आधारशिळा

 

आधारशिळा

एकदा मनू आणि विवेक नावाचे दोन मित्र जंगलात फिरायला गेले. जंगलाचं सौंदर्य बघता बघता दोघंजण किती आतपर्यंत फिरत गेले ते त्यांचं त्यांनाच कळलं नाही. बघता बघता जंगलात जेथे प्रवेश निषिद्ध होता त्या भागात ते शिरले. ह्या भागात अतीशय हिस्र श्वापदं वावरत होती. आपल्याच नादात गप्पा मारत चाललेले दोघं मित्र जंगलातल्या सर्वात उंच पठारावर येऊन पोचले. ह्या पठारावर फारशी झाडं नव्हती. दगड गोटे आणि भल्या मोठ्या शिळा असलेला खडकाळ भाग होता तो!

सभोवार नजर फिरवतांना त्यांच्या लक्षात आलं की एक सिंह त्यांचा पाठलाग करत त्यांच्याच दिशेनी येत होता. दोघांचंही धाबं दणाणलं. काय करावं सुचेनासं झालं. दोघांचे एकमेकांच्या हातात गुंफलेले हात सुटले. वाट फुटेल तिकडे दोघंही पळत सुटले. विवेकला झाडावर चढता येत होतं तो झाडावर चढला. दुसर्‍या मित्राला मनूला मात्र बिलकुलच झाडावर चढता येत नव्हतं. तिथेच असलेल्या एका मोठ्या शिळेमागे तो लपला. सिंह सरळ त्याच्याच दिशेने यायला लागला. त्याला तसं येतांना पाहून मनू अजून अजून अंग चोरून त्या शिळेमागे दडायला लागला. पण त्याला तेथे लपतांना सिंहानी बघितलं होत.

त्यावेळी झाडावर चढलेला विवेक ओरडला, `` अरे बघतोस काय? ज्या शिळेचा तुला आधार वाटतोय ती तुला वाचवू शकणार नाही. लोटून दे ती शिळा त्या सिंहाच्या अंगावर! ''

मनू म्हणाला, ``अरे तू तर निवांत झाडावर चढून बसला आहेस. तुला माहित आहे, मला झाडावर चढता येत नाही हे! वरती बसून मला उपदेश करायला तुझं काय जातय! तू खाली येणार आहेस का मला वाचवायला? ही एक शिळाच माझं रक्षण करू शकेल. तीही तू ढकलून द्यायला सांगतोयस! ही शिळा केवढी प्रचंड आहे दिसत नाही का तुला? मला एकट्याला ती हालणं तरी शक्य आहे का? मला मारायलाच तर तू मला ह्या जंगलात घेऊन नाही आलास? माझ्याशी गोड गोड बोलत फसवून तूच मला ह्या जंगलात घेऊन आला आहेस!'' नाना दूषणं देत तो मित्राची निंदा नालस्ती करू लागला. विवेक मात्र त्याच्याकडे लक्ष देता सर्व शक्ती पणाला लावून शिळा खाली ढकलून देण्यासाठी मनूला परत परत विनवत होता.

सिंह आता दहा पंधरा फूटावर येऊन पोहोचला आणि सिंहाची आणि मनूची दृष्टादृष्ट झाली. मनूच्या सर्वांगातून भीतीची थंडगार लहर सरसरत गेली. आता ही शिळा आपल्याला वाचवू शकणार नाही हे त्याला कळून चुकलं. झाडावरून विवेक त्याला जीव तोडून सांगत होता. ``ढकलून दे ती शिळा.'' आता मात्र भयातूनच एक अजब चैतन्य जन्माला येत आहे असं मनूला वाटलं. त्याच्या सर्वांगातून चैतन्याच्या लहरी दौडत आहेत असा भास त्याला झाला. ती प्रचंड शिळा त्याने सर्व शक्ती पणाला लावून ढकलायला सुरवात केली. हलणारी ती शिळा एका क्षणी थोडीशी हालत आहे असं वाटायला लागलं. हिम्मत धरून त्याने अजून एक जोराचा रेटा दिला आणि ती प्रचंड शिळा डोंगरमाथ्यावरून घरंगळत खाली यायला लागली. उतारावरून गडगडत येणारी ती प्रचंड शिळा येतांना अनेक दगड गोट्यांना घेऊन आपल्याच दिशेने खाली येत असलेली पाहून सिंहही घाबरला आणि पळून गेला.

झालेला प्रकार पाहून मनूचा स्वतःचाच स्वतःवर विश्वास बसत नव्हता. एवढी प्रचंड शिळा आपण कशी काय ढकलू शकलो? त्याला विवेकच्या जीव तोडून सांगण्याची आठवण झाली. स्वतःच्याच विचारातून मनू बाहेर आला. त्याचं लक्ष झाडावर बसलेल्या विवेककडे गेलं. ``धन्यवाद मित्रा! माझ्याकडून हे अवघड काम करवून घेतलंस. तुझं ऐकलं नसतं तर त्या सिंहानी कधीच माझा फडशा पाडला असता.'' मान खाली घालून तो पुढे म्हणाला, `` मित्रा मला माफ कर मी इतका घाबरून गेलो होतो की तू सांगत आहेस ते योग्य आहे हेही मला कळेनासं झालं होतं. त्या जड शिळेलाच मी आधार मानत होतो. तू वरती बसलेला होतास म्हणूनच भीतीरहित अंतःकरणाने विचार करू शकत होतास मला मार्गदर्शन करू शकत होतास. माझ्यातल्या भीतीचा स्पर्श तुझ्या बुद्धीला झाला नव्हता.''

आपल्यालाही आपल्या जीवनात अशा असंख्य शिळा आई, वडिल, भाऊ, बहीण मित्र ह्या रूपात सापडतात. म्हातारपणी तर आपण मुलांनाही ह्या आधारच्या शिळा करून टाकतो. प्रत्येक वस्तूमध्ये एक `पोटेन्शियल एनर्जी' नावाची उर्जा असते. ती वस्तूच्या स्थानमहात्म्य आणि वस्तूमानावर अवलंबून असते. जेवढी ती वस्तू उच्चस्थानी आणि वजनदार तेवढा त्या वस्तूचा दरारा जास्त! ह्याच आई, बाप, बहिण, भाऊ, नवरा, बायको, मित्र तर कधी उच्च पदस्थ ओळखीची व्यक्ती या नावाच्या वजनदार वस्तूंच्या आश्रयाने रहायची आपण सवय करून घेतो.

जेंव्हा संकट आपल्या दिशेने चालून येते तेंव्हा आपल्या जवळच्या मित्राचा विवेकाचा हात आपण सोडून देतो. तो शांतपणे शेजारच्याच झाडावर बसून आपल्याला निरखत राहतो. पारखत राहतो. एकदा विवेकाने हात सोडला की धुळीच्या वादळात उडणार्‍या पानासारखी दिशाहीन आवर्तनं घेत आपण एखाद्या आधाराच्या शिळेमागे येऊन पडतो. संकटाला माहीत असतं आपण कुठे लपलो आहोत. तेही बरोबर हुंगत शिळेपाठीच येऊन पोचतं.

ते जसं जसं जवळ येत, तसा झाडावर जाऊन बसलेला विवेक आपल्याला सांगतो,``ढकलून दे ती शिळा !'' आपण ऐकतोच असं नाही. त्या शिळा काहीकाळ आपलं संकटापासून रक्षणही करतात. पण संकटाची तीव्रता वाढत गेली की तुमचं रक्षण करण्यास त्या असमर्थ ठरतात. मग आपण आपल्या आधार-शिळेलाही नावं ठेवायला लागतो. इतके दिवस जीवलग वाटणारे आप्तेष्ट काहीच कामाचे नाहीत असं वाटायला लागतं. त्यांनी केलेली मदतही आपण विसरून जातो. इतके दिवस त्यांचे दिसलेले सर्व दोषच दोष आता आपल्याला दिसायला लागतात. दुसर्‍यांच्या बारीकसारीक दोषांना अधोरेखीत करणार्‍या एका नव्याच नाटकाच्या अंकाला सुरवात होऊन रंगभूमीवरील पडदा उघडू लागतो. सर्व पात्रांचा आता खरा चेहरा ह्या अंकानी बाहेर आणला असं वाटायला लागतं.

आपल्याला आधारशिळा वाटणार्‍या आपल्या त्या आप्तेष्टांनी आपल्याला प्रत्येक संकटातून वाचवायचा कुठलाही मक्ता घेतलेला नसतो; पण आपण उगीचच समजत असतो तसं. हा निव्वळ गैरसमज असतो. त्यांनी आपला केलेला नव्हे---, तर आपणच आपला करून घेतलेला. एकदा का आपला गैरसमज दूर झाला की मग शेजारच्याच झाडावर सदैव बसलेल्या विवेकाची हाक आपल्याला ऐकू येऊ लागते. वागतो मग आपण तसं! - - एकला चलो रे! एका प्रचंड उर्जेचा स्रोत अंगप्रत्यंगातून अनुभवत! जग जिंकण्याची स्वप्न खरी करायच्या उत्साहाने!

आणि मग अचानक लक्षात येतं, आपण एका वेगळ्याच उंचीवर आहोत. आपण दूर सारलेल्या शिळांखाली संकटांचा चक्काचूर झालेला अहे. वरतून मात्र त्या आधारशिळा आणि ती संकट अगदि लहान लहान दिसायला लागतात. आपण उगीचच का एवढे घाबरलो होतो असं वाटायला लागतं. आधारशिळांकडून मिळणार्‍या मर्यादित आधारची, रक्षणाची व्याप्ती ही त्यांची अंगभूत मर्यादा असल्याचं लक्षात आलं की मग त्यांच्यावर केलेली आगपाखड किती व्यर्थ होती हेही लक्षात येतं. तेंव्हा झालेली आपली उलघाल हास्यास्पद वाटायला लागते. आणि आपल्या इतरांकडून असलेल्या अपेक्षाही तितक्याच निरर्थक! पहिल्यांदा दुसर्‍यांकडून मदतीची अपेक्षा असणंही नैसर्गिक गोष्ट वाटत असते; आता दुसर्‍यांनी यथाशक्ती केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त होणं ही मनाची नैसर्गिकता तयार होते.

अशीच एक शिळा आपण कवटाळून बसतो देव नावाची. त्या मूर्तीतल्या `शिळेपणाचा' त्याग केल्याशिवाय देवत्त्व सापडत नाही. मूर्तीचा त्याग नव्हे शिळेचा त्याग! दूर्वा, फुलं, बेल भंडारा, नैवेद्य दाखवून आपण आपली गैरसमजूत पक्की करत असतो की तो मला पावणार आहे. पेढ्यांचा नैवेद्य दाखवूनही देव पावला नाही तर आपण त्याला दूषणं द्यायला लागतो.

 खरतर विवेकरूपी जगदंबा आपल्या हृदयातच कायमची उभी असते; अढळपणे! तिचं सगुण साकाररूप बाहेरच्या मूर्तीत रेखाटून, आपण तिच्या विविध गुणांची स्तोत्र गात असतो. सहस्र नामातून त्या विवेकरूप देवाच्या गुणविशेषणाची पारायण करत हृदयस्थ शक्तीत ती एकवटण्याचा तो प्रयत्न असतो. बाहेरच्या मूर्तीसाठी गायलेली स्तोत्र मनाला एकाग्र करून मनातल्या शक्तीला जागवत असतात. उठ!, उभी रहा! सिंह त्याच्या चार पंजे आणि एका विकराल मुखाने श्वापदावर तुटून पडतो म्हणून त्याला पंचानन म्हणतात.  तुझ्या हृदयस्थ असलेला शिवही पंचानन आहे.  सर्व शक्तिनिशी तुटून पड संकटांवर!  त्या महा भीषण संकटरूप सिंहालाच ह्या जगदंबेनी तिचं वाहन बनवलय! तशी संकटाची शिंगं पकडून संकटाशी सामना कर! शिळेमागच्या मूर्तीला लागते कर्तव्याप्रति अढळ श्रद्धा!आणि षड्रिपूरूपी माजलेल्या, सतत मे मे ---मी मी ओरडणार्‍या बलिष्ठ मेंढ्याचा बळी!

विवेक जागृत झाला की खर्‍या पूजेचा अर्थ गवसतो. मूर्तीतल्या शिळेचं अपसूक विसर्जन होतं. मूर्तीतील देवत्त्व जागृत होऊन मनात विवेकाचा ज्ञानदीप पेटतो. त्या प्रकाशात कर्तव्यरूप देवाची मूर्ती स्पष्ट दिसायला लागते. मग हातून घडते ती खरी पूजा!

-----------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -


 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -