भर्तृहरी-
भर्तृ हरी - काही गोष्टी लहानपणी वाचलेल्या असतात. पण ! त्याचा अर्थ कळेपर्यंत आयुष्य संपत येतं. भर्तृहरी नावाचा राजा होता. एक दिवस त्याच्या सभेत एक साधू आला. तो म्हणाला, ‘‘राजा, तू प्रजाहितदक्ष आहेस. न्यायी आहेस, कलेचा भोक्ता आहेस, सर्व सद्गुण तुझ्यावर प्रसन्न आहेत. मी तुला एक फळ देतो. हे फळ जो कोणी खाईल तो अमर होईल.’’ साधूने झोळीतून एक फळ काढून राजाच्या हातात ठेवलं आणि तो निघून गेला. त्या फळाचा आकार, रंग, रूप इतकं मोहक होतं की ते पहाताक्षणीच खावं असं कोणालाही वाटावं. पण राजा फार निस्पृह होता; त्याने विचार केला की, ‘माझी लाडकी राणी खूप सुंदर आहे. माझ्या राज्याच्या कामापुढे मी तिच्याकडे लक्षच देऊ शकत नाही. मी हे फळ तिला देईन.’ राजाने राणीला फळ दिलं. -----पण! राणीचं उत्कट प्रेम सरसेनापतीवर होतं. राणीने विचार केला सरसेनापती जर उद्याचा राजा झाला तर ---! तिने ते फळ सरसेनापतीला दिलं. सरनौबत पद कायम रहावं म्हणून सेनापती राणीवर खोटं खोटं प्रेम आहे असं भासवत असला तरी त्याचं प्रेम एका लावण्यवती गणिकेवर होतं. त्याने ते फळ त्या गणिकेला दिलं. त्या ग...