राजा भोज आणि मुंज

 

राजा भोज आणि मुंज

राजा सिंधुल आणि राणी सावित्री ह्यांना त्यांच्या उतारवयात झालेला पुत्र म्हणजे राजा भोज. भोजाचा जन्म होताच अनेक प्रसिद्ध ज्योतिषकारांनी अशी भविष्यवाणी केली की, `हा मुलगा अत्यंत बुद्धिमान निपजेल आणि पन्नास वर्षाहून अधिक वर्षे अत्यंत योग्य रीतीने राज्य करेल.' अत्यंत वयोवृद्ध झालेल्या राजा सिंधुलाला आपल्या पश्चात आपल्या एकुलत्या एक पुत्राचे कसे होईल ही चिंता सतावत होती. कारण सिंधुलराजाचा भाऊ मुंज मोठा महत्त्वाकांक्षी होता. सिंधुलानंतर मीच राजा होणार अशी स्वप्ने बघत होता. भोज त्यावेळेस जेमतेम पाच वर्षांचा अबोध बालक होता. शेवटी आपल्या मरणसमयी सिंधुलराजाने पाच वर्षांच्या बालक भोजास मुंजाच्या मांडीवर बसवले आणि त्याच्या नावाने राज्यकारभार करण्यास मुंजाला सांगून आपले प्राण सोडले.

आईबापाविना पोरका भोज मुंजाच्या ताब्यात होता. भोजाचा काटा कसाही करून काढला पाहिजे असा विचार करत मुंजा योग्य वेळेची वाट बघत होता. शेवटी मुंजाने बंगालहून वत्सराजाला निमंत्रित केले आणि त्याच्या हाती भोजाला सोपवून त्याचा काटा काढण्यास सांगितले. देवीला बळी देण्यासाठी तो भोजाला घेऊन गेला. पण प्रत्यक्षात भोजाच्या अत्यंत मृदु, मधुर स्वभावामुळे भोजाचा बळी देण्याची हिंम्मत वत्सराजाला होईना. त्याने लहानग्या भोजास त्याला बंगालप्रांती घेऊन येण्याचे कारण सांगितले.

आपल्याला बळी देण्यासाठी येथे पाठवले आहे हे कळल्यावरही लहानगा भोज जराही डगमगला नाही. उलटपक्षी त्याने आपल्याकडच्या तलवारीने आपली मांडी चिरून स्वरक्ताने एक श्लोक तेथे पडलेल्या एका वडाच्या पानावर लिहीला आणि तो श्लोक आपल्या चुलत्याला म्हणजे मुंजाला देण्याची विनंती केली. नंतर वत्सराजाने भोजाच्या अंगावरील कपडे उतरवून, एक ससा मारून भोजाचे कपडे त्याच्या रक्ताने माखवून, भोजाच्या डोक्याची तंतोतंत प्रतिकृती बनवून ती मुंजाला दाखवली. मुंजाची खात्री पटली. प्रत्यक्षात मात्र वत्सराजाने भोजास गुपचुपपणे आपल्या महालाच्या तळघरात लपवून ठेवले. तेथे तो भोजाची उत्तम काळजी घेऊ लागला.

मुंजाने वत्सराजास विचारले, ``आपल्याला मारणार म्हटल्यावर भोजाची काय प्रतिक्रिया होती? बाळ मरण्यापूर्वी काही म्हणाला का?'' त्यावेळेस वत्सराजाने भोजाने स्वतःच्या रक्ताने लिहीलेला वडाच्या पानावरील श्लोक त्यास दिला. मरणसमयी भोज अत्यंत शांत होता असे सांगितले. मुंज भोजाने त्याला उद्देशून अत्यंत उपरोधाने लिहीलेला तो श्लोक वाचू लागला,

{ मान्धाता महीपति: कृतयुगालंकार भूतो गत:

सेतुर्येन महोदधौ विरचित: क्वासौ दशस्यान्तक:

अन्ये चापि युधिष्ठिर प्रभृतिभि: याता दिवम् भूपते

नैकेनापि समम् गता वसुमती नूनम् त्वया यास्यति ।। }

मांधाता नृपती पहा कृतयुगी होऊन गेला महा

सेतू बांधुन रावणा वधुनिया गेला कुठे राम वा

गेले कृष्ण युधिष्ठिरादि नृपती संसार सोडून हा

गेली ना वसुधा कुणासह परी जाईल संगे तुझ्या ।।

``हे मुंज राजा ह्या पृथ्वीवर आत्तापर्यंत अनेक थोर थोर नृपती होऊन गेले. कृतयुगाचे भूषण वाटावा असा जो श्रेष्ठ राजा मांधाता ज्याने आपल्या अफाट पराक्रमाने सारी पृथ्वी जिंकली, जो अत्यंत दानशूर होता आणि वैराग्याचा पुतळा होता तो मांधाता राजाही शेवटी ही पृथ्वी सोडून स्वर्गलोकी गेला. समुद्रावर सेतू बांधण्याचे अत्यंत आश्चर्यकारक काम करून महाबळी रावणाचा वध करणारा श्रीरामही कुठे गेला? त्यालाही हा इहलोक सोडून परलोकी जावेच लागले. श्रीकृष्ण, युधिष्ठिरासारखे एकाहूनही एक नामवंत राजे ह्या पृथ्वीवर महान पराक्रम करून शेवटी स्वर्गलोकी गेले. ज्यांनी अनेक वर्षे ह्या पृथ्वीवर राज्य केले आणि ह्या सर्वसम्पन्न वसुंधरेचा उपभोग घेतला त्या कोणाही बरोबर ही पृथ्वी , ही वसुमती गेली नाही राजा. पण तुझ्याबरोबर मात्र नक्की जाईल. मला खात्री आहे की तू ही पृथ्वी घेऊनच स्वर्गात जाशील.''

श्लोक वाचता वाचता मुंजाला पश्चात्तापाने घेरले. त्याच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या. आपण आपल्या मोठ्या भावाला दिलेले वचन पाळले नाही. ज्याने भोजाला आपल्यावर सोपवून त्याची काळजी घेण्याची विनंती केली त्या माझ्या थोरल्या भावाचा मी विश्वासघात केला आणि अत्यंत लहान वयाच्या, प्रगल्भ बुद्धीमत्तेच्या, राजा होण्यास अत्यंत लायक असलेल्या भोजाचा बळी दिला ह्याची बोचणी त्याला स्वस्थ बसू देईना.

दिवसेंदिवस राजा मुंजाचे राज्यकारभारातील लक्ष कमी होत असतांना अचानक एक दिवस बंगाल प्रांतातून जारण मारण करणारा एक कापालिक साधू मुंजाच्या सभेत उपस्थित झाला. त्याने अनेक चमत्कार करून दाखवले राजाची मर्जी संपादन केली. आपण मेलेल्यांनाही जिवंत करू शकतो असे कापालिकाने सांगताच राजाला दुःखावेगाने भोजाची आठवण झाली तो कापालिकास भोजाला जिवंत करण्याविषयी विचारू लागला. कापालिकानेही त्याला भोजाला जिवंत करणे संभव असल्याचे सांगितले. मुंजाच्या सम्मतीने त्या कापालिकाने एक यज्ञ आरंभ केला. तो यज्ञ सम्पन्न होतेवेळेस स्वतः भोज हत्तीवर बसून नगरीत प्रवेश करेल असे वचनही दिले. त्याप्रमाणे यज्ञ सम्पन्न होताच वत्सराजाने मोठ्या समारंभाने भोजाला हत्तीवर बसवून नगरीत आणले. पश्चात्तापाने जळणार्या आपल्या काकांना भोजाने माफ केले. मुंजही भोजाला राज्याभिषेक करून आपल्या पत्नीसह वनात निघून गेला.

--------------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -