1 मुंबई ते मॉरिशस

1 मुंबई  ते मॉरिशस

   विषुववृत्त ओलांडले-           

 4700 कि.मी. अंतर विमानाला पार करायचं होतं. अर्धअधिक अंतर पार झालं होत. घड्याळाकडे नजर टाकली. मुंबई सोडून अडिच तीन तास झाले असावे. मी विमानातल्या टि.व्ही. च्या पडद्याकडे नजर टाकली. परत एकदा मुंबई मॉरिशस प्रवासाचा आराखडा दाखविणारा नकाशा दिसू लागला. भारताच्या पश्चिम किनार्यावर मुंबईच्या ठिपक्यावर विमानाची जागा, स्थान दाखविणारा लाल बाण निळ्या समुद्रावरून पुढे सरकत सरकत विषुववृत्तावर येऊन पोचला होता . विमान विषुववृत्त ओलांडत असल्याची घोषणा झाली.     

           जहाजाने प्रवास करतांना विषुववृत्त ओलांडतांना एक गंमतशीर परंपरा पाळली जाते. एखादा  खलाशी वरुणाचा पोशाख करतो. वरुणराजाच्या दरबारात जहाजावरील प्रवाशांना बोलावलं जातं. जहाजाच्या कप्तानाने जहाजातील सर्वांना खूप दिवस समुद्रात फिरवलं, प्रवास करायला लावला . . आरोप त्याच्यावर ठेऊन शेवटी वरुण महाराज निकाल देतात. जहाजाच्या डेकवर पाणी भरुन ठेवलेल्या टबमधे कप्तानाला तीन वेळा डुबक्या देण्याचा वरुणराजांचा आदेश निघतो. त्यानुसार कप्तानाला टबमधील पाण्यात तीन डुबक्या देता देता सर्वांनाच डुबक्या देऊन जलपंचमीचा उत्सव होऊन जातो. आमच्या नौदल आणि इतर सहकार्यांनी सांगितलेली परंपरा आठवत होती. अर्थात विमानात हे काही शक्य नव्हतं. पण ती काल्पनिक रेघ पहिल्यांदाच ओलांडल्याच अप्रूप मनात भरून राहिलं.                       

                  बघता बघता साडेपाच तास संपले. आमचं विमान थेट दक्षिण गोलार्धात आफ्रिका खंडाच्या जवळ येऊन पोचल होतं. आफ्रिकेशेजारी असलेल्या मादागास्कर बेटाशेजारी मॉरिशसचा लहानसा ठिपका लुकलुकत होता. मॉरिशसच्या पूर्वेला भारताच्या बाजूला मॉरिशस पासून बर्यापैकी लांबवर त्याच्यापेक्षा अजून फिका आणि लहान असा दुसरा ठिपका दिसत होता. तो स्वतःला रॉड्रीग्ज म्हणवून घेत होता. मॉरिशस आल्याची उद्घोषणा झालीखिडकीची पापणी वर उचलून पाहिली. सगळीकडे ढगांचे गठ्ठे पहुडलेले!

        भराभर बॅगेतून कॅमेरा उपसून काढला. विमानात बसतांनाच मिळालेलं Embarkation and Disembarkation card तेंव्हाच  भरून ठेवलं होतं. कॅमेरा खिडकीला लावून ढगांमधून मोकळी जागा मिळताच खालचं दृश्य टिपण्यासाठी On your marks----! च्या Position मधे मी! हे ढगांचे गठ्ठे दूर व्हायला तयार नाहीत. उलट खिडक्यांवरतीच जपानी त्सुमो सारखे धक्के मारताएत. पाणबुडीला देवमाशांनी घेरून सर्व बाजूंनी फिरून चावे घेता येता आहेत का ते पहावं असं ढगांच विमानावर आक्रमण चाललं होतं.  विमानानी खाली यायला सुरवात केली आणि आता पर्यंत अतिशय सुखात तरंगणारं विमान खडबडीत रस्त्यावर आल्यासारखं  वाटायला लागलं. कानांवरचा हवेचा दाब वाढायला लागला होता. हातातला कॅमेरा प्रतिक्षेत-`आऽऽ हा हा! - थोडेसे ढग दूर झाले. - - एक क्षण ---एक क्षण --- खाली मैलोन्मैल हिरवीगार सपाटी. वरतून हिरवळ भासतीए. -- नाही नाही शेती वाटतीए. --ऊस!-ऊसच असणार बहुधा! -वाचलं होतं मॉरिशस विषयी!--छे !! परत ढग! फिरून ढगांचा घेराव! उगीच लहानपणची आठवण झाली. लहान असतांना गणेशोत्सवाच्या आधी महिनाभर आधी गणपतीची सजावट आणि वेगवेगळी दृश्ये, देखावे तयार होत असत. आतल्या काम करणार्यांच्या रागवण्याकडे दुर्लक्ष करून, पडदा बाजूला सारून आत डोकावयाला जे कुतुहल आम्हा मुलांना वाटायचंते नंतर पुढचे दहा दिवस तोच गणपती, तोच देखावा पाहून टिकत नसे. लग्नानंतर कितीही वादावादी होऊन एकमेकांच तोंडही बघू नये असं वाटलं तरी अंतरपाट दूर होण्यापूर्वी पलिकडचा चेहरा टिपण्यासाठी डोळे अधीर असतातच. तसच काहीस हे समीकरण होत. पुढचे दोन वर्ष आमचा `मुक्काम - मॉरिशस' होता पण मॉरिशसच प्प्या टप्प्यांनी होणारं दर्शन माझी उत्सुकता अजून अजून वाढवित होतं. खिडकीला नाक लावून कलती मान करून थोडसं मागे पहायचा प्रयत्न केला. आत्तापर्यंत विमानाच्या पंखांनी जमिनीशी केलेली  समांतर दिशा सोडून किंचित जमिनीची दिशा तर विमानाच्या शेपटीनी आकाशाची दिशा धरली होती. ढगांमधे नाक खुपसून विमानानी खाली डाईव्ह मारला. व्वा - - व्वक्लिक! - क्लिक!!  क्लिक्!!! हिरवळ,पाणी, समुद्र, तलाव, ढग, दिवाळीच्या किल्यात मांडून ठेवल्यासारखी हिरवळीतली घरं- - तुरळक पुंजक्यांमधे..... तीही धाब्याचीहिरव्या विस्तीर्ण सपाटीवर आणून बसविलेले एकटे दुकटे डोंगर, हिरवळीतून बोट फिरवत आखत जाव तसा लांबवर जाणारा रस्ता,

        हो म्हणजे रस्त्यांच जाळं नव्हे  मोजकेच थोडेसे रस्ते! सकाळचे सात वाजले असतील. तुरळक गाड्या रस्त्यावरून पळत होत्यात्रिशंकूसारखे मधेच लोंबकाळणारे ढग! विमान खाली खाली येत होत तसं बेटभर दिसणारी ती हिरवळ हिरवळ नसून ऊसाची शेती आहे हे जाणवायला लागलं. मघाशी embarkation card मधे प्रवाशांना बाहेरच्या देशातून  agricultural products आणि त्यातही ऊस मॉरिशस मधे आणता येणार नाही अशी स्पष्ट सूचना दिली होती त्याची कारण मीमांसा खाली दिसत होती.

                  समुद्राच्या गडद आणि फिक्या हिरव्या-निळ्या, मोरपंखी छटांनी हिरव्या सानुल्या  बेटाला हळुवारपणे मांडीवर घेतलं होतं. विमानानी जमिनीवर पाय टेकविले आणि पळायला सुरवात केली. कोळीणीने मासे मांडून ठेवावेत तशी कोपर्यात थोडीशी विमानं मांडून ठेवली होती.त्यांच्या शेपट्यांवरून त्यांची जातकुळी आणि ती कुठल्या समुद्राला पार करून आली होती ते कळत होतं.

दक्षिण गोलार्धात रामगुलाम शिवसागर विमानतळावर -

                    `Ramgoolam Shivoosagur Airport' रामगुलाम शिवसागरचं शक्य तेवढं लांबलचक स्पेलिंग! एअरपोर्ट मात्र आटोपशीर, टुमदार! मिया मुठभर दाढी हातभर असा! विमानचालकानी निरोप घेतला. विमानाला लावलेल्या जिन्यावर पाऊल टाकलं आणि कडक ऊन आणि थंडगाऽऽर वारं यांनी हातात हात घालून स्वागत केलं. काय गम्मत होती! मी  डिसेंबर 3, 2004 ची पहाट उत्तर गोलार्धातील मुंबईची उकडती थंडी पाहिली तर थंड वार्याची उन्हाळी सकाळ दक्षिण गोलार्धातील मॉरिशस मधे अनुभवत होते. एकाच दिवशी भारतातील थंडीचा ऋतु पाहून मॉरिशसचा उन्हाळा बघत होते. विषुववृत्ताची एक रेघ  आणि विमानाचा एक ठिपका ह्यांनी माझी दुनिया अक्षरशः इकडची तिकडे करुन टाकली होती. ढेरपोट्या माणसाच्या पोटावर फिरणार्‍या मुंगीला त्याच्या पोटावरील बेल्टवरून खाली उतरल्यावरच त्याच्या पावलांचं दर्शन व्हावं, तसं मला विषुववृत्त पार केल्यावरच दक्षिण गोलार्धाचं दर्शन होणार होतं.

 

प्रवीण दीक्षितांची मॉरिशसला नेमणूक -

                ह्या सर्वांबरोबर अजून एक मुद्दा होता तो म्हणजे मॉरिशस सरकारने केलेल्या विनंतीनुसार, मॉरिशसच्या सरकारचा सल्लागार म्हणून प्रवीण दीक्षितांची नेमणू मॉरिशसला झाली होती. भारत सरकारचे `कार्मिक आणि प्रशिक्षण' विभागाचे (Department of Personnel) चे प्रमुख, सचिव श्री. टंडन मॉरिशस भेटीसाठी गेले असता मॉरिशस सरकारने सांगितले की, आमच्या शासकीय कर्मचार्‍यांच्या प्रशिक्षणाच्या गरजा नक्की करण्यासाठी ते गेल्या पाच वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. परंतु अनेक देशांकडून मदत घेऊनही त्यांना ते शक्य होत नाही तरी त्यांना ह्या कामात भारताने मदत करावी. तेंव्हा भारतातील सर्व शासकीय प्रशिक्षण केंद्रातून उत्कृष्ट इच्छुक अधिकार्‍यांमधून चार अधिकारी निवडण्यात आले. त्यांचा समन्वयक म्हणून `यशदा पुणे' येथे काम करत असलेल्या प्रवीण दीक्षितांची निवड करण्यात आली. प्रवीण मॉरिशसला आधी पुढे गेले होते. मी आठ दिवसांनी जाणार होते  प्रवीण मॉरिशसला पोचल्यावर त्यांच्या स्वागतासाठी तेथील सेक्रेटरीने खास कार्यक्रम ठेवला होता. त्यासाठी खास मंत्रीमहोदयही आले होते. कार्यक्रम सकाळी नऊ वाजता असला तरी मंत्रीमहोदयांसकट सर्वजण पाच मिनिटे आधीच उपस्थित होते. सेक्रेटरीने दीक्षितांची वेगवेगळ्या अधिकार्‍यांशी ओळख करून दिली. मॉरिशसमधे प्रत्येक ठिकाणी विना अडचण जाता यावे या साठी त्यांना एक ओळखपत्रही त्यांनी बनवून दिले.

जादूची गाडी -

              आज प्रवीण मला न्यायला  विमानतळावर येणार होते. विमानाच्या जिन्याच्या पायर्‍या उतरून मी प्रवासी नेणार्‍या बॅटरीवर चालणार्‍या पांढर्‍या गाडीत जाऊन बसले. मागोमाग येणार्‍या गर्दीत झगमग साड्या, पंजाबी सूट, ओढण्या, मंगळसूत्री, कुंकु, टिकल्या इत्यादि भारतीय परंपरांचे उठावदार फलकारे लक्ष वेधून घेत होते. भारतातील कपड्यांच्या रंगांपेक्षा झगमग आणि चमचम आणि उठावदार रंगांची निवड जरा जास्त जाणवली. चेहरे भारतीय वंशाचे आहेत हे कोणी वेगळं सांगायला नको. स्मिताला पलिकडून स्मिताचा प्रतिसाद येत होता. इमिग्रेशन आटोपलं. मी सामान शोधायच्या आधीच Conveyor belt वरचं सामान ट्रॉलीवर चढवून हसर्‍या चेहर्‍यानी प्रवीण स्वागताला हजर होते. ‘जादूची गाडीसेवेसी हाजिर होती. हो! म्हणजे चालकाचं नावच, `जादू'! ``नमस्ते मादाम!'' जादूच्या हिंदीवरची स्थानिक फ्रेंच भाषेची जादू जाणवत होती. प्रयत्नपूर्वक जपलेल्या त्याच्या हिंदीचं कौतुकही वाटलं. स्वच्छ लांबच लांब रस्ता, खड्डे नाहीत , नियम तोडणं नाही, ट्रॅफिक जॅम नाही; सगळं कसं सुखदं वाटत होतं. रस्त्यावरच्या कडेला लावलेल्या जाहिराती  का बरं वाचता येत नाहीएत? प्रयत्न करूनही साधत नव्हतं. ओऽह!  त्या फ्रेंचमधे लिहिल्या होत्या. त्यातल्या त्यात वाचता येणार्‍या जाहिराती  म्हणजे  Red Cow Milk.  या दूध पावडरच्या जाहिराती सगळीकडे झळकत होत्या. त्या वाचता येत होत्या. सोबत तांबू गायीचं चित्र. भारतात कोणी `देशी तांबू गायीचं किंवा काळ्या कपिलेचं दूध' अशी पाटी लावली तर लोकं फिरकणार नाहीत.  आपल्याला आपलं जर्सीचच कौतुक. आत्तापर्यंत आम्ही Plesance प्लेजॉन्स (एस् चा उच्चार ज होतो)एअरपोर्ट ते  QuatreBorne क्वात्र बोन 40 कि.मी. च अंतर सहजगत्या पार करून आलो होतो.

 ( खालील प्रकरणाच्या नावावर क्लिक केल्यास पुढचे प्रकरण उघडेल. ) 
Hotel Gold Crest ----  

खाली  दिलेल्या प्रकरणाच्या नंबरवर क्लिक केल्यास ते प्रकरण उघडेल

 0  1   3  4  5  6  7  8  9  10   11 

12  13  14  15  16  17  18  19  20  21.


Comments

  1. अप्रतिम अर्पण पत्रिका आणि सुरुवात ही खुपच सुंदर ,एका वेगळ्याच नजरेतून माँरीशस ची सुंदरता समोर येणार ही खात्री आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप धन्यवाद! माझ्या नवीन प्रयोगाला आपण प्रथम प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद!

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

भौमासुर / नरकासुर वध –

रामायण Express- ची माहिती