9 ‘‘ सुजला भारतभूमीचे दर्यावर्दी पुत्र ’’

9 ‘‘ सुजला भारतभूमीचे दर्यावर्दी पुत्र ’’

 

  पाण्यात राहून सर्व जलचरांची पाण्याशी मैत्री असते. मग माणसाची कशी नसेल बर? सुजला असलेल्या भारतभूमीला तीन बाजूंनी 7000 कि.मी. इतका प्रशस्त व दीर्घ सागर किनारा लाभला आहे. तर भारताच्या ताब्यातील सर्व बेटे धरली तर हा समुद्र किनारा 11 ते 12 हजार कि. मि. इतका सुदूर पसरला आहे. भारतभूमीचं सौंदर्य, ऐश्वर्य शेकडो पटींनी वाढवायचे काम हे किनारे  करतात. भारताच्या पूर्वेला गंगासागर किंवा महोदधी तर पश्चिमेला असलेला सिंधूसागर भारताचे किनारे समृद्ध करतात.

 अथांग समुद्र आम्हा भारतीयांना अनादि काळापासून बोलवत आहे. लाटांचे हात पसरून माणसांना, जहाजांना तारण्यासाठी उत्सुक आहे. झाड दिसल्यावर पक्षी ज्या सहजतेने झाडावर बसतो त्याप्रमाणे माणसाला पाणी पाहून त्यात सूर मारवा असं वाटणार नाही हे कसं शक्य आहे? त्याच्यात नाव, जहाज घालून त्याचा अथांगपणा आजमावावा असं कुतुहल कसं वाटलं नसेल? आपल्या पलिकडे कोण शेजारी राहत असावा हे कुतुहल माणसाला स्वस्थ कसं बसु देईल? दर्यावर्दीपण भारतीयांच्या नसानसातून पूर्वीपासून सळसळत आहे. मोती, विविध खनिजं, क्रूड तेल अशा14 रत्नांनी समृद्ध असलेला रत्नाकर आजही blue revolution घडवून भारताला समृद्ध करत आहे.

समुद्र अनेक देशांना जोडायचं काम करतो. आज भारताचा 90 ते 95टक्के आंतरराष्ट्रीय व्यापार समुद्रमार्गे चालतो. 150 हून अधिक देशांना भारताच्या बंदरांमधून अनेक प्रकारच्य मालाची आयात निर्यात होत असते. भारतातल्या अनेक गोष्टींची आपण निर्यात करत असतो. इतकच नाहीतर आंतरराष्ट्रीय व्यापार करणार्‍या अनेक देशांच्या जहाजांवर आज मोठ्याप्रमाणावर भारतीय लोक जहाजाचे कप्तान, इंजिनअर वा खलाशी म्हणून काम करत आहेत. आज भारताचे नौदलही अत्यंत बलवान आहे. अनेकवेळा समुद्री चाच्यांच्या होणार्‍या हल्ल्यांमधे भारतीयांवर होणारे प्राणघातक हल्ले पाहून सर्व समुद्री मार्गांवरील भारतीय जहाजे आणि भारतीय नाविक अधिकारी, खलाशी ह्यांच्या सुरक्षेसाठी नवी धोरणे जाहीर केली आहेत. भारतीय नौदलाची जहाजे क्रूड तेल घेऊन येणार्‍या भारतीय टँकर्सना बाब अल् मॅन्डेब स्ट्रेट मधून त्यांची सुरक्षित मार्गक्रमणा होण्यासाठी सुरक्षा पुरवण्यासाठी नेमली आहेत.

आजच नाही तर शेकडो वर्षांपूर्वीही भारताला सोनेकी चिडिया म्हणत असत. भारतात सोन्याचा धूर निघतो असं म्हणत असत ते उगीच नाही. भारताची ही समृद्धी फक्त भारतात तयार होणार्‍या उत्पादनांमुळे नाही तर ह्या विविध उत्पादनांची होणारी निर्यात सोन्याच्या रूपात परत भारतात येऊन भारताला समृद्ध करत होती. 

भारताचा दर्यावर्दी इतिहास अनेक संस्कृत व तामीळ शब्दाशब्दांमधून स्पष्ट दिसतो.  ह्या संदर्भातील अनेक शब्द संस्कृत किंवा तामीळ भाषेतून आले आहेत. उदा. – संस्कृतमधील नाव ह्या  शब्दावरूनच  इंग्रजीतील नेव्ही, नेव्हल, नॅव्हिगेशन (Navy, naval, navigation) तामीळ कप्पल(मोठे भांडे) म्हणजे जहाज हा शब्द इंग्रजीतील skip (मोठे भांडे) आणि त्यावरून ship  ह्या शब्दाचा जनक आहे. 15 ते 18 व्या शतकात वापरात असलेले galleon हे मोठे (multi-decked sailing ship used for war and trade) ह्या शब्दाचे मूळ संस्कृत कलशम् मधे आहे तर यानपात्र  ह्या संस्कृत शब्दाला मराठीत ज्याला प्रवासी भांडे म्हणता येईल ह्या शब्दापासूनच vessel / ship  हा शब्द आला आहे. संस्कृत पोत हा जहाजासाठी असलेला शब्द आज आपण जसाच्या तसा हिंदीत वापरतो. जगामधील कुठलीही संस्कृती भारतीय संस्कृतीइतकी समुद्रासोबत इतकी जवळीक, इतकी सलगी दाखवत नाही.

 

अरेरे! ----पण इंग्रजांनी त्यांच्या व्यापाराच्या आड येणारा आपला दर्यावर्दीपणा पूर्ण मोडीत काढला. कुठल्याशा पोंगा पंडिताकडून समुद्र ओलांडला तर प्रायश्चित्त घ्यावं लागतं असं लिहून घेऊन त्यावर ‘‘इति वेदशास्त्र पुराणक्त’’ची खोटी मोहोर उठवली.  भारतीयांना आपल्याच कौशल्याचा सक्तीने विसर पडायला लावला. आम्ही म्हणू तेच खरं! गुलामांना त्यांचं मत नसतं. शंभर वर्ष झोपणार्‍या गोष्टीतल्या राजकन्येसारखा भारत झोपला. त्याला आपल्या कलाकौशल्याला , प्रगत शास्त्र गणिताला, खगोल शास्त्राला, भूगोल, भूगर्भ शास्त्राला खगोल शास्त्राला विसरला. आपल्या दर्यावर्दी पूर्वजांना विसरला. समुद्र ओलांडणं निषिद्ध समजलं जाऊ लागलं. समुद्र ओलांडला तर माणसं प्रायश्चित्त घेऊ लागली. मूळ भारतीय नसलेले पण इंग्रजांना अनुकूल, फायदेशीर, सोयीस्कर असलेले भारतात येऊन वसलेले पारशी, ज्यू, मुसलमान, हिंदुंव्यतिरिक्त इतर मात्र इंग्रजांच्या जोडीने समुद्रमार्गे व्यापार करून कायमचे श्रीमंत झाले.

फार प्राचीन काळापासून भारत हा जहाज बांधणीसाठी फार प्रसिद्ध देश होता. तेव्हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर बांधलेल्या भारतीय जहाजांना सर्व देशांतून मागणी असे. कारण  ह्या जहाजांमधे समुद्राच्या पाण्यात गंजून जहाजाला धोका निर्माण होईल, असा एकही लोखंडी खिळा नसे. ही जहाजं उत्तम प्रकारच्या सागाच्या फळ्या शिवून बनवलेली असत. त्यासाठी नारळाच्या बाहेरच्या आवरणापासून बनवलेला काथ्या पाण्यात भिजवून, अजून भक्कम करून त्याचे मजबूत दोर वापरले जात उच्च प्रकारचा डिंक राळ वापरल्याने जहाज सर्व प्रकारे अच्छिद्र, गळतीमुक्त बनत असे. अशा जहाजांना सर्व जगातून मागणी असे. आजही अशी जहाजं बनवणारे थोडे परिवार केरळ, लक्षद्वीप येथे शिल्लक आहेत.

सिंदबाद हा ओमानचा नागरीक होता. त्याने केलेल्या सफरींची सत्यात्यता पडताळून पहाण्यासाठी ओमान सरकारच्या पाठिंब्याने २१ नोव्हेंबर १९८० रोजी ओमानमधील सुर (Sur) बंदरातून 'सोहर' (Sohar) नावाच्या प्राचीन अरबी जहाजाची ऐतिहासिक सफर सुरू झाली. सिंदबादच्या सफरीची पुनरावृत्ती करणारी ही पहिलीच मोहीम होती, जिने ओमान ते चीनपर्यंतचा ६,००० मैलांचा सागरी प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. हे सोहर जहाज खास जुन्या जहाजांप्रमाणे भारतात शिवलेलं जहाज होतं. तर--- 

भारताच्या नौसेनेचं असच हातानी शिवलेलं INS कौंडिण्य हे शिडाचं जहाज 29 डिसेंबर 2025 ला भारताच्या पोरबंदर हून निघून 17 दिवस प्रवास करून ओमानला मस्कत च्या बंदरात पोचलं. हजारो वर्षांपासून भारताची जहाजं समुद्रमार्गे सर्व विश्वाला जोडत होती. तेव्हा हा प्रवास मुख्य देशांच्या जमिनीच्या किनार्‍या किनार्‍याने होत असे. तोच किनार्‍या किनार्‍याचा रस्ता INS कौंडिण्यने अनुसरला.

प्राचीन काळी भारताचे प्रसिद्ध दर्यावर्दी कौंडिण्यऋषी  समुद्र पार करून दक्षिणपूर्व अशियाला पोचले;  तेथे त्याच्या नावाने आज कंबोडिया हा देश आहे. त्यांच्याच नावावरून ह्या जहाजाला कौंडिण्य नाव देण्यात आलं. पूर्वापार जे नाविक तंत्रज्ञान वापरलं जात असे तेच तंत्रज्ञान ह्या जहाजात वापरलं गेलं.

 त्यावेळच्या जहाजांचा आकार कळेल असे काही कागदपत्र शिल्लक न राहिल्याने अजंठा येथील गुफांमधील पाचव्या शतकातील असलेलं जहाजाचं चित्र प्रमाण मानून कौंडिण्य हे जहाज बनवलं गेलं. काही प्रतिके आणि काही ऐतिहासिक संदर्भ ह्यावर विश्वास ठेऊन जहाजाचा आकार बनवला गेला. त्याच्या शिडांवर दोन डोक्यांचा गंडभेरुंड नावाचा पक्षी आणि सूर्याचं चिह्न अंकित करण्यात आलं. जहाजाच्या अग्रभागावर(bow) सिंह-व्यालचे शिल्प कोरले आहे तर डेकवर हडप्पा संस्कृतीच्या काळातील प्रतिकात्मक दगडी नांगर बसवला आहे. ह्या प्रत्येक वस्तूतून प्राचीन भारताची समृद्ध समुद्र परंपरा दिसून येते.

 भारतावर वक्रदृष्टी असणार्‍या इंग्रजांना, पोर्तुगिजांना, डचांना धडा शिकवण्यासाठी आपलं नौदलही असायला पाहिजे असं नुसतच वाटून न थांबता, ते प्रत्यक्षात उभारून  शिवाजी महाराज आणि सरखेल (admiral) कान्होजी आंग्रे ह्यांना समुद्राचं महत्त्व उत्तम कळलं होतं.

अगस्ति आणि कौंडिण्यऋषींनी दक्षिणपूर्वेकडे समुद्रप्रवास करून हिंदू राज्ये स्थापन केली. आपले भारतीय पूर्वज प्राचीनकाळापासून समुद्रमार्गे दक्षिणपूर्व आशियाला  पोचल्याचे अनेक स्थापत्य शास्त्रातील पुरावे आहेत. थोडेसे येथे देते जे जवळ जवळ सर्वांनाच माहित आहेत आणि मान्य आहेत. कंबोडियातील अंकोरवाट मंदिर तर  इंडोनेशिया प्रम्बानन मंदिर बँकॉक येथील ब्रह्मदेवाचे मंदिर (Erawan shrine ), ब्राह्मण मंदिर, मरिअम्मन मंदिर, सिंगापूरचे श्रीकृष्ण मंदिर, पेरुमल मंदिर.

 

फार फार पूर्वीपासून पश्चिम किनार्‍यावरून सिंधुसागरातून आपला येमेनशी तूपाचा व्यापार होता. गुजरात मधून हे तूप येमेनला जात असे अर्थातच समुद्र मार्गाने जाताना वाटेत थांबण्यासाठी एक बेट आहे त्याचं नाव सुकोत्रा (socotra). पूर्वी हे प्रवास सुखकारक करणारं सुखकर्ता बेट आज सुकोत्रा झालं इतकच!

 

सिंधुनदीच्या खोर्‍यात मिळालेल्या शिक्क्यांवर, नाण्यांवर जहाजांची चित्र असत. ही नाणी व शिक्के आखाती देशांमधून हस्तगत करण्यात आले आहेत.

 

आपल्याकडील राजा समुद्रगुप्त ह्याने समुद्राचं प्रचंड विस्तृत क्षेत्र अधिपत्याखाली आणण्यामुळे त्याला समुद्रगुप्त म्हणू लागले. सातवाहन राजांनी त्यांचा समृद्ध समुद्र व्यापार दर्शवणारी जहाजाची चित्र असलेली नाणी काढली होती. सगर राजाचे नाव सागर म्हणजे समुद्रवरूनच आले आहे.

 

संगम नावाच्या कवीने केलेल्या स्तुतीकाव्यातून  कारीकल हा तामीळ राजा नैऋत्य मौसमी वारे व वायव्य मौसमी वारे ह्यांची ताकद वापरून अनेक समुद्रसफरी करून आला होता हे सांगितले आहे. नंतर राजराज चोला राजेंद्र चोला ह्यांनी विशाल समुद्रावर आपले अधिपत्य स्थापित केले. कालिदासाच्या मेघदूतम् मधे ढग घेऊन येणार्‍या नैऋत्य मौसमी आणि वायव्य मौसमी  वार्‍यांचा प्रवास सुंदर दाखवला आहे तर पावसाळी ढग पाहून आता आपले पती समुद्र सफरीवरून परत येतील  म्हणून त्यांची वाट पहाणार्‍या स्त्रियांचे वर्णन करणारे तामीळ कवी संगमच्या शतश्लोकी रचनेत दिसून येते.

समुद्रीचाच्यांचा पाडाव केल्याची खूप पूर्वीपासूनची उदाहरणे आहेत. तामीळ राजा  चेरन सेनगुट्टुवन ह्याने समुद्री चाच्यांचा नायनाट केला तर इलमपेरु वझुथी हा राजा समुद्रसफरीत मरण पावल्याचे उल्लेख आहेत तर पांड्य राजा मारन ह्याने पहिल्यांदा व्हिएटनाम (चंपादेश) मध्ये सत्ता स्थापन केली.

आज धोक्याचा इशारा म्हणून वापरले जाणारे  कवटी आणि दोन हाडांचे चित्र हे पूर्वी समुद्री चाच्यांच्या जहाजांवरील झेंड्यावर असे. परमेश्वर वर्मन आणि नंदिवर्मन ह्या राजांनी समुद्री चाच्यांचा पूर्ण बिमोड करून त्या विजयाचं चिह्न म्हणून त्याच्या जहाजांवर कवटी आणि हाडं असलेला झेंडा त्यांच्या जहाजांवर लावायला सुरवात केली.

बंगाली लोककथांमधे महोदधी म्हणजे बंगालाच्या उपसागरात जलदस्यू  अत्यंत सक्रीय असल्याचा उल्लेख येतो. एका कथेनुसार देवीच्या निस्सीम भक्ताच्या जहाजावर हल्ला करणार्‍या जलदस्यूंच्या संपूर्ण ताफ्याचा देवी कालीने

 उग्र रूप धारण करण समुद्रातच नाश केल्याचा उल्लेख येतो. तर पश्चिमेला सिंधुनदीच्या मुखाजवळ लुटमार करणार्‍या जलदस्युंचा देवी हिंगलाज आणि सागरीमातांनी पराभव करून समुद्रात परत शांतता प्रस्थापित केली. महिषासुर मर्दिनी स्तोात्रातही समाधि नावाचा वैश्य (व्यापारी) आणि इतर देवीची स्तुती करतानाचा उल्लेख आहे. प्राचीनकाळी व्यापारी व खलाशी प्रवासाला निघताना विंध्यवासिनी देवीची प्रार्थना करीत असत.

एके काळी सोन्याची लंका म्हणून प्रसिद्ध असलेली नगरी राक्षसांची होती. (समुद्राचं रक्षण करणारे ते राक्षस) विष्णूने त्यांचा वारंवार पाडाव केल्याने सर्व राक्षस लंका सोडून रसातळात रहायला गेले. स्वर्णलंका ओस पडली. यम, इंद्र, वरूण ह्याप्रमाणे ब्रह्मदेवाने कुबेराला दक्षिणेकडे लोकपाल म्हणून नेमलं पण त्याला रहायला योग्य जागा नव्हती त्यावेळेला त्याचे वडिल पुलस्य ऋषिंनी त्याला त्रिकूट पर्वतावर वसलेल्या सोन्याच्या लंकेत राहण्याचा सल्ला दिला व कुबेर तेथे राहू लागला.

म्हणजे  समुद्रपार लंकेत राहणारा रावण हा काही पहिलाच लंकेचा राजा नाही तर समुद्राचं रक्षण करणारे ते राक्षस तेथे कित्येक पिढ्या रहात होते. समुद्र लंघून जाणे हे पाप तेव्हाही समजलं जात नसे.

नाग आणि वरुणाच्या सैन्याने सुरक्षित असलेल्या समुद्रात शिरून रावणाने भोगवती नगरीला नागांना वश करून घेतले  तर मणिमयीपुरीच्या निवातकवचांच्या सोबत चाललेलं युद्ध ब्रह्मदेवाच्या मध्यस्थीने  थांबून त्याच्यात मैत्रीचा करार झाला. तेथून रावण अश्मनगरीला गेला आणि दोन घटकांमधेच त्याने चारशे जणांचा खातमा केला. तर वरुणाच्या मलांचा व पु्राचाही पराभव केला

श्रीकृष्णाने मथुरा सोडून द्वारकेला यादवांची राजधानी वसवली तिला ही स्वर्णद्वारका म्हणत. ह्याचं कारणही समुद्रमार्गे व्यापार हेच आहे.  समुद्रमार्गे दूरदूरच्या देशांना होणारा व्यापार देशाला समृद्ध बनवतो. स्वर्ण द्वाारका स्वर्ण लंका हे इतर देशांशी होणार्‍या व्यापारातूनच संभवते.  श्रीकृष्णाने शंखचूड आणि पांचजन्य ह्या समुद्री चाच्यांना ठार मारून त्यांच्याकडचे शंख काढू घेतले व पांचजन्य हा शंख  विजयचिह्न म्हणून कायम बरोबर बाळगला. महाभारत युद्धातही त्याचा उल्लेख आहे.

कालकेय हे समुद्रीचाचे होते. दिवसा ते लोकांना माहित नसलेल्या जवळपासच्या छोट्या निर्जन बेटांचा आश्रय घेउन रहात आणि रात्री लोकवस्ती असलेल्या बेटांवर हल्ला करून निरपराध लोकांना लुटत, त्यांची हत्या करत. त्याचा प्रमुख वृत्रासूर होता. इंद्राने वृत्रासूराल ठार मारले.  कालकेयांच्या नायनाटासाठी विष्णूने लोकांना समुद्रविज्ञान आणि सागरी अभियांत्रिकीचे उत्तम ज्ञान असलेल्या अगस्तीमुनींची मदत घेण्याचा सल्ला दिला. अगस्तींनी सर्व लपलेल्या कालकेयांना वश करून घेतलं आणि कालकेयांचा उच्छाद संपवला. 

कृष्ण आणि अर्जुनाने निवात कवच नावाच्या हजारो समुद्रीचाच्यांचा नायनाट केला.

सीतेच्या शोधासाठी वानराना निरनिराळ्या दिशांना पाठवताना सुग्रीव ज्या लोकांचं वर्णन करतो ते आजही अफ्रिकेच्या लोकांना लागू होईल. पूर्वेकडे यवद्वीप आणि सुवर्णद्वीपला म्हणजेच आत्ताच्या जावा सुमात्राला ही त्याने काही वानराना पाठवले. संपूर्ण पृथ्वीची परिक्रमा आणि त्यात आलेल्या विविध समुद्रांचं वर्णन सुग्रीवाने केलं आहे. उदयाचल म्हणजे जपानच्या वर्णनाप्रत येऊन सुग्रीव थांबतो आणि वानरांना म्हणतो पुढे कुठला देश व त्याची सीमा नाही. त्याच्या पुढची माहिती मला नाही.

सीतेचा शोध घेण्यासाठी समुद्र लंघून गेलेल्या हनुमंताचं कौतुक आपण आजही करतो. राम, लक्ष्मण आणि सुग्रीवाचं संपूर्ण सैन्य समुद्र ओलांडून लंकेत पोचले. लढले ते रामायण आजही आम्हाला पवित्र आहे. ह्या पैकी कोणी समुद्र ओलांडल्याबद्दल प्रायश्चितत घेतल्याचे कोठेही उल्लेख नाहीत. वा अगस्ती, कौंडिण्य ह्यांनाही कोणी प्रायश्चित्ते घ्यायला लावली नाहीत.  मग हे आपल्या धर्मात पाप कसे ठरेल?  

असो! हे सर्व सांगण्याचा उद्देश प्राचीन कालापासून आजपर्यंतचा भारतीयांचा भव्य दिव्य दर्यावर्दीपणा सर्व वाचकांपुढे ठेवणे हाच आहे.  

 

( संदर्भ, रामाायण, भागवत,

https://tamilandvedas.com/2012/04/26/hindu-gods-naval-attacks-against-pirates/  )

------------------------------------------------


Comments

Popular posts from this blog

अनुवाद-पारिजात (स्तोत्र अनुक्रमणिका)

ललित लेख (अनुक्रमणिका)

राजा भोज आणि अमूल्य हिरा