शाकम्भरी इति विख्याता

 


 शाकम्भरी इति विख्याता

‘अल निनो’ चा प्रभाव आपण ह्या वर्षी पावसाळ्याच्या सुरवातीलाच आज पाणी कपात! उद्या पाणी कपात!!---- म्हणत अनुभवला आहे. एक दिवस पाणी नाही म्हटलं की तोंडचं पाणी पळतं; मग असा दुष्काळ एक नाही दोन नाही तब्बल शंभर वर्षे पडला तर काय होईल?  आपल्याला माहित आहे का? असा भीषण दुष्काळ भारतात खरोखर शंभर वर्ष पडला होता. नेमका हा कालखंड कोणता हे मात्र शास्त्रज्ञांना कळत नव्हतं.  त्यांनी पूर्वीचे दस्ताऐवज धुंडाळायला सुरवात केली. पू्र्वीच्या ठिकठिकाणच्या पावसाच्या नोंदी शोधल्या गेल्या. ठिकठिकाणच्या नद्यांवरील पातळी दाखवणार्‍या नोंदी तपासल्या. पण नाही. त्यांना हा कालखंड काही सापडेना. मग त्यांनी संस्कृत स्तोत्रे, पोथ्या शोधायला सुरवात केली आणि काय आश्चर्य! सापडला! हा कालखंड त्यांना सापडला!!

देवीसप्तशतीमधे 11 व्या अध्यायात 46 व्या श्लोकात भारतात भयंकर दुष्काळ पडणार असल्याचे भाकित तेव्हाच्या हवामान तज्ज्ञानी केले असल्याचा उल्लेख आहे. आपल्याकडे कुठल्याही गोष्टीचे श्रेय स्वतः घेण्याची पद्धत नव्हती; त्यामुळे देव/देवी म्हणाली म्हणत, देवाला/देवीला श्रेय देऊन ऋषीमुनी स्वतः निर्लेप भावनेने रहात.

आपल्याकडे सर्व इतिहास सर्वसामान्यांना रुचेल, पचेल असा गोष्टीस्वरूप असल्याने त्यात अनेक अतिरंजित गोष्टीही येतात. तर काही वेळा अत्यंत महत्त्वाची माहिती फक्त ज्ञानी किंवा त्यातील संशोधन करणार्‍या जिज्ञासूलाच शोधून कळेल अशी असते. त्यामुळे रामायण, महाभारत, घडलं का नाही अशीही शंका लोक घेत राहतात.  म्हणूनच सप्तशतीतील ह्या नोंदीची वैधता तपासण्यासाठी; ही नोंद खरी का काल्पनिक हयावरही आपल्याकडच्या संशोधकांचा अभ्यास सुरू झाला. ह्या कालखंडाच्या नोंदीला काही पुरावा मिळतो आहे का ; हेही तपासून पहायला सुरवात झाली.

भारतात पडणारा पाऊस अनेक घटकांवर अवलंबून असतो. त्यातच एक पावसासाठी कारणीभूत घटक म्हणजे नाईल नदीची पातळी. हा एक दुवा भारताच्या पावसाचे अनुमान करताना पाहिला जात असे. तुम्ही म्हणाल, नाईल कुठे? भारत कुठे ? नाईल नदी तर अफ्रिका खंडात इजिप्त, सुदान मधून वाहते. त्याचा आपल्याकडच्या पावसाशी काय संबंध? पण आहे. तो संबंध असा आहे की, नाईल नदीची पातळी जेव्हा खाली असते तेव्हा भारतात दुष्काळ असतो तर नाईल नदीची पातळी जेव्हा वरती असते तेव्हा भारतात भरपूर पाऊस असतो.

मग नाईल नदीच्या पात्राची पातळी खूप पूर्वी कधी खाली गेली होती का? ह्याचा शोध सुरू झाला. सुदैवाने नाईल नदीची पातळी दर्शविणारे अडिच तीन हजार वर्षांचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यानुसार पाहता खरोखरच एक कालखंड असा सापडला जेव्हा नाइलची पातळी सलग शंभर वर्ष अत्यंत नीचांकी होती. आणि काय आश्चर्य हा कालखंड देवीसप्तशतीच्या लिखाणाच्या कालखंडाशी जुळत होता. (ही माहिती कै.मधुसूदन देशपांडे National archives of India चे  महासंचालक /Director General of Archives 72-78 ह्यांच्या दिल्लीला India International Centre मधे खूप वर्षांपूर्वी झालेल्या भाषणातून कळली. )

सप्तशतीत शंभर वर्षांचा दुष्काळ वर्णन करणारा काय आहे बरे हा श्लोक?

 तो श्लोक व त्याचा अर्थ असा-

 भूयश्च शतवार्षिक्यामनावृष्ट्यामनम्भसि।

मुनिभिः संस्मृता भूमौ सम्भविष्याम्ययोनिजा।।46

 

पडेल एकदा ऐसा । महा दुष्काळ भूवरी

पाऊस थेंब ना तेंव्हा। पडेल धरणीवरी ।। 

 

जलथेंब ही कोणाला । मिळेल नच शोधुनी

चालेल ही अनावृष्टी । शतवर्षे भयंकरी ।।

 

व्याकूळ होऊनी तेंव्हा । आठवी मजला मुनी

अयोनिजा स्वरूपी मी । येईन अवनीवरी ।।

एकदा पृथ्वीवर असा काही भयंकर दुष्काळ पडेल की, एक थेंब पाणी पृथ्वीवर बरसणार नाही. पाणी पाणी करत डोळ्यात पाणी आणून सर्व ऋषीमुनीही माझी आठवण काढतील अशा वेळी मी ‘अयोनिजा’ रूपाने पृथ्वीवर अवतीर्ण होईन. आता अयोनिजा ह्या शब्दाला अनेकजण आक्षेप घेतील. जन्म घेणारा प्रत्येक सस्तन प्राणी म्हणजेच मॅमल हा योनिजच असतो. मग हे काय विपरीत!

जेव्हा एखाद्या भयंकर आपत्तीला तोंड द्यायचं असतं तेव्हा सर्व समाज एकत्रित येतो, समाजातील बुद्धिमान, विविधविषयतज्ज्ञ, चतुर, हुशार, मुत्सद्दी, प्रज्ञावंत लोक एकत्र येऊन विचार विनिमय केला जातो. अनेकांचे अनुभव, अनेकांचं ज्ञान, अनेकांचे हात कामाला लागतात. अनेकांनी केलेले विचारमंथन, प्रयोग, चिकित्सा अशा सर्वातून समस्येची कशी उकल करता येइल हे ठरवलं जातं. समस्येचं निराकरण करणारा प्रभावी उपाय, तोडगा काढला जातो. त्याप्रमाणे सर्व योजना आखली जाते. कृतीत आणली जाते. सर्व समाज ती पार पाडण्यासाठी झटतो. माणसांमधून तयार झालेली ही श्रेष्ठ पवित्र योजना कुणा एकट्याचे यश नसते. हे माणसांचे सामुदायिक यश एका मूर्त स्वरूपात दाखवतांना तिला देवीचं स्वरूप दिलं जातं. एखादं सुंदर स्त्रीनाम देऊन गौरवलं जात. अनेक स्त्रीपुरूषांच्या सहभागातून जन्माला आलेली तीच ही अयोनिजा योजना ‘देवी शताक्षी’ ! ‘असा दुष्काळ पडेल तेव्हा मी माझ्या शेकडो नेत्रांनी ह्या सज्जन ऋषीमुनींचे निरीक्षण करत राहीन. दुष्काळाचा आढावा घेत राहीन.’  म्हणजेच दुष्काळात सर्व जनतेचे निरीक्षण करणारी, दुष्काळाचा आढावा घेणारी तेव्हाची योजना होती ‘शताक्षी’!

 

ततः शतेन नेत्राणां निरीक्षिष्याम्यहं मुनीन्।

कीर्तयिष्यन्ति मनुजाः शताक्षीमिति मां ततः।।47

 

माझ्याच शतनेत्रांनी । अवलोकीन मी मुनी

गुण गातील तेंव्हा हे। मुनी माझेच सर्वही

संबोधतील मजला।  ‘शताक्षी’ म्हणुनि मुनी ।।47 

 

शताक्षीच्या सोबत अन्ननिर्मितीचे काही उपायही पाहिजेत की! इतक्या शंभर वर्षांच्या परीक्षा पाहणार्‍या कालखंडात भूकभूक करत हजारो लाखो लोक मरण पावल्याचे कुठे नमूद नाही; उलट अशा खडतर परिस्थितीत आपल्या देहातून अन्न निर्माण करणारी ही पृथ्वी देवता म्हणते, ‘अशा खडतर परिस्थितीत मी शाकंभरी ह्या नावाने प्रकट होऊन माझ्या देहातून अनेक प्रकारच्या भाज्या, खाद्य पाने, कंद, फळे तयार करीन.’ मित्रांनो, तर दुष्काळातही सर्वांना खाण्यास योग्य भाजीपाला, फळे, मुळे व खाद्यान्न निर्माण करायची जी कृषी योजना आखली गेली तिचं नावं ठेवलं गेलं ‘शाकंभरी’.  अनेक प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीतही कंदमुळे हा प्रकार जमिनीत खूप काळ राहू शकतो. ही अशी सर्व प्रकारची खाण्यास योग्य कंदमुळे शोधणे, अनेक प्रयोगाअंती  थोडक्या उरल्या सुरल्या अत्यंत कमी पाण्यात तग धरणार्‍या धान्याचे वाण तयार करणे, ठिबक सिंचनसारखे तेव्हाचे काही प्रयोग, ते चांगल्या प्रकारे वापरून लोकांना किमान तग धरून राहता येईल असे अन्नोत्पादन करणे!

दुष्काळाला तोंड द्यायची ही दुसरी पायरी, म्हणजेच दुसरी योजना ‘शाकंभरी’ ! हया अयोनिजा योजनेलाही एका देवीचं नाव दिलं गेल. श्रेय हे देवाचे! कष्ट हे आपले. कर्मफळ आपलं नाही ह्या भावनेतून जन्मलेली ही दुसरी अयोनिजा योजना देवी शाकंभरी आपल्याला नक्कीच भावेल.

आजही आपण अशा अनेक योजना बनवून त्याला सुंदर सुंदर नावं देतच असतो की!  सुकन्या योजना, मातृवंदना योजना, विश्वकर्मा योजना ह्या सारख्या अनेक योजना आज भारतात राबवल्या जातात. हजारो वर्षांपूर्वी शताक्षी आणि शाकंभरी योजना तब्बल शंभर वर्ष यशस्वीरीत्या राबवल्या गेल्या. हे आज लक्षात घेता; आपल्या पूर्वजांविषयीची आदर आणि कृतज्ञतेची भावना नक्कीच त्यांच्यापुढे नतमस्तक करणारी आहे.

ततोऽहमखिलं लोकमात्मदेहसमुद्भवैः।

भरिष्यामि सुराः शाकैरावृष्टेः प्राणधारकैः।।48

शाकंभरीति विख्यातिं तदा यास्याम्यहं भुवि।।49

 

 

त्रैलोक्य जन्मले सारे। माझ्या देहातुनीच जे

भरण पोषणा त्याच्या । उपलब्ध करीन मी

खाद्यपाने कंद आदि । नव जीवनदायिनी

प्रसिद्धीस तदा जाई । ‘शाकंभरी’ म्हणून मी।।48/49

 

मित्रांनो, कदाचित अशावेळी एखाद्या पहाडातील दुर्गम भागात  रस्त्याची निर्मिती करून वा एखादा कालवा तयार करून लांबवरून पाणी  वळवून आणण्याचा प्रयत्नही केला गेला असावा.  राक्षसासारख्या पहाडाला फोडून  पाणी वळवून आणण्याची योजना कदाचित ‘दुर्गा’ ह्या नावाने राबवली गेली असावी. तोच हा दुर्गेने वध केलेला दुर्गम पहाड रूपी राक्षस दुर्ग! (ही सर्व माझी कल्पना आहे.)

 

तत्रैव च वधिष्यामि दुर्गमाख्यं महासुरम्

दुर्गादेवीति विख्यातं तन्मे नाम भविष्यति।।50

 

तेंव्हा मी दुर्ग दैत्यासी । निर्दाळीन भयंकरी

‘दुर्गादेवी’च नामाने। होईन सुप्रसिद्ध मी।।50

 

असो! शंभर वर्षं सर्व समाजाने एकोप्याने राहून ह्या योजना राबवल्या. कोणी उतलं नाही; मातलं नाही. सामान्य जनांनी त्याला यथाशक्ती साथ दिली; आणि सर्व जण ह्या भीषण दुष्काळातून तरून गेले. दुष्काळ कधीही येऊ शकतो. कितीही काळ राहू शकतो हे सर्व निसर्गचक्र बदलत आहे. हे सर्व अपेक्षित आहे; हे गृहीत धरून आपणही ‘अल् निनो़’ सारख्या राक्षसांना तोंड देण्यासाठी पाण्याचा थेंब थेंब वाचवू या. पाणी जपून वापरू या. जे जे जुने पाणी साठे असतील ते परत स्वच्छ करू.  पाण्यात निर्माल्य, घाण टाकणार नाही. असा निश्चय करू या. शिस्त जीवन सोपे करते तर बेशिस्त अनपेक्षित संकटात ढकलते.

 अशी ही शाकंभरी देवीची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण

--------------------------

अरुंधतीप्रवीणदीक्षित-

Comments

Popular posts from this blog

अनुवाद-पारिजात (स्तोत्र अनुक्रमणिका)

ललित लेख (अनुक्रमणिका)

राजा भोज आणि अमूल्य हिरा