10 मङ्गलम्

 

मङ्गलम्

‘मंगलम्’  ह्या लेखासोबत आपली ‘सस्य श्यामला’ ही दहा लेखपुष्पांची माला ओवून पूर्ण होत आहे. मंगलकार्य असो वा मंगलमूर्तीचा उत्सव असो; हाती घेतलेले कार्य निर्विघ्न पार पडले ह्यासाठी, कृतज्ञतापूर्वक आपण देवाची पूजा करून काही मागणे मागतो. सुख, समृद्धीसाठी घरोघरी अनेक प्रकारच्या पूजा मनोभावे केल्या जातात;  सत्यनारायणाची पूजा घरोघरी घातली जाते; पण मागणे हे मात्र विश्व कल्याणासाठी मागितले जाते.  

सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः ।

सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दःखमाप्नुयात् ।।

सर्वजण सुखी असोत. सर्व निरोगी असोत, सर्वांच्या जीवनात मंगलमय घटना घडोत. सर्वांना कल्याणाचा मार्ग दिसो. दुःख कोणाच्या वाट्याला न येवो. पंढरपूरची वारी सम्पन्न झाली की, आषाढी एकादशीला पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा होते. सर्व पत्रकार मुख्यमंत्र्यांना विचारतात, ‘‘देवाकडे काय मागणे मागितले’’? प्रत्येक आदरणीय मुख्यमंत्री हेच सांगतात की, ‘‘विठुराया माझ्या राज्यात, माझ्या देशात चांगला पाऊस पडु देत, सर्वांना प्यायला आणि शेतीला मुबलक पाणी दे. सोळा आणे पीक येऊ दे, रोगराई येऊ देऊ नकोस, शेतकरी राजाला सुखी ठेव.’’

तामीळ घराघरांमधे कृषी किंवा मेहनतीचे काम  पूर्ण झाल्यावर (पोंगल सणाच्या वेळी); निसर्ग, सूर्य, भूमातेचे आभार मानण्यासाठी; अन्नदात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी; कोणताही सोहळा, सभा, महत्त्वाचे काम पूर्ण झाल्यानंतर किंवा घरात समृद्धी आल्यावर, सर्वांचे कल्याण व्हावे या भावनेने शेवटी जी प्रार्थना म्हटली जाते, तिला ‘विश्वशांती आणि समाप्तीची प्रार्थना’ किंवा ‘मंगळम्’ म्हणतात. ती तामीळ प्रार्थनाही हेच सांगतेः

‘शेती आणि सर्व प्रकारच्या श्रमांना आम्ही वंदन करतो. आम्हाला अन्न आणि उपजीविकेचे साधन देणाऱ्या निसर्गमातेला आणि ईश्वराला कोटी कोटी धन्यवाद. हे कार्य आणि ही भाषा चिरंतन नांदो. या जगातील सर्व जीव सुखी आणि आनंदी राहोत!’

पूर्वीपासून समृद्धी पैशात नाही तर गोधनाच्या रूपात मोजली जात असे. म्हणूनच कृष्णाच्या नेतृत्वाखाली गोकुळवासीयांनी त्यांच्या गायीगुरांना चारापाणी देणार्‍या गोवर्धन पर्वताची पूजा केली. त्याचे आभार मानून सर्व गोप नाचत गात पर्वताला प्रार्थना करू लागले, 

‘‘हे गोवर्धन पर्वता । रक्षी तू गोकुळा सदा

करांगुलीवरी कान्हा । उचले सहजी तुला

दे वरदान तू आम्हा । दे कोटी धेनू धना

छत्रछाया तुझी राहो । आम्हावरी कृपाकरा

 (गोवर्धन धराधार गोकुलत्राणकारक ।

विष्णुबाहुकृतोच्छ्राय गवांकोटिप्रदोभव’’ ।। )

इसविसनापूर्वी 3000 वर्षांपूर्वी दक्षिण भारतात गोदाई नावाची संत कवी होऊन गेली. तिने कृष्णाला वश करून घेतले म्हणून तामीळ भाषेत तिचा उल्लेख अंडाल असा आहे. अंडालचं आयुष्य जेमतेम सोळा वर्षांचं! तिने लिहिलेल्या ‘थिरुप्पवाई’ ह्या तामीळ भाषेतील रचना फार सुंदर आहेत. ती देवाकडे मागणं मागते,

वर्षा व्हावी ऐसी सुंदर। जग व्हावे हे पवित्र मंदिर

डुलोत शेते सोनेरीसर। आनंदाने नित वार्‍यावर।।

पाण्यामधुनी मासे सुळकन । उड्या मारु दे वर खाली वर

वासरु गोंडस बघता अवखळ । गायी देवो दूध मधुरतर।।

राहो अवनीवर समृद्धी।जीवमात्र हे नको उपाशी

मऊ पाकळी करुनी गादी । त्यावर झोपावी मधमाशी।।

तुझ्याच चरणी नित्य निरंतर । कृतज्ञतेने करोचि वंदन

भक्तवृंद हे तृप्त मनाने । नामाचे तव करोत चिंतन।।

अवर्षणाचे नकोच संकट । अति पाऊस वा पूर भयंकर

पालनकर्ता तूच जगाचा । दुःख हरी अमुचे परमेश्वर।।

हे कल्याणकारी हरी!!

आपल्या भारतभूमीत पावसाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाऊस हा आपल्याला समृद्धी देणारा आहे. संस्कृत आणि मराठी नाट्यपरंपरेत नाटकाचा शेवट ज्या मंगलवाचक, शुभसूचक किंवा आशीर्वादपर वचनाने (किंवा पद्याने) होतो, त्याला 'भरतवाक्य' म्हणतात. शूद्रक कवीने लिहीलेल्या मृच्छकटिक नाटकातील भरत वाक्यात तो म्हणतो, (स्रग्धरा वृत्तातील मूळ संस्कृत श्लोक मराठीत देते)

‘‘राहो ऐश्वर्यपूर्णा सकल धनयुता रत्नगर्भा धरित्री

गायी राहो निरोगी विपुल सुदुभत्या पुष्ट संतुष्ट चित्ती ।

वर्षा होवो सुवेळी सकल जनमना देउ दे मोद तुष्टी

वारे वाहोत ऐसे, क्षति न करति जे, सौख्यदायी सदाही ।।

 

आनंदी प्राणिपक्षी किलबिल करु दे; स्वस्थ निश्चिंत रानी

लाभो सन्मान मोठा सकल गुणिजना सज्जनांच्या समूही।

शत्रू उद्दंड सारे दमन करुनिया ठेवि जो अंकुशासी---

ऐसा राजा करो ह्या सकल अवनिचा योग्य सांभाळ लोकी’’ ।।

संस्कृत मुद्राराक्षस ह्या नाटकात चाणक्याची नीती यशस्वी होऊन राक्षस हा चंद्रगुप्ताचे मंत्रिपद स्वीकारतो, तेव्हा कार्यपूर्तीच्या समाधानाने नाटकात शेवटी खालील प्रार्थना आहे:

‘प्रलयकाळात ज्या वराहरूपी विष्णूच्या दाढेचा आधार पृथ्वीने घेतला होता, त्याच विष्णूचा अंश असणाऱ्या राजा चंद्रगुप्ताच्या बाहूंचा आधार आज पृथ्वीला मिळाला आहे. तो राजा चंद्रगुप्त आपल्या आप्तस्वकीयांसह दीर्घकाळ पृथ्वीचे रक्षण करो.’

  भासाच्या नाटकांमधे अशीच प्रार्थना आहे. ‘हिमालय आणि विंध्य पर्वतांची कुंडले धारण करणारी आणि समुद्रापर्यंत पसरलेली ही संपूर्ण पृथ्वी आमच्या श्रेष्ठ राजाच्या एकाच छत्राखाली सुखाने नांदो.’

आजूबाजूला सर्वत्र हालअपेष्टा आणि दुःख असलेल्या संसार सागरात कधी सुखाचं बेट तयार होऊ शकत नाही. असं सुख अल्पकाळ टिकणारं असतं. दुसर्‍याचा द्वेश, मत्सर, लोभापोटी त्याला लुबाडणं ह्या सर्व गोष्टी कोणालाही चिरंतन सुखसमाधान देऊ शकत नाहीत. निरंतर सुखासाठी ‘सर्व सुखी तर मीही सुखी’ हाच व्यवस्थापनाचा योग्य मंत्र आहे; हे स्वानुभवाचे बोल मनन चिंतन अभ्यास करणार्‍या आपल्या ऋषीमुनींनी ठामपणे सांगितले.

अथर्ववेदातील भूमीसूक्तात ऋषींनी हेच मत प्रतिपादन केले. ‘ही धरती माझी माता आहे आणि मी तिचा पुत्र आहे. तिच्या आधाराने आणि कृपेने माझे कार्य सफल झाले आहे, याबद्दल मी ऋणी आहे.’

दुर्गासप्तशतीतील 11व्या अध्यायात नारायणी स्तुतीत, 37 व्या श्लोकात एक उल्लेख येतो. ‘चित्ते कृपा समरनिष्ठुरता’ म्हणजे जिच्या हृदयात दया आहे पण समरांगणावर अत्यंत निष्ठूर असलेली देवी देवांवर प्रसन्न होऊन म्हणते, ‘‘देवांनो असा वर मागा ज्यात विश्वाचे कल्याण असेल. विश्वकल्याणाचा वर मी तुम्हाला देईन.

 “सुरांनो वर मागावा आहे जो तुमच्या मनी

कल्याणास्तव विश्वाच्या । वर देते तुम्हास मी”।।37

वेद पुराणे आणि इतर साहित्यातूनही आपण गरजूला मदत करावी, ह्या जगात कोणीही दुःखी असू नये अशा प्रार्थना वारंवार आम्हाला सांगतात, बाबारे स्वार्थी होऊ नकोस.

– ‘आम्हाला सम्पत्ती देणारे समृद्ध होवोत. आम्ही वेदशास्त्रसम्पन्न आणि संततियुक्त असावे. आमची श्रद्धा ढासळू नये आणि आमच्यापाशी देय पदार्थ पुष्कळ असावेत. आमच्या घरी पुष्कळ अन्न शिजावे आणि पुष्कळ अतिथी यावेत. आमच्यापाशी पुष्कळांनी मागावे पण आम्हाला कोणापाशी मागण्याची पाळी येऊ नये.’

आपली संस्कृती संत सज्जनांनी वारंवार केलेल्या उत्तम विचारांच्या संस्करणाने सुसंस्कृत आहे. सर्वांनी हातभार लावला तर सर्वांची प्रगती, सर्वांचा विकास साधता येतो. हेच आपला धर्म सांगतो.

पण..... !!!

ही झाली नाण्याची एक बाजू. आपण दयाळू, परोपकारी असलो तरी जग तसे नसते. त्यात अनेक दुष्ट प्रवृत्तीचे लोभी लोकही असतात. शक, हूण, मुसलमान, डच, पोर्तुगीज, इंग्रज भारतात येताना त्यांच्या राजांनी त्यांना सांगितले होते की, भारतात खूप सोने, प्रचंड समृद्धी आहे. लोक अत्यंत श्रीमंत आहेत. त्या राजांना, लोकांना ठार मारा. जमेल तेवढे धन लुटून आणा. मुसलमान असो वा अलेक्झांडर असो त्यांनीही हीच आक्रमक पाशवी वृत्ती दाखवत भारताला लुटले. पण आज शक, हूणांचे नामोनिशाण राहिले नाही. अलेक्झांडर असो, गझनीचा महम्मद असो वा डच, पोर्तुगीज, इंग्रज असोत सर्व आक्रमणकारी अत्यंत हाल होऊन तरी मेले किंवा त्यांना माघार घेऊन आपला देश सोडावा लागला आणि आज त्यांची परिस्थिती पाहता रोज दंगे, लुटालूट ह्यांना तोंड देता देता ते जेरीस आले आहेत. दुसर्‍याचे ओरबाडून घेतलेले सुख वादळासारखे असले तरी चिरंतन टिकणारे नसते

ह्या पार्श्वभूमीवर पाहता, सज्जनांच्या , विश्वाच्या सुख समृद्धीचा मार्ग प्रशस्त होण्यासाठी दुष्टांना वारंवार धडा शिकवून त्यांच्यापासून सज्जनांचे रक्षणही तितकेच आवश्यक असते.

 आपल्याला जग जसे हवे तसे नसते. रोज आपल्या डोळ्यांना जे काही भयद दिसते, त्यामुळे मनात एक अनामिक भीती ठाण मांडून बसते. ज्या भयद वार्ता कानावर पडतात, ज्या भयंकर घडामोडी ऐकू येतात त्यामुळे मनात अस्वस्थता दाटते; जणु काही एखादी डाकीण आमच्या डोळ्यातून, कानातून शरीरात शिरते. अशा वेळी विभीषण हनुमानाला प्रार्थना करतो, ‘‘ह्या विचित्र, प्रतिकूल भीतीरूपी डाकिणीचा तू नाश कर. आमच्या प्रगतीला प्रतिबंध करणारी, आमच्या स्वातंत्र्याला खीळ घालणारी दुसर्‍यांची हुकुमत; आमच्यावर सतत दबाव ठेवणारे परकीय नियंत्रण; आम्हाला पराधीन करणारे आणि शत्रूच्या जाळ्यात अडकवणारे परकीय शिक्षण खंड खंड कर. तसं करण्याची ताकद आम्हाला दे. आमची स्वतःची मंत्रणा, कोणा दुसर्‍या शक्तीचा दबाव नसलेले आमचे स्वतःचे शासन, आमचे स्वतःचे तंत्रज्ञान, आमच्या हिताचे शिक्षण आमच्यातून प्रकट कर. त्यासाठी मधे येणार्‍या सर्व विघ्नांचा नाश करण्याची मानसिक उमेद, शारिरीक ताकदीचा आविष्कार आमच्यातून होऊ दे. सर्व आपत्तींचा नाश करून सर्व शत्रूंना नामोहरम करून आम्ही सर्व क्षेत्रात यशस्वी होणारच ही आमच्यात दडलेली ऊर्जा सर्व विश्वाला दिसू देत. अत्यंत अवघड अशक्यप्राय वाटणार्‍या असाध्य गोष्टी आम्ही साध्य करू हे मनोबल आणि शरीरबल आम्हाला दे.

पर-मंत्र, पर-यंत्र, परतंत्र, पर-विद्याः छेदय छेदय ।

स्व-मंत्र, स्व-यंत्र, स्व-तंत्र, स्वविद्याः प्रकटय प्रकटय ।

सर्व अरिष्टान् नाशय नाशय ; सर्व शत्रून् नाशय नाशय ।

असाध्यं साधय साधय’’ ।।

 ह्या प्रार्थनेत आपल्या माननीय़ पंतप्रधान मोदीजींचा अजून एक विचार जोडू या सर्वांचा सहभाग आणि सर्वांच्या प्रयत्नाने सर्वांचा विकास हा समृद्धीचा मूलमंत्र आहे. विश्व-कल्याणाच्या प्रार्थनेने ह्या लेखमालेला विराम देते.

------------------------------------------

28 नोव्हेंबर 2026

 

 

Comments

Popular posts from this blog

अनुवाद-पारिजात (स्तोत्र अनुक्रमणिका)

ललित लेख (अनुक्रमणिका)

राजा भोज आणि अमूल्य हिरा