20 रॉड्रिग्ज द्वीप समुह I’lle Rodrigues

 20 रॉड्रिग्ज द्वीप समुह I’lle Rodrigues  


सुदैवी रॉड्रिग्ज -

               `Rodrigues, the tiny piece of land must have indeed been exceptionally  loved and favoured by God Almighty who chose to cast it in the ocean far away from Chagos archipelago, thus sparing it the abominable fate of islands like Diego Garcia, Peros Banhos and others.'

          सुदैवी रॉड्रिग्ज - मी मॉरिशसचा `News on Sunday'  वाचत होते. फ्रेंचचा पगडा असलेल्या ह्या बेटावर आठवड्यातून एकदाच मिळणार्‍या इंग्रजी वृत्तपत्राचं प्रत्येक पान वाचून झाल्याशिवाय मी ते सहजासहजी रद्दीत टाकत नसे. रॉड्रिग्ज हा मॉरिशसचा अविभाज्य भाग असला तरी या सुदूर बेटाबद्दल मॉरिशसच्या कुठल्याच बातम्यांमधे प्राधान्य नसे. ह्या छोट्याशा बेटावर देवाने सौंदर्याची लयलूट करतांना त्याला छागोस ह्या द्वीपसमूहापासून दूर ठेऊन अशी कुठली कृपा केली असावी हे कुतुहल मनात डोकावून गेलं. माझ्या कुतुहलाचं थोडक्यात उत्तर असं होतं -

                मॉरिशसला स्वातंत्र्य देण्यापूर्वी 1965 साली ब्रिटन आणि अमेरिकेमधे एक गुप्त करार झाला. आणि इंडियन ओशनमधे मालदीव्सच्या दक्षिणेला असलेल्या ब्रिटिशांच्या ताब्यातील British Indian Ocean Territory (BIOT) मधील छागोस आर्चिपिलॅगो ह्या साधारण 30 बेटांच्या द्वीपसमूहातील दिअ‍ॅगो गार्शिया या बेटाची अमेरिकेचे सैनिकी तळ उभारायला निवड केली गेली. आणि त्याचबरोबर नारळाची शेती करणार्‍या छागोस द्वीपसमुहातील आणि खास करून दिअ‍ॅगो गार्शियामधील अंदाजे दोन हजार भूमिपुत्रांची गाठोडी आवळली गेली. `स्थलांतरीत कामगार' ह्या नावाखाली त्यांना जहाजात घालण्यात आलं आणि मॉरिशसमधे अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत सोडून देण्यात आले. मॅरिशसला स्वातंत्र्य देण्यापूर्वी ब्रिटिशांनी हे हलवायाच्या घरावर ठेवलेले तुळशीपत्र. पेरॉस बेन्हॉस आणि सॉलोमन ( Peros Banhos and Salomon) हे दोन द्वीपसमूह आता काही प्रमाणात प्रवासी बोटींना (cruise) खुले करण्यात आले आहेत. सहाजिकच निसर्गाचं वरदान लाभलेलं रॉड्रिग्ज हे छागोस द्वीपसमूहापासून दूर ठेवल्याबद्दल मॉरिशियन लेखक `भीष्मराजने' मानलेले देवाचे आभार माझ्या मनात रॉड्रिग्जबद्दल एक कुतुहल जागं करून गेले. मॉरिशसमधे राहणारे भारतीय किंवा बाकी मॉरिशियन्स या बेटाचं नाव निघाल्यावर ``ह्या छोट्याशा बेटावर जाण्यासारखं काय असणार आहे? परत परत समुद्र काय पहायचा आहे? मला तर घुसमटायलाच होईल.’’ अशा निरुत्साही प्रतिक्रिया देत असले तरी ह्या लेखकानी माझ्या मनात नक्कीच एक उत्सुकता निर्माण केली. प्रवीण कामासाठी रॉड्रिग्जला जाऊन आला असला तरी बेट पहायची संधी त्याला मिळली नव्हती. आज मात्र मी  प्रवीणबरोबर रॉड्रिग्जला जाणार होते. बॉलिवुडमुळे मॉरिशस हे भारतीयांना सुपरिचित आहे. हनिमून कपल्ससाठी हॉट डेस्टिनेशन आहे. रॉड्रिग्जचं सौंदर्य मात्र आपल्यापैकी फारच थोड्याजणांनी अनुभवले असेल.

मॉरिशस ते रॉड्रिग्ज प्रवास -

 मॉरिशसच्या North-East ला  653 कि.मि. वर 104 कि. मि. 2 चे हे  बेट! रॉड्रिग्ज हाही मॉरिशसप्रमाणेच एक बेट बेटुल्यांचा ताफाच. मुख्य बेटाभोवती ही बेटं विखुरलेली आहेत. पाण्यातून जाणार्‍या बदका मागची जणु छोटी छोटी पिल्लचं! समुद्रानी आपल्या तळहातावर कुतुहलानी त्यांना उचलून घेतलं आहे.

विमानातून बघतांना समुद्रात पोहणारी ही छोटी छोटी बेटं, मेणबत्ती पेटवून वितळलेल्या मेणाचे थेंब पाण्यात टाकताच मेणाच्या छोट्या छोट्या टिकल्या पाण्यात तरंगत रहाव्यात तशी दिसतात. मेणबत्ती पेटवून काडेपेटीची काडीही टाकून द्यावी आणि तीही पाण्यावर मस्त तरंगत रहावी तशी Ile Aux Sables  आणि Ile Cocos ही लंबुळकी बेटं  आणि त्यानंतर रॉड्रिग्ज! Bay Topaz --खरोखरच अगदि नावाप्रमाणे नितळ, नीलार्द्र--!!!

Plaine Corail Air Port आणि रॉड्रिग्जचे प्रथम दर्शन-

 

            विमानानी Plaine Corail Air Port वर पाय टेकविले. छोटंसं टुमदार Air Port!  Air Port Buildingचा आकारही जरासा होडीसारखा. अमेरिकेच्या शिकागो, न्यूयॉर्क या अति अति भव्य, विशाल, huge huge विमानतळानंतर हा पिटुकला सुंदर विमानतळ अगदि घरगुती वाटत होता. मोरपंखी समुद्रावरून अजुन गडद चमकदार मोरपंखी समुद्रावर, निळ्याशार आकाशाकडून अजुन गडद निळ्या आकाशाकडे, एका tiny tot बेटावरून अजुन एका tiny dot बेटाकडे जाणारा प्रवास म्हणजे मॉरिशस ते रॉड्रिग्ज प्रवास. आम्ही दिल्लीला असतांना अनेक मोरांचा ताफा आमच्या घरासमोरून डौलात जायचा. त्यांचे मोरपंखी पिसारे ऐटित तोलत जाणारे ते मोर काही दिवसांनी आमच्या चांगलेच परिचयाचे झाले. सर्वांचे रंग मोरपंखी असले तरी त्यातील तरुण मोर हे जास्तच कमनीय आणि तजेलदार दिसत. त्यांच्या पिसांचा मोरपंखी रंग ज्यास्त गडद, उठावदार आणि चमकदार असे. रॉड्रिग्ज आणि मॉरिशसच्या सौदर्यात हाच फरक होता. आकाशाच्या निळाईच्या अजुन अजुन गडद होत जाणार्‍या छटा, हवेतील धूलीकणांचा पूर्ण अभाव, काचेसाखा पारदर्शी मोरपंखी चमकदार समुद्र, जणु विधात्याने आत्ताच समोरचं चित्र ओल्या फडक्याने पुसुन ठेवलं होतं. बेट नुकतच सुस्नात झाल्यासारखं दिसत होतं. बेटावर एक वेगळाच ताजे तवानेपणा सतत भरून राहिला होता. येथे आम्ही सरकारी पाहुणे असल्याने  आम्हाला  घ्यायला गाडी आली होती. हासर्‍या चेहर्‍याच्या तुकतुकीत सागवानी रंगाच्या ड्रायव्हरने आमचे स्वागत केले.

                    गाडीत रेडिओ चालू होता. आम्ही गप्पा मारत असतांनाच ड्रायव्हरने रेडिओवर चालू असलेल्या बातम्यांकडे आमचं लक्ष वेधले. इंडियाहून आपल्या मदतीसाठी मॉरिशसला आलेले भारतीय डेलिगेशन रॉड्रिग्जला पोचल्याचे ठळक बातम्यांमधे सुरवातीलाच सविस्तर सांगत होते. मला त्यात भारत किंवा इंडिया हा शब्द कुठेच ऐकू येत नव्हता. बर्‍याच वेळाने माझ्या लक्षात आलं फ्रेंचमधे ड चा उच्चार ज असल्याने इंडिया ऐवजी ते भारताला इंज्या इंज्या असं संबोधत होते.

पो. मांचुरिआ (Port.Mathurin) -

          बेटाच्या पश्चिम-दक्षिणेकडून दुसर्‍या टोकाला उत्तरपूर्वेकडे असलेल्या राजधानीच्या ठिकाणी पो. मांचुरिआला (Port.Mathurin) पोचायचं हेतं. 20-25 मिनिटं पुरली. गाडी मात्र 4बाय 4 पाहिजे हं! बाकी गाड्या इथे टिकावच धरु शकणार नाहीत. बेटाच्या मधोमध असलेल्या पर्वतराजीला ओलांडून जातांना खंडाळ्याच्या जुन्या घाटाची आठवण होत होती. मोजक्याच गाड्या होत्या. रस्ता डांबरी गुळगुळीत होता. पण चढ श्वासांना थोडतरी रोधून धरायला लावत होता. आपलेच श्वास ऐकू येत होते. श्वासाला लय असते तसा आवाजही असतो हे सांगणारी शांतता होती. शांततेकडुन अजून नीरव शांततेकडे आम्ही पोचलो होतो.

                      मधे मधे लागणार्‍या छोट्या वस्त्या म्हणजे इथली गावं! (villages) सगळी मिळून वस्ती अवघी 37,000. जातांना केळीच्या बागा आणि त्यांचे लोंबणारे घड नजरेत भरत होते. संध्याकाळ झाली होती.

Tamarin!! हॉटेल चिंच!

         हॉटेलवर सामान टाकलं आणि  फिरायला बाहेर पडलो. उताराकडे चालत राहिलं की समुद्र येणार त्या हिशोबानी चालत होतो. रस्त्याच्या कडेला असलेल्या छोटेखानी दुकानांवरून नजर टाकत पुढे निघालो. बघता बघता समुद्र किनारा कधी आला ते कळलच नाही. चालत थोडसं पुढे गेलो. एक जेटी दिसत होती. मुशीतून सोन्याचा रस ओíतावा तसा आकाशात आणि समुद्रावर सूर्य सांडला होता. त्याच्या सोनेरी झगमगाटाकडे बघायची डोळ्यांना हिम्मत होत नव्हती. येथे मॉरिशसची नुसती स्वच्छताच परत एकदा घासून पुसून घेतली घेतली नव्हती तर त्याबरोबरच सूर्यालाही बर्हिगोल भिंगातून पावन करून घेतलं असावं. अगस्तिऋषिंनी हजारो वर्षांपूर्वी आदित्यहृदय स्तोत्रात केलेलं सूर्याचं वर्णन साक्षात समोर पसरलं होतं.

मूशीत घालिता सोने  तेजस्वी दिसते जसे

सुवर्णवर्ण तैसाची। कांति ह्याची दिसे दिसे।।

 

प्रचंड आतपी देई   ताप ह्या जगताप्रती

घाम-घाम जना होई । जीव व्याकूळ अंतरी।।

 

अत्यंत उग्र तेजस्वी। प्रभा फाके प्रखर ही

प्रचंड शक्तिशाली जो। वंदितो देव तोच मी।।

( मराठी अनुवाद)

            ह्या शक्तीमान विश्वसम्राटाला हात जोडण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. गावातले लोकंही फिरायला जेटीवरच आले होते. येथे बसू नये वगैरे बोर्डस् नव्हते. बसायला छान बाक ठेवले होते. लोकही गप्पा मारत बसले होते. उजव्या हाताला डोंगर, डोंगर कडेनी रस्ता आणि डावीकडे समुद्र! समुद्र-क्षितिजाच्या रेघेवर ढगांनी चित्र काढायला सुरवात केली. तासभर चालत होतो. ढगांना आग लावून सूर्य ढगांमागे दडून बसला. ढगांच्या निखार्‍यावर जणु काय वार्‍याने फुंकर घातल्यासारख्या त्यांच्या कडा चमचमायला लागल्या. गुलाबी आणि निळसर राखी रंगातील चित्रकला समोर उलगडत होती. समुद्रातील दगडावर बगळ्याच्या जमातीतील पक्षी लांब मान करून मासा शोधत उभा होता. अधे मधे दिसणार्‍या होड्यांनी चित्रातल्या मोक्याच्या जागा घेतल्या होत्या. विचार निर्माण करणारं डोक्यातलं यंत्र बंद पडलं. काहीही न बोलता समोर फिरणार्‍या अदृष्य कुंचल्यातून उमटणार्‍या रंगांची करामत बघत स्तब्ध बसलो. चित्र पूर्ण झालं आणि सूर्यानी आपला गुलाबी कुंचला पाण्यात खळबळून ढगांना पुसून टाकला. निळ्या गुलाबी पाण्यावर बोटींना खडकाळ समुद्राचे इशारे देणारे दीपस्तंभांचे दिवे लुकलुकतांना दिसायला लागले. समुद्रकिनार्‍यावर एका समुद्रपक्षाचं दगडात कोरलेले शिल्प माणसाच्या पुतळ्यापेक्षा सुंदर वाटलं. कुठल्यातरी फुलांचा मंद सुगंध हवेबरोबर पसरत पसरत असमंतात भरून गेला. कुठला तरी परिचित सुवास होता. चालता चालता अचानक समोर फुलांनी बहरलेला शिरीषाचा प्रचंड वृक्ष सामोरा आला आणि सुवासाचा पत्ता सापडला. येतांना पाहिलेल्या खुणा लक्षात ठेवीत मागे परतत होतो. मघाचा टुमदार बस डेपो आत्ता निर्मनुष्य दिसत होतालाल कौलारू उतरत्या छपराचे 10-12 बस थांबे एकत्र. प्रत्येक थांब्यावर सुटणार्‍या गाड्यांचे क्रमांक , सुटण्याच्या वेळा , तिचे सर्व स्टॉप्स अशी सर्व माहिती लिहिलेली. BusTerminal वर Toilet, Phone अशी माणूस म्हणुन जगण्यासाठी लागणारी सर्व सुविधा उपलब्ध होतीबोट बंदराला लागते ती छोटी जेटी सामसुम झाली होती. मघाशी फिरायला आलेल्या लोकांनी बाकं रिकामी केली होती. थोडं पुढे आलो. मघाचा तो भाजीवाला सामानाची आवरासावर करीत बसला होता. आजुबाजुची वेताच्या टोप्या, स्विमिंग सूट्स, त्यावर ओढून घ्यायचे सराँगबाटलीबंद व्हिनेगार मधील मिरच्या, मेमेंटो, टि.शर्टस् अशा रंगिबेरंगी वस्तुंनी नटलेली छोटेखानी दुकानंही बंद झाली होती. परतीचा मार्ग बरोबर होता. कारण जातांना दिसलेलं ते प्रचंड वडाचं झाड दिसलं. गाव शांत आणि सामसूम झालं होतं पण वडाच्या झाडाला मात्र जाग आली होती. वस्तीला आलेल्या असंख्य पक्षांच्या चिवचिवाटानी बोललेलही ऐकू येणार नाही अशी अभूतपूर्व गडबड उडवून दिली होती. त्यांची गोड गाणी संपून बहुधा झोपण्याच्या जागेसाठी मारामारी, भांडणं चालू होती. कदाचित दिवसभर कशी गम्मत केली ते आपल्या इतर मित्रांना सांगण्याची चढाओढ लागली असावी. माझ्या डोक्यात पंचतंत्रातली गोष्ट जिवंत होत होती. - - अस्ति दाक्षिणात्ये जनपदे महिलारोप्यं नगरम्। तत्र अस्ति विशालः वटवृक्षः! - दक्षिणेकडे एक महिलारोप्य नावाचं एक गाव आहे.  (कदाचित मॉरिशचा उल्लेखच महिलारोप्य होत असावा. ) तेथे एक विशाल वटवृक्ष आहे. हा वृक्ष अनेक पक्ष्यांचं आश्रयस्थान आहे. पावलं पुढे चालत होती आणि चिवचिव मागे अस्पष्ट होत होती. अहमदिया मुस्लिम मशिद आणि होस्टेल समोर MCB पाटी, छोटं बस स्टेशन- - वळणावर - -100 मि वर Hotel La Tamarin!! हॉटेल चिंच! आपल्या कडे हॉटेल्सना चिंच, आंबा, पेरु अशी नावं का बर देऊ नये? मॉरिशसला `ला तामार्‍या' म्हणजे चिंचआळी किंवा चिंचवाडी म्हणता येईल असा भाग आहे. चिंचेला एवढी प्रतिष्ठा पाहून बरं वाटायचखरतर भारतातील चिंच इतकी चविष्ट आहे की रोज तिच्याशिवाय आपल शब्दशः पान हालत नाहीआपण मात्र तिला घर की चिंच ना के बराबरकरून टाकलं आहे. पोटातल्या भुकेची जाणीव झाली. जेवणाच्या टेबलावरील मिरचीच्या वासाला नाकानी सणसणून दाद दिली. पाश्चिमात्यांना ब्रेड बरोबर लोणी तर भारतीयांना मिरच्यांचा ठेचा दिला जात होता. पण आपल्या लवंगी मिरचीची इथली बहीण पाहिल्यावर `ती  खट का ही खट' हे ठरवणं जरा अवघडच होतं. कटकट नको म्हणून लोणीच मागवलंआपल्या पूर्वजांनी उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्मअसं जेवायच्या आधिच आपल्याला म्हणायला शिकवून खूपच उपकार केले आहेत. खेळीमेळीत जेवण चटकन संपून गेलं.

हॉटेल कोकोचे (Cocotiers) -

                            दुसर्‍या दिवशी नाश्ता झाल्या झाल्या आम्हाला दुसर्‍या हॉटेलवर पोचविण्यात येईल असं हॉटेल मालकानी फर्मान काढलं. हॉटेल चिंच अगदि गावाच्या मध्यात होतं. आता आम्ही बेटाच्या उत्तर टोकाला  English bay च्या किनारी असलेल्या हॉटेल कोकोचे (Cocotiers) म्हणजे हॉटेल नारळ वर जाणार होतो. दोन्ही हॉटेल्स एकाच मालकाची होती. दुसर्‍या हॉटेलमधे जागा रिकाम्या झाल्या होत्या. ते जास्त प्रशस्त आणि सुंदर होतं. प्रवीण एका मिटिंगसाठी पूर्वी  रॉड्रिग्जला आला होता तेंव्हा त्याच हॉटेलमधे उतरला होता. तोच समुद्र नवीन जागेवरून अजून नवीन दिसणार होता. आम्हा सर्वांना घेऊन गाडी `हॉटेल कोकोचे' वर आली. हासरे चेहेरे, नारळ पाणी यांनी आमचं स्वागत केलं. प्रवीण कामाला निघून गेला होतापहिल्या मजल्यावरील खोलीत गेले आणि सर्वप्रथम पडदे बाजूला करून सज्जाचे दरवाजे उघडले. सज्जातून मोरपंखी समुद्र सतत दिसत होता. अतिशय प्राचीन, अनादि तरीही सदोदित नवीन अशी दोन विरुद्ध वर्णनं ह्या अफाट सागरासाठी वापरतांना सरसाम् अस्मि सागरः’ - -‘जलाशयांमधे मी सागर आहेह्या भगवान श्रीकृष्णाच्या उक्तीची यथार्थता जाणवत होती. खोलीच्या उजव्या हाताच्या खिडकी शेजारीच एक प्रचंड वटवृक्ष त्याच्या पारंब्या खाली सोडून बसला होता. हे दोन महर्षि वर्षानुवर्ष कुठल्यातरी गहन विषयावर चर्चा करीत जमिनीशी कायमचं नातं जोडून बसले होते.

माझं समुद्राचं वेड अजून संपलं नव्हतं आणि संपेल असं वाटत नव्हतं. न राहवून मी जवळ असलेल्या दुकानातून स्विमिंग सूट घेऊन आले. चार दिवस वेळ मिळेल तेंव्हा समुद्रात मनसोक्त पोहून घेतलं. समुद्राच्या खार्‍या पाण्याचा कंटाळा आला तर गोड्या पाण्याचा निळाशार तरणतलाव खोलीच्या बाहेरच मौजूद होता.

रॉड्रिग्जची पहाटसफर - morning-walk -

 

                 ‘रॉड्रिग्जमधे खर्‍या अर्थानी निसर्ग अनुभवायचा असेल तर एक दिवस तरी पहाटे पहाटे उठून समुद्र किनार्‍यावर लांब फिरायला जायलाच पाहिजे,तेथील शांतता अनुभवायला पाहिजे. ’ माझ्या आधी कामानिमित्त प्रवीण रॉड्रिग्जला आला असतांना मॉरिशसच्या एका मंत्र्यांनी त्याला हे सांगितलं आणि morning-walk चं आमंत्रणही दिलं होतं. तेथे मंत्र्यांबरोबरच्या अनुभवाने प्रवीण आणि मीही पहाटेच फिरायला जायचं ठरवलं. काल पाहिलेल्या विराट मोरपंखी स्वप्नाची धुंदी अजूनही डोळ्यांवरून उतरली नव्हती. हिमालयाची विविध शिखरं अनुभवतांना प्रत्येक अनुभव ताजाच वाटतो. तसं ह्या चैतन्य-निधानाचं विविध दिशांमधून होणारं दर्शनही विलोभनीयच असतं. परत असा समुद्र मला कधीही पहायला मिळणार नव्हता. कारण ह्या छोट्याशा बेटावर परत येण्याची शक्यताही नव्हती. चार वाजता ऊठून बरोबर पाचच्या ठोक्याला बाहेर पडणं आवश्यक होतं. आम्हाला Grand-Baie( ग्राँम्बे) ला जायचं होतं.

                  समोरून मॉरिशसचे मिनिस्टर येत होते. त्यांच्याबरोबर  असलेल्या एका पोलिस गार्डमुळे फक्त त्याचं वेगळेपण जाणवलं. माशा ओठांवर, डोळ्यांवर बसत होत्या. एवढ्या स्वच्छ सुंदर जागी माशा कशा? उत्तर नाही मिळालं. हात हलवायचा हातांना व्यायामच मिळून गेला. प्रत्येक घराघरातून जास्वंदीचे भरगच्च गेंद बाहेर वाकून बघत होते. समुद्रकिनारीच दोन मोठ्या सिमेट्रिज मधे प्रत्येक क्रॉस समोर प्लॅस्टिकची फुलं खोचून ठेवली होती. सिमेट्रीला लागून बंगलेही होतेदोन्ही हातात सामान घेऊन कोळी समुद्रात चालला होता. होडीपर्यंत पोचता पोचता त्याच्या मांडीपर्यंत पाणी वर चढलं होतं. केळीवाला भले मोठे केळ्यांचे घड विकायला बाजाराच्या दिशेनी चालला होता.

                   रस्त्याची खडी चढण चढत असतांनाच आजुबाजुच्या बंगल्यांमधील मोत्या वाघ्यांनी अशी काही दमदार सलामी दिली की आमचा हाड हाडचा जप सुद्धा फळास येईना. व्यायामाशिवायच ते आमच्या शरीरावरचं अर्धा-पाव किलो मांस कमी करतात की काय असं वाटायला लागलं. सुदैवानी मालकाच्या मध्यस्थीमुळे बचावलो. रात्री कुत्र्यांना घराबाहेर काढून द्यायची प्रथा मॉरशस आणि इथे अगदि `शेम टू शेम' वाटली. पाच वाजले होते फटफटत होतं. चढाच्या दोन्ही बाजुंना बाभळीचं रान माजलं होतं. आपल्याकडल्या बाभळींपेक्षा त्या अंगापेरानं मजबूत होत्या. अधुन मधुन वाक्वा च्या 12-15 फूट ऊंचीच्या झाडांवर अननसासारखी फळं लोंबत होती. वाक्वा म्हणजे आपल्याकडील केवडयाचाच एक प्रकार . आपल्या केवड्यापेक्षा हाडापेरानं मजबूत. त्याच्यावर लोंबकाळणारी अननसासारखी फळं कोकणच्या केवड्यावर कधी पाहिली नव्हती. चढण पूर्ण चढून गेलो आणि सभोवार नजर टाकली. एक मोरपंखी निळं अर्धचंद्राकार स्वप्न समोर शांत पहुडलं होतं. सगळे कष्ट कुठल्याकुठे पळून गेले.

डोंगराच्या उतरणीवर समुद्राला मिळेपर्यंत हिरवळच हिरवळ पसरली होतीत्या विस्तीर्ण हिरवळीवर उतरत्या छपरांचे छोटेखानी टुमदार 12-15 बंगले बसले होते. हिरवळीवर एक डौलदार कोंबडा कुटुंब कबिल्यासह वॉक घेत होता. एवढ्यात तिथल्या पाटीकडे लक्ष गेलं- ‘हॉटेल ले कोनोकोनो’!  (हे ही इथल्या खाऊन संपलेल्या अजुन एक माशाचं नाव) तो सुंदर परिसर न्याहाळत उभे असतांनाच तिथल्या हॉटेल मालकानी आमचं स्वागत केलं. ``या ना आमचं हॉटेल बघा.'' आग्रहानी त्यानी हॉटेल दाखवलं. आम्हाला सूर्योदयाच्या आत रूमवर पोचायची घाई होती.शेवटी व्हिजिटिंग कार्डस् ची आदलाबदल करून आम्ही पुढच्या समुद्रदर्शनाला निघालो. आता पूर्ण उतारच होता. उतरतांना समोरच समुद्र आणि पांढरी पुळण दिसत होती सुरूची झिपरी झाडं मधुन मधुन झिप र्‍या हलवून एकमेकांच्या कानात कुजबुजत होती. सुरुच्या बनात बसायला बाकही होते. आम्ही शांतपणे समुद्र डोळ्यात साठवून घेत तिथल्या बाकावर कितीतरी वेळ निश्चलपणे बसून होतो.

      नितांत शांत समुद्रात इंग्रजी व्ही च्या आकाराच्या लहरी उठवित एक नाव डौलात पाणी कापत चालली होती. पक्षांशिवाय एकही आवाज येत नव्हता. पूर्वेकडे गडद निळ्या आकाशावर उजाडल्याच्या खुणा उमटायला लागल्या. जवळपास चाळीस मिनिटं इथवर पोचायला लागली होती. तेवढंच मागे जायचं होंतं. मघाशी गोड वाटलेला उतार  चढतांना तेवढा गोड वाटत नव्हता. सकाळी पो. मांचुरिआ ला जाण्यासाठी ग्राँबे वरून सुटलेली पहिली बस आमच्यामागून घूँ घूँ घूँ घूँ आवाज करीत पो. मांचुरिआला निघाली. तिच्या घुमण्याच्या आवाजावरून आणि डिझेलच्या काळ्या काळ्या धुराच्या घनतेवरून ती आम्हाला घ्यायला मधे थांबेल अशी शक्यताच  नव्हती. असा दणकटच चढ होता. तो पर्यंत सूर्यराव तळपद्यांनी आकाशाच्या स्टेजवर एंट्री घेतली आणि आल्या आल्याच आमची पाठीची चामडी अशी काही भाजून काढायला सुरवात केली की थोड्याच वेळात आमच्या पाठींचं पुरतं भरीत झालं. समुद्रही तळपायला लागला. निळ्या समुद्रावर सोनेरी तरंगांची गर्दी उसळली. सोनेरी तरंग सतत हेलावण्याने त्यांच्यावर चमचम हिरकण्यांसारख्या चांदण्या चमकत असल्याचा भास होत होता. जेवढं बेट छोटं तेवढी समुद्राची व्याप्ती विशाल, अति विशाल भासत होती. हेच त्या छोट्या बेटाला लाभलेलं महा-वरदान होत. विश्वरूपाची झलक बघत बघत खोलीवर पोचलो व्हॉट अ वॉक!!!!

  बेटाचा  बसप्रवास -     

                      हॉटेलच्या लॉबीच्या दोन्ही भिंतींवर रॉड्रिग्ज मधल्या प्रेक्षणीय स्थळांचे फोटो लावले होते. ते बघत बघत जातांना तेथल्या गुफेच्या फोटोंनी माझं लक्ष वेधून घेतलं. आम्ही चार दिवस येथे राहणार होतो. प्रवीण मात्र सकाळी आठाच्या ठोक्याला रोज कामाला जाणार होतामी फोन करून मला ती गूढ गुफा पहायला जायचं आहे म्हणून सांगितलं. आज शक्य नाही. आजची रिझर्वेशन्स फुल आहेत. त्यासाठी सरकारी परवानगी लागते. आज आम्ही ती घेऊन ठेऊ मग उद्या जाता येईल. दुसर्‍या दिवसाचं बुकिंग करून मी नकाशा पसरून बसले. प्रवीण चार वाजता येणार होता. मला चारवाजेपर्यंत वेळ होता. ठरवून कुठे न जाता नुसतच बसनी फिरून येऊ या. बेटाच्या मधोमध मोठा डोंगर पसरला आहे माँट ल्युबिन. त्याच्या पलिकडे जाऊन पाहू या. बसनी जातांना गाव, माणसं, त्यांचं राहणीमान सर्वच नजरेखालून जातं. बस अनेक वस्त्या-वस्त्यांमधुन फिरत जाते. एखादं गाव छान समजावत जाते. रस्ते हे अंगभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांसारखे असतात तर बस कानाकोर्‍यातून फिरणार्‍या पेशी सारखी. सगळ्या गावाचं आरोग्य बघत, दाखवत जातेमी पो माचुरिआपर्यंत बस घेतली.

परत तेच कालचं चित्र मांडून ठेवलं होतं. पण त्यात वेगळेच रंग भरणं चालू होतं.

वेताच्या विणलेल्या बास्केट्स, टोप्या दुकानांतून डोकावत होत्या. काल पाहिलेलं समुद्रपक्षाचं शिल्प पाहून कालचा आनंद वाटला नाहीकारण हा सॉलितायर (Solitair) नावाचा चविष्ट पक्षी लोकांच्या पोटात कधीच अदृष्य झाला होता. जिभेवर रेंगाळणाऱया त्याच्या आठवणी त्याच्या दगडी पुतळ्याच्या रुपात उभ्या होत्या. डच, फ्रेंच आणि इंग्रजांच्या खादाडपणामुळे मॉरिशसचा डोडो आणि रॉड्रिग्जचा सॉलितायर (Solitair) भूतळावरून कधीच अदृष्य झाले आहेत. मॉरिशस आणि रॉड्रिग्ज दोन्ही ठिकाणी अति प्रचंड आकाराची आणि विविध प्रकारची कासवं होती. ह्या कासवांचा जीवन काळ 400 वर्षांचा असतो.

 

                काल पाहिलेली जेटी दिसत होती. अरेवा! आज जेटीवर एक जहाज ही लागलं होतं. दर सोमवारी मॉरिशसहून अत्यावश्यक सामान घेऊन हे जहाज इथे येतंहे जहाज भारतानेच मॉरिशसला भेट दिलेलं आहे. जवळच मोठ्ठं गोडाऊन होतं. तेथे पेप्सी आणि कोकचा प्रचंड साठा मौजूद होता. आणि अजून भरला जात होता.

माझा मुलगा लहान असतांना मी त्याला आजानुबाहू म्हणजे गुडघ्यापर्यंत लांब सडक हात असलेला असं सागत असतांनाच अचानक त्याने ``हो हो कळलं कळलं - म्हणजे चिंपांझी'' अशी माझी विकेट घेतली होती. आज इतक्या सुदूर बेटावर बोट भरभरून आलेला एवढा मोठा कोक आणि पेप्सीचा साठा पाहिल्यावर कोणी मला विश्वव्यापीचा अर्थ कोक आणि पेप्सी सांगितला असता तर नक्कीच पटला असता.

 

                        पो. माचुंरिआ आलं होतं येथूनच मला पुढची बस घ्यायची होती. बस टर्मिनलवर बेटाच्या उत्तर टोकापासून दक्षिण टोक गाठणारी बस उभी होती. ती मला हॉटेल एबनी पर्यंत नेणार होती. बसने डोंगराची चढाई चढायला सुरवात केली. रस्त्याच्या दोन्ही कडेला दोन तीन फुटी रुंदीच्या काळ्या प्टॅस्टिक पेपरच्या रस्त्याच्या लांबीच्या लांबलचक पट्ट्या लावल्या होत्यात्यातून ठराविक अंतरा अंतरावर छोटी छोटी गवतासारखी पानं डोकावत होतीकंडक्टरलाच त्याबद्दल विचारल असता तो म्हणाला, ``ते अननस लावले आहेत.'' रस्त्याच्या कडेकडेनी केलेली दोन-तीन फुटी रुंदीची आणि रस्त्याच्या लांबीची ही अननसाची शेती मला फारच आवडून गेली. माँट ल्युबिन! मी खिडकीतून बाहेर पहात होते. ``ह्या डोंगरावर ट्रेकींग करायला चांगले ट्रेक्सही आहेत. सध्या आपण माँट लिमॉन ( Mountain Limon at 398 m (1,306 ft).) रॉड्रिग्जमधे सर्वात उंच जागी आहोत.''  कंडक्टर सांगत होता. सेंट गॅब्रिअल चर्चवरून बस पुढे जात होती. बेटाच्या आकाराच्या मानाने चांगलं ऐसपैस चर्च होतं. मॉरिशसमधे भारतीय वंशाच्या लोकांची संख्या जास्त आहे. येथे मात्र जास्त करून आफ्रिकन वंशाचे कॅथॉलिक ख्रिश्चनबस गावा गावात शिरून मला बेटाचं अंतरंग दाखवत होती. सर्वात उंच ठिकाणाहून आमची बस जरा खाली सरकली आणि समोर विराट अर्धगोल समुद्रच समुद्र. जणु एक विशाल मोरपिसारा समोर उलगडला होता. मोरपंखावर असलेले विविध रंग समोरच्या समुद्रावर उमटले होते. शिवरूपी मोर त्याचा हा विशाल पिसारा फुलवून आकाशाचा तुरा उभारून समोर प्रकट झाला होता.

 

हे आकाश तुर्‍यासमान दिसते शंभो तुझ्या मस्तकी

शेषाचा उघडा फणाचि दिसतो शंभो पिसार्‍यापरी

त्याचे नेत्र सहस्र हीच जणु का नक्षी पिसार्‍यावरी

नाचे शंभु-मयूर तो फुलवुनी त्याच्या पिसार्‍यासही

( मराठी अनुवाद)

 

आदि शंकराचार्यांनी केलेलं शिवानंद लहरीतील शिवाचं वर्णन समोर साकर झाल्यासारखं वाटत होतं. मनात खरोखरच आनंदाच्या लहरी उठत होत्या. फोटो काढावेत का समोरचं दृश्य डोळ्यात साठवून ठेवावं हे मलाच कळत नव्हतं. दोन तीन फोटो काढले. नंतर शांतपणे बघत बसले. बस उतरावरून उतरत होती. समोरच चित्र ज्यास्तच जवळ जवळ सरकत होतं. समोर प्रचंड आकाराची नीळिशार स्वच्छ काच बसवली असल्यासारखं वाटत होतं. इतकं स्वच्छ पाणी की तरंगही जणु गाळून घेतले असावेत. मॉरिशसपेक्षाही स्वच्छ, सुंदर. छोट्या छोट्या वस्त्यांमधुन बस चालली होती. इतक्या सुंदर गावात प्रत्येक घरापुढे कपडे वाळत घालायला दोर्‍याच दोर्‍या बांधलेल्या दिसत होत्या. कपडे मात्र वाळत घातलेले नव्हते. काही तरी वेगळच वाळत होत. मनाला काहीतरी खटकत होतं. बसमधे बसल्यापासूनच कंडक्टरला मी नवीन आहे हे कळलच होतं. तो मला मधुन मधुन माहिती देत होता. `` येथे लॉबस्टर्स आणि‍ ऑक्टोपस छान मिळतात. रॉड्रिग्जमधला माणूस ऑक्टोपस शिवाय जेवत नाही. ह्या सगळ्या दोर्‍यांवर ऑक्टोपस वाळत घातले आहेत.'' हिरवीगार हिरवळ, नीळाशार समुद्र, काळेभोर खडक एक सुंदर कोलाज तयार झालं होतं. खडकावर बसून फ्रॉक घातलेली एक काळी आज्जी  नातवाला सांभाळत होती. हे जिवंत शिल्प माझ्या कॅमेर्‍यात बांधून घेतलं. त्याच बसने परत मी पो. मांचुरिया परत गाठलं. मला उद्या सकाळीच त्या गूढ गुफा पहायला जायची उत्सुकता होती.

  ( Caverne Patate) कॅव्हॅरॉन पेटिट गुफा -

                  हॉटेलमधील फोटो पाहून गुफांचा अंदाज येत नव्हता. नैसर्गिक रित्या तयार झालेल्या या गुफा मी पहाणार होते पण एकटीच. प्रवीण आणि त्याच्या डेलिगेशनला पूर्ण दिवस काम होत. टॅक्सी येणार होतीच. मला फक्त टॅक्सीत बसायचं  होतमी इच्छित स्थळी पोचले. ते एक खुरटी झुडपं वाढलेल माळरान होतं. तेही समुद्रापसून दूरच. थोडासा विरस होणाराच परिसर दिसत होता. तरीही आलो आहोत तर पाहून घ्या ह्या तयारीनीच मी तिथे आलेल्या ग्रुपला बोंझु ऽऽ बोंझु (Good morning) म्हणून घेतलं. गुहा पहायला डोंगरही कुठे नजरेच्या टप्प्यात नव्हते. थोड्याच वेळात एका ऊंच सडसडीत हसरया चेहर्‍याच्या आफ्रिकन  वंशाच्या माणसाने बोंझू म्हणत आमचं स्वागत केलं. तो हसला आणि त्याचे हिरकण्यांसारखे दात प्रकाशाची तिरीप यावी तसे चमकून गेले. काळ्या ढगातून वीज चमकून जावी तसं वाटलंपांढर्‍या शुभ्र रंगाचं परिमाण ठरवायला मला त्याचे चांदण्या चमचमत जाणारे दात हे अजून एक परिमाण सापडल्याचा आनंद झाला. हे काळे लोकं अत्यंत मोकळे ढाकळे आणि सरळ मनाचे असतात. सगळ्या रुक्ष माळरानावर त्याच्या हसण्यानेच उत्साह संचारल्यासारखं वाटल. इतरवेळेला पाहूनही न कळणार्‍या गोष्टींमधे गाईड रंग भरायला लागला की रोचक होऊन जातात. न दिसलेल्या गोष्टी दिसायला लागतात. समोर असुनही अदृश्य वाटणार्‍या अनेक गोष्टी अचानक प्रकट झाल्यासारख्या वाटतात.                       

                थोड्याशा औपचारीक परीचयानंतर आम्ही15-20 जण गाईडच्या मागे जात होतो. त्याच नाव जॉन होतं. जमिनीच्या सपाटीवरून खाली उतरणार्‍या 70 - 80 पायर्‍या आम्हाला जमिनीच्या पोटात 50 फूट खोल घेऊन गेल्या. जॉनच्या हातात भले मोठे प्रखर टॉर्चेस्  होते. त्यातील दोन टॉर्च त्याने आमच्यापैकी काहींच्या हातात दिले. बाहेर सकाळचे 11 वाजले असले तरी इथे बर्‍यापैकी अंधार असावा. उजेडाकडून अंधाराकडे जातांनाही काही वेगळ्याच गोष्टींवर प्रकाश पडतो. माझ्या मनात विचार आला आणि जॉनचे दात त्या बॅटरीच्या उजेडात चमचम चमकले. खर तर तो कमीच दिसत होता त्याचे फक्त दातच दिसत होते. मला तो अदृष्य जादुगारासारखा वाटत होता. गुहेमधे त्याचा पांढरा शर्ट आणि त्याच्या दातांव्यतिरिक्त तो दिसतच नव्हता.

`` आता आपण अशा जागी आहोत जेथे आपल्या डोक्यावर समुद्र आहे. आणि आपण ज्या जमिनीवर उभे आहोत त्या जमिनीखालीहि समुद्र आहे. मॉरिशस बेट लाव्हापासून झालं असलं तरी हे बेट बर्‍याच अंशी प्रवाळाचं आहे. हे वरचे, म्हणजे आपल्या डोक्यावर दिसणारे दगड जाळीदार आहेत त्यातून पाणी अभिषेक केल्यासारखं अनेक जागांमधून झिरपत राहतं. ह्या झिरपणार्‍या पाण्यासोबत क्षारही खाली येतात. जेंव्हा हे झिरपणं मंद मंदपणे होत राहतं, तेंव्हा त्याच्या सोबत येणारे क्षार हळु हळु तेथे साठत जातात. कॅलशियम कार्बोनेटचे एकावर एक साठणारे हे कण काही हजार वर्षांनंतर वरतून लोंबणार्‍या खांबांसारखे दिसतात. हे झिरपणारं पाणी थेंब थेंब खाली एकाच जागेवर पडून खाली शिवलिंगासारखे आकार तयार होतात. छतातून लोंबणारे खांब हे जास्त लांबीचे होते.

                आम्ही गुहेत प्रवेश केला आणि वेगळ्याच विश्वात आलो. धबधब्याचा किंवा झाडांवरचा बर्फ वितळता वितळता परत  थंडीने गोठून जावा अशा आयसिकल्स सारखे खांब वरून लोंबत होते. अंधारात लपून बसलेली निसर्गाची किमया आम्ही प्रकाशझोत टाकून पहात होतो. निसर्गाने बनवलेल्या वेगवेगळ्या आकारात आम्ही आमचे ओळखीचे आकार शोधत होतो. फोटोंचे फ्लॅश झळकत होते आणि प्रत्येक फ्लॅश सोबत जॉनचे चमचम चांदण्यांचे दात. ``सावकाश! खाली पाण्यामुळे घसरडं झालं आहे. शेवाळही आहे.'' अधुन मधुन अंगावरही  पाण्याचे थेंब टपकत होते. गुहेच्या भिंतींवरून पाझरणार्‍या पाण्याने भींतींवरही क्षार साठण्याने सुरेख नक्षी तयार झाली होती. वेरुळमधे कोरलेल्या चित्रांसारखी भिंत सजली होती. ही लेणी मात्र निसर्गाने कोरली होती. चितारली होती. त्या निसर्गाच्या कलेत कोणाला चर्चिलचा चेहरा दिसत होता तर कोणाला लेडी डायनाचा. मावळतीवर ढगांच्या चित्रनगरीत विविध आकार  शोधत रहावेत किंवा रुद्राक्षाच्या वळ्यांवळ्यांवर असलेल्या नक्षीत कुठेतरी ॐ, त्रिशूळ, शंख शोधावेत तसे त्या भींतींवर आणि आजु बाजूला आम्ही मनातले आकार भितींवरील चित्रकलेशी जोडून पहात होतो. वारंवार युरेक्का युरेक्का ओरडत होतो.

मातीसी नच कोंब हे फुटति की , माठा घटांचे कधी

कुंभारा मनि कल्पना उपजवी, आकार सृष्टी नवी।।

त्याप्रमाणे पाश्चिमात्यांना त्यांच्या ओळखीचे चेहरे तेथे भेटत होते तर मला आपल्याकडचे शिव, विष्णू, लक्ष्मी, गांधीजी असे. जैसा ज्याचा भाव तैसा त्याचा देव. शिवलिंग आणि त्यांच्यावर नैसर्गिक होत असलेला अभिषेक आपल्या भारतीयांनी पाहिला असता तर लगेच गुहेबाहेर बेल, फुलांची दुकानं लागली असती. आणि दुधाच्या घागरी रित्या झाल्या असत्या. Stalactites आणि  stalagmites  चं ते अद्भुत दर्शन आश्चर्यकारक होतं. एका क्षणी वरतून लोंबणारे stalactites आणि जमिनीवर उगवलेले ते stalagmites आणि त्याच्या मधून चालतांना मला आपण मगरीच्या तोंडात प्रवेश केल्यासारखं वाटत होतं. खाली बसून एका सुंदर शिवलिंगाला मी हात लावून पाहिला. ते गायीच्या नाकासारखं गार गार होतं. मी जॉनला त्याचं कारण विचारलंजॉन म्हणाला ज्या स्टॅलॅग्माईटची तयार होण्याची प्रक्रिया सुरू असते तो गार असतो. तो गार नसेल तर त्याची तयार होण्याची प्रक्रिया संपली. सारे खाली वाकून प्रत्येक शिवलिंगाला गोंजारायला लागले. परत एकदा ``अरे हा गार आहे'' , ``हा पण!''  ``अरे हा नाहीए'', ``पाहु पाहु!'' `` खरच की'' `` मि. जॉन बघा बघा हा स्टॅलॅग्माईट डेड आहे का?'' अशी धमाल उडाली. अर्थात हा संवाद असा चालू असावा असा माझा नुसता तर्क आहे. कारण बहुधा रॉड्रिग्जला येणारे प्रवासी हे `रीयाँ ' (Re Union) किंवा सेशल ह्या चिमुकल्या बेटांवरचेच असतात. त्यांच्या फ्रेंच किंवा क्रेऑल बोलण्याचे त्यांचे चेहरे वाचून केलेलं हे मुक्त भाषांतर आहे.

 

 ``आता आपण ह्या गुहेच्या बरोबर अर्ध्या अंतरावर आलो आहोत. आपण सगळेजणं आपले टॉर्चेस अर्ध्या मिनिटासाठी बंद करू या.'' जॉनच्या सांगण्याप्रमाणे सर्वांनी दिवे बंद केले. इतकावेळ प्रकाशाने उजळून निघालेल्या त्या गुहेत भीषण अंधार झाला. जवळचा माणूसही दिसणार नाही असा अंधार. सगळ्यांचा किलबिलाट एका क्षणात एकदम बंद झाला. इतका काळा अंधार कधीच पाहिला नव्हता. वीऽऽऽ!! तेवढ्यात कोणाचा तरी पाय सटकला. प्रकाशाने डोळ्यांची आणि विवेकाने माणसाची साथ सोडली तर अशा महाअंधारात चाचपडत ठेचकाळणं  क्रमप्राप्तच होतं. आपल्याकडे अज्ञानाला अंधार का म्हणतात ते एका सेंकंदात उमगलं.  ``आता तुम्हाला माझे चमकणारे दातही दिसणार नाहीत.'' डोळ्यात बोट गेलं तरी दिसणार नाही अशा अंधारातून जॉनचा हसरा आवाज आला. आणि सगळ्यांची भीती हसण्यात परिवर्तित झाली. जॉनच्या दातांच्या चमचमत्या चांदण्या अंधारात अदृश्य झाल्या होत्या. ``येथे येण्यासाठी सरकारी परवांनगीचं पत्र लागतं. तुम्ही गाईडशिवाय जाऊ शकत नाही. पहिल्यांदा काहीजणं येथे आले आणि आत हिंडण्याच्या नादात त्यांच्या टॉर्चेस्चे सेल संपले. ते येथून बाहेरच पडू शकले नाहीत.''  आत्तापर्यंत जॉनच्या सांगण्याची वाट न पाहता सर्वांनी आपापले टॉर्चेस लावले होते. ह्या गुहेत अजून एक रस्ता दिसत होता. ``तो रस्ता कुठे जातो''?  ``सरळ समुद्रात.'' येथून जे जे गेले ते परत आलेच नाहीत. ही गुहाही सरळ समुद्रात मिळते पण आपण इतकच पुढे जाऊन परत येऊ या. त्याच्या उत्साहाच्या तालावर आमचीही पावलं पडत होती. ह्या अशा एकमेकांना जोडलेल्या अकरा गुहा आहेत. ही एकच गुहा प्रवाशांसाठी खुली आहे. कॉमेर्‍याचे सेल संपेर्पंत प्रत्येकाने फोटो काढले होते.

                बाहेर आलो तर दुसर्‍या ग्रुपचा गाईड माझ्याकडे आला. ``काल तुम्ही एकट्याच बसने हॉटेल एबनीला गेला होता ना?''  छोट्याशा बेटावर सगळे एकमेकांना परिचित होते. नवीन माणसाचा वावर लगेचच टिपला जात होता. ह्याच कारणामुळे येथे गुन्ह्यांचं प्रमाणही असल्या नसल्यातच जमा होतं.

           ``उद्या मी कोकोचे बेटावर जाणार आहे एक ग्रुप घेऊन. तुम्ही येणार का? खूप पक्षी आहेत तेथे. बोटीवर बार्बेक्यू आणि ताजे ताजे मासे भाजून आम्ही देतो.'' ``किती वाजता निघणार?'' ``सकाळी नऊला निघुया आणि 7-7.30 वाजेपर्यंत परत येऊया.'' जायची वेळ मला जमणार होती पण संध्याकाळी प्रवीण आणि त्याच्या डेलिगेशन बरोबर हे चिमुकलं बेट पहायला जायचं होतं. प्रवीण हा भारतीय पोलीस सेवेतील (IPS)असल्याचे कळल्यावर तेथील पोलीस दलाने प्रवीणला शोफरड्रिव्हन स्वतंत्र गाडी दिली. पोलीस ही एक स्थानिक संस्था नसून सर्वच देशांच्या सीमा ओलांडून जाणारं एक विशाल कुटुंब आहेभारतातच नव्हे भारताबाहेरही हा अनुभव आम्हाला वारंवार दिलासा देऊन गेला.

                         ड्रायव्हर बरोबर होणार्‍या वार्तालापातून कळलं की रॉड्रिग्जमधील लोकांना भारतीय हिंदी सिनेमे फार आवडतात. रॉड्रिग्जमधे दर गुरुवारी टि.व्ही. वर दुपारी तीन वाजता भारतीय हिंदी सिनेमा दाखवला जाई. हिंदी सिनेमाच्या दिवशी सर्व अ‍ॅफिसेस् दुपारी दोन वाजताच सुटत. तीस वर्षांपूर्वी आपल्या कडील टि.व्हीवर महाऽऽऽभाऽऽरत अशी लकेर घुमली की सगळे रस्ते जसे सामसुम होत, तसे दर गुरुवारी दुपारी रॉड्रिग्ज मधले रस्ते सामसुम होतात हे ऐकून आमचं कुतुहल अजुनच वाढलं. ``येथील लोकांना हिंदी कळतं का?'' ``नाही कळत पण खाली सबटायटल्स येतात ना.'' `` एवढे हिंदी सिनेमेच का आवडतात?'' - मी ``आम्हाला हिंदी सिनेमाचा शेवट फार आवडतो. बहुतेक सिनेमे सुखान्त असतात.''

                      ``येथे भारतातर्फे एक धरण बांधत आहेत. त्याचे मुख्यही भारतीयच आहेत. तुम्हाला त्यांना भेटायला आवडेल का?'' ड्रायव्हरच्या प्रश्नाला आम्ही लगेच होकार देऊन टाकला. रॉड्रिग्ज पर्यंत भारतीय पर्यटक अभावानेच पोचत असले तरी तेथे पोचल्यावर हा एक सुखद अनुभव होता . रॉड्रिग्जमधे त्यांचं पहिलं धरण बांधून देणारे भारतीय अभियंता भेटले तेथे धरण बांधायच्या निमित्ताने ते कित्येक वर्ष तेथेच राहत होते. त्याने हाती घेतलेले बांधकामही जवळजवळ पूर्ण झाले होते.

           रस्त्याने जातांना ठिकठिकाणी लोकांना बसायला, एकत्र यायला, एखादा कार्यक्रम करायला छान, टुमदार जागा किंवा हॉल बांधलेले दिसत होते. जागोजागी सुसज्ज हॉस्पिटल्सही दिसत होती. भरपूर वार्‍याचा उपयोग करून घेऊन पवनचक्या फिरत होत्या. थोड्याशा सखल प्रदेशातून जात असतांना ड्रायव्हरने त्यावेळेला (26 डिसेंबर 2004 ) नुकत्याच येऊन गेलेल्या त्सुनामीची आम्हाला आठवण करून दिली. `त्यावेळेला आमच्या येथेही मोठ्या मोठ्या लाटा आल्या होत्या. ह्या ह्या इथल्या रस्त्यावर पाणी आलं होतं. त्या सोबत मोठे मोठे मासे येथे येउन पडले होते.'

 

                   तेथील फायर सर्व्हिसेसचे मुख्य प्रवीणला भेटल्यावर त्यांनी अभिमानाने त्यांचे सर्व ट्रेनिंग आणि B.E. in Fire services ही डिग्री नागपूरच्या फायर सर्व्हिसेस कॉलेजमधून पूर्ण केल्याचे मोठ्या अभिमानाने सांगितले. त्यांच्या अ‍ॅफिसमधे लावलेला तेथील ग्रॅज्युएशनचा फोटोही अत्यंत उत्साहाने आणि कौतुकाने दाखविला. अतिदूर असलेल्या 140 देशातील लोकांना भारत त्यांच कौशल्य वाढविण्यासाठी गेल्या 50 हून अधिक वर्ष Indian Technical and Economic Coopretion (ITEC) द्वारे करत असलेल्या मदतीबद्दल त्यावेळेला सार्थ अभिमान वाटला. ह्या माध्यमातून आपल्याला मॉरिशसला मदत करता आली ह्याचाही आनंद झाला. अशा अनेक मिनिस्ट्रीजमधे भारत आपले पैसे खर्च करून भारतीय तज्ज्ञांच्या रूपाने अन्य देशांना  भरघोस मदत करत आहे.

                     प्रवीण Jean Claude Pierrre Louis - Island Chief Executive (चीफ सेक्रेटरी) ना भेटायला गेला असता तेथील अनुभव सांगत होता. Island Chief Executive च्या ऑफिसात कामानिमित्त येणार्‍या प्रत्येकाला तेथे कामाला असलेल्या बायका नम्रपणे आणि हसतमुखाने बसायची विनंती करून चहा पाणी देत होत्या.

              आम्ही बेटावर आलो तेंव्हा नेमकी आमावस्या किंवा आमावस्येच्या जवळची तिथी होती. रात्री जेऊन आम्ही जरा पाय मोकळे करून यावेत म्हणून हॉटेलबाहेर पडलो. बाहेर मिट्ट काळोख होता. पायाखालचा रस्ताही दिसणार नाही इतका. आवाजाची जराही गाज नसलेला समुद्र आमच्याशी आंधळी कोशिंबीर खेळतांना आमच्या डोळ्यांवर अंधाराची पट्टी बाधून कुठल्यातरी दिशांमागे लपला होता जणुआम्ही अजून थोडं पुढे आलो आणि लक्षात आलं देवाजीनी आमच्या डोक्यावर चांदण्यांचं छत्र उघडून धरलं होतं. आकाशात लाखो लाखो  तारे चमचमत होते. कुठे बिन तार्‍यांची इवलीशी सुद्धा जागा दिसत नव्हती. आकाशगंगा लांबवर पसरली होती. इतकंच नाही तर जिथे जिथे पाणी तिथे तिथे चांदणी. खाली वर हा भेदही संपून गेला होता. सभोवार चांदण्यांचं साम्राज्य पसरल होतं.  आपल्याभोवतीची मोकळी जागा आक्रसली जाऊन सर्व जागा चांदण्यांनी व्यापण्याचा तो अनुभव अशक्य, आणि तरीही थोडासा गुदमरवून टाकणारा होता. अर्जुनाने विश्वरूप दर्शानाच्या भीतीने डोळे मिटल्यावर त्याला स्वतःच्या आतही तेच विश्वरूप दिसायला लागले. त्याप्रमाणे वर खाली, बाजूला चांदण्याच चांदण्या पाहून आकाश कुठलं आणि समुद्र कुठला हेच कळेनासं झालं.

           ढग, वारा, वादळ, पाऊस हे सर्व वातावरणात एका उंचीपर्यंतच असतात. 30 हजार फूटावर हे सर्व संपून जातातह्या उंचीवर विमानाला कुठलाच अडथळा रहात नाही. प्रवाशांना वेगाची जाणीवही होत नाही. जाणीव असते ती घर्षणाची संघर्षाची. निसर्गाचे हे अनाकलनीय अनुभव आपल्याला असेच खूप खूप वरती घेऊन जातात; जिथे तू तू मी मी, कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ वादविवाद यांचे सारे ढग, वादळ, वारे खालीच राहून जातात. मनात उरते एक चिरंतन शांती किंवा अद्भुत आनंद. अशा अढळपदांवरून सहजा सहजी तुम्ही खाली येत नाही. मग बारीकसारीक कुरबुरींच्या जळमटांची काय कथा?

                  अशी ही शांत निवांत, प्रदूषणमुक्त जागा पाहूनच तेथील आकाशाचा अभ्यास करायला, समुद्रातून ग्रहणाचा अभ्यास करायला हवामान खात्याने माऊंट ल्युबिन येथे दोन मजली वेधशाळा उभारली आहे. तेथील टेरेसवर दोन टेलिस्कोप विराजमान होते. तेथूनच हवामानावर सतत लक्ष ठेवलं जातं. ग्रहणांचा अभ्यास केला जातो. ग्रहणाची पर्वणी साधून अनेक देशातील खगोल-शास्त्रज्ञ येथे येतात असे तेथील वेधशाळा-प्रमुख सांगत होते. प्रवीणमुळे ही वेधशाळा पहायला मिळाली.

                  जाता जाता ड्रायव्हरने विषय काढला. भारताने मॉरिशसच्या मुलामुलींसाठी भारतातील विद्यापीठात अनेक स्कॉलरशिप्स ठेवल्या आहेत. त्याच्या मुलाचा भारतात शिक्षणासाठी निवड समितीकडून इंटरव्ह्यू झाला होता. प्रवीणने भारतीय अॅम्बॅसिडरला शब्द टाकला तर त्याच्या मुलाला नक्की स्कॉलरशिप मिळेल. असे तो आवर्जून सांगत होता. ज्याप्रमाणे भारतीयांना अमेरिकन युनिव्हर्सिटीजच अप्रूप असतं तसं रॉड्रिग्जच्या लोकांना भारतीय युनिव्हर्सिटीजचं अप्रूप वाटतं हे पाहून मूठभर मांस वाढल्यासारखं वाटलं. आपण शिकलेल्या कॉलेज आणि युनिव्हर्सिटीचा अभिमान वाटून गेला.

              परत जायची वेळ झाली होती. आम्ही मॉरिशसला परत निघालो होतो. अठरा किलोमिटर लांबीच्या आणि साडेसहा कि.मी. रुंदीच्या एका टिकली एवढ्या  बेटावर पाहिलेलं, अनुभवलेलं, मोरपंखी समुद्राचं विराट स्वप्न मी कायमचं माझ्याबरोबर घेऊन चालले होते. पायाखालची जमीन जेवढी आक्रसत जावी तेवढा क्षितीजरेखेचा परीघ जास्तच प्रदीर्घ गोलाकार आणि सुस्पष्ट होत जातो नजर जास्त दूरवर पहायला लागते, समुद्राची व्याप्ती नजरेत मावेनाशी होते. समोर पसरलेली स्वप्न जास्त विशाल होत जातात. आकाशाचा तुकडा विस्तीर्ण घुमटाच्या रुपात साकार होतो. आकाशापलिकडे खुणावायला लागतो. तो चमकदार मोरपिसारा उलगडून बसलेला मोरपंखी समुद्र मनातून हलत नव्हता. श्री आदि शंकराचार्यांच्या शिवानंदलहरी स्तोत्रात दक्षिण भारतातील अंकोल नावाच्या झाडाचा उल्लेख आहे.

देठातून सुटे परीच चिकटे अंकोल वृक्षास बी

तैसे चित्त अनन्यभाव धरुनी विश्वेश्वरा आठवी

( मराठी अनुवाद)

फेब्रुवारी मार्चमधे फुलं येणार्‍या ह्या अंकोल वृक्षाची फळं मार्च एप्रिलच्या सुरवातीस पिकून जमिनीवर पडतात. किड्या मुंग्यांनी गर खाऊन बिया जमिनीवर विखुरतात. एप्रिलच्या अखेरी अखेरीस येणार्‍या पहिल्या वादळवारा पावसाच्या रात्री ह्या सर्व बिया अंकोलाच्या बुंध्याला जाऊन चिकटतात.त्याच्या पायाशीच रुजतात. माझंही तसचं झालं होतं. विमानातून मॉरिशसला परत फिरतांनाही माझं मन त्या विराट मोरपंखी स्वप्नालाच चिकटून राहिलं होतं.

----------------------------------------------
 ( पुढचे प्रकरण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. ) 

खाली  दिलेल्या प्रकरणाच्या नंबरवर क्लिक केल्यास ते प्रकरण उघडेल

 0  1   3  4  5  6  7  8  9  10   11 

12  13  14  15  16  17  18  19  20  21.

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

भौमासुर / नरकासुर वध –

रामायण Express- ची माहिती