रानफुले -
रानफुले -
कोणीही न लावता, रानात उगवणारी ती रानफुलं! त्यांना
कुंडीत, सज्जात, मानवाने बनवलेल्या बागांमधे रुची नसते. तेथे त्यांचा जीव घुसमटतो,
मोकळ्या आकाशाखाली, निसर्गाच्या सानिध्यात, वसुंधरेच्या कुशीत, माळरानांवर,
दगडांच्या खोबणीत, कडे-कपारीत, पठारांवर , सूर्यासोबत हसत, वार्यासवे डुलत डोलत,
बरड वाळवंटात पाय रोवून; तर धुवाँधार पावसात न कुजता न मोडता, ती त्यांच्या मनस्वी
जगण्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतात. कोमल तर इतकी की, तोडली तर लगेच सुकून जातात.
कृष्णाच्या सोबत्यानी गुंफलेल्या ह्या रानफुलांची कायम ताजी टवटवीत राहणारी आपाद
वनपुष्पमाला म्हणजेच पायापर्यंत रुळणारी माळ कृष्णाच्या गळ्यात असल्याचे उल्लेख
अच्युताष्टकात आहेत(श्लोक7). वृत्तही मोठं गोड ‘स्रग्धरा!’ त्याचा अर्थच पुष्पमाला धारण करणारं! मराठीत श्लोकाच्या
ओळीचा अर्थ देते-
रानपुष्पेच ताजी सुगंधी अती
सोबत्यांनी खुडोनीच जी गुंफिली
कृष्णकंठी रुळे पुष्पमालाच ती
गोजिरी बाळमूर्ती दिसे साजिरी ।।
रानफुलांचा कोमल ताजेपणा टिकून ठेवायला सुखाचा वर्षाव
करणारा मेघश्याम श्रीहरी तरी पाहिजे नाहीतर पावसाचा शिडकावा करणारा श्याम मेघ तरी
पाहिजे. त्यामुळे जून ते ऑक्टोबर संपेपर्यंत रानफुलांचा बहर!
वैय्यक्तिक प्रगती मोजताना दुसर्याशी तुलना येते;
स्पर्धा येते; दुसर्याला खाली दाबून आपण वर येण्याचा आगाऊ अग्रेसरपणा अपेक्षित
असतो. पण सामुदायिक कृतीत वा फुलण्यात एक शिस्त असते. समान रंग, समान आकार, समान
उंची, उमलण्या, फुलण्या, मिटण्याची समान वेळ, एकोप्याने राहण्याचे एखाद्या
गणवेशधारी शिस्तप्रिय दलाचे सर्व गुण ह्या रानफुलांनी आत्मसात केलेले असतात.
कुठल्याशा
पावसाळी डोंगराळ भागात जांभळ्या तेरड्याचे कोवळे वाटणारे बुटके सैन्य आपल्या
पारदर्शक गुलाबीसर देठांच्या अंगकाठ्या घेऊन, वादळ वार्यात एखाद्या गुरखा
रेजिमेंटसारखे चिवटपणे उभे असते. पावसाने तडकणार्या तेरड्याच्या बिया त्यांचं
साम्राज्य पुढच्या वर्षी वाढेल, विस्तारेल ह्याची खबरदारी घेत असतात. तर कुठे
गुलाबी जांभळे टोकदार भाले किंवा थ्री नॉट
थ्री रायफल्स घेतलेले कुर्डु हया रानफुलांचे म्हणजेच कोंबड्यांच्या रोपांचे जवान
अनेक भागात गार्ड ड्युटीला सतर्कपणे उभे असतात.
सोनकीची
पिवळी फुलं सगळा डोंगर, पठार, जमिन चिनी सैन्याप्रमाणे व्यापून पिवळी पिवळी बनवून
टाकतात. ‘काळी मुसळी’ची पिवळी फुलं का बरं? --- त्याच्या काळ्या बीया ‘‘पौरुष आणि बलवर्धक(?)’’
असल्याने भलत्याच तेजीत असतात ; तर हबेनेरिया ची पांढरी फुलं ग्लॅडिओला प्रमाणे
एकावर एक उमलत एक फुलशिडीच तयार करतात. मखमली जांभळ्या पाकळ्यांमधे असलेल्या एका
छोट्या पाकळीवर दवाचा थेब पडल्याप्रमाणे सीतेची आसवं मन वेधून घेतात.
अशोकाच्या पानाप्रमाणे (वेव्ही) नागमोडी,
लाटालाटावाल्या लाल पिवळ्या पाकळ्यांची कळलावी किंवा अग्निशिखाची फुलं खरोखरच
आगीच्या ज्वाळांची प्रतिकृती सादर करतात. पिवळी पुंगळीची हलक्या पिवळ्या रंगाची फुलं गुलबक्षी सारखी पण लहानखुरी असतात.
आपली नेहमीची कंबरमोडी रस्त्यात सुद्धा कुठल्याशा
दगडाआड वार्यावर डुलत असते. तिचं दांडीसकट फुल तोडून टिचकी मारल्यावर लांब उडताना
पाहून, लहानपणी आम्ही रावणाचं डोकं उडवलं म्हणत असू. निळी चिरईत असो निळावंती असो
सगळे जण माळरानाची शोभा कितीक पटींनी वाढवत असतात. खरखरीत पानाच्या आणि नाजुक
नाजुक फुलाच्या घाणेरीच्या वा टणटणीच्या लालपिवळ्या झुडपांनी डोंगराचे भाग आपल्या
मालकीचे केलेले असतात.
विंचवी किंवा वाघनखी किंवा नकटी ची गुलाबीसर जांभळी
फुलं पाहिल्यावर का कोण जाणे त्यांचं नकटी नाव आवडून जातं. कांद्याचा रंग आणि
सापाच्या कातडीचं टेक्श्चर घेऊन आलेली साप-कांद्याची फुलं पहायला मजा येते.
फुलांनी केलेलं प्राण्यांचं अनुकरण मोठं गमतीशीर असतं. पाच पाकळ्यांचा झेंडू
माळरानावरच मजेत असतो.
खेळातल्या भोवर्यासारख्या गुबगुबीत छोट्या गोलावर
अबोलीप्रमाणे बाहेर डोकावणारी पांढरी द्रोणपुष्पीची फुल फुलतात. लिलीबाईंनी पावसात हजेरी लावली नाही तरच नवल!
गुलाबी, पांढरी, पिवळी ---- लिलीचे रंग तरी किती! . पिवळ्या लिलीनी एकदा का आपला
डेरा छोट्याशा भूभागावर टाकला की ती कित्येक एकर जमिन काबीज करते.
जांभळ्या फुलांचा गुंफलेला गबगुबीत लोंबणारा गजरा
म्हणजे जांभळी दशमी. आभाळीची म्हणजेच sky flower ची गुलाबीसर किंवा पिवळी फुलं रान
व्यापून टाकतात. गोलगुंडा, पिवळा
धोत्रा, आकाश तुळस, शंकासूर ही बरीचशी ओळखू येणारी झुडपं! दुधाळी किंवा
milky way ही कॅलेंड्युला प्रमाणे रान शुभ्र करणारी फुलं.
पिवळे पांढरे चवरचे पुष्पदांडे, वनराणी,
कोंडल, लाल गोधडी-----किती किती ही फुलं! न संपणारी त्यांची ओळख! कित्येकांची नावंही माहित नाहीत. फक्त नजरेने त्यांचं
सौंदर्य बघत रहायचं आणि मनात सुखावत रहायचं!
मधेच करवंदाच्या जाळ्या लागल्या तर रसरशीत करवंद
तिथेच चाखत माखत खाण्याची मजा औरच! कुठून तरी येणारा रानजाईचा सुगंध मोहवून गेला नाही तरच नवल; तर मधेच फुललेला रान कढीपत्ता म्हणतो,
‘चुरगाळून तर बघ माझं पान, असा सुगंध तुला बाजारात विकत मिळणार नाही.’ चुरगाळलेलं
पान बोटांवर कढिपत्याचा वास कित्येक तास रेगाळत ठेवतं
छोट्या छोट्या जागांवर आपला हक्क सांगणारी नाजुक
जांभळी केसाळ लाजाळूची फुलं असोत वा गालिच्यासारखी खाली जमिनीलगत पसरत जाणारी
निळी, पिवळी, पांढरी गोडुली फुलं असोत! छान जाळीच्या रुमालाने ताट झाकावे किंवा
दरवाजात रांगोळीने गोल वा षट्कोनी झेला रेखावा तसा जमिनीलगत राहून त्यावर सुबक गोल
आकारात सर्व दिशांनी सारखा पसरत राहणारा निळा जांभळा इटुकल्या पिटुकल्या
विष्णुक्रांता वनस्पतीचा झेला बघत रहावा इतका सुंदर!
फुलांचं साम्राज्य पक्षी, कीटक, मधमाशा आणि
फुलपाखरांवाचून पूर्ण होत नाही. फुलपाखरं म्हणजे फुलांच जणु उडतं प्रतिबिंब तर
फुलं म्हणजे फुलपाखरांची स्थिर प्रतिमा. दोघांनाही त्यांची प्रतिमा प्रत्यक्षाहून
उत्कट वाटावी इतके त्या दोघांचे रंग, रंगसंगती मनोरम! पिवळी, काळी, लालपिवळी,
रंगिबेरंगी फुलपाखरं फुलांच्या ताटव्यांवर भिरभिरत असणं ही फुलांची श्रीमंती! फुलं आणि फुलपाखरांनी नटलेली वसुंधरा पहायला
मिळणं ही आपली श्रीमंती!
जून ते ऑक्टोबर ह्या काळात एकमेकांसवे
गुण्यागोविंदाने नांदणारी, जमिनीवरची, फुलांची छोटी मोठी पुष्पसाम्राज्य बघत जाणं
हा नेत्रसुखद रंगोत्सव असतो. कुठला रंग कुठे चालू होईल आणि कोठे दुसरा त्यात
मिसळून जाईल आणि हा निसर्ग सुंदर रंगांचा नक्षिदार गालिचा कसा विणत जाईल ही
अनुभूती स्वतः एकदा तरी घ्यायला पाहिजे. स्वतःचं स्वत्व, स्वातंत्र्य जपत;
इतरांनाही छान फुलू देत; एकोप्यानी नांदणारी विविध रंगी पुष्प साम्राज्ये एक
विस्तीर्ण पुष्प साम्राज्य तयार करताना पाहून; विविध संस्कृती एकोप्याने जपणारे
आम्ही भारतीयही तसेच नाही का? असा सुखद विचार मनात डोकावतो. शीळ घालत स्वच्छंदपणे
डोंगर दर्यातून हिंडलं पाहिजे. मी हे वैभव डोळ्यात साठवायला निघालेच आहे;
तुम्हीही येता ना!
स्वच्छंद विहरतो, आकाशातुन । मेघ धवल तो जसा
मनमुक्तपणे मी, तशी एकदा । फिरले दाही दिशा
ओठात शीळ मम, साद घालते । रानपाखरासवे
बहु गिरीकंदरा, पार करित मी । रानवाट अनुसरे
चढ चढता चढता , नेत्रांपुढती । साकारले पठार
उलगडतचि गेला, पुष्प गालिचा । त्यावरती अलवार
चैतन्यमयी तो, रानफुलांचा । भव्य गालिचा हसे
ते अबलख न्यारे, रंग फुलांचे । जणु इंद्रधनु विलसे
वार्याने त्यावर उठती लहरी । सरसरसर धावती
टेकवी फुले शिर, शेजार्यांच्या । खांद्याफांद्यांवरी
कधि रेलत चुंबत, झुलतचि अलगद । पुष्प ताटवा हसे
जणु इंद्राचे का, नंदनवन हे । वाटे मनी ऐसे
ते नृत्यनाट्य मी, बघत राहिले । विसरुन सारे भान
हृदि आनंदाचे, तरंग उठती । मन जाय मोहरून
हातात हात घालून वायुच्या । परिमल फिरेचि स्वैर
मम हृदयमंदिरी प्रवेशता तो । मम हृदय सैरभैर
मम हृदयकुपीतचि, आजही आहे । सुगंध ताजा तोच
ह्या मनपटलावर, चित्र रेखले । रंगही ओले तेच
मम हृदय मंजुषा, कधी अचानक । उघडुन जातो काळ
अन पुष्प गालिचा, नेत्रांपुढती । उलगडतो अलवार
------------------------------------------------------
अरुंधतीप्रवीणदीक्षित-
(मेनका मासिकाच्या ऑगस्ट 26 च्या अंकात प्रसिद्ध
झालेला लेख)
---------------------------------------------
नीलांबरी काळी मुसळी, विंचवी, निळी चिराईत, साप कांदा, आभाळी, ढाल तेरडा, आकाश तुळस, रानभेंडी,
कानपेट,कळलावी/ अग्निशिखा,
सोनेरिला, कंबरमोडी,
थुंबा/द्रोणपुष्पी, सीतेची आसवं, ताग, बुरुंडी
कुर्डु/कोंबडा, दुधाळी,
रुई, लाजाळू, गोलगुंडा, पिवळा धोत्रा, चवर, वनराणी, कोंडल, लाल गोधडी, चिरेहबेअमरी, घाणेरी, टणटणी, सोनकडी, पिवळी पुंगळी, विष्णुक्रांत, संकासूर, सोनकीची पिवळी (हरिश्चंद्रगडच्या जांभळी दशमी जांभळ्या फुलांचे लोंगर
सोनकडी (Pentanema Indicum), पिवळी पुंगळी (Obscure Morning
glory ), विष्णूक्रांत (Dwarf Morning glory), .संकासूर (Peacock Flower /
Caesalpinia Pulcherrima)
डोंगर भाऊ ब्लॉग
कास प्रमाणेच पुष्प वैविध्य असलेला किल्ला म्हणजे पुरंदर किल्ला. १५०० मीटर उंची असलेल्या या किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरील केदारेश्वर मंदिराकडे जाणारी पायवाट सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस फ़ुलांनी भरुन जाते. सोनकीच्या पिवळ्या फ़ुलांनी डोंगर जरी झाकलेला असला तरी पुरंदरवर अनेक प्रकारची फ़ुल पाहायला मिळतात. त्यात निळ्या जांभळ्या रंगाची निलांबरी, आकाश तुळस, इत्यादी दुर्मिळ फ़ुलही पाहायला मिळतात. त्रिंगलवाडी किल्ल्याला नाशिकच कासच पठार म्हणतात. या किल्ल्याच्या पठारावर रानफ़ुलांचे अनेक प्रकार विखुरलेले पाहायला मिळतात. हरिश्चंद्रगडावरचा गुहेसमोरचा आणि मंदिराच्या आजुबाजूचा प्रदेश सोनकीच्या चादरीने झाकलेला असतो)
https://samantfort.blogspot.com/2015/09/sahyadri-valley-of-flowers.html#:~:text=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%20%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A%20%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AB%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80,%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9A%20%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%20%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%20%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87.&text=%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%80%20%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AB%E0%A4%BC%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80,%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AB%E0%A4%BC%E0%A5%81%E0%A4%B2%20%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6%20%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BE%20%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4.
Comments
Post a Comment