काकोलूकीयम् कथामुख

 

 ।। श्रीः ।।

पञ्चतंत्रातील तिसरे तंत्र 

काकोलूकीयम् कथामुख

मित्रांनो, आपलं रोजचं जगणं एक लढाई असते. वैय्यक्तिक आणि सामाजिक अशा दोन आघाड्यांवर एकाचवेळी लढलेली. त्यात यशस्वी होण्यासाठी आपल्याला वैय्यक्तिक नीतीनियम आणि सामाजिक नीतीनियम ह्या दोहोंचे उत्तम प्रकारे भान ठेवावे लागते.

वैय्यक्तिक जीवनाची मार्गदर्शक तत्त्व आपल्याला संतांनी चांगल्याप्रकारे सांगितली आणि त्यामुळेच बर्‍याच प्रमाणात आज भारत हा शांतताप्रिय देश  अजून तरी आहे. पण वैय्यक्तिक जीवनाची आणि सामाजिक जीवनाची तत्त्व पूर्णपणे वेगळी असतात. कित्येक वेळेला एकमेकाना छेद देणारी सुद्धा. वैय्यक्तिक आयुष्यात अत्यंत निर्लोभ, स्वार्थरहित, छक्के पंजे न करता, प्रसंगी आपल्या लोकांसोबत अत्यंत क्षमाशील असलं पाहिजे. पण एका देशाचा नागरीक म्हणून देशहितासाठी घ्यावे लागणारे निर्णय घेतांना देशासाठी साधलेला स्वार्थ निस्वार्थ असतो. स्वराज्यासाठी बोललेलं खोटं हे सत्य असतं. (अफजल खानाशी शिवाजीचा वकील बेमालूम खोटं बोलला म्हणून तर पुढची लढाई जिंकली.) नरो वा कुंजरो वा म्हणणं हीच सन्नीती असते. (त्यामुळेच अधर्म मार्गावरून जाणारे गुरू द्रोण रणांगणातून दूर होतात.) शत्रूला फसवणं हा विवेक असतो. (त्यानेच दुष्ट जयद्रथ धुळीला मिळतात.)

समाजात वावरतांना  सामाजिक जीवनाची मूल्यं काय असावीत, एका देशाचे नागरीक म्हणून वावरतांना देशाच्या नावाने कंठाळ्या जयघोषाच्या पलिकडे अजून काही करायचं असतं; आणि असलं तर ते काय? नागरिकांची कर्तव्य काय? हे आपल्याला फारसं माहित नाही. किंबहुना ते कळू नये ह्याची गुलामगिरीच्या काळात शासनकर्त्यांनी डोळ्यात ते घालून काळजी घेतली. आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या विदुरनीती, भीष्मनीती, चाणक्यनीती, कणीकनीती, आदि अनेक नीती आपण बाजूला ठेवल्या. दुर्लक्षित झाल्या. 

नेते ती नीती. कुठे नेते ती त्या त्या नीतीच्या तंत्रावर अवलंबून आहे. त्या अनेक नीतींपैकी पंचतन्त्र ही एक नीती. कावळा चिमण्यांच्या गोष्टी इतपतच त्याचा आवाका मर्यादित नाही. एखाद्या सुंदर चित्राची फ्रेमच बघत बसावी आणि चित्राकडे लक्षच देऊ नये तसं वर्षानुवर्ष आपण ज्ञानाच्या ठेव्याची नुसती गोष्टरूपी डबीच बघत बसलो. दागिन्याची मखमली डबी ठेऊन द्यावी आणि सोन्याचा हार फेकून द्यावा तसं आपण आजही वागतोय. त्यातील मुख्य सामर्थ्य आहे ते त्यातील संवादात, त्यातील अर्थगर्भ श्लोकांमधे. त्या काळात म्हणजे जवळ जवळ 2000 वर्षांपूर्वी सनातन धर्माची पिछेहाट होण्यामुळे, अहिंसेचं अवास्तव स्तोम माजल्याने येणार्‍या निष्क्रीयतेमुळे धार्मिक, राजकीय वातावरणात उत्पन्न झालेल्या दोषांमुळे, माणसांच्या वैयक्तिक विचार करण्याच्या प्रक्रियेत निर्माण झालेले दोष आचरणात आल्यावर काय महान उलथापालथी होऊ शकतात ते ह्या पुस्तकातून खूबीने मांडलं आहे.

 Verb / क्रिया म्हणून तन्त्र चा अर्थ पाहिल्यास तन्त्र म्हणजे प्रशासन करणे, नियंत्रण करणे तर noun/ नाम म्हणून पाहिल्यास शास्त्र, सिद्धांत असा आहे. तन्त्र ह्याचा अजुन एक अर्थ अध्याय, भाग असाही आहे. पाच भागात आहे म्हणून पञ्चतन्त्र. आणि  शास्त्र, सिद्धान्त ह्यांचे पाच वेगवेगळे प्रकार म्हणूनही हे पञ्चतन्त्र.

पंचतंत्रात पाच तन्त्र आहेत. मित्रभेद,  मित्रप्राप्ति, काकोलुकीयम्,  लब्धप्रणाश आणि अपरिक्षितकारक. पहिल्या दोन तंत्रांमधे अभ्यासलेल्या तंत्राचा प्रत्यक्ष उपयोग तिसर्‍या तंत्रात केला आहे. डोंगर चढता चढता शिखरावर पोचावं आणि तेथून सर्व जग तळहातावर ठेवलेल्या आवळ्यासारखं दिसावं, त्याची चोहोबाजूंनी नीट कल्पना यावी तसं पंचतंत्रातील तिसरं तंत्र म्हणजे काकोलुकीयम्. पंचतंत्रातील जणु शिखर, Master piece. मित्रभेद,  मित्रप्राप्ति अशी दोन तंत्र शिकवून झाल्यावर घेतलेलं एक प्रॅक्टिकल म्हणू या.

`काकोलुकीय' हे तिसरं तंत्र म्हणजे आत्ताच्या जमान्यातील एक model युद्धकथा! आत्ताही युद्ध कसं जिंकल जातं ह्याचं प्रात्यक्षिक दाखविणारी ही प्राचीन रणनीती.  बहुतेक वेळा युद्धे  रणांगणावर कमी आणि रणांगणाबाहेरच ज्यास्त जिंकली जातात. कित्येक वेळेस बुद्धिबळात आपण पहातो, पटावर सर्व सैन्य जिथल्या तेथेच राहून जातं. राजा आणि वजीर आपल्याच सैन्याच्या गराड्यात घुसमटत राहतात. हलुही शकत नाही; आणि प्रतिस्पर्ध्याचं एखादं छोटंसं प्यादं राजाला चेकमेट देऊन जातं.

                ह्या कथेतील युद्धाचे दोन प्रतिस्पर्धी आहेत - काक म्हणजे कावळा तर उलूक म्हणजे घुबड. हिंदीतला उल्लू हा शब्द उलूक ह्या संस्कृत शब्दावरूनच आला आहे. (+ = असा संधी असल्याने काक + उलूक = काकोलूक आणि त्यांची गोष्ट म्हणून काकोलूकीयम्) कावळे आणि घुबडं ह्याच्यात जन्मजात हाडवैर आहे. कुत्र आणि मांजर ह्या प्राण्यांमधे जसे अजिबात सख्य नाही तसे पक्षी वर्गात कावळे आणि घुबडांचेही सख्य नाही. कावळे हे दिवसा वावरणारे तर घुबड हे निशाचर. कावळा  हा सर्वसामन्य जमातीतला वा निम्न स्तरातील  किंवा मध्यमवर्गीयांच प्रतिक असलेला पण हुशार पक्षी!

कावळा हा काही आकर्षक पक्षी नाही. दिसायला अत्यंत सामान्य. इतर रूपगर्विता पक्ष्यांप्रमाणे त्याला आपल्या रूपाची घमेंड असणं संभवत नाही पण तो चाणाक्ष आहे. त्याचे पाय जमिनीवर आहेत. तो व्यवहारचतुर आहे. आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे हे तो अत्यंत सावधपणे बघतो आहे. ऐकतो आहे लक्ष्मण’च्या प्रत्येक कार्टूनमधे चाणाक्षपणे सारं टिपणार्‍या Common Man  सारखा! पृथ्वीवर अनेक पशुपक्ष्यांच्या जाती आज नामशेष झाल्या. कित्येक संपण्याच्या मार्गावर आहेत.  कधी त्या पक्ष्यांच्या चवदार  मांसामुळे त्यांची शिकार होते. कधी त्यांच्या सौंदर्यासाठी पकडले जातात. पोपटासारखे पक्षी त्यांच्या अति बोलण्याने गोत्यात येतात. काही नवीन परिस्थितीशी जुळवून घेऊ शकल्याने काळाच्या ओघात मरण पावतात. कावळ्याचं तसं नाही. कावळा हजार वर्षे जगतो असे आपल्या संस्कृत वाङ्मयात म्हटले आहे. त्याचा अर्थ असा लावता येईल की परिस्थितीशी जुळवून घेणे आणि हे त्या परिस्थितीवर मात करणे ह्या गुणांमुळे कावळ्याचा वंश आजही चिरंजीव आहे. आजही ते बदलत्या परिस्थितीत स्थिरपणे कालक्रमणा करत आहेत. म्हणूनच ह्या कथेतील कावळ्यांच्या प्रधानांची नावंही जीव् ह्या धातू पासून ठेवली आहेत.

घुबड अंधारातच कारवाया करणारा लबाड पक्षी. रात्री झोपी गेलेल्या एकट्या दुकट्या पक्ष्यावर अचानक हल्ला करून आपला डाव साधणारा हा पक्षी. रात्रीच्या अंधारात ह्याची नजर ज्यास्तच तीक्ष्ण होते. घुबडाच्या डोळ्यांचे एक वैशिष्ठ्य म्हणजे इतर पक्ष्यांप्रमाणे त्यांचे डोळे चोचीच्या दोन्ही बाजूंना नसून माणसासारखे एका रेषेत असतात.  माणसाच्या दृष्टीला Binocular Vision  असे म्हणतात. म्हणजे त्यांना Binocular मधून पाहिल्यासारखे एकच चित्र डोळ्यांना दिसते. बाकी पक्ष्यांना दोन्ही डोळ्यांनी वेगवेगळी दोन दृश्ये दिसतात ज्यांचा मेळ त्यांच्या मेंदूत घातला जातो. पक्षी दोन डोळ्यांनी 360 अंशात पाहू शकतात. माणूस नाही. घुबडाला माणसाप्रमाणे दिसते. शिवाय तो त्यची मान 180 अंशात फिरवू शकत असल्याने त्याला मागचेही सहज दिसते. घुबडाचे डोळे चमकदार लाल केशरी असल्याने रात्रीच्या अंधारात वाघ सिंहाच्या डोळ्यासारखे  Reflectors  असलेले असतात. त्यामुळे ते रात्रीही चमकतात. रात्रीच्या अंधारात पाहू शकतात. घुबड हा निशाचर (Nocturnal) पक्षी आहे. त्याची सर्व जीवनावश्यक कामे तो रात्रीच करतो.   त्या उलट कावळ्याला रात्रीच्या अंधारात पहायची सवयही नाही आणि पाहून दिसतही नाही.

थोडक्यात सर्वसामान्य जगाचे कुठचेही नियम पाळणार्‍या बलाढ्य अंडरवर्ल्ड  भाईंशी  हुशारीने झुंज देणार्‍या सामान्य नागरिकांची ही कथा आपल्याला नक्कीच प्रेरणादायी आहे.

ह्या एका तंत्रात अनेक गोष्टी असतात. काकोलूकीयं मधे 17 गोष्टी आहेत. पञ्चतन्त्राची गोष्ट संपली की त्याचे तात्पर्य, निष्कर्ष अजिबात काढू नयेत. कारण गोष्ट सांगणारा हा कोण आहे, तो कुठल्या उद्देश्याने सांगतो आहे, सांगणार्‍याच्या विचारांवर कोणाचा, कुठल्या संप्रदायाच्या, गटाच्या विचारांचा प्रभाव आहे ह्याचा सखोल विचार करून राजाने काय उचित निर्णय घेतला हे पाहण्यासारखे आहे. असे प्रसंग आजही आपल्याभोवती घडत असतात. अनेक देश अनेक खेळ्या करत असतात. त्यांच्या देशात तयार झालेली उत्पादनं आपल्या देशात खपवण्यासाठी आपल्याला असं तसं त्यांच्या जाळ्यात ओढत असतात. आपल्या चांगल्या उत्पदनांना निकृष्ट ठरवत असतात. आपल्या चांगल्या सवयींना गावंढळ ठरवून त्यांची उत्पादनं वापरल्याने आपण कसे सर्व जनसामान्यांमधे उठून दिसू, आकर्षक ठरू हे पटवून देण्यासाठी झटत असतात. आपल्याला फसवणार्‍या ह्या तंत्रांचं आकलन होण्यासाठी पंचतंत्राचा अभ्यास सर्वसामान्यांसाठीही उपयोगी आहे.

महाभारत युद्धात दुर्योधन पडला, हारला; पण मेला नव्हता. कौरंवांकडील कृप, अश्वत्थामा आणि कृतवर्मा तिघेच जिवंत शिल्लक होते.  ह्यांच्यासारखे शत्रू पराजित असले तरी विझत आलेल्या अंगारा सारखे होते. विझत आलेला निखारा मोठी आग लावण्याचे सामर्थ्य अंगी बाळगून असतो.  श्रीकृष्णाने अश्वत्थामा, कृपाचार्य रूपी शत्रूचं वळवळणारं शेपूट अजून बाकी आहे हे लक्षात घेऊनच युद्ध संपल्यानंतरच्या रात्री पांडवांना युद्ध शिबिरात झोपण्याचा सल्ला दिला.

कृप, अश्वत्थामा आणि कृतवर्मा  हे तिघे जीव बचावून रात्री  जंगलात वणवण फिरत असतांना रात्रीच्या अंधारात अश्वत्थाम्याने पाहिले की, बहुसंख्य कावळ्यांनी आश्रय घेतलेल्या एका झाडावर रात्री अचानक घुबडांनी हल्ला केला आणि बेसावध, झोपलेल्या असंख्य कावळ्यांचा फडशा पाडला. त्या प्रसंगापासून स्फूर्ती घेऊन अश्वत्थाम्यानेही युद्धाचे सर्व नियम बाजूस सारून झोपलेल्या पांडवांवर रात्रीच हल्ला केला. द्रौपदीच्या सर्व मुलांना , धृष्टद्युम्न आदि महारथींना कापून काढलं. कृतवर्मा आणि कृपाचार्यांनी त्याला साथ दिली.

कृष्णाच्या त्या एका छोट्याश्या वाटणार्‍या निर्णयानेच पांडव शेवटपर्यंत जिवंत राहू शकले. नाहीतर जिंकलेल्या लढाईचं पारडं क्षणात इकडचं तिकडे व्हायला वेळ लागला नसताच. देशाचे तुकडे तुकडे करण्याची बोली लावणारे, `ऋणं कृत्वा घृतं पिबेत' म्हणजे बँका लुटून मौज करा, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः? म्हणजे देह जळून गेल्यावर काही उरत नाही त्यामुळे देहाला जे जे गोड वाटत असेल ते ते करायला, ज्ञानेश्वरांच्या कडक शब्दांमधे सांगायचच झालं तर ``शिश्नोदरी घालायला’’ पुढे मागे न पाहणारे, त्यासाठी जनतेची लूट करून स्विस बँका भरणारे कणीक आणि चार्वाक त्याही वेळेला होते. तेंव्हाही दुर्योधनासाठी छाती पिटून आक्रोश करत होतेच. चुकून जरी पांडवांचं काही बरवाईट झालं असतं तर, ते परत एकदा पुढे सरसावले असते. त्यामुळे जे जे उत्तम ते ते  टिकून राहणे, सर्व समाजाने टिकवून ठेवणे, हे सर्वात आवश्यक आहे. मग ते तत्त्वज्ञान असो वा माणसे.

  रोजच्या व्यवहारात चाललेल्या घटनांमधे काही उत्तुंग घडलं, दुष्टांविरुद्ध कसोशीने मात देऊन सत्याचा जय झाला तर ती प्रेरणादायी गोष्ट म्हणून लोकांच्या हृदयात सत्याची निरांजन बनून तेवत राहते.

--------------------------

मित्रांनो,  आपल्या हिताचा सल्ला देणारे, आपलं चांगलं व्हावं अशी कळकळीची इच्छा असणारे, सतत सतर्क राहून बलाढ्य शत्रूंचा पूर्णपणे नाश कसा करायचा हे सांगणारे योग्य सल्लागार आपल्या जवळपास असतात. पण आपल्याला ते ओळखू येतात का नाही, आपला त्यांच्यावर विश्वास असतो का नाही हे महत्त्वाचं. कित्येक वेळेस गोड गोड बोलणारे तोंडपुजेच बरे वाटतात. अर्धवट सल्ला देणारेच खरे वाटतात. आणि खरी काळजी असलेले पण कठोर बोलणारे, कठोर निर्णय घ्यायला लावणारे सल्लागार नकोसे वाटतात. आपल्या हिताची चिंता खरोखरीच ज्याला आहे असा सल्लागार निवडणे ही राजाची फार मोठी जबाबदारी असते. किमान तेवढा विवेक त्याला असणे आवश्यक आहे. आणि एकदा का एखाद्या गुणग्राहक राजाने अशा सल्लागाराच्या वर्तनाची शहानिशा करून, त्यांच्या अनेक वर्षांच्या एकनिष्ठतेची परीक्षा घेऊन, त्यांचे गुण जाणून घेतले की, त्यांच्यावर पूर्णपणे श्रद्धा ठेऊन ते सांगतील तसं वागणं हे विजयासाठी अपेक्षित आहे. ज्याप्रमाणे सल्लागार निवडण्यासाठी राजाचे डोके ठिकाणावर असण्याची, त्याला किमान स्वयंप्रज्ञा असायची गरज आहे त्याप्रमाणे सध्या लोकतंत्रात प्रजा हीच राजा असल्याने प्रधानमंत्री निवडतांना वैय्यक्तिक क्षणैक लोभांना दूर ठेवणे हे आवश्यक आहे. अयोग्य माणसाची निवड देशाचं अपरिमित नुकसान करून जाते.

 तसेच योग्य काळजी घेऊन आपण निवडलेला योग्य प्रधानसेवक जे जे करत असेल त्यावर किमान विश्वास ठेऊन त्याला साथ देणे आवश्यक आहे. त्याने सांगितलेल्या गोष्टी करताच कुठे आहे स्वच्छ भारत? कुठे आहेत अच्छे दिन विचारणं म्हणजे एकाद्या चुकार मुलाने तुम्ही माझा पेपर कोणा चांगल्या मुलाकडून लिहून घेतला नाही म्हणून मी नापास झालो किंवा आईबापाने माझ्यासाठी काही `इश्टेट ठेवली नाही म्हणून माझ्यावर आज हे दिवस आले असं म्हणणार्‍या कृतघ्न आपत्याप्रमाणे आहे. 

वैयक्तिक पातळीवरही आपल्या आयुष्याला खरोखरीचे आकार देणारे योग्य गुरुजन कोण आहेत हे लहानपणापासूनच पालकांच्या मदतीने कळू लागते. नाहीतर `यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा शास्त्रं तस्य करोति किम्?' ज्याला स्वतःचा विवेक नाही त्याला किती उत्तम शास्त्र हाती आले तरी काय सुधारू शकणार? हेच खरे. विवेक म्हणजे योग्य आणि अयोग्य ह्यांना वेगळं करण्याची बुद्धीची कुवत. ती अभ्यासाने प्राप्त होते.

खूप खूप वर्षांपूर्वी विष्णुशर्मा नावाचे थोर ऋषि होऊन गेले. त्यांनी उनाड राजपुत्रांना शिकवून शहाणं करण्यासाठी `पंचतंत्र' हया अप्रतिम ग्रंथाची निर्मिती केली. विष्णुशर्मा ह्या अलौकिक गुरुजींनी केवळ राजपुत्रांनाच नव्हे तर आपल्यासारख्या सामान्य जनतेला राजपुत्रांच्या मिषाने शिकवलेला हा विवेक , योग्य अयोग्याची पारख करण्याची दिलेली दृष्टी ह्या तंत्रातून सामान्यांच्या सारासार विवेक बुद्धीची कुवतही वाढवणारी आहे.

 त्याच पंचतंत्रातील तिसरे तंत्र `काकोलूकीयम् ' मी येथे तुम्हाला सांगणार आहे.

एकेकाळी तुमच्या विरुद्ध दंड थोपटून उभा राहणारा, तुमच्या प्रत्येक सुयोग्य कामात अडथळे आणणारा, तुमचा कट्टर विरोधक, कडवा शत्रू, हाडवैरीच म्हणाना! असा कोणी शत्रू अचानक तुमच्याशी गोड बोलून मैत्री करत असेल तर सावध राहिलेलेच बरे. काही कारणास्तव तुम्हाला त्याच्याशी मैत्री करायला लागलीच तर काही साध्य साधण्यापुरती ठीक. कामापलिकडे त्याच्याशी मैत्री दाखवली तरी त्याच्यावर कधीही विश्वास ठेऊ नये. त्याच्या प्रत्येक कृतीबद्दल दक्ष, साशंक राहून त्यावर बारीक नजर ठेऊन असावे. नाहीतर हा हा म्हणता तो तुमचा सर्वनाश करतो. एका कावळ्याने एकदा घुबडांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर कावळ्यांनी उलूकांच्या गुहेला आग लावून त्यांचा कुंभीपाक केला. कुंभीपाक हे एका नरकाचे नाव आहे.  कुंभात/ माठात अनेकप्रकारच्या भाज्या, मीठ, मिरची, मसाला घालून त्या मडक्याचे तोंड बंद करून ते जमिनीत पुरून, त्याला चहूबाजूंनी चहू बाजूने आग लावून खरपूस शिजवतात. अशा भाजीला उबडियो वा कुंभीपाक म्हणतात.  अशाच प्रकारे कावळ्याने रचलल्या एका व्यूहात सुटकेचे सर्व मार्ग बंद झालेल्या घुबडांचा अंत झाला. थोडक्यात तोंड दाबून मरेतोवर बुक्यांचा मार अशी घुबडांची स्थिती झाली.

कावळे  आणि घुबडांच्या ह्या सर्व कथेचा गोषवारा त्यातील पहिल्या एकाच श्लोकात विष्णुगुप्ताने दिला आहे.

विश्वसेत्पूर्वविरोधितस्य शत्रोश्च मित्रत्वमुपागतस्य।

दग्धां गुहां पश्य उलूकपूर्णां काकप्रणीतेन हुताशनेन।।1

होताची शत्रू परि मित्र झाला । विश्वास त्याचा कधि ना धरावा

पहा मुलांनो घुबडांसवे ही । जाळी गुहा काक कुटीलतेनी ।। 1

तर मंडळी, असं ऐकण्यात आहे की पूर्वी दक्षिण भारतात जी छोटी छोटी लोकतंत्र होती त्यातील एका लोकतंत्रात, चेन्नाई-शहराजवळ महिलारोप्य नावाचं एक गावं होतं. त्या गावाच्या वेशीबाहेरच खूप खूप मोठ्ठ एक वडाचं झाड होतं. त्याला अनेक फांद्या होत्या. फांद्यांवर अगणित पाने होती. असंख्य लांब लांब पारंब्यांनी तर ते झाड, दाढी वाढलेल्या, तपश्चर्येला बसलेल्या एखाद्या तपस्वी ऋषिमुनीसारखं दिसे. विपुल अशा लाल लाल फळांनी ते झाड बहरून गेलेलं असे. ती फळं खाण्यासाठी त्या झाडावर कावळ्यांची पुष्कळ गर्दी होई. बघता बघता कावळयांनी त्याच झाडावर खूप घरटी बांधली. त्या झाडावर कावळ्यांचं एक गावच वसलं. मेघवर्ण हा त्या कावळ्यांचा राजा होता. त्या झाडावर आपले सुरक्षा रक्षक तैनात करून त्यानी त्या झाडाचा  एक बळकट किल्लाच तयार केला होता आणि आपला परिवार, नोकर-चाकर, आप्त कुटुंबीय आणि त्याचे समविचारी अनुयायी ह्यांच्या समवेत तो तेथे आनंदाने कालक्रमणा करत होता.

              तेथून जवळच असलेल्या डोंगरगुहांमधे घुबडांची मोठी वसाहत होती. घुबड रात्री वावरणारा शिकारी पक्षी तर कावळा दिवसा उडणारा. रात्र झाली की घुबडराज अरिमर्दन आपल्या टेहाळणी पथकासह त्या वृक्षाच्या चोही बाजूस फिरत राही झाडाच्या आसपास एकटा दुकटा कावळा दिसला की पूर्ववैमनस्यातून ते त्याची हत्या करीत. अशा प्रकारे रोज रात्री कावळे झोपी गेले की घुबडांचा राजा `अरिमर्दन' कावळ्यांची वस्ती असलेल्या झाडाभोवती आपल्या सैन्यासह छापे टाकत असे. झोपलेल्या बेसावध कावळयांचीही शिकार करत असे. बघता बघता जणु कावळ्यांचा हा बालेकिल्लाच असलेल्या ह्या वटवृक्षावर कावळ्यांविना शुकशुकाट पसरला. दिवसेंदिवस कावळ्यांची संख्या रोडावतच चालली. त्या वटवृक्षाच्या आसमंतात एकही कावळा उडतांना दिसेनासा झाला. कावळ्यांचा राजा मेघवर्ण विचारात पडला. तो विचार करू लागला,  - ``काय करावे बरे?''

खरतर असचं होतांना दिसतं

एखादा दुर्धर रोग झाला आणि त्याला योग्यवेळीच उपचार नाही केला तर दुसरं काय होणार? आळसाने औषध घेण्यात चालढकल करण्याने, रोगाला जराही पायबंद केल्याने हळुहळू तो रोग त्याच्या शरीरात  असा पसरतो की हट्टाकट्टा वाटणारा रोगी बघता बघता क्षीण क्षीण होत मरण पावतो. ह्या आजाराप्रमाणेच शत्रूच्या कारवायांचंही आहे. शत्रू काय अगदीच किरकोळ आहे माझ्या तोलामोलाचाही नाही असं म्हणत जर त्याच्या कारवायांकडे दुर्लक्ष करत राहिलं तर तो तुमचं राज्य पोखरत पोखरत राज्याची नुसती वाट लावून टाकतो. 

 

उपेक्षेत त्रुं स्वं  प्रसरन्तं यदृच्छया

रोगञ्चालस्यसंयुक्तः  शनैस्तेन हन्यते ।।2

व्याधी शत्रूच जे दोन्ही   अनिर्बंधचि वाढती

दुर्लक्षितोच त्यांसी जो । उपेक्षेनेच आळशी ।।

प्रसार पाहुनी त्यांचा खीळ ना घालतो कधी

मरे हळुहळू तोची रोग वा शत्रुपासुनी ।। 2

व्याधी असो शत्रु असो लहान दुर्लक्षिता त्या बनतो महान

कायाच होई अति क्षीण रोगे शत्रूमुळे राज्यहि कोसळे ते॥

व्याधी असो शत्रु असो नवीन त्वरीत त्यासी करणे उपाय

बलाढ्य राज्ये मिळती धुळीस रोगी मरे, ना करिता उपाय॥ 2

म्हणून शत्रू बलवान आहे का किरकोळ आहे; त्याच्या कारवाया क्षुल्लक आहेत का उपद्रवी स्वरूपाच्या आहेत; ह्यापेक्षाही  अस्वलाआधी आरोळी ह्या न्यायाने  जो त्यांना आधीच चांगलाच तडाखा देतो तोच खरा शहाणा. नाही तर बलाढय राज्य आणि बलवान माणसंही रोग आणि शत्रूंपुढे हा हा म्हणता गारद होतात. 

जातमात्रं यः शत्रुं व्याधिञ्च प्रशमं नयेत्

अतिपुष्टाङ्गयुक्तोऽ पश्चात्तेन हन्यते ।। 3

रोग वा शत्रु उत्पन्न होता त्यांसीच तत्क्षणी

काबूत आणिना  जोची मरे पुष्ट असूनही ।। 3

शत्रू असो रोग असोच केवी येता क्षणी जो उपाय योजी

हळू हळू मृत्यु-पथीच जाई तो ओढवूनीच विनाश घेई 3

दुसर्‍या दिवशी त्या वायसराज मेघवर्णाने सर्व सचिवांची बैठक बोलावली. तो म्हणाला, ``आपला शत्रू महा बलाढ्य, अत्यंत शक्तीशाली, उन्मत्त आणि भीषण (उत्कट) आहे. तो समयसूचक आहे. त्याला हल्ला करायला योग्य वेळ कुठली हे तो बरोबर जाणून आहे. (कालविच्) तो अत्यंत दृढसंकल्प आहे. तो त्याच्या प्रयत्नात तसुभरही उणीव ठेवत नाही.  अंधार पडल्यावर संध्याकाळी तो येतो. आणि आपण झोपेत बेसावध असतांना आपला विनाश करतो. ह्याला प्रतिकार कसा करावा? (प्रतिविधानम्) त्याला आपण कसं रोखू शकू? त्याच्या कारवाया कशा निष्फळ होतील? त्याचा प्रतिशोध घेणं कसं शक्य आहे? तो रात्री हल्ला करतो तेव्हा आपण अंधारात त्याला पाहू शकत नाही. दिवसा तो त्याच्या किल्ल्यात लपून बसतो. आपल्याला तो कुठल्या कडेकपारीच्या, गुहेच्या आश्रयाने राहतो तेही माहित नाही. त्यामुळे सकाळी आपण त्याच्यावर हल्ला चढवून त्याला मारूही शकत नाही. आता ह्या विषयात काय करणं योग्य ठरेल हे तुम्हीच विचार करून मला योग्य ते आपलं मत सांगा. राजनीतीत सांगितल्याप्रमाणे येथे संधि, विग्रह, यान, आसन, संश्रय किंवा द्वैधीभाव यापैकी कुठल्या नीतीचा अवलंबन करणं उचित होईल? ह्याबद्दल मला तातडीने सल्ला द्या.’’

(संधि, विग्रह, यान, आसन, ह्या चारही नीतींची आपण हळुहळु ओळख करून घेऊ.)

सर्व मंत्रीही म्हणाले,

महाराज, आपण विचारलेला प्रश्न योग्यच आहे. राज्यावर येणार्‍या सर्व संकटांवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणार्‍या, पहारा देणार्‍या, राज्याचे हित इच्छिणार्‍या मंत्र्यांनी राजाने आपल्याला सल्ला विचारण्याची वाट बघत बसू नये. राजाने सल्ला विचारला नसला तरी वेळोवेळी त्याला योग्य तो सल्ला देत रहावाच रहावा.

अपृष्टेनाऽपि वक्तव्यं सचिवेनाऽत्र किञ्चन।

पृष्टेन तु विशेषेण वाच्यं पथ्यं महीपतेः ।। 4

विचारिले जरी नाही राजाने काहिही तरी

सचिवानेच पथ्याचे   सांगावे  दोन बोलची

प्रसंगानेच काही वा योग्य सल्ला विचारिता

विशेष दक्षतेने त्या सांगावे हित सर्वदा ।। 4

  हे राजा! आपत्तीची जाणीव होताच, परिस्थितीचे गांभीर्य पाहून राजाने विचारताच मंत्रीमंडळाने राजाला सल्ला देणे, योग्य सूचना देणे आवश्यक आहे. पण एखादा मंत्री राजाने सल्ला विचारल्यावरही राज्याच्या हिताचा, कल्याणकारी सल्ला देता नुसतेच गोडगोड बोलत काही तरी टोलवाटोलवी करत राहिला तर तो गोडबोल्या मंत्री राज्याचा, राजाचा हितचिंतक नसून  घरभेदी  शत्रू समजावा.

यो पृष्टो हितं ब्रूते परिणामे सुखावहम्

मन्त्री प्रियवक्ता केवलं रिपुः स्मृतः ।। 5

विचारूनहि राजाने सल्ला योग्य पुन्हा पुन्हा

राजासी हित ना सांगे कल्याणाचे प्रजेचिया ।।

गोलमाल वदे काही सल्ला देई चांगला

गोडबोल्याच मंत्री तो निखारा अस्तनीतला ।।5

हे राजा, म्हणून एकांतात आपल्या मंत्र्यांसवे राजाने एखाद्या समस्येवर विचारविनिमय करणे आवश्यक आहे. तशी सल्लामसलत आपण आमच्याबरोबर करणे आम्हाला अपेक्षित आहे. त्यामुळेच निर्णय प्रक्रिया सुलभ होईल आणि त्या चर्चेतूनच समस्येचं निराकरण करण्याचा काही उपाय निघेल.

तस्मादेकान्तमासाद्य कार्यो मन्त्रो महीपते!

येन तस्य वयं कुर्मो निर्णयं वारणं तथा ।। 6

म्हणून सचिवांसगे बोलणी करणे बरे

योग्य वेळीच  राजा तू बोलावे आमुच्यासवे

गुप्ततेनेच एकांती ज्याने निर्णय होतसे

 ज्यानेचि त्या समस्येचे निराकरण होतसे ।। 6

अशाप्रकारे संजीवी, उज्जीवी, अनुजीवी प्रजीवी आणि चिरंजीवी ह्या पाच मंत्र्यांसोबत राजा मेघवर्णाची बरीच चर्चा झाली. हे सर्व मंत्री हे वंशपरंपरागत ह्या राज्याचे मंत्री असल्याने त्यांना ह्या राज्याचे, राज्यकारभाराचे, राजाच्या स्वभावाचे बारकावे पूर्णपणे माहित होते आणि राजाचाही त्यांच्यावर विश्वास होता. त्यामुळे विचारांची आदानप्रदान होतांना कोणी हातचे राखून, भयाने सांगणार नाही हे जसे होणार नव्हते तसेच राजाही मनमोकळेपणाने आपल्या सार्‍या समस्या त्यांच्यापुढे मांडू शकत होता. राजानेही एकेकाला त्याचे मत विचारायचे ठरवले. उज्जीवीकडे अंगुली निर्देश करून राजा म्हणाला, ``मंत्रीवर, ह्या अशा परिस्थितीत आपण काय निर्णय घ्यावा असे आपल्याला वाटते. आपण काय उपाय सुचवाल?

( आपले सल्लागार हे अत्यंत विश्वासू असले पाहिजे. ते वंशपरंपरागत आले असतील तर त्यांचे सर्व बारकावे राजाला माहीत असतात. राजाने आपले मत प्रथमच व्यक्त करू नये. इतरांना बोलते करून प्रत्येकाच्या मनाचा अंदाज घ्यावा. सर्वच सल्ले योग्य असतीलच असे नाही

 आता लोकशाहीत वंशपरंपरागत मंत्री असणे संभवत नसले तरी ते विश्वासू असणे अपेक्षित आहे.  )

------------------------------

(सुहृदहो आपली गोष्ट सुरू करणयापूर्वी आपल्याला आठवत असेलच की घुबडांचा राजा उलूकराज अरिमर्दन तर कावळ्यांचा राजा मेघवर्ण. मेघवर्णाचे पाच मंत्री आहेत संजीवी, उज्जीवी, अनुजीवी प्रजीवी आणि चिरंजीवी त्याच्याशी एकांतात बोलून राजा मेघवर्ण आपल्या शत्रूला कसे तोंड द्यावे ह्या बाबत सल्लामसलत करणार आहे.  पहिल्यांदा तो आपला मंत्री उज्जीवी ह्याला योग्य तो सल्ला देण्याची विनंती करतो. )-

उज्जीवी बोलू लागला, हे राजन् , आपला शत्रू आपल्यापेक्षा बलवान आहे. रात्री जेंव्हा दमून आपण झोपी जात असतो आणि अंधारात आपल्याला दिसत नाही ह्या आपल्या कमजोरीचा, दुर्बळतेचा गैरफायदा आपला शत्रू घेतो. योग्य वेळ पाहून तो आपल्यावर हल्ला करतो. अशा शत्रूसोबत संधिकरार करणेच उचित होईल.

 नद्या कायम उतारावरूनच वाहतात त्याप्रमाणे बलवान शत्रूसमोर तरी नम्रताच दाखवावी आणि योग्यसंधी मिळाली की त्याच्यावर हल्ला चढवावा. काळाचं असं योग्य भानं ठेवलं तर राजाच्या ऐश्वर्यात उणीव ती कसली?

बलीयसे प्रणमतां काले प्रहरतामपि

सम्पदो नाऽपगच्छन्ति प्रतीप इव निम्नगाः ।। 7

नदी धरे उतारासी वाहतांना जशी सदा

सामर्थ्यवान शत्रूला तैशी दाखवि नम्रता

योग्य काळ परी येता । नामशेष करी तया

कळे काळ जया ऐसा राज्यलक्ष्मी वरे तया ।। 7

संधीचं महत्त्व राजाला पटवून देण्यासाठी उज्जीवी अनेक उदाहरणे देऊ लागला. जर शत्रूने अनेक लढायांमधे मोठा पराक्रम केला असेल; कधी पराभवाची माती चाखली नसेल; मोठा गुणग्राही, न्यायी असेल तर त्याच्या बाजूनी अनेक लोक उभे राहतात. सारी प्रजाच त्याच्या निर्णयाशी सहमत असते. कारण मोठ्या खंबीरपणे तो प्रजारक्षण करत असतो. ( मिर्झाराजे जयसिंग ह्यांना औरंगजेबाने जेव्हा शिवजीचा बदोबस्त करण्यासाठी पाठवले तेव्हा प्रजेला होणारा त्रास पाहून शिवाजीला तात्पुरते शरण येणे भाग पडले. शत्रू धार्मिक, न्यायी आहे हे पाहून त्याच्यावर विश्वास ठेऊन राजांनी दिल्लीला जाणेही मान्य केले. तहामधे बरेच किल्ले मिर्झाराजांना द्यावे लागले. पण हे किल्ले योग्य वेळ येताच राजांनी परत जिंकूनही घेतले. )

 

सन्न्यायो धार्मिकश्चाढ्यो भ्रातृसङ्घातवान्बली

अनेकविजयी चैव सन्धेयः रिपुर्भवेत् ।। 8

वैरी जो गुणसम्पन्न न्यायी श्रीमंत धार्मिक

अनेक युद्ध जिंके, ज्या मानती बंधु बांधव

 अशा राजासवे संधी असे योग्य निरंतर ।। 8

त्याचप्रमाणे एखाद्या कुटिल वर वर गोड बोलणार्‍या शत्रूने जर  आपल्यावर आक्रमण केलं, आणि जर आपल्याला प्राणभय निर्माण झालं आहे अशा वेळेला त्याच्याबरोबर तह बरा! भले तो कितीही क्लेशदायक असो. शेवटी `सिर सलामत तो पगडी पचासह्या न्यायाने आपण वाचलो तर आपण आपलं राज्य परत मिळवू शकतो आणि ते वाढवूही शकतो. 

सन्धिः कार्योऽप्यनार्येण विज्ञाय प्राणसंशयम्

प्राणैः संरक्षितैः सर्वं राज्यं भवति रक्षितम् ।। 9

जरी अधम शत्रू तो दुट्टपी दुष्ट  दुर्जन

तरी तो योग्य संधीस येताची प्राणसंकट

अनिवार्य असे संधी कराया प्राणरक्षण

असे प्राण तरी सारे राज्य होते सुरक्षित ।। 9

त्या उलूकराजाने अद्याप पराभवाचे तोंड पाहिलेले नाही. तो अजेय आहे. अनेक युद्धात तो विजयी झालेला आहे. म्हणून आपण त्याच्याबरोबर तह करण्याचा आटोकाट प्रयत्न करायला पाहिजे.

असं म्हटलच आहे,

अत्यंत बलाढ्य, अनेक युद्धांमध्ये ज्याने विजयश्री खेचून आणली आहे अशा राजाशी तुमची मैत्री आहे हे नुसतं माहीत जरी झालं तरी तुमचे अनेक शत्रू दबकून वागतात.

अनेक युद्धविजयी सन्धानं यस्य गच्छति

तत्प्रभावेण तस्याशु वशं गच्छन्त्यरातयः ।। 10

महापराक्रमी शत्रू युद्धामध्ये सदा जयी

मैत्री त्याच्या सवे होता धाक अन्यहि शत्रुसी

दबून राहती सारे उपद्रवहि ना करी

प्रभावानेच त्याच्या ते वश होती तुम्हाप्रती ।। 10

दुसरं म्हणजे, शत्रू बलाढ्य असतांना युद्धात माझाच विजय होईल अशी कोणी खात्री देऊ शकत नाही. जेव्हा विजयाचीच शाश्वती नाही तेव्हा ते युद्ध न केलेलच बर असं थोर थोर युद्धनीती निपुणही सांगतात.

सन्धिमिच्छेत्समेनाऽपि सन्दिग्धो विजयो युधि

हि सांशयिकं कुर्यादित्युवाच बृहस्पतिः ।। 11

जयाची निश्चिती नाही कोणाचीही रणी कधी

शाश्वती ना जयाची ज्या   ऐसे युद्ध तू करी

दोघे समान शक्तीचे असता युद्ध ना करी

उपाय तह हा योग्य ऐसे बोले बृहस्पती ।। 11

 

युद्धात होणारं नुकसान आणि होणारी अपरिमित हानी सहज भरून येणारी नसते. तसेच निश्चितपणे विजयच होईल अशी कोणाला खात्रीही देता येत नाही म्हणून साम, दाम, दंड, भेद हे चारही उपाय जर निष्फळ झाले तरच आपल्या समान बलवानाबरोबर युद्ध करावं, अन्यथा नको.

सन्दिग्धो विजयो युद्धे समेनाऽपि हि युध्यताम्

उपायत्रितयादूर्ध्वं   तस्माद्युद्धं   समाचरेत् ।।  12

विजयाची नसे खात्री तेंव्हा ना लढणे कधी

उपाय निष्फला होती साम दाम नि भेद ची

युद्ध तेंव्हा करावे ते   समानबळ शत्रुशी ।। 12

युद्धासारखा मोठा निर्णय घेतांना आपला अहंकार दुखावला जात आहे असा आंधळा विचार करू नये. मान थोडासा मागेच ठेवावा आणि खरोखरची काय योग्य कृती आपल्याला सफळ करेल, यश मिळवून देईल ह्यावर लक्ष केंद्रित करावे. कधी कधी अहंकारापोटी, सूडाने मदांध झाल्याने, तारतम्य सुटते. रागाने योग्य गोष्टी कळेनाशा होतात. अशावेळी शक्तीने आपल्याला तुल्यबल असलेल्या शत्रूशी युद्ध केले तरी त्यात दोघांचाही विनाश संभवतो. त्यातल्या त्यात दोघेही जर छोटे , कमजोर राजे असतील तर त्यांचा सर्वनाश होतो. दोन न भाजलेले मातीचे कच्चे घडे एकमेकांवर आपटले तर काय होईल? अर्थात दोन्ही घडे फुटून जातील हे सांगायला नकोच. त्याप्रमाणे अशा युद्धात दोघांचाही विनाशच संभवतो.

असन्दधानो मानान्धः समेनाऽपि हतो भृशम्

आमकुम्भ इवान्येन करोत्युभयसङ्क्षयम् ।। 13

कच्चे न भाजलेले ते । मातीचे दोनची घडे

फुटती आपटीता ते । एकमेकांवरी जसे ।। 13.1

समतुल्य तसे राजे अहंकार दुखावुनी

करिता युद्ध दोघेही विनाश पावती रणी ।। 13.2

एक राजा बलवान असेल आणि दुसरा जर ताकदीने खूपच कमी असेल तर खडकावर पडताच मातीचा घडा फुटून जातो त्याप्रमाणे दुर्बळ राजा चितपट होतो.

समं शक्तिमता युद्धमशक्तस्य हि मृत्यवे

दृषत्कुम्भमिवाऽभित्वा नावतिष्ठेत शक्तिमान् ।। 14

मृत्तिका घट तो जैसा । पडता खडकावरी

 ठिकर्‍या ठिकर्‍या होई । विनष्ट होतसे झणी ।। 14.1

राजा बलिष्ठ तो तैसा । लेचापेचा दुजा कुणी

झुंझता एकमेकांशी । मरे दुर्बळ तो रणी ।। 14.2

अजूनही एक म्हणजे युद्ध केल्यानी काय फायदा होईल ह्याचा विचार करणे आवश्यक आहे मदाने वा रागाने दुसर्‍यावर आक्रमण करण्यात काहीच हशील नाही. उपयुक्त जमिन, सोने, धन वा अत्यंत विश्वासू मित्र मिळत असेल तरच दुसर्‍या राज्यावर चढाई करावी.  नाहीतर सिंहाने उंदराच्या रागाने बीळ खोदण्यासारखे आहे. पर्वतात दगडात लपलेले बीळ खोदतांना नख्याही तुटायच्या आणि मिळालाच तर एक घासही नाही असा उंदिर!

भूमिर्मित्रं हिरण्यं वा विग्रहस्य फलत्रयम्

नास्त्येकमपि यद्येषां विग्रहं समाचरेत् ।। 15

जमीन मित्र वा सोने युद्धाची तीन ही फळे

ना मिळे एकही जेंव्हा तेंव्हा संग्राम टाळणे ।।15

 

खनन्नाखुबिलं सिंहः पाषाणशकलाकुलम् ।

 प्राप्नोति नखभङ्गं वा । फलं वा  मूषको भवेत् ।। 16

उंदीरबीळ खोदून काय सिंहास ते फळ?

नख्या तुटति पाषाणे । घास एकचि उंदिर ।। 16

म्हणून ज्या युद्धात काही म्हणावं असं हाती लागणार नसेल तर आपणहून लढाईत न पडलेलच बरं.

तस्मान्न स्यात्फलं यत्र । पुष्टं युद्धं तु केवलम् ।

तत्र स्वयं तदुत्पाद्य । कर्तव्यं न कथञ्चन ।।17

ठोस ना फळ ये हाती । युद्धामध्येच ज्या कधी

प्रारंभ न करावा त्या । युद्धा आपणहूनची ।। 17

पण जर एखद्या बलाढ्य राजानेच जर आक्रमण केलं असेल तर वेताच्या झाडाप्रमाणे असलेलं बरं. उगीच `आरे ला कारेन करता वेळू जसा लगेच वाकतो त्याप्रमाणे नम्र राहणे बरे. अशा बलवान शत्रूवर अविचाराने चालून जाण्याचे ठरवले तर फणा काढून डसायला येणार्‍या सापाला जसे लोक ठार मारतात तसा आपण आपला नाश आपल्या हातानेच ओढवण्यासारखा आहे.

बलीयसा समाक्रान्तो वैतसीं वृत्तिमाचरेत् ।

वाञ्छन्नभ्रंशिनी  लक्ष्मी न भौजङ्गी कदाचन ।। 18

सामर्थ्यशाली अति क्रूर ऐशा  । फसे रिपूच्या विळख्यात जोची

इच्छी जरी तो नित राज्यलक्ष्मी । त्याने धरावी नित नम्रवृत्ती ।। 18

वेळूसमा जी झुकतेच खाली । देईच जी त्या यश आणि लक्ष्मी

परी धरावी न भुजंगवृत्ती । जी सर्वनाशाप्रत त्यास नेई ।। 18

 

कुर्वन् हि वैतसी वृत्तिं प्राप्नोति महतीं श्रियम् ।

भुजङ्गवृत्तिमापन्नो वधमर्ति केवलम् ।। 19

वृत्तीच वैतसी देई । अफाट धन संपदा

भुजंगासम फुत्कारे । मरे तात्काळ तो तदा ।। 19

आपल्याला वेळ जर प्रतिकूल असेल, योग्य नसेल तर बलाढ्य शत्रूसमोर हातपाय आत घेऊन बसणार्‍या कासवाप्रमाणे सुरक्षित राहणेच बरे. पण तेच शत्रू बेसावध आहे हे पाहून आपल्याला वेळ अनुकूल आहे हे हेरून वेळ न दवडता फणा काढून भुजंगाप्रमाणे सर्वशक्तिनिशी शत्रूवर चालून जाऊन शत्रूचा नाश करणे योग्य.

 

कौर्मं सङ्कोचमास्थाय प्रहारानपि मर्षयेत ।

प्राप्तेकाले च मतिमानुतिष्ठेत्कृष्णसर्पवत् ।। 20

वेळ अयोग्य पाहूनी । कूर्मवृत्तीस जो धरी

तोंड आक्रमणा देई । धैर्याने  घाव सोसुनी ।।

पाहुनी योग्य वेळेसी । डसे फणा उभारुनी

बुद्धिमान असे तोची । राहे तगून तो रणी ।।20

 

आग्रहं विग्रहं मत्वा सुसाम्ना प्रशमं नयेत्

विजयस्य ह्यनित्यत्वाद्रभसं च समुत्सृजेत ।। 21

युद्धजन्य स्थिती येता । सामोपचार तो भला

प्रयत्ने युद्ध टाळावे । जयाची शाश्वती कुणा ।।

नको खुमखुमी चित्ती । दुराग्रह नको नरा

परिणामचि युद्धाचे । विदारकचि मानवा ।। 21

 

बलिना सह योद्धव्यमिति नास्ति निदर्शनम्।

प्रतिवातं नहि घनः कदाचिदुपसर्पति’’ ।। 22

बलिष्ठासह झुंजावे  । उदाहरण ना असे

वार्‍याविरुद्ध ना जाती ।  मेघ ना कधिही कुठे

अनुकूल दिशा त्यांसी । म्हणून मिळते सदा

नीतीत सामनीती ही । यश देई सदा नरा ।। 22

अशा प्रकारे  वायसराज मेघवर्णाने उज्जीवी ह्या त्याच्या मंत्र्याने दिलेला सल्ला नीट ऐकून घेतला. मग संजीवी ह्या आपल्या दुसर्‍या मंत्र्याकडे वळू तो म्हणाला, मंत्रीवर ह्यावर आपला काय अभिप्राय आहे? मला ऐकायला आवडेल.

त्यावर गरम रक्ताचा संजीवी उसळून म्हणाला, महाराज! शत्रूबरोबर तह करावा, संधीची बोलणी करावीत मला मुळीच पटण्यासारखे नाही. शत्रू हा कायम शत्रूच असतो. त्याची नियत कधीच चांगली नसते. त्याच्या मनात सूडाची भावना कायम खदखदत असते. म्हणून मैत्रीचे नाटक करून गोडगोड बोलणार्‍या शत्रूबरोबरही मैत्री नको. पाणी उकळतं जरी असले तरी ते अग्नी विझवायलाच मदत करते. ते काही अग्नीला उद्दीपना देत नाही कधी.

शत्रुणा नहि सन्दध्यात्सुश्लिष्टेनाऽपि सन्धिना ।

सुतप्तमपि पानीयं शमयेत्येव पावकम् ।। 23

शत्रूच झाला प्रिय मित्र खासा

 परस्परी स्नेह जरी उदेला ।

परी सवे त्या तह  ना करावा

अग्नी विझे तप्त जलेहि मोठा ।। 23

दुसरी गोष्ट म्हणजे, आपला शत्रू अत्यंत क्रूर, लोभी तर आहेच पण त्याला जराही नीतीमत्ता नाही. तो दिलेलं वचन पाळेल वा न्याय्य आचरण करेल अशी सुतराम शक्यता नाही. आपला शब्द फिरवण्यात तरबेज असलेल्या, कुठल्याही न्याय्य, हिताच्या प्रथेचे औचित्य नसलेल्या, फसवाफसवी करणार्‍या शत्रूशी कोणत्याही अटीवर तह न करणेच योग्य ठरेल.

सत्यधर्मविहीनेन न सन्दध्यात्कथञ्चन ।

सुसन्धितोऽप्यसाधुत्वादचिराद्याति विक्रियाम् ।। 24

चाड ना ज्यास धर्माची/नीतीची । सत्यासत्य न भेदची

विश्वास न धरी त्याचा । कळे ना काय त्या मनी ।।

स्वभाव दुष्ट सोडी ना । तोडील नियमांसही

योग्य ना त्या सवे संधी । उलटे सख्य दावुनी ।। 24

अशा शत्रूसोबत युद्ध करावं हेच योग्य. महाराज, आपला शत्रू समोरासमोर न लढता ज्याप्रकारे आपण झोपलेलो असतांना आपल्यावर छुपे दारूण हल्ले करतो ते पाहिल्यावर त्याची नियत योग्य नाही हेच खरे. अशा नीच, अधर्मी शत्रूसोबत तह योग्य नाही. लढाई हा एकमेव पर्याय आहे.

क्रूरो लुब्धोऽलसोऽसत्यः प्रमादी भीरुरस्थिरः ।

मूढो युद्धावमन्ता च सुखोच्छेद्यो  भवेद्रिपुः ।। 25

क्रूरनिर्दय, निष्ठुर, कठोर, दारूण, नाशकारी, अनिष्टकर, खूनी

लुब्ध- लालची, लोभी, स्वेच्छाचारी, लंपट

अलसःसुस्त, स्फूर्तिहीन, थकलाभागला, ढीलाढाला, मंद

प्रमादीअवहेलना करणारा, भयंकर उत्पात करणारा, चुका करणारा, असावधान, वेडा

भीरूघाबरट, नीच, पापी, अधर्मी, प्रतिज्ञाभंग करणारा, संकोची

अस्थिरः चंचल, कधीही बदलणारा, दृढ नसला

मूढकिं कर्तव्यमूढ, पाचपोच नसलेला, बिनडोक, विषयाचं आकलन नसलेला.

लोभी निष्ठुर वा सुस्त । जो करी अवहेलना

नीच चंचल संकोची । पाचपोच नसे जया ।।

उपेक्षा करि युद्धाची । घेई माघार जो रणी

अनायास असा शत्रू । मारला जातसे कुणी ।। 25

महाराज, दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शत्रूने आपला पराभव केलेला आहे.  आता आपल्यासारख्या अशा पराभूताकडून संधिप्रस्ताव जर आला तर आपला शत्रू अजूनच क्रुद्ध होईल. मग आपली काही खैर नाही.

महाराज, ज्या रोगात सणसणीत घाम येऊन गेल्यानंतरच ताप कायमचा उतरतो; अशा तापात रोग्याचे अंग पाण्याने पुसून घेणे अगदीच योग्य नाही. जेव्हा साम दाम भेद हे उपाय निष्फळ असतात तेव्हा दंड म्हणजे लढाई हा एकमेव उपाय तारून नेणारा असतो.

चतुर्थोपायसाध्ये तु रिपौ सान्त्वमपक्रिया ।

स्वेद्यमामज्वरं प्राज्ञः कोऽम्भसा परिषिञ्चति? ।। 26

प्रतिकार असे जेव्हा । पर्याय एकमेवची

संधी प्रस्ताव त्यावेळी । करे क्रोधित शत्रुसी ।। 26.1

ताप जो उतरावाची । घामाने अंगिच्या बरे

पाण्याने पुसुनी काया । उतरावा न योग्य हे ।। 26.2

मोठ्या त्वेषाने चालून येणारा राजा सर्वनाश करण्यासाठीच सरसावलेला असतो. त्याच्यापुढे असा शांतीप्रस्ताव ठेवला तर तर तो धुडकारून तर देतोच पण तुमच्या मिळमिळीतपणाची त्याला अशी चीड येते की तो अजूनच क्रोधित होतो. तापलेल्या तूपावर पाणी शिंपडलं तर ते प्रचंड तडतड करत सर्व बाजूंना उडतं.  शिवाय त्याचा मोठा भडकाही उडतो.

सामवेदाः सकोपस्य शत्रोः प्रत्युत दीपकाः

प्रतप्तस्येव सहसा सर्पिषस्तोयबिन्दवः ।। 27

क्रोधाने चालुनी येता । शत्रू तो आपुल्यावरी

शांतीप्रस्ताव त्या आणी । चीड राग भयंकरी ।। 27.1

जैसे शिंपडता पाणी । तापलेल्या तुपावरी

तूप तडतडे भारी । उडे वा भडका वरी ।। 27.2

 महाराज, कायम अत्यंत आक्रमक राहून लहान मोठ्या शत्रूंचा पराभव करून आपल्या पंजाखाली ठेवणे हेच योग्य आहे. कोणाच्याही मनात धाक उत्पन्न करणारं सिंहचं दर्शनी रूप; आणि त्याची प्रत्यक्ष कृती; म्हणजे सिंहाची गर्जना, त्याचा आक्रामकपणा, त्याचप्रमाणे तो जर सर्व ताकदीनिशी चालून आला तर त्याची हत्तीलाही लोळविण्याची धमक ह्या त्याच्या गुणांमुळेच तो जंगलचा राजा म्हणून टिकून राहतो.

सोत्साहशक्तिसम्पन्नो हन्यात् शत्रुं लघुर्गुरुम्

यथा कण्ठीरवो नागे सुसाम्राज्यंप्रपद्यते ।। 28

उत्साहरूप शक्तीने वर्चस्व साधणे भुवी

लहान थोर शत्रूंचा करणे नायनाटची ।। 28.1

गर्जतो केसरी रानी आक्रामक दिसे अती

कळपांवर हत्तीच्या प्रभुत्त्व गाजवे झणी ।। 28.2

जो शत्रू बलवान असेल, युद्धात समोरासमोर लढून त्याचा पराभव होणार नाही हे निश्चित असेल अशा शत्रूला काही तरी क्लृप्तीने ठार करणेच योग्य.  कीचक हा विराटाचा सेनापती, महाराणी सुदेष्णाचा सख्खा भाऊ. सर्व सेना त्याच्याच हाती असल्याने विराटही त्याला शासन करू शकत नव्हता. अशा बलाढ्य शत्रूला काहीतरी योजना आखून, फसवून मारणेच क्रमप्राप्त होते. भीमाने जसे त्याला द्रौपदीकरवी नृत्यशाळेत बोलावून, कोणालाही नकळत ठार मारले तसे अवध्य शत्रूला फसवून मारणेच योग्य! 

मायया शत्रवो वध्या अवध्याः स्युर्बलेन ये।

यथा स्त्रीरूपमास्थाय हतो भीमेन कीचकः ।। 29

शक्तीने साधते ना जे साधावे युक्तिने भले

बलाढ्य क्रूर शत्रूसी   ठकवूनचि  मारणे ।।

कीचका वधिले जैसे भीमे स्त्रीरूप घेउनी

तैसे अजिंक्य शत्रूसी कपटाने वधे गुणी ।।

/

शत्रू बलाढ्य मारावा कपटाने अवध्यची

कीचका वधिले जैसे भीमे स्त्रीरूप घेउनी ।। 29

शत्रू असो वा आपलीच प्रजा असो! ते राजाच्या प्रत्येक कृतीवर बारकईने नजर ठेऊन असतात. प्रत्येक कृतीची शहानिशा करत असतात. त्याच्या स्वभावाची चाचपणी करत असतात. यमाप्रमाणे जो राजा तीक्ष्ण दंड आहे, दया माया दाखवत नाही अशा राजाला त्याचे शत्रू सुद्धा शरण येतात. क्षमाशील राजाला शत्रू काडीइतकी किंमत देत नाहीत. राजा थोडा जरी लेचापेचा असेल, दयाळू, असेल तर त्याचा उदोउदो तर सोडाच पण कोणीही त्याची गय करत नाहीत. त्याला विचारत नाहीत. लोक डसणार्‍या सापाची पूजा करतात. पण जो गरूड त्या सापांचा नायनाट करतो त्याची आठवणही काढत नाहीत.

 

मृत्योरिवोग्रदण्डस्य राज्ञो यान्ति वशं द्विषः

शष्पतुल्य हि मन्यन्ते दयालु रिपवो नृपम् ।। 30

द्विष्रिपु द्वेश करणारा

मृत्यूसमान जो देई शिक्षा अति कठोर ती

मानिती त्याच राजासी   शत्रू शरण त्या पदी

दयाळू  फार जो चित्ती   क्षमा, प्रेम सदा हृदी

ऐशा राजास शत्रूही   कस्पटासम लेखती ।। 30

एखाद्या बलाढ्य शत्रूसमोर नांगी टाकणार्‍या राजाची छी थू झाल्याशिवाय राहात नाही. त्याला सारेजण अपमानित तर करतातच शिवाय त्याचं जगणं इतकं व्यर्थ होऊन जातं की आईचं यौवन हरण करणारा इतकीच त्याची ओळख शिल्लक राहते.

प्रयात्युपशमं यस्य तेजस्तेजस्वितेजसा

वृथा जातेन किं तेन मातुर्यौवनहारिणा? ।। 31

तेज झाकोळते ज्याचे तेजस्वी शत्रुच्या पुढे

मातेच्या यौवना नाशी व्यर्थ आयुष्य तो जगे ।। 31

राज्यलक्ष्मी, वैभव, ऐश्वर्य कितीही मनोहर, हवहवसं वाटलं तरी त्या राज्यलक्ष्मीच्या माथ्यावर जो पर्यंत शत्रूचा सनसनाटी पराभव करून त्याच्या रक्ताचा विजय तिलक लागत नाही तोवर ती राज्यलक्ष्मी पराक्रमी राजाला  आनंद देत नाही. शत्रूचा दारूण पराभव ही राजाचे सामर्थ्य दाखवणारी घटना आहे. असे अनेक पराक्रम ज्या राजाच्या नावावर आहेत अशा बलशाली राजाला सारे जग मानते. ज्या राजाच्या नावावर असा एकही पराक्रम नाही अशा अननुभवी राजावर लोकांचा विश्वास नसतो. तो लोकांच्या प्रशंसेस पात्र नसतो.

 

या लक्ष्मीर्नानुलिप्ताङ्गी वैरीशोणितकुङ्कुमैः

कान्ताऽपि मनसः प्रीतिं सा धत्ते मनस्विनाम् ।। 32

शत्रु-रक्तात ना न्हाली लक्ष्मी सौंदर्यशालिनी

रुचेना शूर राजासी  तेजस्वी ती असूनही

आपली भूमीवर शत्रूच्या रक्ताचे सडे घातले गेले पाहिजेत. त्यांच्या वैर्‍यांच्या स्त्रियांच्या अश्रूंनी शिंपण केलेली, भिजली असली पाहिजे नाहीतर त्या राजाच्या आयुष्यात काय प्रशंसा करण्यासारखं काय रहिलं? कोणतही काम करायचं असेल तर अडचणी येणारच

रिपुरक्तेन संसिक्ता वैरिस्त्रीनेत्रवारिणा

भूमिर्यस्य भूपस्य का श्लाघा तस्य जीवने ।। 33

नाही जी भिजली भूमी शत्रू-रुधिर शिंपुनी

शत्रूच्या ललनांच्याही अश्रूंनी चिंब ना कधी

सत्ता भूमीवरी ऐशा सांगे जो भूपती कुणी

निंदापात्र असे तोची असो धिक्कार त्याप्रति ।। 33

----------------------------

 अशा प्रकारे संजीवी ने युद्ध करण्याचा परामर्श दिला. संजीवीकडून त्याचे विचार ऐकल्यावर वायसराज मेघवर्ण आता अनुजीवीकडे वळला आणि म्हणाला, मंत्रीवर आता आपला काय अभिप्राय आहे तोही निवेदन करावा.

तेव्हा अनुजीवी नमस्कार करून म्हणाला, महाराज,  आपला शत्रू बलाढ्य तर आहेच शिवाय त्याच्या क्रौर्याला काही मर्यादा नाही. त्याला थोडीही दया माहीत नाही. अशावेळी माझ्या मते संधी किंवा विग्रह/लढाई हे दोन्हीही उपाय योग्य नाहीत अशा वेळी यान म्हणजे पलायन हा उपायच योग्य आहे.

आपल्याला आपल्या शत्रूची काही माहिती नाही. पण तो बलाढ्य आहे. त्याचे सैन्यही अफाट आहे. त्याचा सामना आपण करू शकणार नाही. आत्तापर्यंत त्याने आपल्या अगणित कावळ्यांना ठार मारलं आहे. बघता बघता ह्या विशाल वृक्षावर आपली नगण्य अशी संख्या उरली आहे. अशावेळी आपले प्राण जर वाचावेत असे आपल्याला वाटत असेल तर पलायन हा एकमेव उपाय आहे.

 

बलोत्कटेन दुष्टेन मर्यादारहितेन

सन्धिर्विग्रहो नैव विना यानं प्रशस्यते ।। 34

दुष्टाव्यास नसे सीमा । क्रूरकर्मा रिपू असा

महा बलाढ्य सेनाही । बाळगून असे सदा ।। 34.1

दुष्ट शत्रूसवे ऐशा । संधी, विग्रह योग्य ना

पलायन असे नीती । हिताची एकमेव बा ।। 34.2

 आपण समजता तसं पलायन हे कायम भ्याडपणाचे नाही. कारण पलायनातही दोन प्रकार आहेत. एकतर बलाढ्य शत्रूनी आक्रमणं केलं तर त्याच्या समोरून, त्याला पाठ दाखवून पळून जाणं आणि आपला जीव वाचवणं. पण दुसर्‍या प्रकारच्या पलायनात एक ना एक दिवस शत्रूवर हल्ला बोल करून विजय मिळवण्याठी प्रस्थान अपेक्षित असतं. आपलं सुरक्षित स्थान सोडून शत्रूवर आक्रमणासाठी चालून जाणं हेही यानच!

द्विधाकारं भवेद्यानं भये प्राणप्ररक्षणम् ।

एकमन्यज्जिगीषोश्च । यात्रा लक्षणमुच्यते ।। 35

प्रकार दोन यानाचे । असती वर्णिले खरे

सुयोग्य समयी जे जे । योग्य ते अवलंबिणे ।। 35.1

शत्रू आक्रमणावेळी । बचाव करणे भले

सुरक्षित ठिकाणी ते । जावे पळुन हे बरे ।। 35.2

विजयास्तव चालोनी । जावे शत्रु-दळावरी

सोडून आपुल्या दुर्गा । दुजा यान प्रकारची ।। 35.3

 

हे यान कधी करावं ह्याला काही ढोबळ नियम आहेत. आपल्या देशातील पाऊसपाणी, आणि इतर मुद्दे लक्षात घेता  चैत्र आणि कार्तिक हे महिने शत्रूवर चढाईला योग्य आहेत. पण गनिमीकाव्यानी लढण्यासाठी हा नियम नाही. शत्रू पेचात सापडला आहे, बेसावध आहे, त्याची कुमक रसद तोडायची अहे अशा वेळेस योग्य वेळ पाहून कधीही आक्रमण केले तरी योग्य आहे.

कार्तिके वाऽथ चैत्रे वा विजिगीषोः प्रशस्यते ।

यानमुत्कृष्टवीर्यस्य शत्रुदेशे न चान्यदा ।। 36

चैत्र कार्तिक हे मास । योग्य आक्रमणास्तव

पराक्रमी नृपाला त्या । जय लाभेच निश्चित

महिने अन्य ना योग्य । चढाई करण्यास्तव ।। 36

अवस्कंदप्रदानस्य सर्वे कालाः प्रकीर्तिताः ।

व्यसने वर्तमानस्य शत्रोश्छिद्राऽन्वितस्य च ।। 37

पाहून न्यून शत्रुचे । छापा मारे तयावरी

करेचि गनिमीकावा । योग्य वेळ सदा तयी  ।।37

पण आपण एका शत्रूवर चालून जात आहोत हे पाहून दुसरा शत्रू आपली निरंकुश प्रजा पाहून त्यावर चढाई करू शकतो हे लक्षात घेऊन, दुसर्‍यावर चढाई करण्यापूर्वी आपलं राज्य चहूबाजूंनी अत्यंत सुरक्षित असणं आवश्यक आहे. अशा वेळेला विश्वासू सहकार्‍यांवर राज्य सोपवून ज्या राज्यावर स्वारी करायची आहे तेथे आधीच सर्वत्र हेर पाठवून, योग्य जागी त्यांची नियुक्ती झाल्याची खात्री करून त्यांच्या सल्ल्याने योग्यवेळी आपल्या इमानदार, बलशाली योद्ध्यांसह चढाई करणे उचित.

 

स्वस्थानं सुदृढं कृत्वा शूरैश्चाप्तैर्महाबलैः ।

परदेशं ततो गच्छेत्प्रणिधिव्याप्तमग्रतः ।। 38

स्वराज्य सर्व बाजूंनी । करुनीच सुरक्षित

सोपवूनच विश्वासू । शूर आप्तावरी मग

पुढे ठेऊन हेरांसी । ईमानी वीर घेउन

शत्रुराज्यावरी स्वारी । करणे हेचि उत्तम ।। 38

चढाई  करणार्‍याला शत्रूच्या राज्यातील बारीक सारीक तंतोतंत माहिती हवी. तेथील सर्व मार्ग, आडमार्ग, पायवाटांचं चांगलं ज्ञान हवं. हे मार्ग ठीकठाक आहेत ना? तेथे काही दगाफटका तर होणार नाही ना, आपल्यालाच कोणी खिंडीत गाठणार नाही ना? ह्याचे ज्ञान हवे. सैन्य हे पोटावर चालते हे लक्षात घेऊन आपल्याकडे आवश्यक तेवढा अन्नपाण्याचा साठाही हवा. जो राजा स्वारीवर तर निघतो पण ना त्यास पुरेसे रस्त्यांचे ज्ञान, ना मदत करणारे मित्र, ना बरोबर आवश्यक ती साधन सामुग्री! अशा राजाचे हाल कुत्रा खात नाही. तो संपल्यातच जमा असतो. असा स्वारीवर निघालेला राजा पुन्हा आपल्या राज्यात परतून येऊ शकत नाही.

 

अज्ञातवीवधासारतोयसस्यो व्रजेतु यः ।

परराष्ट्रं स नो भूयः स्वराष्ट्रमधिगच्छति ।। 39

(वीवधःमार्ग.  आसारः मित्रबळ )

मार्ग माहीत ना ज्यासी । सारे पूर्णपणे निके

सहकार्य न मित्रांचे । धान्य पाणी न घे सवे ।। 39.1

माहिती ना कशाचीही । परी आक्रमणा करे

स्वदेशी परतूनी तो । कधिही नच येतसे ।। 39.2

त्याचप्रमाणे शत्रू जर बलाढ्य असला, त्याला विजय सहजसाध्य असेल तर तो तह कशाला करेल? आणि अशा शत्रूशी लढून, मरणाशिवाय हाती तरी काय लागणार? अशा वेळेला पलायन हाच स्वतःचा आणि प्रजेचा जीव वाचवण्याचा उत्तम उपाय आहे. आपण जिवंत राहिलो तर कधी ना कधी आपलं राज्य परत जिंकून घेऊ शकतो.

न विग्रहो  न सन्धानं बलिना तेन पापिना ।

कार्यलाभमपेक्षाऽपसरणं क्रियते  बुधै; ।। 40

बलाढ्य क्रूर दुष्टांशी । युद्ध वा तह ना बरा ।

शहाण्याने करावे ते । पलायनचि तेधवा  ।। 40

पलायनात वाईट असे काहीच नाही. तात्पुरती माघार ही नंतरच्या विजयश्रीची नांदी ठरते. प्राण्यांमधे जरी पाहिलं तरी हेच दिसून येईल. एडका हल्ला करण्यापूर्वीमागे मागे सरकतो.  मग धावत येऊन त्वेषाने  धडक देतो. सिंहसुद्धा प्राणी दिसला की लगेच उडी मारत नाही. तो अंग चोरून, सावजावर लक्ष्य केंद्रित करून गवतात आपण दिसणार नाही अशा बेताने लपून , बसून राहतो. ज्या क्षणी सावज बेफीरपणे त्याच्या आवाक्यात, आक्रमणाच्या टप्प्यात येतं तेव्हा तो सर्व शक्तीनिशी त्याच्यावर झडप घालतो.

त्याप्रमाणे पलायन ही आक्रणाची पहिली पायरी किंवा आक्रमणाची सिद्धता समजून शत्रूवर झडप कधी व कशी घालता येईल हा डाव आहे.

 

यदपसरति मेषः कारणं तत्प्रहर्तुं

मृगपतिरपि कोपात्सङ्कुचत्युत्पतिष्णुः ।

हृदयनिहितवैराः गूढमन्त्रप्रचाराः

किमपि विगणयन्तो बुद्धिमन्तः सहन्ते ।। 41

घेण्या टक्कर एडका सरतसे मागे जरासा जरी

घेण्या झेप मृगावरी, दबुनिया बैसे जसा केसरी ।। 41.1

होती आक्रमणास सज्ज, हृदयी क्रोधास त्या ठेऊनी

तैसे वैर मनात जागृत जरी, ना दाखवावे वरी ।। 41.2

आखावी मनि योजना पुनरपी शत्रूस मारायची

साहोनी रिपुसी, पलायन करी, त्या जिंकण्या संगरी ।

येता वेळ सुयोग्य, लावुन पणा सार्‍याच शक्तीसवे

जिंकावे रिपुसी प्रहार करुनी, सार्‍याच सैन्यासवे ।। 41.3

 

कित्येक वेळेला बलाढ्य शत्रूसमोर काहीही चालत नाही हे पाहून कोणाला देश सोडून जायची जरी पाळी आली तरी एक ना एक दिवस मी माझं राज्य, गतवैभव परत मिळवीन ही उमेद मनात ठेवणार्‍याला युधिष्ठिराप्रमाणे त्यांच राज्य, वैभव परत मिळतं.

त्या उलट स्वतःच्या शक्तीची पुरती कल्पना न येता, मी म्हणजे यंव मी म्हणजे त्यंव असं समजून जो बलाढ्य शत्रूवर स्वतःच चालून जातो तो जणू काही शत्रूच्या मनातले विचार ताडून त्याची इच्छापूर्तीच करत असतो. असा राजा स्वतः तर विनष्ट होतोच पण आपल्या गणगोतासहित नाश पावतो.

 

बलवन्तं रिपुं दृष्ट्वा देशत्याग करोति यः ।

युधिष्ठिर इवाप्नोति पुनर्जीवन्स मेदिनीम् ।।42

बलाढ्य शत्रु पाहूनी । सोडी राष्ट्रचि आपुले

पुनश्च राज्य त्या लाभे । जीवनी ह्याच त्या भले ।। 42

युद्ध्यतेऽऽहंकृतिं कृत्वा दुर्बलो यो बलीयसा ।

स तस्य वाञ्छितं कुर्यादात्मानश्च कुलक्षयम् ।। 43

कस्पटासम जो कोणी । गर्वाने ताठुनी परी

जाता चालून शत्रूच्या । महासैन्य दलावरी ।। 43.1

घेई ओढवुनी त्याचा । सर्वनाश कुळासवे

इच्छापूर्तीच शत्रूचि । स्वतःहूनचि तो करे ।। 43.2

म्हणून बलाढ्य शत्रूवर चालून जाण्याची वा त्याच्याशी तह करायची ही वेळ नाही. आत्ता आपण आपलं पाऊल मागेच घेतलं पाहिजे. असा मोलाचा सल्ला अनुजीवीने दिला.

अनुजीवीचा सल्ला ऐकून वायसराज मेघवर्ण आपल्या चवथ्या मंत्रीवरांकडे वळून म्हणाला, मंत्रीवर, आपलाही जो काय अभिप्राय आहे तो कथन करावा. आपलेही मत ऐकण्यास मी उत्सुक आहे.

ते ऐकून प्रजीवी म्हणाला, महाराज, ह्या प्रसंगी मला तह, युद्ध किंवा यान हया तीनही नीती उचित वाटत नाहीत.  ह्या वेळेला आसन, किंवा संश्रय म्हणजे आपल्या बालेकिल्यात सुसज्जपणे लपून शत्रूच्या आक्रमणाची वाट पाहणे ही पद्धतच मला जास्त योग्य वाटते. आपण जोवर आपल्या दुर्गात असतो तोवर सुरक्षित असतो. अवती भोवतीचा परिसर कोपरान् कोपरा आपल्याला परिचित असतो. शस्त्रांस्त्रांनी आपण सुसज्ज असतो. आपल्याला पाहिजे ती सामग्री हाताशी उपलब्ध असते.

आता हेच बघा नां जोवर मगर पाण्यात असतो तोवर त्याच्यामधे हत्तीलाही पाण्यात ओढून घेण्याचं बळं असतं. पाण्यात बलवान असलेला मगर जमिनीवर आला की मात्र हवालदील होतो. जणु त्याची ताकदच संपते. मग एखाद्या लूत भरलेल्या कुत्र्याकडून सुद्धा तो पराभूत होतो. म्हणून म्हणतो की, स्वस्थानी कोणीही सामर्थ्यवान असतो. आपलं स्थान सोडलं की त्याची स्थिती अत्यंत दयनीय होते.

 आपल्या हितचिंतकांना मदतीला बोलावून, त्यांचा सहयोग घेऊन आपल्या संरक्षणाचे उपाय चांगल्याप्रकारे राबवून आपण सुरक्षित राहणं हे फार आवश्यक आहे.

 

नक्रः स्वस्थानमासाद्य गजेन्द्रमपि कर्षति ।

स एव प्रच्युतः स्थानाच्छुनाऽपि परिभुयते ।। 44

स्वस्थानी नक्र बैसोनी । खेचून घेतसे गजा

पाण्याबाहेर येताची । कुत्रीही मारिती तया ।। 44

अभियुक्तो बलवता । दुर्गे तिष्ठेत्प्रयत्नवान् ।

तत्रस्थः सुहृदाह्वानं । प्रकुर्वीतात्ममुक्तये ।। 45

येता चालून तो शत्रू । बलवान महाबळी

दुर्गी सज्ज रहावे ते । आत्मरक्षार्थ नित्यची ।। 45.1

प्रतिक्षेत चढाईच्या । मित्रांचे साह्य घेऊनी

निमंत्रित करावे त्या । हितैषिंना लढाइसी ।। 45.2

महाबळी रिपू येता ।  दुर्गावरचि चालुनी

शत्रू आपल्यावर चढाई करून येत आहे ही नुसती बातमी ऐकूनच ज्याचा थरकाप होतोराज्य सोडून जो पळत सुटतो तो आपलं राज्य तर गमावतोच पण परत कधीही आपल्या राज्यात परत येऊ शकत नाही.

एकेकाळी तो राजा कितीही बलवान असेलही पण दात पडलेला साप, म्हातारा झालेला हत्ती, आणि त्याचप्रमाणे परागंदा झालेला राजा ह्यांना नंतर कोणीही विचारत नाही. एखाद्या  यत्कश्चित शत्रूकडूनही ते मारले जातात.

ह्या उलट जो राजा आपल्या दुर्गाची अत्यंत काटेकोर काळजी घेतो, शत्रू कोठूनही येणार नाही ह्या साठी दुर्गाचा सर्व परिसर, खंदक सुसज्ज ठेवतो; अन्न, धान्य, हितचिंतक मित्रांचे सैन्य ह्यासह आपल्या स्थानी पाय रोवून उभा राहतो, तो शेकडो बलाढ्य राजांना चांगल्याप्रकारे टक्कर देतो.

 

यो रिपोरागमं श्रुत्वा भयसन्त्रस्तमानसः ।

स्वस्थानं सन्त्यजेत्तत्र न स भूयो विशेन्नरः ।।46

कानावर जरी आले । शत्रू आलाचि चालुनी

सुटे धीर भयानेची । येई घायकुतीसची ।। 46.1

आपुले राज्य त्यागूनी । जाई जो पळुनी दुरी

भ्याड ऐसा न येई तो । त्याच्या देशी पुन्हा कधी ।। 46.2

 

दंष्ट्रा विरहितः सर्पो मदहीनो यथा गजः ।

स्थानहीनस्तथा राजा गम्यः स्यात्सर्वजन्तुषु ।। 47

दंतहीनच सर्पासी । वयोवृद्ध गजासची

पदच्यूत नृपासीही । जिंकतो सहजी कुणी।। 47

 

निजस्थानस्थितोऽप्येकः शतं योद्धु सहेन्नरः ।

शक्तानामपि शत्रूणां तस्मात्स्थानं न सन्त्यजेत् ।। 48

पाय रोवून स्वस्थानी । वीर सज्जचि जो असे

महा बलाढ्य शत्रूचा । सामना तो करू शके

म्हणून आपुला दुर्ग । सोडावा ना कधी नृपे

सज्ज करुन ठेवावा । दुर्ग तो सर्वतोपरे ।। 48

 

तस्माद्दुर्गं दृढं कृत्वा वीवधासारसंयुतम् ।

प्राकारपरिखायुक्तं शस्त्रादिभिरलङ्कृतम् ।। 49

अन्न धान्यादि सामुग्री । आद्ययावत आयुधे

हितैषी मित्रसैन्याच्या । सवे सैन्यचि आपुले ।। 49.1

प्राकार खंदकांनी । दुर्ग सज्जचि ठेवणे

शत्रू आक्रमणाची ती । सुसज्ज वाट पाहणे ।। 49.2

राजाने धैर्याने येईल त्या परिस्थितीस तोंड देणे अपेक्षित आहे. युद्धाला तोंड द्यायला लागलं तर त्याने निकराने तोंड दिलं पाहिजे किंवा आपण यदाकदाचित मारले गेलो तर स्वर्गाचं राज्य मला मिळणार आहे अशा कृतनिश्चयाने लढायची तयारी ठेवायला हवी.

आपल्या हितचिंतकाच्या सैन्यासह, योग्य सल्लागारांबरोबर राहिलेल्या राजाला पराभूत करणे सोपे नाही. कारण एखादा उंच विशाल वृक्ष वादळात मूळासकट उखडला जातो पण वेलीला आधाराला दुसरे काही खंबीर झाड मिळाले नाही तर त्या एकमेकांभोवती विळखे घेत इतक्या चिवटपणे उभ्या राहतात की येणार्‍या वावटळीत कितीक झाडे पडू शकतील पण ही संयुक्त वेल चिवटपणे वादळाला झुंज देऊन उभीच राहते. पण अनेक झाडे जर समुहात उभी असतील तर त्यांच्यावर वादळाचा तितकासा परिणाम होत नाही.

 

तिष्ठ मध्यगतो राजा/ नित्यं युद्धाय कृतनिश्चयः ।

जीवन् संप्राप्स्यसि क्ष्मान्तं मृतः स्वर्गमवाप्स्यसि ।। 50

सज्जता सर्व ठेऊनी । युद्धाचा निश्चयू मनी

दुर्गमध्यात राजानी । रहावे धैर्य दावुनी

सार्‍या भूमंडळाची ती । प्राप्ती त्या जिंकता घडे

संयोगवश मृत्यू ये । तरी स्वर्ग तया मिळे ।। 50

 

बलिनाऽपि न बाध्यन्ते लघवोऽप्येकसंश्रयाः ।

विपक्षेणाऽपि मरुता यथैकस्थानवीरुधः ।। 51

राजे एकदिलाने जे । राहती संगरी उभे

जरी नगण्य शक्तीचे । बलाढ्या चारती खडे ।। 51.1

आधारे एकमेकींच्या । वेली ज्या राहती उभ्या

उखडू न शके त्यांसी । वारा तो वादळी महा ।। 51.2

खूप फांद्या असेला जमिनीत मूळं पसलेला एखादा विशाल वृक्ष जर एकटाच असेल तर वादळाच्या झंझावाताला तोंड देऊ शकत नाही. त्या वार्‍याच्या असह्य वेगापुढे तो उन्मळून पडतो. पण रांगांनी लावलेले वृक्ष इतक्या सहजासहजी उखडले जात नाहीत. त्याचप्रमाणे एकटा बलवान राजा फार पराक्रम दाखवू शकत नाही.  तो एकाकी पडून असहाय्य होऊन पराभूत होतो. त्याउलट जरा कमी बलवान असेल तरी चालेल पण असे राजे जर एकत्र येऊन एकदिलाने लढले तर मोठा पराक्रम गाजवू शकतात. अशा प्रकारे आपल्या किल्ल्याला बळकट करून मित्रपक्षांची सहाय्य घेऊन शत्रूच्या आक्रमणाला तोंड द्यायच्या युद्ध नीतीला `आसनम्हणतात.

महानप्येकको वृक्षो बलवान् सुप्रतिष्ठितः ।

प्रसह्यैव हि वातेन शक्यो धर्षयितुं यतः ।। 52

विशाल वृक्ष तो मोठा । घनदाट जरी असे ।

बलशाली असूनीही । झंझावातात ना टिके ।। 52

 

अथ ते संहता वृक्षाः सर्वतः सुप्रतिष्ठिताः ।

न ते शीघ्रेण वातेन हन्यते ह्येकसंश्रयात् ।। 53

 

समूहातचि ओळीने । वृक्ष जे असती उभे

जुमानती न वेगासी । झंजावाताचिया कधी ।।53

प्रजीवीचे सर्व विचार शांतपणे ऐकून घेऊन वायसराज मेघवर्ण  आता आपल्या पाचव्या मंत्र्याकडे चिरंजीवीकडे वळून म्हणाला, मंत्रीवर आता आपलाही अभिप्राय सांगा.

चिरंजीवी म्हणाला, महाराज, संधी , विग्रह, यान, आसन, द्वैधीभाव आणि संश्रय ह्या ज्या युद्धाच्या सहा नीती सांगितल्या आहेत त्यातील संश्रय ही नीती येथे सध्यातरी आपल्याला अत्यंत चपखलपणे लागू पडणारी आहे. मला तरी तीच नीती योग्य वाटते. एखादा राजा कितीही बलवान असला पण त्याला जर बाकी कोणांच सहाय्य नसेल  तर तो कसा जिंकेल? अभिमन्यू शूर, वीर, धीर होता. चक्रव्यूहाचा भेद जाणत होता. पण भीमाबरोबर असलेल्या आपल्या सैन्यापासून त्याची ताटातूट झाली. तो एकटा पडला. शत्रूसैन्याने त्याला घेरून सर्वांनी मिळून ठार मारले. 

एवं मनुष्यमप्येकं शौर्येणापि समन्वितम् ।

शक्यं द्विषन्तो मन्यन्ते हिंसन्ति च ततः परम् ।। 54

सर्वांसी धरुनी राही । सोपे ना जिंकणे तयी

संरक्षित असे तोची । चोही कडुन  नित्यची ।।

शौर्य धैर्य असे अंगी । एकाकी पडला परी

आला हा आयता माझ्या । मुठीमध्येच जाणुनी

असुरक्षित पाहोनी घाला घालेच शत्रुही

विनाश करि तो त्याचा क्रौर्‍याने  प्राणही हरी ।।55

महाराज, एकटाच शूरवीर तेजस्वी माणूस जर निःशस्त्र असहाय असला तर समूहाला तोंड देऊ शकत नाही. समूहाकडे नुसत्या लाठ्या काठ्या असल्या तरी पालघरला ज्याप्रमाणे दुष्टांनी डाव साधून निशःस्त्र साधूंना मारलं त्याप्रमाणे समूह एखाद्या बलाढ्य माणसालाही ठार मारू शकतो. दिव्याची ज्योत कितीही प्रखर असली तरी त्याच्यावर एखादं भांडं पालथ घातलं तर ती विझून जाते.

असहायः समर्थोऽपि तेजस्वी किं करिष्यति ?

निर्वाते ज्वलिते वह्निः स्वयमेव प्रशाम्यति ।। 55

महापराक्रमी व्यक्ती । बलवान असे जरी

एकाकी पडता होते । निस्तेज असहाय्य ती

वार्‍याविना जसा अग्नी ।  फैलावे ना वनी कधी

विझून जातसे सारा । आपल्या आप सर्वही ।। 55

म्हणून कायम आपल्या समविचारी लोकांनी, आपल्या आचारा विचारांशी पूरक असलेल्या लोकांनी संघटित रहावं. संघटनेमधे प्रचंड ताकद असते. कित्येकवेळेला अपल्याला पूरक विचार, कृती असलेली व्यक्ती दुर्बळही असू शकते पण ती कधी मदतीला येईल आणि कोणतं मोठं काम करून दाखवेल हे सांगता येत नाही. साधं भाताचं तूसच बघा ना! म्हटलं तर काहीच उपयोगी नाही असं वाटतं. भात शिजवण्यापूर्वी  भात सडून/ कांडून ते काढूनही टाकावं लागतं. आपण जरी ते सेवन करत नसलो तरी कीड लागण्यापासून ते भाताचं रक्षण करतं. शिवाय जोवर तूस आहे तोवरच  पेरलेला तांदूळ म्हणजे साळ उगवते. भात साळीसह नसेल तर उगवत नाही.

 

सङ्गतिः श्रेयसी पुंसां स्वपक्षे विशेषतः

तुषैरपि परिभ्रष्टा प्ररोहन्ति तण्डुलाः ।।56

असावे धरुनी सर्वां अपुल्या आप्त बांधवा

हित त्यात असे मोठे लोकसंग्रह तो भला

संकटी येती धावोनी मदतीलाचि आपुल्या

तुसावीण रुजे ना तो तांदूळ जरि चांगला ।। 56

म्हणून आपण आपल्या सत्तेच्या बालेकिल्ल्यात आपल्या समर्थ मित्रांचा, हितचिंतकांची मद घेऊन, राहून जे करू शकतो ते अन्य प्रकारे करू शकत नाही. आपला सत्तेचा बालेकिल्ला सोडला तर कोणी काडीचीही मदत करत नाही. एकदा का तुम्ही असहाय्य आहात असं वाटलं जरी तरी तुमचे सर्व मित्र, समविचारी हितचिंतक तुम्हाला सोडून जातात किंबहुना तेच तुमच्या नाशाला पुढे सरसावतात.

महाराज, हे जग बलवानांचं आहे. बलवानांच्या बाजूने शेकडोजण उभे राहतात. पण तोच बलवान माणूस त्याची ताकद जर काही कारणाने हरवून बसला तर त्याचे मित्र वा जवळचे वाटणारे लोकच पहिल्यांदा त्याचा घात करतात. वनंच्या वनं जाळणारा दावानल अजून अजून भडकायला वार्‍याचा झंझावात मदतच करतो. पण  तोच झंझावात एका छोट्याशा दिव्याला मात्र पार विझवून टाकतो. हेच सत्य आहे महाराज! ये कहानी है दिये की और तूफान की!

 

वनानि दहतो वह्नेः सखा भवति मारुतः

एव दीपनाशाय, कृशे कस्याऽस्ति सौहृदम् ।। 57

पेटता वणवा रानी   वारा साह्य तया करी

विझवी तोच ज्योतीसी दुर्बला मित्र ना कुणी ।। 57

राजा, संघटित राहण्याचे अनेक फायदे असतात.  बांबूच्या घनदाट बेटातील आतला कोवळा बांबू कापणं कोणाला शक्य होत नाही. त्याप्रमाणे तुम्ही ताकदीने थोडे कमी असला तरी चालेल पण समानधर्मी जिवलग मित्रांच्या संगतीत असाल तर सहज तरून जाता,

सङ्घातवान्यथा वेणुर्निबिडो वेणुभिर्वृतः ।

न शक्यः स समुच्छेतुं दुर्बलोऽपि तथा नृपः ।। 58

दाट वेळूबनी राहे । कोवळा वेळु जो मधे

शक्य ना कापणे त्यासी । वेळुंनी वेढला असे

राजा जरी तसा राहे समूही निर्बळांचिया

बलवान नसोनीही सोपे ना जिंकणे तया ।।58

दुसरं म्हणजे मोठ्या लोकांच्या सहवासात राहण्याचे फायदेही खूप असतात. त्यांच्यामुळे अनेक सद्गुण आपल्या रोजच्या व्यवहारातल्या कृतींमधे इतके सहजपणे मिसळून जातात की, जराही क्लेश सहन न करता आपण कधी सुधारलो हेच कळत नाही. आपली होणारी ही प्रगती अत्यंत सुखकारक आणि पाहणार्‍यालाही अवाक करणारी असते. हेच बघा ना, कमळाच्या पानावर पडलेले थेंबभर पाणीही मोत्याप्रमाणे चमकत असते.

महाजनस्य सम्पर्कः कस्य नोन्नतिकारकः ।

पद्मपत्रस्थितं तोयं धत्ते मुक्ताफलश्रियम् ।।59

मोठ्यांच्या संगतीमध्ये लाभे ना उन्नती कशी?

लाभे सौंदर्य मोत्याचे पद्मपत्री जलास ही ।। 59

अशाप्रकारे संश्रय ही नीतीच कशी योग्य आहे हे चिरंजीवीने राजाला समजावून सांगितले.

चिरंजीवीकडून संश्रय ही नीतीऐकून वायसराज मेघवर्ण क्षणभर शांत बसला.  मग काही वचार करून आपल्या पिताश्रींच्यावेळेपासून त्यांना वेळोवेळी योग्य, सयुक्तिक सल्ला देणार्‍या, पित्याच्यावेळी सचिव पदावर नियुक्त असलेल्या स्थिरजीवी नावाच्या सचिवाकडे वळला. राजनीती पारंगत किंबहुना राजनीती जगलेल्या, अत्यंत वृद्ध झालेल्या पण अत्यंत दूरदर्शी अशा पित्यासमान  सचिवाला प्रणाम करून अत्यंत विनम्रपणे म्हणाला,

``काका, साक्षात युद्धनीती जाणकार असे आपण आज इथे उपस्थित असतांनाही मी माझ्या सचिवांची परीक्षा घेण्यासाठी त्यांना त्यांचा योग्य तो सल्ला विचारला. त्यांचे विविध सल्ले आपण ऐकलेच. त्यावर योग्य विचार करून आत्ता मला जो योग्य आहे, मला जो श्रेयस्कर आहे असा सल्ला आपण मला द्यावा.’’

स्थिरजीवी म्हणाला, बाळा, ह्या सर्व मंत्र्यांनी तुला नितीसम्मत असेच विचार ऐकवले आहेत. ह्या वेगवेगळ्या नीती वेगवेगळ्या वेळी वापरावयला लागतात. पण आत्ता मात्र ``द्वैधीभाव’’  ही नीती वापरण्याचा काळ आहे. आपला शत्रू बलाढ्य आहे, क्रूर आहे अविश्वसनीय आहे.  अशा शत्रूच्या कोठल्याही बोलण्यावर विश्वास ठेऊ नये.  पूर्ण सावध राहून एकीकडे त्याच्याशी गोडगोड बोलत रहावं. पण त्याला जराही पत्ता न लागू देता आतून मात्र त्याच्याशी युद्धाची तयारी करत राहावी. कधी त्याच्याशी तह करावा, कधी गोड बोलता बोलता छापाही मारावा. आणि एकदिवस त बेसावध आहे पाहून त्याचा पूर्ण काटाही काढावा. अशी ही दुधारी वागणूक म्हणजेच द्वैधीभाव.

अविश्वासं सदा तिष्ठेत्सन्धिना विग्रहेण च ।

द्वैधीभावं समाश्रित्य पापे शत्रौ बलियसि ।। 60

बलाढ्य क्रूर शत्रूचा कधी विश्वास ना धरी

पूर्ण दक्षचि राहूनी त्याच्याशी तह दाखवी ।। 60.1

परंतु गुप्त रीतीने युद्धाची सज्जता करी

देण्या मातच क्रूराशी द्वैधीभावच रीत ही ।। 60.2

कधी तह कधी छापा झुलवीत रहा तयी

कळावा ना तया हेतू मारी शिथिल शत्रुसी ।। 60.3

आपण शत्रूवर जराही विश्वास न ठेवता अत्यंत सावधपणे शत्रूला विविध प्रलोभने दाखवून आपल्या विनीत आणि सुसंस्कृत वागण्याने आपल्याबद्दल त्याच्या मनात विश्वास उत्पन्न करत रहावा. आणि तो आपल्याबद्दल विश्वस्त झाला की सहजपणे एखाद्यादिवशी त्याचा काटा काढावा.  आपल्याबद्दल विश्वास निर्माण झालेल्या शत्रूला विनासायस मारता येते.

कित्येकवेळा कफ झाल्यावर गुळ खायला देऊन तो कफ अजुन अजुन वाढवतात. शेवटी तो उलटीवाटे पडून जातो. त्याप्रमाणे शत्रूवर विश्वास ठेऊन राहिलेला राजा विना सायास आपण होऊनच नाश पावतो.

उच्छेद्यमपि विद्वांसो वर्धयन्त्यरिमेकदा ।

गुडेन वर्धितः श्लेश्मा सुखं वृद्ध्या, निपात्यते ।।61

वाढवावा गुळानेची साठलेला जुना कफ

जातो पडून तो सारा पूर्णतः उलटीतून ।। 61.1

तसेच नजराणे ते शत्रूसी धाडुनी भले

स्तुतीने चढवावे त्या योग्य वेळीच पाडणे ।।61.2

निरागस राजा शोभत नाही. राजा हा अत्यंत कुटिलच पाहिजे. सर्वांबाबतीत  समभाव नकोच. चांल्याशी चांगला आणि वाईटाला कठोर शासन करणाराच राजा पाहिजे. जो भेदभाव न करता सर्वांशी समभाव ठेवतो तो राजा मेलाच म्हणून समजावं. स्त्रिया, शत्रू, वाईटमित्र, वेश्या ह्या सर्वांना जो समभावाने बघतो, वागवतो, किबहुना ह्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो, त्याचे अस्तित्त्व धोक्यात येते; आहे हे कटु सत्य आहे.

स्त्रीणां शत्रोः कुमित्रस्य पण्यस्त्रीणां विशेषतः ।

यो भवेदेकभावेन न स जीवति मानवः ।। 62

स्त्रिया, शत्रू, दुष्टमित्र लोभी, वेश्या विशेषतः

ह्यांच्याशी आतबाहेरी सारखा जो निरागस ।। 62.1

विश्वास धरितो त्यांचा विसंबेचि तयांवर

जगतो नाचि तो फार कटु सत्य खरोखर ।।62.2

काही कामात आत एक वर एक असा द्वैधीभाव धरूनच कामे करावी लागतात. काही कामे सरळपणे करावीत. मग ती पूजाअर्चना, सणवार, उत्सव असो, गुरू, देव, ब्राह्मण कृत्ये असोत. ती एकभाव धरून करावीत. जे विश्वासू आहेत अशा संत महात्म्यांच्या वा ज्यांना जीवनाचाही लोभ उरला नाही अशा जीवनमुक्तात्म्यांच्या बाबतीत आत-बाहेर अशी वेगळी वागणूक असू नये. पण ज्यांना धनाचा लोभ आहे अशांच्या बाबतीत त्यातल्यात्यात अशा राजांच्या बाबतीत आपली वागणूक कायम सावधानतेची असावी वरवर कितीही गोड बोलावे लागले तरी आतून सतर्क असणेच योग्य!

 

कृत्यं देवद्विजातीनामात्मनश्च गुरोस्तथा ।

एकभाकेन कर्तव्यं शेषं भावद्वयाश्रितैः ।। 63

देव ब्राह्मण कृत्ये ती । गुरूची आपुली तशी

एकभावे करावी ती । द्वैधीभावेच ती दुजी ।। 63

 

एको भावो सदा शस्तो यतीनां भावितात्मनाम् ।

श्रीलुब्धानां न लोकानां विशेषेण महीभृताम् ।। 64

यती जीवन-मुक्तात्मा । विश्वासा नर पात्र ते

राजा वा धनलोभ्यांचा । कधी विश्वास ना धरे ।। 64

``हे राजा,’’ स्थिरजीवी म्हणाला, ``ह्या द्वैधीभाव नावाच्या नीतीने तू तुझ्या राज्यात सुखाने राहू शकशील आणि शत्रूला प्रलोभन देऊन त्याचं उच्चाटनही करू शकशील.’’

त्यावर मेघवर्ण जरा साशंकपणे म्हणाला, ``काका, मला तर आपला शत्रू कोठे राहतो हेही माहित नाही. मग मी त्याचे दौर्बल्य, कमजोरी काय आहे हे कसे जाणू शकेन?’’

त्यावर स्थिरजीवी म्हणाला,

``बाळ, मी आपल्या शत्रूचं राहण्याचं स्थानच काय पण त्याचे काय दोष आहेत, कुठे तो कमजोर आहे हे सर्व माझ्या गुप्तचरांकडून जाणून ही सर्व गुप्त बातमी एक दिवस तुला प्रकटपणे सांगेन. 

महाराज, साध्याभोळ्या जनतेत आणि राजात फरक असतो तो हाच! राजाला त वरून ताकभात कळायला पाहिजे. कुठे काय शिजतय ह्याचा त्वरित वास यायला हवा. गायीच्या दृष्टीपेक्षाही घ्राणेंद्रिय जास्त सक्षम असतात. तिला वासाने अनेक गोष्टींचं चागलं ज्ञान होतं. तिच्यावर झडप घ्यायला बसलेल्या वाघ सिंहाचा तिला दूरूनच वास येतो. ती लांबूनच परत फिरते. ज्ञानी लोकांना त्यांनी वाचलेल्या, शिकलेल्या पुस्तकातील ज्ञानाच्या आधाराने घडणार्‍या गोष्टींचा रोख कळतो. अनेक जणांच्या वागण्याची सुसंगत जोडणी त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पाडते आणि  पुढे होणार्‍या गोष्टींचं ज्ञान देते. राजा जरी राजधानीत बसला आहे असं वाटलं तरी अनेक ठिकाणी नेमलेले त्याचे चतुर हेर त्याला ठिकठिकाणच्या बातम्या सांगून, धोक्याचे, मोक्याचे इशारे देऊन त्याला जगात काय चाललं आहे, ह्याची सविस्तर कल्पना देतात. ह्या चतुर हेरांच्या माध्यमातून राजा सगळं जग जाणून घेत असतो. बघत असतो. हेर हे राजाचे अत्यंत दूरदर्शी, खात्रीलायक डोळेच असतात.

गावो गन्धेन पश्यन्ति, वेदैः पश्यन्ति वै द्विजाः ।

चारैः पश्यन्ति राजानश्चक्षुर्भ्यामितरे जनाः ।। 65

कळे गायींस वासाने । वेदाभ्यासातुनी द्विजा

हेरांमुळेच राजासी । डोळ्याने इतरे जना ।।65

ज्या शत्रूच्या आणि आपल्या स्थानांवर गुप्तहेर ठेवायला हवेत त्या स्थानांना तीर्थ म्हणतात. जो राजा अशा गुप्तचरांमार्फत आपल्या आणि शत्रूच्या अधिकार्‍यांची सविस्तर माहिती ठेवतो, त्याला आपला कोण, आपल्या विरोधात कोण ह्याची पूर्ण जाणीव असते. त्याच्यावर कष्टदायक पश्चात्तापाची वेळ कधी येत नाही.

ह्यावर मेघवर्ण म्हणाला, ``काका, तीर्थ कशाला म्हणतात? ह्या तीर्थांचे किती प्रकार असतात? गुप्तचर कसे असावेत? कृपया मला जरा सर्व विषय स्पष्ट करून सांगा.’’

 ह्यावर अनुभवी असलेला स्थिरजीवी म्हणाला, राजा, महर्षी नारदांनी युधिष्ठिराला दिलेल्या सल्ल्याप्रमाणे शत्रूपक्षात 18 तीर्थ असतात तर स्वपक्षात 15 तीर्थ असतात. म्हणजे शत्रूच्या 18 स्थाने फार संवेदनाशील असतात. तर आपल्या कडील 15 स्थाने. ह्या व्यक्तींकडून एकतर माहिती मिळते तरी वा आपल्याकडील काही राजाशी संपर्कात असलेल्या व्यक्तिंकडून ही माहिती बाहेर फुटते तरी. ह्या प्रत्येकांवर तीन तीन गुप्त हेर नेमावेत. अशा ह्या गुप्तचरांकडून मिळालेल्या संवेदनशील माहितीमुळे आपल्या राज्यात घडणार्‍या घडामोडींवर आपला चांगला ताबा राहतो. योग्यवेळी त्यात हस्तक्षेप करून आपल्याला गोष्टी सुधारता येतात;  शिवाय शत्रू  कडील संवेदनशील विषयांची अंतस्थ माहिती मिळाल्याने, शत्रूचे दुखरे स्थान माहिती झाल्याने, त्याच्याही राज्यात योग्य वेळ पाहून अफरातफर माजवता येते. अशा प्रकारे दोन्हीपक्ष आपल्या मुठीत राहतात.

 

 

यस्तिर्थानि निजे पक्षे परपक्षे विशेषतः ।

आप्तैश्चारैर्नृपो वेत्ति न स दुर्गतिमाप्नयात् ।। 66

हेरांच्याकरवी जोची । मिळवे माहिती खरी

अधिकारी गणांची ती । आपुल्या अणि शत्रुची ।। 66.1

विशेष बारकाईने । शत्रुपक्षातली पुरी

दुर्गतीस न पावे तो । राजा चाणाक्ष तो सुखी ।। 66.2

 

रिपोरष्टादशैतानि स्वपक्षे दश पञ्च च ।

त्रिभिस्त्रिभिरविज्ञातैर्वेत्सि तीर्थानि चारकैः ।। 67

अठरा शत्रु पक्षाचे । स्वपक्षाचेहि पंधरा

राजसेवक जाणावे । महत्त्वाचेचि सर्वदा ।। 67.1

नाही माहीत कोणासी । असे अज्ञात हेरची

नेमूनी लक्ष ठेवावे । ह्या राजसेवकांवरी ।। 67.2

तीन तीनचि नेमावे । दोन्ही पक्षात हेर ते

सर्वांची खडान् खडा देती । राजासी माहितीच जे ।। 67.3

 

राजा, राजनीतीत राजसेवक अथवा राजकार्य ह्यांना तीर्थ म्हटलं जातं. जर राजाच्या ह्या वेगवेगळ्या खात्यांची कामं उत्तम रीतीने नाही झालं तर प्रजेमधे असंतोष निर्माण होऊन राजाचा विनाश होतो. जर ह्या वेगवेगळ्या खात्यांचा कारभार उत्तम रीतीने होत राहिला, जर त्यात भ्रष्टाचार न होता अत्यंत स्वच्छप्रकारे कामं होतं राहिली तर प्रजेचा राजावरील विश्वास दृढ होऊन राजाची उन्नती होते.

शत्रूपक्षाच्या राजाच्या वेगवेगळ्या विभागांच्या प्रमुखांची नाव मी सांगतो.

1 मंत्री, 2 पुरोहित, 3 सेनापती, 4 युवराज, 5 द्वारपाल/ पहारेकरी, 6 अन्तपुराचे अध्यक्ष/ राजस्त्रियांची व्यवस्था सांभाळणारे, 7 मुख्य प्रशासक, 8 कर वसुली करणारे मुख्य, 9 राजासाठी लोकांकडून धन वा इतर वस्तू संग्रह करणारा/ कोठावळा, 10 राजाज्ञेची दवंडी पिटणारा, 11 अश्वाध्यक्ष, 12 गजाध्यक्ष, 13 सभाध्यक्ष, 14 पायदळप्रमुख, 15 कोशाध्यक्ष, 16 दुर्गपाल, 17 सीमापाल, 18 राजा जवळ राहणारे अन्य प्रमुख सेवक. ह्यांचे  गुप्तभेद जाणून शत्रूपक्षाच्या राजाला सहज  आपल्या तालावर नाचवता येतं.

 आपल्या पक्षात 1 महाराणी व इतर राण्या, 2 राजमाता, 3 अन्तःपुराचे सेवक, 4 हार, माळा, गजरे गुंफणारे, 5 शय्या लावणारे, 6 गुप्तचर प्रमुख, 7 रोजचे पंचांग व भविष्य सांगणारे , 8 वैद्य, 9 पाणी आणणारे, देणारे परिचारक, 10 पानसुपारी, विडे तयार करणारे व देणारे, 11 आचार्य, 12 अंगरक्षक, 13 आसनव्यवस्था सांळणारे आसनाध्यक्ष, 14 राजाच्या माथ्यावर छत्र धरणारे, चौरी हलवणारे, 15 नर्तकी, वेश्या ह्यांच्याकडून आपल्या राजाला फार मोठा धोका संभवतो. त्यांच्याकडून राजाला ठार मारण्याचा वा राज्य बळकावण्याचा प्रयत्न होतो; कारण

मोठा जनसंपर्क असलेले, वैदू, कुडमुडे ज्योतिषी, गारुडी, अध्यात्मिक गुरू, लग्नमुंजी लावणारे गुरुजी/भटजी, राजचा विश्वास संपादन करून गुप्तहेर खात्याचा मुख्य म्हणून काम पाहणारे, चित्रविचित्र वेश धारण करणार्‍या बहुरुप्याचे सोंग घेऊन फिरणारे हे लोक समाजातील अनेक थरातील अगणित लोकांच्या सतत संपर्कात येण्यामुळे, राजाचे सर्व दोष, राज्यातील कमतरता, राजाविरुद्ध लोकांमधे खदखदणारे विषय, समूळ जाणत असतात.

(आता धर्मप्रचारक, घरांमधे काम करणार्‍या स्त्रिया, सर्व इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स दुरुस्त करणारे मेकॅनिक, भाजी, ग्रोसरी, पिझ्झा इत्यादि पोचविण्यासाठी येणारे डिलिव्हरी बॉईज, गाडी धुणारे असे अनेक प्रकारची घरपोच सेवा देणारे ---

( तुकोजी होळकर अत्यंत पराक्रमी वीर होते. त्यांना रोज पहाटे अंघोळ झाली की तंबूबाहेर येऊन, डोक्यावर पंचा घेऊन डोकं पुसण्याची सवय होती. त्यांच्या तंबूसमोर भिकार्‍याच्या वेशात बसणार्‍या शत्रूच्या हेराने हे बरोबर हेरून ते तंबूबाहेर येऊन डोकं पुसत असतांना त्यांना तलवारीने ठार मारले. )

वैद्यसांवत्सराचार्याः स्वपक्षेऽधिकृताश्चराः ।

तथाहितुण्डिकोन्मत्ताः सर्व जानन्ति शत्रुषु ।। 68

ज्योतिषी, भटजी, वैद्य । नाना धर्म प्रचारक

गारुडी, बहुरूपी वा । शत्रुचा मुख्य चारण ।। 68.1

होऊन शत्रुराज्यात । फिरे सर्वत्र जो कुणी

कळती भेद राज्याचे । शत्रुचे दोष सर्वही ।। 68.2

आपल्या कामात कुशल असलेले स्थापत्य विशारद जमिनिच्या पोटात पायर्‍या बनवत जाऊन हळुहळू खोलपर्यंत खणून ज्याप्रमाणे वर वर न दिसणार्‍या पाण्यापर्यंत पोचतात त्याप्रमाणे, सतत सतर्क राहणारे, अत्यंत चाणाक्ष हेर शत्रुपक्षाच्या अधिकार्‍यांसोबत कुशलतेने संधान साधून, त्यांच्या माध्यमातून, त्यांच्याकडूनच शत्रूच्या विविध भागातील अत्यंत गोपनीय अशी आतल्या आतल्या गोटातील माहिती, भेद करून जाणून घेऊ शकतात. शत्रूच्या समुद्राप्रमाणे असलेल्या साम्राज्याच्या तळापर्यंत पोचून आपल्याला जी माहिती पाहिजे ती मिळवू शकतात.

कृत्वा कृत्यविदस्तीर्थेष्वन्तः प्रणिधयः पदम् ।

विदाङ्कुर्वन्तु महतस्तलं विद्विषदम्भसा ।। 69

 ( प्रणिधिःसतत सतर्क राहणारा, हेर, गुप्तचर. विद्विषदम्भसाशत्रुसागराचा

पृथ्वीत खोल पाणी जे । तेथे कुशल पोचती

खोदून पायर्‍या जैशा । तळापर्यंत खालती ।। 69.1

तैसे चाणाक्ष हेरांनी । शत्रूच्या माध्यमातुनी

शत्रूच्या अधिकार्‍यांच्या । मदतीनेच सर्वही ।। 69.2

विभिन्नशा विभागांची । सखोल माहिती खरी

घेणे जाणून भेदाने । शत्रु-सिंधु-तळातली ।। 69.3

वायसराज मेघवर्णाने वयोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध स्थिरजीवी ह्या  मंत्र्याचे सर्व भाषण अत्यंत आस्थेने लक्षपूर्वक ऐकून घेतले आणि नंतर तो म्हणाला, मंत्रीवर  अजून एक गोष्ट मला कळली नाही; ती म्हणजे, कावळे आणि घुबडांचं इतकं प्राणांतिक वैर का आहे? ही घुबडं कायम आम्हाला जीवे मारण्यासाठीच टपलेली असतात. ह्यामागे काही इतिहास आहे का? भूतकाळात अशि कोणती घटना घडली होती का? जिच्यामुळे आजही हे वैर संपायचं नावच घेत नाहीए उलट नव्याने हा वैरभाव दृढ होत चालल्याचच दिसून येतं.

स्थिरजीवी म्हणाला, हो! ती एक फार मोठी कथा आहे ती मी तुला सांगतो. ऐक! ---

----------------------------

 

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -