2 सप्टेंबर- आज नारळ दिवस!
2 सप्टेंबर- आज नारळ दिवस! नारळाचं उंच झावळीदार झाड मला फार आवडतं. वारा येताच जाहिरातीमधल्या सुंदरीप्रमाणे वार्यावर सार्या झिपर्या वार्याच्या दिशेने सोडून वार्याच्या सोबत खोडासकट मंदमंद हालणार झाड पाहूनच मला ते फार आनंदी वाटतं. कायम उत्साहाने सळसळत असत. ‘समुद्र आहे का कुठे जवळ’ म्हणून उंच वाढून आकाशातून डोकावून बघत असतं. समुद्र किनारपट्टीला वाढणारे माड कायम नार्सिसस सारखे समुद्रात डोकावून डोकवून बघत आपलं सुंदर रुपडं न्याहाळत असतात. समुद्राच्या दिशेने वाढल्यास आपले सर्व खाली पडणारे नारळ समुद्र सुरक्षित कुठेतरी किनार्याला लावेल आणि तेथे ते रुजतील, माझा वंश दूर दूर वाढेल ही सुप्त इच्छाही त्यात असते. समुद्राशी प्रेमाच्या बंधानं बांधलं गेलेलं झाड जवळ इमारत किंवा भिंत असेल तर मात्र घाबरतं आणि त्याच्यापासून दूर वाढण्याचा प्रयत्न करतं. नारळाचे प्रकार तरी किती! बुटका नारळ, उंच नारळ, सिंगापुरी नारळ , फिलिपिनी नारळ, मलेशियन नारळ, उंच बाणवली नारळ, चेन्नगी नारळ, सनंगी नारळ, ह्या कमी की काय !----परवा मारवाड्याच्या दुकानात ‘एक नारळ दे’ म्हणताच तो बाहेरच्या...