शिल्पी -

 

शिल्पी -

उत्तम शिल्पकार होता तो. त्याने घडवलेल्या शिल्पांकडे लोक तासन् तास बघत उभे रहात. वाटे जणु खरी माणसं! -- - खरेच प्राणी! -- ह्यानी जणु मंत्र टाकून दगडात बंदिस्त करून ठेवले आहेत. आत्ता हातात घेतलेली काम परत करायला लागतील. थिरकणारी नृत्यांगना पटकन एक गिरकी घेईल. पायाला अंग घासणारी मांजर म्यॉऽऽव करत दूध मागेल. किंवा घराच्या बाहेर गवतात चरणारा मस्त रेडा फाटकाचं दार उघडून आत येताच अंगावर का शिंगावर घेईल.

रेवा नदीच्या काठी बालपण गेलेल्या विरिंचीला बालपणापासूनच शिल्पकलेत एवढी गती होती की नदीत स्नान करता करताही त्याला रेवाकाठच्या कडेकपारीत शिल्पच उमटलेली दिसायची. प्रत्येक दगडात त्याला कसली ना कसली मूर्ती दिसत असे. तो म्हणायचा, ``मूर्ती तर दगडातच असते. मी फक्त त्यातील नको असलेला भाग काढून टाकतो.'' बघता बघता विरींचीची कीर्ती देशोदेशी पसरू लागली. कलेचा हात धरून कमलाही घरात आली. पण विरींचीचं मन कलेच्या अभ्यासाव्यतिरिक्त कशातच गुंतलं नाही.

विरींचीचा छोटा मुलगा विष्णु विरींचीच्या हातांकडे बघत बघत छोट्या छोट्या मूर्ती घडवू लागला आणि सारेजण म्हणू लागले बापसे बेटा सवाई होणार. विरींचीही विष्णूच्या प्रत्येक कलाकृतीत बारीक लक्ष देऊन विष्णूला अजून कुठे आणि कशा सुधारणा आवश्यक आहेत हे समजावून सांगत असे. बघता बघता विष्णूही मोठा झाला. अनेक पुरस्कारांनी सन्मानित होत गेला. तरीही विरींची त्याच्या प्रत्येक शिल्पात अजून सुधारणा सुचवत राही. नवीन लग्न होऊन घरात आलेल्या राधेला मात्र बापाने मुलामधे अशा सतत चुका काढण्याचा राग येत असे. एकदा ती विष्णूला म्हणाली, ``तुमची शिल्पकला इतरांनी इतकी नावाजली तरी मामंजी मात्र सारखे सारखे तुमच्यात चुकाच काढत राहतात. त्यांना तुमचं काहीच पसंत पडत नाही.'' विष्णु म्हणे, ``अगं, लहानपणापसून ते माझी कला बघत आहेत. त्यांनाच माझ्या कलेतील दोष माहीत आहेत.'' ``मला तर तुमची कला मामंजींहून कित्येकपटींनी सरस वाटते. पण म्हातार्‍याला तुमचा हेवा वाटतो. कध्धी मेला चांगलं म्हणत नाही. तुमच्याशीच मेली त्यांची स्वतःची तुलना! तुमच्याबरोबरच स्पर्धा! बघवत नाही त्यांना तुमचं यश!'' कळत स्वतःच्या स्तुतीने विष्णु सुखावला तरीही म्हणाला, ``काहीतरी काय राधा! वडील आहेत ते माझे.'' राधानेही डोळ्यातून टिप गाळायला सुरवात केली आणि विष्णु नरम झाला. वडील आपल कधी साधं कौतुकही करत नाहीत ही एरवी लक्षात आलेली गोष्ट राधेमुळे विष्णूच्या मनात कुठेतरी सुप्तपणे सलत राहीली.

दुसर्‍या दिवशी त्याने एक मूर्ती घडवायला सुरवात केली आणि त्याचवेळी विरिंचीने त्याला काही सूचना द्यायला सुरवात केल्यावर विष्णुच्या मनात राधेचे शब्द घुमु लागले. ``मला तर तुमची कला मामंजींहून कित्येकपटींनी सरस वाटते. पण म्हातार्‍याला तुमचा हेवा वाटतो. कध्धी मेला चांगलं म्हणत नाही. तुमच्याशीच मेली त्यांची तुलना! तुमच्याबरोबरच स्पर्धा! बघवत नाही त्यांना तुमचं यश!'' विष्णुला प्रथमच वडिलांचे शब्द असह्य झाले. तिरीमिरी आल्यागत तो म्हणाला, ``बाबा, एखाद्यावेळेस तरी माझ्या शिल्पाचं कौतुक करा. मी माझ्या लहानपणापासून बघतो आहे. इतरांपेक्षा मी कितीतरी पटींनी चांगलं काम केलं तरी तुम्ही कायम मला बोलतच आला. दर वेळेला सूचना. दर वेळेला सूचना! नको वाटू लागलय मला इथे राहणं देखील!"

विष्णुच्या अशा अचानक बोलण्याकडे विरींची एकदम आश्चर्याने पाहू लागला पण सुबुद्ध विरिंची सर्व जाणून गप्प बसला. तरीही व्हायचं तेच झालं. एक दिवस विष्णू घर सोडून निघून गेला. हरीची इच्छा म्हणून विरींची शांत होता. रोजचा त्याचा नेम थोडाही चुकला नाही की बदलला नाही. राधा मनोमन खूश होती. तिला जे पाहिजे होतं तसच झालं होतं. राधेच्या वडिलांनीही 'झाडाखाली झाड वाढत नाही' म्हणत विष्णुचं स्वतःच्या घरी स्वागत केलं.

विष्णु मूर्ती बनवू लागला आणि त्याचं अलोट कौतुक होऊ लागलं. तरीही बाबांनी आपल्या मूर्तीचं कौतुक केलं नाही आणि ते त्यांना करायलाच लावीन ह्या भावनेनी विष्णूचं मन पेटून उठलं. त्याने स्वतःच कौशल्य पणाला लावून सरस्वतीची एक विशेष मूर्ती तयार करायला घेतली.

मुलगा सून घरातून निघून गेल्यावरही इकडे विरींची 'ठेविले अनंते तैसेची रहावे' म्हणत त्याच्या रोजच्या दिनक्रमानुसार रेवा नदीमधे पहाटेच स्नानास जात असे. सूर्योदयास सूर्याला अर्घ्य देऊन रेवाच्या काठावरील शिळा बघून कोठल्या शिळेत काय शिल्प तयार होईल ह्याचा विचार करत असे. रेवाच्या काठावर वाढलेल्या वनातून त्याचा जाण्या येण्याचा रोजचा मार्ग सर्वांनाच सुपरिचित होता.

एक दिवस विष्णु तन मन ओतून तयार करत असलेली सरस्वतीची मूर्ती तयार झाली. विरींचीच्या रोजच्या येण्याजाण्याच्या मार्गावर त्याने ती मूर्ती ठेवली आणि वडील स्नान करून परत यायची वेळ होताच तेथून जवळच असलेल्या झाडामागे तो लपून बसला. विरींची हरीनाम घेत परत येत असतांनाच त्याला ती सुंदर मूर्ती दिसली. तो बघतच उभा राहिला. ``आहाहा! किती प्रमाणबद्ध, किती सुंदर मूर्ती! हाव भाव तर बघत रहावेत इतके विलोभनीय! ज्या मूर्तीकारानी घडवली तो जगातला सर्वश्रेष्ठ मूर्तीकार होऊ शकतो.'' ते ऐकत झाडामागे लपून बसलेला विष्णु पटकन पुढे आला. `` बाबा मी बनवली ही मूर्ती. तुम्ही माझ्या कलेला एकदा तरी चांगलं म्हणावं असं मला वाटत होतं. माझी इच्छा पूर्ण झाली."

विरींचीच्या डोळ्यातून मात्र अश्रुधारा वाहू लागल्या. त्याच्या घशात अडकलेला अस्पष्टसा हुंदका त्याच्या दाबून धरलेल्या ओठातून बाहेर पडल्यावर विष्णू उपहासाने म्हणाला, ``काय झालं बाबा? मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ शिल्पी आहे हे तुम्हाला रुचलं नाही का?'' डोळे पुसत विरिंची म्हणाला, ``नाही रे बाळा! तुझ्यात असलेले सर्वश्रेष्ठ शिल्पी होण्याचे गुण मी लहानपणीच हेरले होते. तुझ्यामधे सतत प्रगती व्हावी म्हणून तुझं कौतुक करता तुझ्या लहान लहान चुका सुद्धा मी सतत तुला सांगत होतो. तू त्या सुधारत होतास आणि हळु हळु तुझ्यात होणारी सुधारणा तुला सर्वश्रेष्ठ शिल्पीच्या मार्गावर नेत होती. श्रद्धावान् लभते ज्ञानम्। ज्याची गुरूवर श्रद्धा असते त्यालाच सर्व ज्ञान प्राप्त होत. अश्रद्ध माणूस कायम अनेक शंकांनी ग्रस्तच राहतो. कामावरच लक्ष घालवून बसतो.

जोपर्यंत तुझी माझ्यावर निःसीम श्रद्धा होती तोपर्यंत मी सारखं सारखं रागवत आहे असं तुला कधीच वाटल नाही. जशी तुझी श्रद्धा डळमळीत झाली, तू घर सोडून गेलास. माझी प्रत्येक गोष्ट तुला विपरीत वाटु लागली. आज माझ्या तोंडून ऐकलेली तुझी प्रशंसा आता तुला कधीच सुधारू शकणार नाही. आता तुझी प्रगती इथेच थांबली. सर्वश्रेष्ठ शिल्पीच्या आदल्याच पायरीवर तू थांबलास. तू सर्वश्रेष्ठ शिल्पी व्हाव हे माझं स्वप्न अपुरच राहणार. जा. बाळा जा. आता मी तुझा गुरू नाही. आणि तू माझा शिष्यही नाहीस.'' शांतपणे घराकडे चाललेल्या पाठमोर्‍या विरींचीकडे हताशपणे विष्णू बघत उभा राहीला.

-------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -