वाद्ये
वाद्ये काहीतरी काम करत होते स्वयंपाकघरात. म्हणजे हात काम करत होते. पाय हातांना पूरक वागत, देहाला जेथे न्यायचे तेथे नेत होते. सवयीनी सर्व गोष्टी पुढे पुढे चालल्या होत्या. मन मात्र घरातून बाहेर पडून बाहेरच्या गल्लीबोळातून कोणाचा तरी माग घेत चाललं होतं. कुठल्याशा तरी सुरांचा! सूरांचा मंद मंद होत चाललेला ध्वनी सांगत होता की सूर ह्या गल्लीतून पुढच्या गल्लीत वळले होते. घरापासून दूर दूर जात होते. कामाच्या गडबडीत सुरांचं विरून जाणं विसरलं गेलं पण काही वेळातच सूर परत पुढच्या गल्लीत वळून मागे परतले होते. त्यांची तीव्रता रेडिओचं बटण हळूच किंचित उजवीकडे सरकवल्यासारखी वाढत होती. सापशिडीवरून वरखाली, डावीकडे, उजवीकडे फिरल्यासारखे बासरीचे सूर शनिवार आणि रविवारची सकाळ आमच्या गल्लीबोळातून फिरत रहात आणि माझं मन त्या मागे फिरत राही. बासरीवाला काही पन्नालाल घोष वा हरिप्रसाद चौरसियांशी जवळीक साधणारा होता अशातलाही भाग नाही. पण ती धून गल्लीबोळातून वातावरणाला भेदत; पण एखाद्या मंद सुवासासारखी पसरत गेली की घराघरातील कोणी बिछान्याला खिळलेले रुग्ण, कोणी एकटे एकाकी राहणारे उदास जीव, म्हातारे कोतारे मोहरून...