संपातीची गोष्ट

 

संपातीची गोष्ट -

आवरतांना एक वही मिळाली. फार वर्षांपूर्वी ड्यूक विद्यापीठात श्री बा.भ. बोरकरांचं एक पुस्तक वाचायला मिळालं. त्यात त्यांनी लिहीलेली संपातीची गोष्ट मनाला फार स्पर्शून गेली. त्या गोष्टीची काही टिपणं ठेवली होती. काही काही  तेजस्वी उतारे जसेच्या तसे लिहिले होते. ते जसेच्या तसे त्यांच्याच शब्दात देते. कमितकमी ठिगळं लावून द्यायचा प्रयत्न करते.

संपाती हा जटायूचा मोठा भाऊ. लहानग्या जटायूला सूर्याचं प्रचंड आकर्षण स्वस्थ बसू देईना. त्याने सरळ सूर्यावरच झेप घेतली. जटायू जळून जाईल हे त्याच्या मोठ्या भावाच्या संपातीच्या लक्षात येताच त्याने जटायूपेक्षा अधिक वेगाने अजून उंच भरारी घेतली. सूर्य आणि जटायू ह्यांच्यामधे ढालीप्रमाणे आलेल्या संपातीमुळे जटायू वाचला. पण संपातीचे पंख मात्र जळून गेले. संपाती जमिनीवर कोसळला.

संपातीच्या उदात्त त्यागावर एक कादंबरी लिहावी असं बोरकरांना वाटत होतं. परंतु संपाती आणि त्याच्यासारख्यांच्या त्यागाची जगात होणारी परवड पाहून ही कादंबरी लिहायला लेखकाला उत्साह वाटत नव्हता. दुसर्‍याला मोठं करतांना आपला नाश होण्यात थोरवी असली तरी ह्या त्यागाचं काहीतरी वेगळं चीज व्हायला हवं असं लेखकाला वाटत होतं. पण अनुभव असं सांगतो की तसं चीज काही होतांना जगात काही दिसत नाही. असं असेल तर सामान्य माणसाला अशा त्यागाचं आकर्षण कसं बर वाटेल? त्यातून त्याला स्फूर्ती तरी कशी मिळेल?  त्याचवेळेला संपातीची वाट चोखाळलेला लेखकाचा एक स्नेही त्यांना भेटला. स्मित करून तो म्हणाला,

`` तू संपातीची अर्धीच कथा वाचलीस, असे दिसते. भावाला सांभाळण्यात त्याचे पंख जळून गेले, एवढेच तुला माहित आहे. पुढची कथा तुला ठाऊक नाही.''

``मग सांग ना पुढे काय झाले ते? '' - लेखक.

``पंख जळलेल्या अवस्थेत संपातीच्या त्यागाची अग्निपरीक्षा चालली होती. त्याच्या त्यागाची प्रेरणा शुष्क कर्तव्यबुद्धीच्या सक्तीतून किंवा परिस्थितीच्या असहाय्यतेतून आली नव्हती, तर प्रेमाच्या उत्कटतेचा कर्तव्यात साकार झालेला तो रसमय आविष्कार होता आणि म्हणूनच त्याच्या अंतरात्म्यातून आनंदाची `अमृत-निस्यंदिनी' त्या क्षणापासून स्त्रवत राहिली. अशा त्यागातच त्याचे चीज असते. बाह्य कसोटीवर त्याचा कस किंवा यश पारखायचे नसते. अंतःकरणात असल्या त्यागाने घडणारे परिवर्तन प्रत्यक्ष जीवनात आणि समाजात उमटल्यावाचून राहूच शकत नाही. मग त्याची नोंद इतिहासात झालेली असो किंवा नसो.''

``संपातीच्या अंतःकरणात हे अशा प्रकारचे परिवर्तन झाले, तर त्याच्या नंतरच्या जीवनात आणि त्याच्या भोवतालच्या समाजात तुझ्या म्हणण्याप्रमाणे थोडातरी पडताळा पाहिजे तो कोठे आहे? '' - लेखक

``संपातीचे पंख जळाले होते, पण त्याच्या अंतरात्म्याची उड्डाणशक्ती जळाली नव्हती. उलट, त्या अग्निपरीक्षेने  ती अधिकच उज्ज्वल, अधिक सूक्ष्म आणि अधिक सार्मथ्यशाली झाली होती. अवकाशाचे पट भेदून त्याला सहस्र योजने पाहता येऊ लागले. They also serve who stand and wait - या मंत्रावर अधारलेली ती एक क्रांतदर्शी साधना होती आणि लौकिक सिद्धिच्या किंवा फलश्रुतीच्या विचाराने विक्षेप न पावता अखंडपणे  चालाली होती. त्या अवस्थेत तो अग्नीपूत संपाती स्वतःच जगद्कल्याणाचा अंज्ञ होऊन राहिला होता.

वानर ज्यावेळी लंकेपर्यंत सेतू बांधण्याचे मनसुबे रचू लागले आणि सेतूच्या दुसर्‍या टोकाची नीट कल्पना न करता आल्यामुळे सेतुबंधनाच्या त्यांच्या योजना फसू लागल्या, तेंव्हा बसल्या ठिकाणाहून दीर्घदृष्टी संपातीने त्यांना निश्चित कल्पना आणून दिली. त्याप्रमाणे सेतू तयार झाला. वानरांच्या शिल्प कौशल्याची प्रभु रामचंद्राला कल्पना होती पण केवळ शिल्प नैपुण्याने सेतु-बंधन होऊ शकत नाही, त्याला दीर्घदृष्टीची जोड मिळावी लागते, हे त्या कर्मयोगी युगकर्त्याला माहित होते.

अर्थातच त्याने विचारपूस केली आणि संपातीच्या त्या मूक आणि थोर सेवेची कदर करण्यासाठी तो स्वतःहून त्याच्याकडे गेला. कृतज्ञ अंतःकरणाने त्याने त्याला स्नेहालिंगन दिले आणि दग्ध झालेल्या त्याच्या पवित्र पंखांवरून पूज्य भावाने हात फिरवला. त्या क्षणाची धन्यता अनुभवतांना संपातीच्या अंतःकरणातील `अमृत-निस्यंदिनी' अष्टांगातून वाहू लागली आणि मुलायम पिसांच्या कोवळ्या अंकुरांनी त्याचे पंख पूर्वीपेक्षा अधिक समर्थ आणि सुंदर झाले.'' माझा स्नेही ही भाषा बोलत नसून संपातीच स्वमुखाने आपला दिव्य अनुभव सांगत आहे असे मला वाटले. चकित होऊन मी विचारले,

``वाल्मिकी रामायणात ही कथा आहे?''

`` आहे की नाही , मला माहित नाही.कदाचित ती वाल्मिकीने लिहिली नसेल. कदाचित त्याने लिहून देखील कालप्रवाहात ती गहाळ झाली असेल; पण त्यामुळे तिच्या महत्तेला मुळीच उणेपणा येत नाही. जीवनाचे महाकाव्य आत्म्याच्या डोळ्यांनी पहावयचे असते, साधनेचे खत घालून वाढवायचे असते, जगून भोगावयाचे असते आणि भोगता भोगता त्याच्याबरोबर स्वतः वाढावयाचे असते. ज्यांनी कृषिकला शोधून काढली, वस्त्रविद्या निर्माण केली, पहिले चाक किंवा पहिले अक्षर यांना आकार दिला, अर्थांची शब्दात प्राणप्रतिष्ठा केली, अनुभव विचारात ग्रथित केले, विस्तव निर्माण करून अन्न शिजवले, त्या विश्वकल्याणकर्त्या सर्व महाभागांची नावे इतिहासात नमूद नाहीत, म्हणून त्यांच्या त्यागाची परवड झाली, त्याचे चीज झाले नाही, असे मानणे सत्याला धरून होईल काय?

-----------------------------------------

आजही माझ्या अनेक अत्यंत गुणी मैत्रिणी घर मुलं संसार सांभाळण्यासाठी नोकरी करून मिळणार्‍या पैशांचा हव्यास सोडून घरी राहतात. मुलांचे आयुष्य घडवतांना स्वतःच्या आयुष्याचे खत त्यात घालत राहतात. अनेक गरीब घरातील आई वडिल मुलांना उच्च शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करतात. अशा त्यागामागे त्यांचा कोणताच स्वार्थ नसतो. मुलांचे हित झालेले अनुभवास आले की अशा निस्वार्थ भावातून लाभलेला आनंद कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. त्यांच्या ह्या त्यागाचा संपूर्ण समाजामधे एक चांगल्या परिवर्तनाच्या रूपाने आज पडताळा येतही आहे. त्या माझ्या सर्व सुहृदांना ही बा. भ बोरकरांची गोष्ट अर्पण!

------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -