ती लेक लाडकी माझी

 

ती लेक लाडकी माझी

 

                   तिची लढाई ती निकराने लढली होती. अगदि इंग्रजांविरुद्धही. शाळेत असतांनाच कोणाला कळणार नाहीत अशा प्रकारे इंग्रजांविरुद्ध छापलेली पत्रके योग्य ठिकाणी पोचविण्याचे काम तिने वारंवार केले होतं बिनबोभाटपणे. इंग्रज सत्तेविरुद्ध लोकांच्या मनात जागृती निर्माण करणारी गाणी गात  पहाटे पहाटे रस्त्याने मेळे निघत. त्या मेळ्यांमधे आघाडीला ही नऊ दहा वर्षांची पोर तिच्या सुरेल खड्या आवाजात देशप्रेमाने भरलेली गीतं गात लोकांना  भारून टाकत असे. आज ऐंशीव्या वर्षीही तिचा आवाज तितकाच सुरेल होता. तुरुंगवास भोगला नाही, स्वातंत्र्य सैनिकपण चिकटावं म्हणून मनातही आलं नाही. पण राष्ट्रप्रेमाच्या कसोटित कुठे खोट नव्हती तिच्या.

         जीवनाच्या रणांगणामधेही लढणं संपलं नाही. पण आज  तिच्या जीवनाच्या रणांगणामधे ती एकांड्या शिलेदारासारखी उभी होती. तिच्या बरोबरीचे, तिच्या आजुबाजूचे, तिचे भोवतालचे तिला सोडून गेले होते. जीवनाच्या रणांगणावर धराशायी तरी झाले होते, नाहीतर नवीन दमाचे तरुण त्यांच्या जीवनाची लढाई लढायला दुसर्‍या फ्रंटवर कधीच निघून गेले होते. एकट्याने लढावे तरी कोणाशी? आपण जिंकलो हे सांगायलाही पुढे कोणी नाही किंवा आपण हरलो का? हे विचारायलाही मागे कोणी नाही. पाठीवर हात ठेऊन धीर देईल असं कोणी नजरेच्या टप्प्यात राहिलं नाही. अशी आता ती जास्तच हतबल झाली होती.

थव्यात एकट्याच राहिलेल्या पक्षिणीसारखी ती सैरभैर. जीवन जगण्याची उभारी सुटत चालली. नजरेसमोर चाललेल्या गोष्टी पटत तरी नव्हत्या किंवा त्यांच्याशी पटवून घेणंही अवघडच होतं तिला. एक तर नवीन जीवनाला ती `मिस मॅच' तरी होती ; किंवा नवीन जीवनाला सामाऊन घेतांना `‍ऑड मॅन आऊट' तरी!

अशाच कातरवेळी आपल्याच जीवनदात्रीची भेट हेलावून गेली मनाला -----

 

ती वात्सल्याची मूर्ती

ती प्रेमळ माझी आई

जिच्या दरार्‍याने हाले

घर सारे एकेकाळी

 

घडी घडी बिनसे काही

नेत्रातुन झरझर पाणी

माझ्याच घरी म्हणते ही

आज झाले का मी परकी

 

का कळपातुन चुकलेली

ती गायचि भेदरलेली

मज कळले नाही काही

 का म्हातारी ही झाली?

 

वृद्धत्वचि या जीवाचे

कुणि शैशव म्हणती दुसरे

मज आठविता हे सारे

मम सुटले कोडे पुरते

 

 

 ते नाटक आयुष्याचे

ती नाती आणिक पात्रे

लव अदलाबदली केली

भूमिका वटवण्या पाहे

 

 मी माय तिची हो झाले

ती लेक लाडकी माझी

भूमिका बदलता दोन्ही

नजरही बदलली माझी

 

निरखून तिला बघतांना

मज जाणवलेसे काही

धोक्याचे वय की  झाले

असे नेत्र तिचे बोलती

 

 

 

मी  आवेगाने तिजला

 मम कुशीत जवळी  घेता

बिलगली पोर ती माझी

जणु बिलगे वेल तरूला

 

कुशीत शिरुनी माझ्या

ती स्फुंदे दीन अनाथ

एकाकी उरली पुरती

तिज उरले नाही गोत

 

मी मिठीत घेता तिजसी

ती बावरली का हरिणी

का शीळ घुमे तिज कानी

हरि पैल घालितो रानी

 

 

हरि एकांती तिज बोलवी

नात्यांच्या सोडुन गाठी

तो पावा नित्य उशाशी

वाजवी जागवी तिजसी

 

ती शांत जराशी झाली

का कल्लोळ मम मानसी

हरि भेटाया उतावीळ

लाडकी लेक बावरली

 

मम काळिज हलले हलले

अश्रुंचे बांधचि फुटले

चिंतीत मनी जे होते

ते घडले घडले घडले

 

ज्वाळांच्या पडद्यामधुनी

झिरझिरीत केशर पिवळ्या

मग शेवटची ती दिसली

क्षण एक लाडकी माझी

 

उधळीत अग्निच्या लाह्या

निज माथ्यावरुनी मागे

ती शांत चालली पुढती

वळुनी ना मागे पाहे

 

हातात हात घालोनी

 तो सखा श्रीहरी जवळी

उतरवी `देह-वस्त्रा'सी

जे जुने पुरातन होई

 

ज्वालाच जणू ती झाली

ती चैतन्याची मूर्ती

ती कांतिमती तेजस्वी

हरि सखया संगे गेली

 

लाडकी लेक ती माझी

अश्रुंच्या पडद्यामधुनी

अस्पष्ट होतशी गेली

भेटेल कधी का मजसी?

           - -----

भेटेल कधी ना मजसी !

-----------------------------

 

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -