नक्षलग्रस्त -

 

नक्षलग्रस्त -

IPSOWA - IPS Officers’ wives’ association. महिन्यातून एकदा आम्ही काहीतरी कायक्रम आयोजित करून एकमेकींना भेटायचो. त्या निमित्ताने जुन्या आणि नव्यांच्या ओळखी, गप्पा, विचारांची देवाणघेवाण, जुने गमतीदार प्रसंग, आणि त्याच बरोबर साड्या, ड्रेसेस मिरवण्याची एक संधीही! मुंबईभर सुदूर सर्वजणी विखुरलेल्या असल्याने जास्तीत जास्त मेंबर्स यावेत यासाठी काहीतरी शक्कल लढवायला लागायची. काहीतरी चांगला कार्यक्रम द्यायला लागायचा. चहासोबत काहीतरी छानशा रुचकर पदार्थांची निवड करायला लागायची. कार्यकारणी मध्ये असलेल्या तरुण ऑफिसर्सच्या तरुण पत्नी ही सारी कामं उत्साहाने आणि बारीकसारीक तपशील सांभाळत इतक्या सुबक सुंदर करत की सिनियर्सना त्यांचं कौतुक करणे आणि आलेल्यांना स्वागताचे चार शब्द संबोधित करणे ह्या पलिकडे फारसं काम नसे. कधीतरी मुंबईत एखादी कॉन्फरन्स असेल तर  मुंबई बाहेरच्याही आमच्या सदस्यांना आम्ही बोलवत असू.  

पण त्या दिवशीचा कार्यक्रम वेगळा होता. मी पोलीस-मेसमधे पाय टाकताच टिव्ही ची सारी टीम त्यांचे कॅमेरे, लाइट  त्यांची बाकी सारी उपकरणं सिद्ध करतांना दिसली. मीही जरा चक्रावले. तेवढ्यात मला माझ्या सिनियरनी सांगितलं की, ``आज कार्यक्रमाच्या सुरवातीचं स्वागतपर भाषण तू करायचएस. आणि आजच्या कार्यक्रमासाठी आदेश बांदेकरजी येऊन बसले आहेत. तुम्ही भेटा आणि सुरवात कशी करायची ते ठरवा. इतर वेळेला बोलणं ठीक होतं. आज मला प्रचंड तणाव आला होता. मी बांदेकरांशी म्हणजे  सर्व ललनांच्या लाडक्या आदेशभाऊजींशी बोलायला गेले. आम्हाला कार्यक्रम कसा सुरू करावा? कार्यक्रम कितपत उभा राहील काहीच लक्षात येत नव्हतं. ``पैठण्या द्यायच्या का?’’ आदेशजी विचारत होते. ``मला माहित नाही.’’ मी मान हलवली. ``आणल्या आहेत का?’’ माझ्या विचारण्यातही दम नव्हता.

``होय!!! आणल्या आहेत.’’

‘‘पण---आत्ताच नको ठरवायला ----’’

 ‘‘ठिक आहे! कार्यक्रम कसा सुरू होतो त्यावर ठरवू.’’

 मी म्हटलं, आदेशजी मी----  मी फक्त स्वागताचं एक वाक्य बोलून `आज तुम्हाला सर्वांना भेटायला  तुमचे लाडके भाऊजी आले आहेत.’ असं म्हणीन बाकी तुम्ही पाहून घ्या.

 तेवढ्यात कुणी तरी येऊन सांगितलं, मॅम चला --- चला बसेस आल्या आहेत. सर्वजणी पोचल्या आहेत. स्वागताला जायला पाहिजे. बसेसमधून उतरणार्‍या अठरा एकोणीस वर्षांच्या मुलींपासून ते तीस पस्तीस वर्षांच्या तरुणी पाहून घशात आवंढा अडकत होता. त्यांचं स्वागत करायला हसर्‍या चेहर्‍याने पुढे आलेल्या आमच्या मुलीही कुठे तरी मागे जाऊन डोळे पुसून येत होत्या. प्रत्येक कार्यक्रमाला जास्तीजास्त उपस्थितीसाठी प्रयत्न करणार्‍या आम्हा सर्वांनाच इतक्या जणी??? असं वाटून हळहळायला होत होत. माझ्या मुली, सुना शोभतील अशा ह्या सर्वजणी गडचिरोली, गोंदिया हया नक्षलग्रस्त भागातून आलेल्या होत्या. नक्षल्यांशी  दोन हात करतांना आमचे जे शूर जवान, अधिकारी शहीद झाले होते त्यांच्या पत्नी होत्या. काहींच्या कडेवर काही महिन्यांची बाळे होती. तर काही चार पाच वर्षांची छोटी लेकरं आईचा पदर धरून तिच्यामागे लपत आत येत होती. सगळ्यांच्याच चेहर्‍यांवर ओढून आणलेलं हसू मनाला जास्त भकास करत होत. एवढ्या जणी? दोन बसेस भरून?

नक्षलवादी, वनवासी भागात अत्यंत निरागस, भोळ्याभाबड्या अशा वनवासी बांधवांना शहरी सुधारणांपासून कायम वंचित ठेऊन, ते अत्यंत मागास राहतील, त्यांना त्यांच्या पाड्यांच्या बाहेरच्या लोकांबरोबर व्यवहार करण्याचा, वावरण्याचा जराही आत्मविश्वास राहणार नाही ह्याची काळजी घेतात. नक्षलवादी जे म्हणतील तेच निमूटपणे खरं मानणं वा पटलं नाही तरी ते भीतीपोटी मान्य करणे त्यांना भाग असते. त्यांच्या विरुद्ध आवाज उठवण्याची तर त्यांची शामतच नसते. कारण सर्वांना परिणाम माहित असतो. परिणाम एकच--- हत्या! अत्यंत क्रूर प्रकारे हत्या.

 परिणामी नक्षल्यांची प्रचंड दहशत ह्या भागांमधे कायम असते. ती राहण्यासाठी हे नक्षलवादी सर्व मर्यादांच्या पलिकडे कितीही खाली जाऊ शकतात. कुठल्याही अद्ययावत सोई सुधारणा, रस्ते, शाळा, बँका, पोलीस स्टेशन्स होऊ न देण्यासाठी ते कटिबद्ध असतात. हे नक्षली सरकारविरोधी पवित्रा घेऊन असतात. त्यामुळे सरकारी आदेश राबवणारे, कायदा आणि सुव्यवस्था अमलात आणणारे विशेषतः पोलीस हे त्यांचे नंबर एकचे शत्रू असतात.  सरकार कोणाचं आहे याचं त्यांना सोयरसुतक नसतं. इथे आमची दहशत आमचं गुंडाराज चालेल ह्या एका उद्दिष्टाने ते त्यांच्या मधे जे जे येईल ते उद्ध्वस्त करतात.  सरकारने नवीन केलेले रस्ते बाँबने उडवणे, नद्यांवरचे पूल उडवणे, शाळांवर बाँब हल्ले करणे; कोणी मुलगा पोलीसात भरती झाला की त्याच्या घरच्यांच्या क्रूर-- अतिक्रूर हत्या करणे, घरातल्या मुलामुलींनाच पळवू नेऊन त्यांना नक्षल बनण्यास भाग पाडणे. त्यांच्याकडूनच त्यांच्या स्वतःच्या आईवडिलांची हत्या करवणे; कोणी पोलीसात भरती झाला हे कळलं तर त्याला घरचे आजारी आहेत अशी खोटी तार पाठवून, बोलावून, रस्त्यातूनच उचलून, त्याला क्रूर रीतीने ठार करून, त्याचं प्रेत वेशीवर टांगून ठेवणे;  त्यांना लागणारा पैसा तेथल्या लोकांकडून सक्तीने बंदुकीच्या नळीच्या धाकावर उकळणे, त्यासाठी तेथे बांधकाम वा काही उद्योग चालू करणार्‍यांकडून  सक्तीने वसूली करणे, नाहीतर त्यांना ठार करणे  असे हे नक्षल्यांचे उद्योग. जसा हिमनगाच्या छोट्याशा दिसणार्‍या टोकाखाली दहापट अस्ताव्यस्त पसरलेला हिमनग पाण्याखाली असतो त्याप्रमाणे, रानात राहणार्‍या ह्या नक्षल्यांकडे अद्ययावत शस्त्र कुठून येत असतील? असा प्रत्येकच सामान्य माणसाला पडणारा प्रश्न असेल. तर ह्या पाठिमागे शहरी नक्षल आणि शहरी नक्षल्यांमागे अनेक अनेक परदेशी हात भारताला खिळखिळं करण्यासाठी, भारताचे तुकडे तुकडे करण्यासाठी कटिबद्ध  असतात. वरवर भारताशी सलोख्याने, चांगले वागणारे देशही त्यांच्या स्वार्थासाठी आपल्याशी वरवर चांगले वागत असतात पण आतून मात्र भारत पोखरण्याचेच उद्योग करत असतात.

पण सरकारला मजबूत करणारे, कायदा सुव्यवस्था राबवणारे, बांधकाम, शाळा, उद्योग ह्यांना संरक्षण देणारे पोलीस कायमच नक्षल्यांच्या टार्गेटवर असतात. त्यांचे लक्ष्य असतात. जशा नक्षल्यांच्या हालचाली पोलीसांना देणारे खबरे असतात त्याप्रमाणे पोलीसांच्या हालचाली, त्यांच्या कारवाया कळण्यासाठी नक्षली वनवासींना अतोनात त्रास देतात.

अशा नक्षल्यांशी अत्यंत हिमतीने आणि हिकमतीने लढून त्यांना धूळ चारणार्‍या ह्या आमच्या पोलीस दलातील अनेक तरुणांना शहीद व्हाव लागलं. आज परिस्थिती खूप वेगळी आहे. ह्या समस्येवर आता उत्तम नियंत्रण आपण मिळवलं आहे एवढच एक समाधान!

सर्वांचं स्वागत करून सर्वजणी पोलीस-मेसच्या हॉलमधे खुर्च्यांवर आसनस्थ झाल्या आणि मी स्वागताचं भाषणं करायला माईकसमोर उभी राहिले. पोलीसांच्या बृहद् परिवारात आमच्या मुलींच मुंबईत आल्याबद्दल स्वागत करून मी सर्व वयाच्या ललनांचे, त्यांचे लाडके भाऊजी त्यांना भेटायला आल्याचे सांगितले. कोण ते नाव मात्र सांगितलं नाही. सर्वजणी मागे दरवाजाकडे वळून बघायला लागल्या आणि समोरच्या दरवाजातून, सर्व महिलांच्या मधून स्टेजवर येणार्‍या मार्गावरून आदेश भाऊजी स्टेजवर येतांना पाहून हा!!! आदेश भाऊजी !!!!’’ असा एकच आश्चर्याचा, आनंदाचा उद्गार त्या तरुणींमधून आला. त्या सर्वजणी क्षणभर दुःख विसरल्या. त्यातील 18-19 वर्षांची मुलगी सहजपणे बोलली, तुम्ही नुसतेच आला का पैठण्याही घेऊन आला आहात? आणि सगळ्या हॉल मधे भरून राहिलेली एक विचित्र शांतता आणि उदासीचं सारं मळभ झरझरझर दूर झालं. आदेशजींनी पैठण्याही आणल्याचं सांगत बोलायला सुरवात केली. गडचिरोली, गोंदियातील दुर्गम भागात राहणार्‍या साध्यासुध्या आमच्या मुली हरखून गेल्या. आदेशजींनी बोलता बोलता त्या तरुणीला विचारलं, माऊली त्या दिवशी काय झालं?भळभळणारया जखमेवर कशीबशी धरलेली खपली निघावी आणि जखम भळभळायला लागावी तशी त्या दिवशीची भयानक कहाणी पुढे आली. नक्षल्यांवर कारवाई करायला निघालेल्या एका पोलीसांच्या गाडीची माहिती नक्षल्यांना मिळाली आणि आख्खी गाडी भुईसुरंग लावून उडवली गेली.----- काही काही हाती आलं नाही.  एक एक जण बोलती होत होती. नक्षल्यांसोबत झालेल्या चकमकीत चार चार नक्षल्यांना यमसदनाला पाठवून कोणी गेला होता. कोणी पोलीस स्टेशनवर झालेल्या हल्ल्यात, कोणी तेथील माणसांना वाचवतांना, कोणी तेथील कंत्राटदारांच्या कर्मचार्‍यांना वाचवतांना. आमची सर्व तरुण मुलं अद्ययावत शस्त्र असलेल्या ज्या नक्षल्यांकडून मारली गेली त्यांच्या मानवी हक्कांबाबत कोणी संवेदनशीलता दाखवत नाही पण नक्षली मारले गेले तर मात्र त्यांच्याबाजूने गळा काढायला सर्वांच्या लेखण्या सरसावलेल्या असतात ह्याचं अतोनात दुःख होत होतं.

पंपासरोवराच्या निसर्गरम्य परिसरात श्रीरामसुद्धा थोडाकाळ सीताहरणाचं दुःख विसरले त्याप्रमाणे पैठणीच्या पोतात आमच्या मुली काही काळ त्यांचं दुःख विसरल्या जरी नाहीत तरी थोडं हलकं करु शकल्या.

त्यांना चहासाठी बोलावतांना मुलं घुटमळत होती. पुढे येत नव्हती. शेवटी एकाला विचारलं, तुला इथला खाऊ आवडत नाही का? आम्हाला खाण्यापूर्वी हातपाय धुवायचे आहेत ह्या उत्तराने मलाच माझी लाज वाटली. त्यांना हात,पाय धुवायला घेऊन गेले. स्वच्छ हात पाय धुवून पुसून मुलं बसली. हात जोडून प्रार्थना म्हणून प्रत्येकानी अत्यंत सावकाश खायला सुरवात केलेली पाहून ह्यांना वनवासी मुलं म्हणायचं का उच्च सुसंकृत म्हणायचं हा प्रश्न माझं मन मला विचारू लागलं.त्यांना सर्वांना मनातल्या मनात शुभाशीर्वाद देण्यापलीकडे मी काही करू शकत नव्हते.

आज 21 ऑक्टोबर. पोलीस शहीद दिन! सर्व शहीदांना विनम्र अभिवादन!

---------------------  

लेखणी अरुंधतीची -

  

 

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -