वाद्ये

 

वाद्ये

काहीतरी काम करत होते स्वयंपाकघरात. म्हणजे हात काम करत होते. पाय हातांना पूरक वागत, देहाला जेथे न्यायचे तेथे नेत होते. सवयीनी सर्व गोष्टी पुढे पुढे चालल्या होत्या. मन मात्र घरातून बाहेर पडून बाहेरच्या गल्लीबोळातून कोणाचा तरी माग घेत चाललं होतं. कुठल्याशा तरी सुरांचा! सूरांचा मंद मंद होत चाललेला ध्वनी सांगत होता की सूर ह्या गल्लीतून पुढच्या गल्लीत वळले होते. घरापासून दूर दूर जात होते. कामाच्या गडबडीत सुरांचं विरून जाणं विसरलं गेलं पण काही वेळातच सूर परत पुढच्या गल्लीत वळून मागे परतले होते. त्यांची तीव्रता रेडिओचं बटण हळूच किंचित उजवीकडे सरकवल्यासारखी वाढत होती.

सापशिडीवरून वरखाली, डावीकडे, उजवीकडे फिरल्यासारखे बासरीचे सूर शनिवार आणि रविवारची सकाळ आमच्या गल्लीबोळातून फिरत रहात आणि माझं मन त्या मागे फिरत राही. बासरीवाला काही पन्नालाल घोष वा हरिप्रसाद चौरसियांशी जवळीक साधणारा होता अशातलाही भाग नाही. पण ती धून गल्लीबोळातून वातावरणाला भेदत; पण एखाद्या मंद सुवासासारखी पसरत गेली की घराघरातील कोणी बिछान्याला खिळलेले रुग्ण, कोणी एकटे एकाकी राहणारे उदास जीव, म्हातारे कोतारे मोहरून येत होते. त्याला घरी बोलवून एकदोन घटका त्याच्या सुरांसोबत; कदाचित त्या वृंदावनातील यमुनातटीचा अनुभव घेत असावेत.

एकदा सुट्टीला घरी आलेला लेक  घरी येत असताना त्या बासरीवाल्याला घरी घेऊन आला. ‘‘आई हे बघ मी कोणाला घेऊन आलो आहे. मी येत असताना हा गल्लीतून बासरी वाजवत चालला होता. त्याला घेऊन आलो.’’ बसरीवाला पाहून नातवंडही हरकून गेली. पुढच्या पिढीलाही मोह घालणारा बासरीचा सूर कृष्णकाळापासून आजपर्यंत शाश्वत आहे असं वाटलं  घटकाभर आम्ही त्याची बासरी ऐकली. तो गेला. त्याच्याकडून विकत घतलेल्या बासरीने मात्र घरात कान किटवून टाकले. फू फू फू फू करून त्यातून कुठलं गाणं वाजतयं हे आज्जीला ओळखू आलं नाही की एक गोंडस फटका खायला लागत होता. शेवटी कशीबशी बासरी लपवून ठेवल्यावर सर्वांनी सुस्कारा सोडला. एवढा अपवाद वगळला तर ---

अशी ही सर्वांनाच बोलावणारी बासरी त्या गोकुळातील गोपींची आठवण करून देते. कृष्णाच्या दूरवर वाजणार्‍या बासरीने  हातातलं काम सोडून त्या सूरांच्या दिशेने जात कृष्णापर्यंत पोचत. गायीसुद्धा गवत चरायचं विसरून कृष्णाजवळ गोळा होत आणि त्याच्याजवळ बसून रहात. ही किमया बासरीची का कृष्णाची? जेवढी कृष्णाची तेवढीच बासरीचीही!

कारण दुसरा बासरीवाला आठवला तो गावातल्या उंदरांना बीळातून बाहेर यायला भाग पाडणारा! सुरांवर लुब्ध झालेल्या उंदरांना आपल्या स्वतःचाही विसर पडायला लावून नदीत बुडवून टाकणारा! उंदरांनंतर घराघरातील लहान मुलांना घरातून बाहेर पडायला भाग पाडून सगळ्यांना गोळा करून नदीकडे नेणारा बासरीवाला ------!!!

बासरी एकट्याने निर्जन जागी, निसर्गाच्या सानिध्यात एखाद्या झाडाखाली बसून वाजवावी आणि तिचे सूर मंद वार्‍यासोबत दूरवर पसरत जावेत. दूरदूरच्या हृदयांना घरातून ओढून वनात घेऊन यायची क्षमता बासरीशिवाय कुठल्याच वाद्यात नाही.

असं वाटलं, प्रत्येक वाद्याची काही ताकद असते. काही स्वभाव असतो. काश्मिरच्या खळखळणार्‍या निर्झरांचं संगीत घेऊनच संतूर जन्माला आलं असावं. त्याच्यासोबत मनही ताजंतवानं होऊन निर्झरासारखं बागडायला लागतं. तर सनईच्या रम्य सूरातून सडा रांगोळ्या उत्सवाची आणि उत्साहाची मंगल सुरवात जगाला प्रसन्नतेचा संकेत देत असावी.

संवादिनी सर्वांशी मिळवून घेणारी! स्वतःचा प्रभावीपणा लपवून मूळ आवाजाची प्रभावळ होऊन राहणारी. तिचं कुठल्याच वाद्याशी भांडण नाही. एखादा भविष्यवेत्ता भेटला तर तो संवादिनीची तूळ, कर्क बिर्क काही तरी मनमिळावू रास असल्यामुळे ती अशी मनमिळावू आहे असं सांगेल असं वाटतं.

मित्रांसोबत सहलीला जाऊन एखाद्या शांत जागी नदीकाठी तंबू टाकून बसावं आणि हलकेच कोणी खिशातून माऊथऑर्गन काढून वाजवावा तर, कोणी त्याला गाणं गाऊन साथ द्यावी तर कोणी बुलबुलतरंगावर उडती धून वाजवावी.

लढाईमधे थोडा विश्रांतीचा वेळ मिळाला तर आपल्या तंबूत आलेल्या सैनिकाने आपल्या छोट्याशा तंतुवाद्यावर वाजवलेली धून ऐकायला महिषासुर मर्दिनीही हळुच त्याच्या तंबूत डोकावते आणि त्या स्वरांमधे रमून जाते. असं महिषासुर मर्दिनी स्तोत्रात सुंदर वर्णन आहे.

लढतिच सैनिक, संगर भीषण, घेति विराम, कधी शिबिरी

मधुरचि छेडिति तार कुणी, स्वरसुंदर त्यातचि तू रमशी

मोराला असलेल्या पिसार्‍याने मोर चिमणीसारखा कोणाच्याही घरात ये जा करताना दिसत नाही. सतारीचंही तसच! उगीच पिकनिक, रस्त्याच्या कोपर्‍यावरील नाट्य अशा जागा सतारीसाठी नाहीत. भव्य मैफिल; मोठ्या आदराने गवसणीतून काढून तिचा व्यासपीठावर झालेला प्रवेश--- खास सतारीसाठी विशिष्ट आसनात स्थानापन्न होत कलाकाराने नजाकतीने हातात धारण केलेली सतार अथवा वीणा पाहिली की हे वाद्य सरस्वतीचच ह्याविषयी कोणाचे दुजे मत होणार नाही. मोर, हंस, पोपट ह्या सरस्वतीमाते जवळ वास्तव्य करणार्‍या डौलदार पक्ष्यांच्या जोडीला डौलदार वीणा वा सतार हवीच! मैफिलीत बसूनच सतार वीणा ही वाद्य अनुभवायला हवीत.

तबल्याने सर्वांना शिस्तीत ठेवायचं काम करावं. तबला गणिताच्या करड्या मास्तरांसारखा कोणी कितीही कोलांट्या मारल्या तरी शेवटी बरोबर उत्तरावर येण्याची शिस्त सांभाळत आणि सांभाळायला लावत सर्व गायक वादकांना स्वतःच्या तालावर नाचवतो. ढोलकं, दिमडी आणि तुणतुणं लावणीला नसले तर ती लावणी कसली!

 गणपतीचं स्वागत करायला डंका (लहान नगार्‍यासारखी जोड वाद्य)च पाहिजे. त्याच्या काड्यांनी (टिपरु) कातड्यावर काढलेला तऽर्ऽर्ऽर्ऽर् असा मुलायम थरथराट गणपतीलाही आदितालावर थिरकायला लावेल असा असतो.

गणपती आणि ढोल हे मात्र कुठेतरी न जुळणारं प्रकरण वाटतं. ढोल हे रणवाद्य महिषासुराशी लढणार्‍या देवीच्या लढाईप्रसंगाशीच मेळ दाखवतं. गणवेशधारी रुबादार सैन्याचं दायेबाये करत शिस्तबद्ध होणारं संचलन ड्रम्स, ढोल ह्यांच्या तालावर, बिगुलच्या ललकारीवर, ट्म्पेट्सच्या दुमदुमून टाकणार्‍या आवाजासोबत, झेंड्याच्या डौलदार फडकण्यासोबत मनात अभिमान, वीरश्री उत्पन्न करतं.   लढाईची सुरवात

तस्य सञ्जनयन् हर्ष कुरुवृद्धः पितामहः ।

सिंहनादं विनिद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतावान ।।

अशी कुरुश्रेष्ठ पितामह भीष्मांसारख्या ज्येष्ठ सेनापतीच्या शंखनादानेच व्हायला हवी.

घंटा, टाळ्या आरतीला तर; झांजा, पखवाज अभंगाला सोबत पाहिजेत.  एका बाजूला राष्ट्राच्या सामाजिक पातळीवर वीरश्री निर्माण करणारं सैन्य संचलन तर दुसर्‍या वैय्यक्तिक बाजूला मनातील श्रद्धा जागवणार्‍या वारकर्‍यांच्या दिंड्या!  दोघांचीही माणसाच्या मनावर प्रचंड पकड ! झांजा पखवाज, अभंग आणि उंच उड्या मारत नाचत जाणारी शुभ्र धोतर सदरा टोपीतील वारकरी मंडळी सर्वांच्याच मनात श्रद्धा जागवण्याचं काम करतात.

किसी लोलूप नजर ने हमारे मुक्ति को देखा तो --

उठेगी जलप्रलयकी आग जिसपर क्षार सोयी हैं ।

असा सिंहनाद करत राष्ट्राची इंचभर जमीन शत्रूला देणार नाही हे सांगणारी (रण)वाद्य पंढरीच्या वारीत अभंगासोबत आली की वैय्यक्तिक जीवनात श्रद्धा भक्ती वैराग्याला सोबत घेऊन येतात आणि मी तू पणाची थेट बोळवण करून टाकतात.

--------------------

अरुंधतीप्रवीणदीक्षित-  

3 ऑक्टोबर 2026

Comments

Popular posts from this blog

अनुवाद-पारिजात (स्तोत्र अनुक्रमणिका)

राजा भोज आणि अमूल्य हिरा

ललित लेख (अनुक्रमणिका)