गोष्ट

 

गोष्ट

               ``एकदा काऽऽय झालऽऽऽऽ!!!'' एखादी लाट उंच उभी राहून गोलाकार वळत खाली यावी, त्या लाटेप्रमाणे एक छानसा हेल काढत गूढ आणि उत्सुकता वाढवणार्‍या वाक्याने आमच्या प्रत्येक गोष्टीची सुरवात होते. आजीचं हे वाक्य संपताक्षणीच ``काऽऽऽय झाऽऽलऽऽ ? '' तसाच हेल काढत, एक उत्सुकतेने भरलेला, कोवळ्या आवाजातला, डोळे विस्फारलेला प्रश्न! कुतुहलाचं बीज कळत 4-5 वर्षांच्या नातवाच्या मनात पेरलं जातं.  मनात झोपलेल्या ह्याच कुतुहलाच्या सुप्त बीजाला गोष्टीतून जागं करायचं काम आज्जीचं. इंग्रजी S  अक्षर खालपासून वरच्या दिशेला रेखत जाव तसं हे जागं झालेलं कुतुहलाचं बीज हळुवारपणे हात वर करत आळोखे पिळोखे देत``काऽऽऽय झाऽऽलऽऽ ? '' ह्या प्रश्नामधून  हृदयातून अंकुरत ओठावर येतं. माझं मन ह्याच प्रश्नाची वाट बघत असत. जीव सुखावतो. गोष्टीच्या वाटेवर एकत्र चालण्यासाठी मनं एकमेकात गुंफल्याची ही निशाणी असते.

मनाच्या बंदरात नांगरून पडलेलं गलबत सफरीसाठी तय्यार झाल्याचा जणु वाजलेला भोंगा असतो. आमचं गोष्टीचं विमान हँगरमधून धावपट्टीवर आल्याची ही खूण असते. तोपर्यंत आई पांघरुण लहान उशी सारा जामानिमा आणुन टाकते. पलंगभर लोळणार्‍या लेकाला ``आजीला त्रास देऊ नको हं रात्री.'' म्हणून उगीचच जरा खोटं खोटं दटावून जाते. आजीने पाहिलेल्या समृद्ध जगाची सफर नातवाला घडवायला आजी पायलटच्या खुर्चीवर सज्ज असते आणि आमचे को- पायलट आजीच्या अंगावर पाय टाकून आणि गळ्यात हात टाकून लोळत लोळत सज्ज असतात. आज्जीच्या गोष्टीचं शेवटचं डेस्टिनेशन जरी `निद्रा नगरी' असलं तरी नेत्रांची कमलदलं मिटेपर्यंत बरच जग फिरायच असतं. विमान आकाशात भरारी घेण्यापूर्वी त्याचे पंखे जसे फुल्ल स्पीड फिरायला लागतात तशी आजीच्या डोक्यातील विचारचक्र आता फिरायला लागतात.

मघाशी बागेत पाहिलेला सुरवंट आठवतो. ``एकदा काऽऽय झालऽऽऽऽ!!!'' ``काऽऽऽय झाऽऽलऽऽ ? ''  ``एक होता सुरवंट. इवलासा. त्याला लागली होती भलतीच भूक. -- -''  ``भीमासारखी?'' ``हो ना !  लिलीच्या पानावर बसून पानं खात होता. कुरुम कुरुम कुरुम कुरुम. खात होता- - - खात होता- - खात होता. सकाळ पासून संध्याकाळपर्यंत.'' ``मग काय झाल?''  ``खाऊन खाऊन सुरवंटाला झोप आली.'' ``मग?'' ``तिथेच झोपला. पानाच्या गादीवर. सकाळ झाली. चिऊताई आली. म्हणाली , अरे वा तू तर चांगला जाडजूड झालास. तुझ्या अंगावरचा हा केसाळ अंगरखाही चांगलाच मऊसूत आणि गुबगुबीत झालाए की! तुझा हा अंगरखा माझ्या बाळाला झोपायला देशील?'' ``मी कसा देणार? माझ्या अंगालाच चिकटलाय तो.'' ``देशील. काही दिवसांनी तू तो आपणहून काढून टाकशील. अजुन दोन दिवस तू खूप खाशील. अजून जाड होशील. मग गाढ झोपशील. एकदम गाढ! काही दिवसांनी हा अंगरखा तुला लहान व्हायला लागेल. मग तो हळुच काढून टाकशील बाहेर येशील त्याच्यातून. ते बघ ते फुलपाखरु दिसतयं ना? तसा दिसशील. उडायला लागशील माझ्यासारखा.'' असं कसं होईल हे सुरवंटाला काहीच समजत नव्हत.'' ``आज्जी खरच का? मग त्या चिमणीच्या बाळाला तो अंगरखा मिळाला?''  ``हो .'' गोष्टीसोबत egg, larva, pupa, adult. सगळ्या पाय र्‍यांवरून आम्ही चढत जातो. प्रत्येक stage घोकून पाठही झाली.

घारीने पंख पसरावेत तसे कल्पनांचे पंख पसरून त्यावर कुतुहलाने लुकलुकणार्‍या डोळ्यांना बसवून आजी जगाची सफर करत असते. पंचतंत्र, इसापनीती, सिंदबाद, रॉबिनसन् क्रुसो, गलिव्हर, रामायण, महाभारत, ध्रुवबाळ, बाळ अरुणी, सुश्रुत, एडिसन, एडवर्ड जेन्नर, अॅलेग्झांडर ग्रॅहॅम बेल, जॅकी रॉबिनसन् आमची वाट बघत असतात.

कधी कधी झोपेच्या नगरीला निघालेलं आमचं विमान भरकटल तर आजीची फारच पंचाईत होते. गोष्ट रंगवून सागता सांगता एखाद्या खुमासदार वाक्यप्रयोगानी आलेलं हसु खळखळणार्‍या लाटांचं रूप घेतं. शांत शांत निद्रानगरीचा रस्ता सोडून हाऽहाऽ हा ! हीऽ हीऽ ही च्या लाटांनी  खोली चैतन्यमय होऊन जाते. गोडुल्याचं गोड हसण पाहून आजीलाही हसु आवरेनास होतं. आमच्या हास्य लाटेचा धक्का उशाशी उभ्या असलेल्या पाण्याच्या बाटलीला लागला तर आत्तापर्यंत शिस्तीत उभी असलेली बाटली आणि बाटलीवर खाली मान घालून बसलेलं भांड आमच्या हसण्यात सामील होऊन जमिनीवर गडबडा लोळायला लागतात. ``आज्जी!! ठण् ठण् ठण् ठण् ठण् ठः!!!'' निद्रानगरीच्या वाटेवर निघालेलं विमान कधी हास्य नगरीला पोचतं हेच कळत नाही. कधी तरी सांगितलेल्या कालिदासाच्या गोष्टीतील समस्यापूर्तीच्या गोष्टीतील श्लोक ``बघ मी पाठ म्हणून दाखवतो'' म्हणून जोरदार आवाजात चालू होतो. ``राज्याभिषेके जलं आनयित्वा हस्तात् च्युतो हेमघटो युवत्याः सोपानमार्गेषु करोति शब्दम् ठ्ण ठ्ण ठ्ण ठ्ण ठ्ण ठः!!!'' (राज्याभिषेकासाठी पाणी आणत असतांना जिन्यावरुन उतरणार्‍या दासीच्या हातून सोन्याचा कलश पडला. आणि ठ्ण ठ्ण ठ्ण ठ्ण ठ्ण ठः आवाज करीत जिन्यावरून खाली आला.)   पलंगावर उड्या मारत येणार्‍या श्लोकाला शांत करणं जरुरीचं असतं. अंधारात पाय वाजल्याची खूण हा शेवटचा एल्गार असतो. ``पिलु, लवकर झोप हं! इन्चकेप् (Inchcape Rock) रॉकवरील धोक्याची घंटा वाजली.'' ``कुठला रॉक?'' ``इन्चकेप!'' मी परत. ``इन्चकेप?'' ``हं!'' ``म्हणजे काय?'' ``मोठी गोष्ट आहे. उद्या सांगीन.'' आणीबाणीच्या प्रसंगातही उद्याच्या कुतुहलाचं बी मी पेरून घेते. मला उद्या त्याची गोष्ट सांगायची असते.

Down sank the Bell with a gurgling sound,

The bubbles rose and burst around

दोन ओळी with action  करून दाखवायच्या असतात. मी परत गावाला जायच्या आत पाठ करून घ्यायच्या असतात. 

अंधारात बाबाची आकृती आमच्या पलंगापाशी उभी राहते. शूऽऽ शूऽऽ शूऽऽऽ करत आमचं एकमेकांना गुरफटुन गाढ झोपल्याचं नाटक. हसण्याच्या लाटानी हेंदकळणार्‍या आजी-नातवाला पाहून बाबाचा सज्जड दम येतो. ``अहो वीर, उद्या सकाळी शाळा आहे. पहाटे साडेपाचला उठायचं आहे. चला तिकडे झोपायला.'' झोपायचं नाटक जास्त तीव्र होतं. गळ्याभोवती पडलेला इवल्या इवल्या कोवळ्या हातांचा विळखा बाबा घेऊन जाईल ह्या भीतीने जास्तच घट्ट होतो. बाबाचा रागाचा पारा फारच चढला तर मात्र गालावर ओघळणारे निर्झर आणि  खालच्या बाजूला वळणार्‍या  ओठांच्या  साजुक तुपातल्या नाजुक करंजीतून निषेधाचा सूर बाहेर पडतो. ``आज्जी बाबा सारखा रागवतो. सारखा रागवतो. '' `` बाबा जा बर! आता बाळ झोपणार आहे. आणि उद्या त्रास देता पहाटेच उठणार आहे. '' आजीची मध्यस्थी. राष्ट्रपतींच्या हुकमापुढे बाबा नाराजीने निघून जातो. ``पिलु! झोप हं लवकर. चला डोळे मिटा! नाहीतर बाबा घेऊन जाईल तुला. उद्या लवकर उठलास तर गम्मत देईन तुला.'' ``काय देशील?'' ``उद्या सांगीऽऽन!'' मात्रा लागु पडते आणि डोळ्यावर सुरकुत्यांच जाळं पडे पर्यंत जबरदस्तीने घट्ट मिटलेली नेत्रदले पाचच मिनिटात सैलावतात. माझ्या गळ्याभोवती पडलेली कोवळी मिठी अलगद सोडवून मी पांघरूण वरती सरकवते.

बॅगेत लपवून ठेवलेली निळी गाडी हळुच पर्समधे घालून ठेवते. पहाटेची तयारी.

शाळेत पोचवायलाही आबा आणि आज्जी लागतात.

शाळेच्या बसपर्यंत पोचवून आल्यावर शांतपणे बाल्कनीत उभी असतांना कुंडीत पेरलेल्या गुलबक्षीची बी उगवलेली दिसते. तरारून आलेल्या दांड्याला सगळ्यात खालच्या बाजूला बीजाची दोन दलं (cotyledons) चिकटलेली असतात. मातीतून जीवन मिळताच वाळलेल्या काळ्या बी ची दोन्ही दळे  फुगून हिरवीगार झालेली असतात.. त्याच्यावर निरोगी दोन पानं आणि त्याच्यावरती परत दुस र्‍या दोन पानांचा मजला उभा होता. आजी - आजोबा , मुलं आणि  नातवंड

वरच्या पानांना अन्न पुरवण्यासाठी, जीवन देण्यासाठी, त्यांनी स्वतःच्या हिमतीवर जमिनीत पाय रोवून उभं राहीपर्यंत दळांना निसर्गाने परत हिरवं करणं  माझ्याच चेहर्‍यावर हसू देऊन गेलं.

 तो पर्यंत पायांना मागून एक नाजुक मिठी पडली. धाकटं पिलु - छोटी नात जागी झालेली असते होती. ``चल आजी हात घोदा हात करु'' म्हणून मागे लागते. खुर्चीवर बसून, तिला पायावर उभं करून, हाट घोडा हाट करतांना मी अच्युतम् केशवम् रामनारायणम् म्हणणार असते. आणि ते बाळही शिकणार असतं. अजून थोडे दिवस हिरवं राहणं हे काळाचं  सुनियोजित गणित असतं..

 

----------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

Inchcape Rock - Poem by Robert Southey

No stir in the air, no stir in the sea, 
The Ship was still as she could be; 
Her sails from heaven received no motion, 
Her keel was steady in the ocean. 

Without either sign or sound of their shock, 
The waves flow’d over the Inchcape Rock; 
So little they rose, so little they fell, 
They did not move the Inchcape Bell.

The Abbot of Aberbrothok 
Had placed that bell on the Inchcape Rock; 
On a buoy in the storm it floated and swung, 
And over the waves its warning rung.

When the Rock was hid by the surge’s swell, 
The Mariners heard the warning Bell; 
And then they knew the perilous Rock, 
And blest the Abbot of Aberbrothok

The Sun in the heaven was shining gay, 
All things were joyful on that day; 
The sea-birds scream’d as they wheel’d round, 
And there was joyaunce in their sound. 

The buoy of the Inchcpe Bell was seen
A darker speck on the ocean green; 
Sir Ralph the Rover walk’d his deck, 
And fix’d his eye on the darker speck. 

He felt the cheering power of spring, 
It made him whistle, it made him sing; 
His heart was mirthful to excess, 
But the Rover’s mirth was wickedness. 

His eye was on the Inchcape Float; 
Quoth he, “My men, put out the boat, 
And row me to the Inchcape Rock, 
And I’ll plague the Abbot of Aberbrothok.” 

The boat is lower’d, the boatmen row, 
And to the Inchcape Rock they go; 
Sir Ralph bent over from the boat, 
And he cut the bell from the Inchcape Float.

Down sank the Bell with a gurgling sound, 
The bubbles rose and burst around; 
Quoth Sir Ralph, “The next who comes to the Rock,
Won’t bless the Abbot of Aberbrothok.” 

Sir ralph the Rover sail’d away, 
He scour’d the seas for many a day; 
And now grown rich with plunder’d store, 
He steers his course for Scotland’s shore. 

So thick a haze o’erspreads the sky, 
They cannot see the sun on high; 
The wind hath blown a gale all day, 
At evening it hath died away. 

On the deck the Rover takes his stand, 
So dark it is they see no land. 
Quoth Sir Ralph, “It will be lighter soon, 
For there is the dawn of the rising Moon.” 

“Canst hear,” said one, “the breakers roar? 
For methinks we should be near the shore.” 
“Now, where we are I cannot tell, 
But I wish we could hear the Inchcape Bell.” 

They hear no sound, the swell is strong, 
Though the wind hath fallen they drift along; 
Till the vessel strikes with a shivering shock, 
“Oh Christ! It is the Inchcape Rock!” 

Sir Ralph the Rover tore his hair, 
He curst himself in his despair; 
The waves rush in on every side, 
The ship is sinking beneath the tide. 

But even is his dying fear, 
One dreadful sound could the Rover hear; 
A sound as if with the Inchcape Bell, 
The Devil below was ringing his knell. 

Robert Southey

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -