मान्यवरांचा सत्कार
मान्यवरांचा सत्कार - ``आता मान्यवरांचा सत्कार करु या.’’ भर समारंभात हे वाक्य ऐकलं की मला भीतीने कापरं भरतं. व्यासपीठावर शालीची घडी उघडताच मला भर उन्हाळ्यातही अंगावर काटा उभा राहतो. वा थंडीत घाम फुटतो. शाल उचलतांना तबकात गडगडणारा नारळ आता माझ्याच डोक्यात पडल्याच्या वेदना होतात. भूतबाधा झालेल्यावर मोराच्या पिसांचा कुंचा फिरवून त्यानी `झाडानी धरलेल्याला’ झोडपतात त्याप्रमाणे पुढे येणारा पुष्पगुच्छ “मला कुठलीही मोठेपणाची बाधा झाली नाही” असं मी केविलवाणेपणाने सांगत असतांनाही माझ्यावर फट्टकन बसतो आहे असं मला वाटतं. कित्येकवेळा फुलांच्या पार्श्वभागात काड्या खुपसून त्यांना तारा गुंडाळून सरळ उभं रहायला भाग पाडणारे फुलवाले मला पोर्च्युगीज वा इंग्रजांइतके क्रूर वाटतात. कधी कधी घरात उन येत नसतांना वा बाल्कनी झाडांनी ओथंबून वाहात असतांना मिळणारी झाडाची/ तुळशीची कुंडी ‘ठेव आता मला तुझ्या डोक्यावर आणि चल पंढरीला’ म्हणून मला घराबाहेर ढकलत असते. चिमुकल्या कुंडल्यांपासून थेट पामच्या प्रशस्त झाडांपर्यंत असा भला मोठा स्पेक्ट्रम माझ्या घरात येण्यासाठी आसुसलेला असतो. त्यांनी घरात प्रवेश कर...