3 घराच्या शोधात –
3 घराच्या शोधात –
कमल अवतार
घर शोधायच काम आमच आम्हालाच करायच होतं. क्वात्रबोर्नला घर असण्यात एक फायदा हा होता की सर्व मॉरिशस जास्तीत जास्त दोन अडिच तासाच्या अंतरावर उपलब्ध होतं. कुठेही पोचणं सहज शक्य होत. दुसरं म्हणजे भारतीय लोकं ह्या भागात जास्त प्रमाणात होते. नवीन देश, न समजणारी भाषा आणि 15 दिवसाची मुदत हे सर्व लक्षात घेउन प्रवीणनी आल्या आल्याच इस्टेट एजंट `कमल अवातो'च्या मदतीने घर शोधायला सुरवात केली होती. अवातो च्या स्पेलिंग वरून लक्षात आलं की भारतीय “कमल अवतार” ह्या नावाची ही मॉरिशियन आवृत्ती आहे. फ्रेंच मधे शेवटच्या र चा उच्चार करत नाहीत. अवातोपाशी उच्चार संपतो. फ्रेंच भाषेत र चा जीभेनी उच्चार न करता घशातून करतात. असा र जड जीभेनी अ म्हटल्या सारखा वाटतो. आणि मग राम किशन चा आमकिसून होतो. रोझ हिल ची ओझ हिल होते . curepipe चा उच्चार क्युअरपाईप न होता
क्युपिप असा होतो. ह्या गमतीत नंतर कितीतरी शब्दांची भर पडत गेली. एकदा भारतातून आलेल्या प्रा. नवलगुंदकर यांच्या भाषणासाठी गेलो होतो. Black River हा मॉरिशसमधील मराठी वस्ती असलेला भाग. Mrs. घोष ह्या तेथील डेप्युटी मेयर बाई. आणि president of Black River
Council. घोषबाई नवलगुंदकर या स्पेलिंगनुसार त्यांच्या आडनावाचा फ्रेंचमधे उच्चार करतांना वारंवार मिस्टर नवलगुंडा म्हणून त्यांना संबोधत होत्या. फ्रेंच स्टाईलने नवलगुंडा म्हणल्यावर स्वाभाविकपणे तोंडाचा वासलेला आ बराच काळ तसाच रहात होता आणि त्यांच्या ह्या गडबडगुंड्याने मला हसु आवरता आवरत नव्हतं. मूळचे भारतीय असलेले शब्द काळाच्या, इतर भाषांच्या आणि आजूबाजूच्या वातावरणाच्या अमलातून आणि फ्रेंच गोमुखातून बाहेर पडतांना भलतीच गम्मत घडवत होते.
मी मॉरीशसला पोचण्यापूर्वीच, प्रवीणने अवातो च्या मदतीने 2-4 घर निवडून ठेवली. एखाद्या लग्नेच्छुला पाहिलेली प्रत्येक मुलगी आवडावी तसं प्रत्येक घर मला आवडत होतं. सगळीच घर छान होती. ती का नाकारावीत ह्याला काही कारण नव्हतं. पण एकाच घरात रहायचं होत. एकच घर निवडण भाग होत. चार दिवसातच हॉटेलच्या कृत्रिम आगत्यासोबत येणार्या व्यवहारी कोरडेपणाने हॉटेलमधे रहाणं नको नको वाटायला लागलं होतं. हॉटेल सोडून कधी घरी रहायला येतो असं वाटत होतं. अनेकांनी सांगितलं की येथील लोक भारतीयांना ज्या सहजपणे घर भाड्याने देतात त्या सहजपणे साऊथ अफ्रिकन लोकांना देत नाहीत. भारतीय लोक पैसे वेळेवर देतात, जागा चांगली ठेवतात आणि दारुबिरु पिऊन फार गोंधळ घालत नाहीत. साऊथ अफ्रिकन लोकांनी घरातल्या सर्व फर्निचर आणि फिटिंग्जसह पोबारा केल्याची अनेक उदाहणं सांगत. आम्ही मिया बीबी दोघच असल्यानी बंगला या संकल्पनेपेक्षा फ्लॅट हा प्रकार सोईचा वाटत होता. मॉरिशसमधे सुंदर सुंदर बंगले उपलब्ध असले आणि ते सहज भाड्याने मिळण्यासारखे असले तरी एक अंदरकी बात होती. घर कितीही मोठ्ठ असलं तरी बहुतेक हिंदूच्या घराला एकच Toilet असे. बहुधा ते घराच्या बाहेर अंगणात किंवा घराच्या सर्वात सुदूर कोपर्यात वसवलेले असे. घर कितीही मोठं असलं तरी बेडरूमला अटॅच्ड टॉयलेट ही पद्धत अजूनही तिकडच्या भारतीय मनांना भावलेली नाही. ( हेही जुन्या भारतीय घरांच्या रचनेशी कुठेतरी साधर्म्य ठेऊन होतं. ) आम्ही एका कोपर्यावरच्या घरात पहिल्या मजल्यावरचा फ्लॅट निवडला. फ्लॅट टुमदार छान होता. तो आवडायचं अजून एक कारण होतं. ह्या तीन मजली इमारतीत नऊ फ्लॅटस् होते. त्यातील सहा प्लॅट्स साठी एक जिना होता तर कडेच्या तीन फ्लॅटस् वेगळा प्रवेश मार्ग होता ग्राऊंड फ्लॅटला समोरूनच प्रवेशदार होतं. पण वरच्या दोन फ्लॅट्ससाठी कडेनी वेगळा जिना होता. त्यातील आमच्या डोक्यावर रहाणारे मॉरिशन मराठी गानू कुटुंबातील अंजली या मुलीसाठी घेतलेला फ्लॅट ती लंडनला रहात असल्यानी रिकामाच होता. पर्यायानी आम्हाला एक स्वतंत्र जिना मिळाला. डोक्यावर मिरे वाटायलाही कोणी नाही. आणि हा जिना सरळ वरच्या टेरेस पर्यंत होता. रात्री अपरात्री आकाश निरीक्षणाला तर दिवसा पक्षी निरीक्षणाला ही टेरेस मला आवडून गेली. इमारतीतले बाकी
कोणी येत नसत. दोन वर्ष ही टेरेस बाय डिफॉल्ट आम्हालाच मिळाल्यासारखी आम्ही वापरत होतो. आम्ही इथे
केंव्हाही येऊन मनमुराद आकाशाची मजा घेत असू. आमची अमेरिकेहून आलेली अवघे पाऊणशे वयमान मैत्रीण
आमच्या घराच्या मागे असलेल्या को-दे-गार्ड डोंगराच्या इतकी प्रेमात पडली की चक्क तिची
कलरबॉक्स घेऊन सकाळीच टेरेसवर जाऊन बसली. तासभर त्या डोंगराचं
चित्र रेखाटत बसली. तेथील जोरदार हवेनी तिचा कागद दोनतिनदा उडवून
दिला. पण तिने आपल्या चित्राच्या स्टँडला कागद लावून चित्र पूर्ण
केलं.
उल्कापाताचा देश - Mauritius
is land of meteorite
fall.
आमच्या भारतीय परिवारांना चांदण्या
रात्री कॉफी घेत गप्पा मारत बसायलाही
ही मस्त जागा होती. हवेत धूळ आणि
प्रदूषण नावालाही नव्हतं. उजेडाचंही नाही. आकाशभर
चांदण्यांची पोतीच्या पोती ओतल्यासारख्या चांदण्या ओतल्या होत्या. आकाशाच्या कढईत
रोज बहुधा ज्वारीच्या लाह्या भाजण्याचा कार्यक्रम होत असावा. रोज आकाशगंगेची
सफर आणि नक्षत्रांची उधळण बघत डोळे दिपून जात. खरोखरच नदीप्रमाणे वहाणार्या या आकाशगंगेत अजूनही
गोलगोल आकाराच्या आकाशगंगा दिसत.
चांदण्यांच्या मांडवाखाली बसून चांदण्या
निरखता निरखता पटकन् एखादी चमचमणारी उल्का विद्युत् वेगाने हवेतून खाली येतांना दिसे. एका बैठकीत बघता बघता दोन चार तारे तरी आपली जागा सोडून खाली झेपावतांना दिसत. ही गम्मत नवीनच
होती. एस्ट्रॉनॉमीची
माहिती नव्हती. जे दिसत होतं ते मात्र जमेल तितकं डोळ्यात साठवून ठेवत होतो. . आमच्या मॉरिशसच्या मित्रानी विशालनी सांगितलं–Mauritius is
land of meteorite fall. इथे कायमच उल्का पडतात. म्हणजे सकाळी इंद्रधनुचा
असलेला हा देश रात्री उल्कापातासाठीही प्रसिद्ध आहे.
सुदक्षिणा-
मॉरिशसमधे सुदक्षिणेचा
प्रथमच परिचय झाला. दिक्षणदिशा! सुदक्षिणा! सगळ्यांपेक्षा उजवी! लोकांनी तिला
मृत्यूची दिशा, यमाची दिशा म्हणून बदनाम केलं असलं तरी तिचं अद्भुत सौदर्य पहायला मिळणं मोठं
भाग्याचच! विषुववृत्ताच्या
दक्षिणेला किमान सहा अंश खाली गेल्या शिवाय तिची खरोखरची भेटच होत नाही. मॉरिशस
विषुववृत्ताच्या खाली दक्षिणेला वीस अंशावर असल्यानी ती मला भेटणार होती. कुठे कशी हे
मला माहित नव्हतं. भारत सोडतांनाच उत्तरेनी विषुववृत्तावर
अर्ध्या आकाशात रजा घेतली. उत्तरेचा हात हातातून सुटला होता. नेहमी उत्तरेला
दिसणार्या सप्तर्षिंच्या पतंगाच्या
शेपटीचे शेवटचे दोन तारेच कसेबसे क्षितीजाला टेकलेले दिसत असत. उत्तरेला ठळकपणे दिसणार्या इंग्रजी M किंवा इंग्रजी W च्या आकाराच्या शर्मिष्ठा नक्षत्रानेही येथे रजा घेतली होती. आम्ही
मॉरीशसमधे असेपर्यंत ध्रुवतारा तर दोन वर्षांच्या लाँग लिव्ह वर गेला होता. सुदक्षिणेनी माझा हात इतका अलगद धरला की तिचा
स्पर्श जाणवलाच नाही.
भारतात कायम
दक्षिण क्षितिजावर ररेंगाळणाऱया वृश्चिक राशीनी इथे ठळकपणे दक्षिण आकाशात एन्ट्री
घेतली होती. भारतात नेहमी दक्षिण क्षितीजावर असलेली ही
सर्वात मोठी रास इथे कितीतरी वरती सरकली होती. मान उंचावून बघायला लागत होती. वृश्चिकाची गोल
वळलेली बाकदार नांगी चमचमत होती. तिच्यातला सर्वात सुंदर ज्येष्ठाचा तारा
तेजानी सर्वांपेक्षा ज्येष्ठ असल्याची जाणीव करून देत होता. आणि अचानक
लक्षात आलं की ह्या वृश्चिक राशीच्या खाली कधी न दिसलेलं दक्षिणसौंदर्य - -तीन तीन
सॉलितायर (Solitary) डायमंडस्! ठळक हिरे! दक्षिणेच्या
गळ्यात असलेला हार , - - रत्नजडित अमूल्य
कंठा मी प्रथमच बघत होते. डायमंड क्रॉस, सदर्न क्रॉस आणि फॉल्स क्रॉस. सदर्न क्रॉस (crux) दाखवणारे अल्फा आणि बीटा हे पॉईंटर स्टार्स. सुदक्षिणेचं हे सौंदर्य पहायला पृथ्वीच्या
दक्षिण गोलार्धातच यायला लागतं. इतके दिवस ऑस्ट्रेलिया , न्युझिलंड, सामोआ, पापुआ, न्युगिनिआ यांच्या
ध्वजांवरच दिसणारा सदर्न क्रॉस मी प्रत्यक्ष बघत होते. बाहेरची थंडी
बोचरं वारं सगळं सगळं विसरायला झालं. आत्तापर्यंत दक्षिणेनी अलगद धरलेला हात
जाणवलाच नव्हता. किंचित हसून तिनी हातात धरलेला माझा हात जरासा दाबला. आणि माझ्या
समोर हिर्या माणकांनी
मढलेली सुदक्षिणा पाहून मी हरखूनच गेले. तिचा हात घट्ट धरत मी म्हटलं -“आज पासून तुझी माझी मैत्री!” आम्ही
टेरेस वरून खाली आलो तरी डोळ्यासमोरून दक्षिणेची गर्भश्रीमंती हलत नव्हती. सहज घराच्या बाल्कनीचा
दरवाजा उघडला आणि हिरयांचा कंठा घातलेली सुदक्षिणा समोरच हसत उभी होती. घराचा दरवाजा
दक्षिणेला आहे म्हणून भयभीत होऊन मंत्रतंत्र करणाऱयाची खूप कीव आली. मॉरिशसच्या दोन
वर्षांच्या वास्तव्यात सुदक्षिणेला भेटल्यावाचून माझा एकही दिवस गेला नाही.
मॉरिशस रेडिओ टेलिस्कोप (MRT)
मॉरिशसचं दक्षिण गोलार्धातील मोक्याचं स्थान दक्षिण गोलार्धाच्या आकाशाच्या निरिक्षणासाठी, अभ्यासासाठी अत्यंत सुयोग्य उपयुक्त आहे हे हेरून मॉरिशस
विद्यापीठ ,
Indian
Institute of Astrophysics (IIA), आणि Raman Research
Institute ह्या सर्वांच्या सहकार्यातून तेथे मॉरिशस रेडिओ टेलिस्कोप (MRT) उभारला आहे म्हणण्यापेक्षा दोन कि.मी. लांब
पसरला आहे म्हटलं तर जास्त बरोबर होईल. ह्याला दक्षिणोत्तर पसरायला
आणि ठराविक कोन मिळायला रोशेनॉयर आणि फ्लॅक ह्या दोन गावांच्या मधे असलेलं पक्ष्यांचं
अभयारण्य (forest of Bras d'eau) ही हवी तशी जागाही मिळाली.
येथे असलेलं घनदाट जंगल आणि आमराईने त्याला लोकवस्तीपासून लांब आणि सुरक्षित
ठेवलं होतं.
हा टेलिस्कोप नेहमीच्या
टेलिस्कोप प्रमाणे नाही. आकाशातील रेडिएशन्स गोळा करायची तर दोन कि.मी. व्यासाच्या डिश अँटेनाचि जरूर असते. शिवाय पृथ्वीच्या गतीप्रमाणे अवाढव्य डिशचा कोन सतत फिरता ठेवणंही अवघड.
अशावेळेस डिश अँटेनाचा दोन किमी. चा फक्त व्यास
वापरून हवी ती गोष्ट साध्य करून घेतली आहे. इंग्रजी T च्या आकाराच्या रेडिओ टेलिस्कोपला
गोल गोल वळणं घेणार्या (helical antennas) अँटेना आहेत.
आकाशातून एखाद्या ठिकाणावरून येणार्या रेडिओ लहरीचे विजेच्या सिग्नलमधे रूपांतर केले जाई. वेगवेगळ्या अँटेनांच्या गटांकडून येणारे हे संकेत गाळून घेऊन अॅम्प्लिफाय करून
ते टेलिस्कोपच्या बिल्डिंगकडे पाठवले जातात. तेथे त्यांना डिजिटल
स्वरूपात आणून त्यांच्यावर correlator कोरिलेटर च्या सहाय्याने त्यांना प्रतिमा स्वरूपात आणले जाई.
दूरवर आकाशातून येणारी ही प्रचंड माहिती गोळा करून त्यांच्या प्रतिमांचा
अभ्यास येथे केला जातो.
(Corps The Garde) को-दे-गार्ड.
घराच्या मागे एक सुंदर डोंगर होता. या डोंगराचा आकार खूपच गंमतीदार होता. पुढचे पाय समोर पसरून हत्ती खाली बसल्यासारखा हा डोंगर मला वाटे. डोंगराला एक छोटीशी शेपूटही होती हरणाची असते तशी. ह्या डोंगराचं नाव होतं- को-दे-गार्ड. (Corps The Garde) फ्रेच मधे `को' म्हणजे body of people `गार्ड' म्हणजे रक्षण करणारा, रक्षक! मराठीत सांगायच तर `जनत्राता' म्हणाना. असा हा कणखर रक्षक सतत आमच्या पाठीशी उभा होता. पाहता क्षणी मी या डोंगराच्या प्रेमात पडले.
आश्ले मोक्युडे -
आमचा घरमालक चाळीशीचा असला तरी त्याचा उंच सडसडीत बांधा आणि उत्साहाने फुरफुरणं पाहिलं की तो विशीचाच वाटायचा. त्याच्याकडून मी पहिले दोन फ्रेंच शब्द शिकले. बोंझू ( Good Morning) आणि बों स्वा( Good Evening/ Good night.) ``तुम्ही माझं नाव ऐकल असेल, आश्ले मोक्युडे'. मी इथला उत्तम फुटबॉल प्लेअर आहे. माझ्या नावावर असलेलं गोलच रेकॉर्ड अजून कोणी मोडलं नाही.'' थोडक्यात तो तेथील सचिन होता. ''अॅश्ले दर महिन्याच्या पहिल्या रविवारी यायला चुकायचा नाही. त्याच्या व्यवहारीपणाची चुणुक त्याच्या प्रत्येक भेटीत चमकून जाई. एक वर्षाचं घराचं contract
संपत आल्यावर त्याने आम्हाला `I'll re-do the house' म्हणून एक भरभक्कम आश्वासन दिलं. आम्हीही नवीन रंग इ. इ. ची अपेक्षा करत आनंदात असतांना तो एकदिवस त्याच्या स्वतः रहात असलेल्या घराचे जुने पडदे घेऊन आला. हॉलचे पहिले चांगले जुने पडदे काढून त्याचे अजून जुने पडदे लावून गेला. काही दिवसांनी आम्ही त्याला विचारलं की, ``अरे घर re - do करणार होतास ना''? त्याचं उत्तर ऐकून हसून हसून आमची पुरेवाट झाली कारण फ्रेंचमधे किंवा क्रेयॉलमधे पडद्यांनाच re - do म्हणतात आणि ते तर त्याने कधीच बदलले होते.
आम्ही आटोपशीर फ्लॅट घेण्यामागे तो सहजगत्या आपल्याला आवरता यावा आणि तेवढ्यासाठी आपल्याला कोणावर अवलंबून रहायला लागू नये हा मुख्य भागही होताच. येथे कामवाली ठेवायची असेल तर इथले कामगार कल्याणाचे नियम कडक असत. तिला सरकारी नियमाप्रमाणे ठराविक पगार द्यायलाच लागे. संध्याकाळी पाचनंतर काम सांगितले तर over time चे वेगळे पैसे. रविवारी सुट्टीही. सुट्टीच्या दिवशी कामाला बोलवायचे असेल तर त्या दिवसाचे जास्तीचे पैसे, येण्या-जाण्याचे टॅक्सीचे पैसे किंवा तिला गाडीने आणून पोचवावे लागे. प्रत्येक कामाचे वेगवेगळे पैसे असत. मिनिस्ट्रि ऑफ लेबरचे ऑफिसर्स अचानक येऊन घरी पहाणी करत. घरी काम करणार्या बाईला चांगले वागविले जाते किंवा नाही ह्याची तिच्याकडे चौकशी करत. तिच्या उत्तराने त्यांचं समाधान झालं तर ठीक नाहीतर मालकावर सक्त कारवाई होत असे.
Petrol station -
आत्तापर्यंत आमच्याबरोबर आलेले सर्व भारतीय क्वात्रबोर्नच्या आजुबाजुला स्थिरस्थावर झाले होते. तेथील गरजेप्रमाणे प्रत्येकाने गाडीही घेतली होती. घर सुरू करण्यासाठी अग्निहोत्राची गरज होती. गाडी चालू करण्यासाठी लागणारं पेट्रोल आणि घर चालू करण्यासाठी लागणारा गॅस सिलिंडर एकाच पेट्रोलस्टेशनवर/ गॅसस्टेशनवर मिळणार होते. गाडीत पेट्रोल भरायला पेट्रोल स्टेशनवर जायला लागायचे तसे गॅस-सिलिंडर संपला की तो गाडीत घालून पेट्रोलस्टेशनला जायला लागे. जवळच्या कुठल्याही पेट्रोलस्टेशनवर सिलिंडर बदलून मिळे. घरपोच सिलिंडर, दूध, पेपर, धोबी आणि इतर सेवा मिळायचं कौतुक फक्त भारतातच आहे. पेट्रोल स्टेशनवर गाडीत हवा भरणे हे एक दोन वेळेला हवा भरून आम्ही शिकलो. पहिल्याच वेळेला चाकाच्या हवा भरायच्या छोट्या नळीवरचं टोपण काढायला गेले आणि ते चाकाच्या आत पडलं. जवळ पडलेली काडी उचलून मी चाकात अडकलेली कॅप काढायच्या प्रयत्नात. तेवढ्यात पेट्रोल स्टेशनवरचा एक मुलगा जवळ आला आणि म्हणाला, ``गाडी थोडी पुढे न्या बाहेर येईल कॅप.'' प्रवीणने गाडी चालू करून थोडी पुढे नेली आणि centrifugal force ने कॅप पटकन बाहेर पडली. एवढी साधीशी गोष्ट सुचू नये ह्याची गम्मत वाटली. नंतर आमचा मुलगा कणाद त्याच्या मित्रांना घेउन आला होता तेंव्हा त्यालाही गाडीत हवा भरायला शिकवली त्यावेळेला नेमकी त्याच्या हातून कॅप चाकात पडली. मीही त्याला गाडी चालू करायचा उपाय सांगून माझा चतुरपणा दाखवून दिला.
राहण्याचे नियम -
आम्ही आमच्या भारतीय मित्रांकडे जाउन त्यांची घरं पाहून आलो आणि तेही आमच्या घरी येऊन गेले. आमच्यापैकी काहींनी एका फ्रेंच कॉलनीत घरं घेतली होती. माझ्या मैत्रीणीचं घर ग्राउंड फ्लोअरलाच होतं. घराभोवती सुंदर बगिचा होता. पपई, आंबा अशी सुंदर झाडं होती. पपईला आलेल्या बाळ पपया काही दिवसातच पिकून मोठ्या झाल्यावर तिने त्यातील एक पपई तोडली. ही गोष्ट तेथील फ्रेंच मालकिणीला अजिबातच आवडली नाही. दुसर्याच दिवशी तिचा माळी इलेक्ट्रिक करवतीने तेथील पपई, आंबा सर्व मोठी झाडे कापून गेला. थोड्याच दिवसात त्या कॉलनीत अजून एक पंजांबी कुटुंब रहायला आले. त्यांची मुलं 8- 10 वर्षांची असतील. शाळेतून आल्यावर कॉलनीमधे असलेल्या ग्राऊंडवर ती फुटबॉल खेळत. आतमधे वेगाने येणार्या गाड्यांना मुलांच्या खेळाची सवय नव्हती. कारण येथे खेळण्यासाठी बाहेर खरोखरच उत्तम ग्राउंड्स असतात. शिवाय त्यांच्या आवाजाने त्रस्त झालेल्या मालकिणीने इथे फुटबॉल खेळू नका असं सांगितल्यावरही त्यांनी साफ नकार दिल्यावर सर्व फ्रेंच लोकांनी ह्यापुढे ह्या कॉलनीत भारतीयांना जागा द्यायची नाही असा निर्णय घेऊन टाकला. भारतात अनेक अयोग्य गोष्टी आपल्याला नेहमीच्याच झाल्यामुळे योग्य वाटतात. कित्येकवेळेला आपण योग्य गोष्टींची टिंगल टवाळी आणि आपल्या अयोग्य गोष्टींचं हसत हसत समर्थनही करतो. जागतिक स्तरावर योग्य गोष्टींचं पालन न करणं हे दंडनीयच असतं. आपण ह्या ग्लोबल व्हिलेजचा भाग आहोत हे लक्षात घेऊन भारतीयांनीही आपलं वर्तन सुधारलं नाही तर त्याचा त्यांना आणि नियम पाळणार्या इतर भारतीयांनाही फटका बसतोच शिवाय बाहेरच्या देशात भारताचं नावही बदनाम होतं. Do You know this is
Mauritius. This is not India किंवा Hey! You Indian! असं एखाद्यावेळेला आपल्या बांधवांसाठी ऐकलेलं वाक्यही मनात खळबळ माजवून गेलं.
मलेरियाची तपासणी-
मॉरिशसमधे प्रवेश करतांनाच तुम्ही कुठे उतरणार हे विमानतळावरच जाहीर करायला लागतं. तुम्ही कुठल्या हॉटेलमधे उतरणार का तुमच्या मित्र वा नातलगांकडे जाणार ते तिथे गेल्यावर ठरवू असं म्हणून चालणार नाही. एकदा का तो माणूस त्याच्या वास्तव्याच्या जागी टेकला की, भारत, दक्षिण आशिया इत्यादि यादितल्या देशातले तुम्ही असला तर दुसर्याच दिवशी तुमच्या घरी आरोग्य खात्याचा फोन घणघणतो. पाठोपाठ त्यांचा माणूस मलेरियासाठी तुमच्या रक्ताचा नमुना घ्यायला हजर होतो. आम्ही गेल्या गेल्या `कान टोचले सोनारे' नाही तरी `सुई टोचली मॉरिशसने' म्हणायला लागलं. आम्हाला आणि आमच्याकडे आलेल्या प्रत्येक पाहुण्याला हे `रक्तदान' करायला लागलं.
मॉरिशसच्या अंतरंगात -
घर शोध मोहिमेमधे मॉरिशसच्या अंतरंगात शिरायची थोडीशी संधी मिळाली आणि घरं, बंगले बघता बघता जुन्या पुण्याची छवी डोळ्यासमोर तरळून गेली. पुण्याचा डेक्कन परिसर, तेंव्हाचा भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता तेथील बंगले, बंगल्यांभोवती केलेल्या बाग , रसिकतेने लावलेली झाडं त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या.
पुण्यातील डेक्कन परिसर 1930 च्या सुमारास उदयाला आला असावा. पानशेतच्या पुरानंतर 1960-62 च्या सुमारास पुणेकरांनी त्यांचे पैसे पुण्याच्या मातीत पेरायला सुरवात केली आणि बाजीरावरस्ता,पर्वती, डेक्कन प्रभात रस्ता, भांडारकार रस्ता अशा निसर्गरम्य परिसरांमधे रस्याच्या दुतर्फा बंगल्यांच पीक उगवायला सुरवात झाली.70-80 च्या सुमारास बंगल्यांच अमाप पीक उगवलं आणि बघता बघता 90-ते 2000 मधे ते कापणीलाही आलं. जास्त उत्पादन आणि जास्त भाव मिळवून देणार अपार्टमेंट्सचं पीक घेण्यासाठी बिल्डर्सनी बंगल्यांच उच्चाटन केल. बंगल्यांच्या जोडीनी उभी असलेली अनेक सुंदर झाडही जमिनदोस्त झाली. आणि आडवं पसरलेलं पुणं आता उभं तरारून आलं.
मॉरिशस मधील बंगल्यांच पीक मात्र अजूनही टवटवीत होतं. थोड्याफार गगनचुंबी सोडल्या तर 70 साली पुण्यात हिंडतांना जसे दिमाखदार बंगले दिसायचे किंबहुना थोडेसे सरसच बंगले जाता-येता लक्ष वेधून घेत असत. बंगल्याचं आकिर्टेक्चर,त्याची रंगसंगती,पडदे आतला बगीचा,प्राणी, गाड्या माणसं बघत जाता जाता कित्येक किलोमिटर अंतर पाय दुखल्याची जाणीव न होता सुखावहपणे पार होतं असे. इथल्या प्रत्येक घराभोवतीचं कुंपण मात्र खणखणीत असे. कुंपणांचे विविध प्रकार पाहून घ्यावेत. कित्येक कुंपणं तर 10-20 फुटी उंच असल्याने परदानशीन सुंदरींसारखे कित्येक बंगले रोजच्या वाटेवरचे असूनही अज्ञातच राहिले. 10-15 फूट उंच आणि अंगठ्या एवढ्या जाड बांबूंच कुंपण एवढं घनदाट असे की आतला उजेडही बाहेर येऊ नये. तर कधी इथल्याच काळ्या तपकिरी पिवळ्या दगडाची कासवाच्या पाठीसारखी भिंत ढालीसारखी घराची राखण करतांना दिसते. तर कधि सिमेंट ब्लॉकनी बाधलेल्या कुंपणाला वेलीनी आपल्या नख्या रुतवून ते इतकं दाट वेढलेलं असतं की नखाएवढी भिंतही कुठून दिसू नये.
अर्थात एवढं असूनही या अभेद्य कुंपणाची मर्यादा झाडं पानं, फुलं, फळ. पक्षी, प्राणी कोणालाच मान्य नाही. 10-15 फुट कुंपणावरुनही माना वर करून फुलं, कळ्या डोकावत असतात. भारानी झुकलेली केळ आपला भला मोठा केळीचा घड कुंपणाबाहेर काढुन रोज तिच्या बाळाची प्रगती कौतुकानी इतरांना दाखवत असे.(बघणार्याची नजर केळीला लागत नाही हेही विशेष. बाजारात केळी महाग असूनही) आंब्याचा सडा कुंपणाच्या आत बाहेर सांडलेला असे. आंब्यांना हातही लावायचा नाही म्हणजे किती लावयचा नाही, आमच्या समोरच्या घराच्या छतावर आणि खाली पडलेले आंबे त्याचा मालक रोज झाडूने झाडून साफ करत असे. चोर अथवा कुंपण कोणाचीही पर्वा न करता लिचीचे वृक्ष आपली सारी संपत्ती अंगावर मिरवित असत. फणसाच्या अंगाखांद्यावर त्याची गोल मटोल बाळं आईचं बोट धरून लोंबकाळत असत. दारादारात उभा असलेला हा फणस मला जनीच्या लेकुरवाळ्या विठूसारखा भासे. मुलांच्या पराक्रमाने आईबापही प्रसिद्धीच्या झोतात येतात. त्याप्रमाणे झाडांना फुलं फळं आली की ती नजर वेधून घेत. इतरवेळेला अनामिकपणे उभे असलेले वृक्ष फुला फळांमुळे लगेच ओळखीचे होतात. नोव्हेंबर-डिसेंबरमधे लगडलेल्या लिचींनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पांढरा चाफा येणार्या जाणार्यांसाठी फुलांचे गालिचे अंथरत असे. कुणाच्या परवानगीची गरज सुगंधालाही नाही आणि पक्ष्यांनाही नाही. वार्याच बोट धरून बकुळ, चाफा, रातराणीचे सुगंध थेट घरात दाखल होत. तर ह्या झाडावरून त्या झाडावर ह्या बागेतून त्या बागेत लाल चिमण्या ,पिवळ्या सुगरणी, बुलबुल चिमण्या मैना भुरभुरत असत. चिऊताई चिऊताई दार उघड म्हणायला इथे कावळेदादा मात्र नाहीत. बिचार्या कोकीळेची पंचाईत नाही का? तिची बाळं कोण वाढविणार? काऊच्या जोडीने कोकीळाही अदृष्य झाल्या आहेत. आम्र मंजिर्यांचे बाण सज्ज करून येणार्या वसंत योद्ध्याचं
स्वागत करायला कोकीळेचं नसणं म्हणजे रंगमंचावरच्या क्लायमॅक्सच्या वेळी हिरोनी एंट्री घ्यायलाच विसरावं अस काहीसं वाटायच. काही वर्षांपूर्वी मॉरिशसमधे अमेरीकन तज्ञांच्या मदतीने कावळे हटाव मोहीम राबवून कावळ्यांचा आवाज बंद करून टाकला होता. आज पोर्टलुई आणि काही थोड्या ठिकाणी ‘आज मी नवल पाहिले’ म्हणण्या इतपत 1-2 कावळे दिसतात. कबुतरांच्या गतीनी वाढणार्या प्रजेवर नियंत्रण ठेवणं मात्र त्यामुळे अशक्य झालं आहे.
अनेक घरांना electricity चा मिटर , letter-box ची सोय घराच्या कुंपणाच्या भिंतीतच केलेली असे. प्रत्येक घराला किंवा इमारतीला कुंपणाच्या भिंतीलगत बांधलेल्या कचराकुंडीचा एक दरवाजा रस्त्याच्या बाजूने उघडणारा असे. कचरावाला, मिटर रिडिंग घेणारा माणूस, पोस्टमन, यांचंही दर्शन आतल्या माणसाला होत नसे. `अरे माझं पत्र आहे का रे?' त्यावर पोस्टमननं त्याची पत्रांनी गुबगुबीत दिसणार्या झोळीत डोकावत, हातंनी चाळत `बघतो हं! - --हं आहे आहे हं! ' असा संवाद शक्य नव्हता. आता आपल्याकडेही हळु हळु तशाच सुधारणा होत आहेत. तेंव्हा मात्र प्रायव्हसीची ही कल्पना मला जरा उलटी वाटत होती - --म्हणजे आपणच आपल्याला तुरुंगात डांबल्यासारखी! ज्या घरांच्या letter-box बाहेर कुंपणात नसत आणि ज्यांच्याकडे पाळीव कुत्र असे त्यांच्या electricity bill वर Dog अशी नोंद असे. आमची एक भारतीय मैत्रीण मंजू चेट्टी. त्यांच्या घरमालकाकडे कुत्र पाळलेलं असल्याने त्यांना येणार्या बिलावर Dog अशी स्पष्ट नोंद असे.
आता भारताप्रमाणे येथेही प्रत्येक बंगल्यातील मुलं परदेशी गेली आहेत. 12 वी नंतर ऑस्ट्रेलिया, फ्रांस, इंग्लंड, भारत ह्या देशांनी स्कॉलरशिप्सची खैरात केली आहे. भारत सोडून बाकीच्या देशात गेलेली मुलं परत येत नाहीत असा तेथीलही एकंदर कल होत चालला आहे. किंवा भरतात एक पदवी प्राप्त करून पुढच्या शिक्षणाला इंग्लंड फ्रांस मधे जाण्याचा कल तेंव्हा जास्त होता. बहुधा त्यामुळेच बहुतेक मंत्री व अधिकारी भारतातल्याच विविध संस्थांमधे शिकलेले असत.
मॉरिशसची मोकाट कुत्री -
तर सांगायचं काय की इथल्या बंगल्यांच्या कुंपणांच्या आत बंद असतात माणसं, कुत्री आणि गाड्या. मर्सीडिज, रोल्सराईस,बीएम्डब्ल्यू ते फोक्स वॅगन पर्यंत विविधता दाखविणार्या गाड्यांचं प्रदर्शन बंगल्यांमधे माडलेलं असतं. हवेमधे धूळ नामक प्रकार औषधालाही नसल्याने गाड्यांवर साठलेल्या धुळपाटीवर जाताजाता बोटानी रेखाटलेला हृदयाचा बदाम चिरत जाणारा बाण, किंवा त्याचं किंवा तिचं नावं ही कचर्यातून कला ( किंवा कलेचा कचरा) डेव्हलप झालेली दिसली नाही. रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्या ही कायम नव्या सारख्या दिसायच्या. गाड्यांच्या जोडीला अॅप्सो, जर्मन शेफर्ड पासून आपल्याकडल्या लोकल मोत्या वाघ्या पर्यंतचा ब्रॉड स्पेक्ट्रम कुंपणापलिकडून
जिथून बाहेरचा कवडसा तरी दिसेल अशी जागा शोधून भुंकत असे. मॉरिशस मधे संध्याकाळनंतर कुत्र्यांना घराबाहेर काढून द्यायची अजब पद्धत आहे. ही मोकाट कुत्री रात्रभर किंचाळून दमली की पहाटे पाचाच्या नमाजाला मुल्लाच्या सुरात सुर मिसळून ‘मिले सुर मेरा तुम्हारा तो बेसुर बने हमारा’ असं आर्त आवाजात, विव्हळत `गायला' लागली की ‘ऊठा राष्ट्रवीर हो’! म्हणत पांघरूण झटकून उठायला पर्याय नसे.
पहाटे फिरायला म्हणून बाहेर पडलं की, पहिली सलामी शेजारी राहणार्या रामचंद्रन् च्या मोत्याची असे. रामचंद्रन् हा आमचा मॉरिशन शेजारी. त्याचं कुत्र आमच्या दिशेने धावत यायला लागलं की आमची समोरची चिनी शेजारीण आम्हाला ``मोवे मोवे !!!'' असं म्हणत सावध करे. तेंव्हा तिची बेकरीतून पाव आणायची वेळ असे. पहिल्यांदा मला कुत्र्यांचं नावच मोवे आहे असं वाटलं. पण मोवे म्हणजे वेडा. ते कुत्र वेडं आहे अंगावर धावून येतं असं तिला सुचवायचं असे. बिचारं दिवसभर बांधून ठेवलेलं असे आणि रात्री सोडून दिलेलं असे. घरातलं उरलं सुरलं खाऊन त्याचं पोटही भरत नसे. भुकेने कळवळलेल्या त्या जीवाला मालक खाऊ घालेना आणि बाहेरचे जवळ करेना अशी अवस्था असे. त्याचं ते पिसाळलेपण मला बिरबलाच्या घोड्याची आठवण करून देई. एकदा अकबराने सर्व दरबारी लोकांना एक एक घोडा दिला आणि त्याची चांगली काळजी घ्यायला सांगितली. आणि कोण चांगली काळजी घेऊन घोड्याला चपळ ठेवेल त्यासाठी बक्षिसही जाहिर केलं. बिरबलाने त्या घोड्याला एकच झरोका असलेल्या अंधार्या खोलीत बांधून ठेवलं. एकाकीपणाने तो अर्धपोटी घोडा पिसाळल्यासारखा वागे. रोज एकच गवताची पेंडी बिरबल त्या झरोक्यातून त्याला टाकत असे. कोणाचा घोडा बलवान आहे हे पहायला जेंव्हा बादशहाचा मोत्तद्दार आला तेंव्हा झरोक्यातून आत डोकावताच आत आलेली त्याची लांबसडक दाढी गवताची पेंडी समजून घोड्याने रागाने ओढून घेतली. अशा प्रकारे बिरबलाचा घोडा सर्वात बलवान ठरला. त्याप्रमाणे कोणी दिसलं रे दिसलं की ते कुत्र अंगावर धावून जात असे.
दिवसभर भुंकणार्या या कुत्र्याला शांत राहण्यासाठी मी आमच्या गच्चीतून चीजचे तुकडे टाकत असे. ते खाण्यामुळे दिवसभर त्याच्या भुंकण्यातून माझी सुटका होई. भयंकर दिसणार्या ह्या कुत्र्याची आणि आमची थोडे दिवसातच मैत्री झाली. सगळ्यांना पळता भुई थोडं करणारं हे कुत्र आम्हाला पाहताच प्रेमळ कसं होतं हे बाकी कुणाला कळत नसे. पण ते त्याच्यातलं आणि आमच्यातलं सिक्रेट होत. त्याच्या अव्याहत भुंकण्यावर मला सापडलेला हा एकमेव तोडगा होता.
एकदा एका चित्रकाराने खूप पैशांच्या मोबदल्याच्या आशेने एका कंजूस राजांचं अगदि हुबेहुब चित्र काढलं. पण बोलून चालून राजा कंजूसच असल्याने, येतांना तो त्याच्या कुत्र्याला घेऊन आला. कुत्र्याने चित्राकडे ढुंकूनही पाहिलं नाही. राजा म्हणाला, ``हे कसलं हुबेहुब चित्र? माझं कुत्रसुद्धा ह्याला ओळखत नाही. चल निघ इथून.'' चित्रकाराजवळ उभ्या असलेल्या एका हुशार माणसाने चित्रकाराच्या कानात काहीतरी सांगितलं आणि चित्रकार म्हणाला, ``महाराज मला एक दिवसाचा वेळ द्या. मी ह्या चित्रात काही सुधारणा करतो.'' ``ठीक आहे'' राजा म्हणाला. दुसर्या दुवशी मात्र आल्याआल्याच कुत्र्याने चित्रातल्या राजाचे पाय, हात चाटायला सुरवात केली. राजाला कुत्र्याच्या अशा वागण्याचा उलगडाच झाला नाही. राजाला नाईलाजाने ठरलेली मोठी रक्कम त्याला द्यायला लागली. हुशार चित्रकाराने मात्र चित्राच्या मागच्या बाजूने कागदाला राजाच्या हाता पायाच्या जागी थोडासा खिमा फासून ठेवला होता. लहानपणी ऐकलेल्या ह्याच गोष्टीच्या आधाराने घराबाहेर पडतांनाच मी काठीऐवजी चीजचे तुकडे माझ्याबरोबर ठेवत असे म्हणजे अशा अचानक अंगावर येणार्या मोत्या वाघ्यांचं भय राहत नसे. मॉरिशसमधे हे चीजचेच तुकडे मला श्वानभयावर अंगार्यासारखे उपयोगी पडत होते. त्या वासाने कोपर्यावर असलेल्या हॉस्पिटलच्या बाहेर झोपलेली माऊ मात्र अचानक जागी होऊन माझ्या मागे येऊ लागे. तेथील डॉक्टरबाईही रागाने `मेरी बिल्ली और मुझसे म्याऊ' म्हणत तिला आत जायचा आदेश देत. आपल्या मालकिणीकडे ढुंकूनही न पाहता ही माऊ पायाला अंग घासत एक चौकभर पुढे येऊन चीज खाऊनच माघारी फिरत असे.
एका बंगल्यात लुटुलुटु चालणारं मोठ्या कढईपाठीचं कासव ही दिसे. कधी कधी गवत खात तर कधी हातपाय ताणून उन्हात पसरलेलं असे.
बिन नावांची घरं -
येथील बिननावाची घरं मला कायम बिनचेहर्याचीच वाटत राहिली. नंतर हळु हळु कानावर येणारी येथील एकएक आडनावं मला विचारात बुडवून टाकत. अनेकांची नावं/आडनावं दुखी, भिकारी, शोक अशी असतं. कदाचित मॉरिशसमधे पाय ठेवल्या ठेवल्या नाव नोंदणी करतांना इंग्रजांनी त्यांना आडनावं विचारली असावीत. त्यावेळी आपल्याकडे भारतात आडनावं नव्हतीच. गोत्र विचारलं जायचं. काय सांगावं हे न कळल्यामुळे कधीतरी त्यांनी ``मी भिकारी आहे'', ``दुःखी आहे'' , ``माझा शोक मला आवरत नाही.'' असं काहीसं सांगितलं असावं का? तेच शब्द त्यांच्या नावासमोर आडनाव म्हणून कायमचे चिकटले असावेत का? पण अनेक वर्ष काशीला कामनिमित्त जाऊन राहिलेले आमचे मित्र जेंव्हा म्हणाले की, ``येथे लोकांची आडनाव भिकारी, दुखी अशी काहीही असतात.'' तेव्हा मात्र ह्या आडनावांभोवती माझ्या मनात अजुनच न सुटणारा गुंता तयार झाला. सकलांचं दुःख हरण करणार्या गंगामातेच्या किनारी भिकारी आणि दुखी का असावेत न कळे. त्यातल्या त्यात एखाद्याचं सुखी आडनाव ऐकून किवा एखाद्या घरमालकाच्या नावाची टिळक ह्या नावाचं Teelouck एवढं मोठ्ठ spelling करून लिहिलेली पाटीही सुखावून जाई.
आपल्याकडे बंगल्यांना, घरांना, इमारतींना नावं द्यायची पद्धत मला फार आवडते. कदाचित त्याचं कारण आपल्या संस्कृतीत खूप खोलवर दडलं आहे. रामायण महाभारतात घरांनाच काय तर प्रत्येकाच्या धनुष्याला आणि प्रत्येकाच्या शंखालाही नावं दिलेली आहेत. रामाचं कोदंड तर शंकारचं पिनाक तर अर्जुनाचं गांडीव. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसं आणि उठावदार! कृष्णाचा पाञ्चजन्य, अर्जुनाचा देवदत्त, भीमाचा पौण्ड्र, युधिष्ठिराचा अनन्तविजय, नकुलाचा सुघोष, सहदेवाचा मणिपुष्पक शंख वाजतांना त्या शंखांनीही आपल्या मालकाचं व्यक्तिमत्त्व उचलल्यासारखं वाटतं. आजही दक्षिणेतील राजे वडियार यांच्या सिंहासनाला भद्रासन म्हणतात. भद्र म्हणजे कल्याणकारी. तसे शिव म्हणजेही कल्याणप्रद. पांडवांचे `कायमचेच कल्याण' करण्याच्या हेतूने वारणावतला दुर्योधनाने बांधलेल्या घरालासुद्धा ‘शिव’ नाव दिल्याचं नमूद केलं आहे. मालकाच्या मनाचं प्रतिबिंब मला त्या घराच्या नावात दिसत. आजसुद्धा मालती माधव नाव वाचतांना घरात राहणारे दोन प्रेमीजीव आज अनेकवर्ष एकमेकांना साथ देत एकमेकांना आधार देत अजूनही रोज फिरायला जात असतील का? असं मला कायम वाटतं. तर ‘पितृस्मृती’ चा मुलांवर मायेची पाखरण करणारा बाबा आणि त्याची कृतज्ञतेनी आठवण जपणारा मुलगा कसा असेल अशी उत्सुकता मनात राहते. तर ‘चैतन्यस्मृती’ चं चैतन्य अचानक लोपलं तो चैतन्य कोण ही हुरहुर त्या बंगल्यासमोरून जातांना मला कायम अस्वस्थ करते. समुद्रकाठी उभी मेघदूत मालकाच्या कलासक्त मनाची ओळख करून देते. त्या लोकांना न भेटताही प्रत्येक माणसांना, त्यांच्या कुटुंबियांना मी मनानी ओळखत असते. त्यांच्याशी कुठल्यातरी भावबंधानी बांधलेली असते.
मॉरिशसमधल्या हिंदूंची घरे -
मॉरिशसमधे घरांना नावं नसली तरी घर अथवा बंगला हिंदूचा असेल तर लगेच ओळखू येई. कुंपणातून आत शिरल्या शिरल्या लक्ष वेधून घेई ते म्हणजे एक सुबक सुंदर मारुतीच छोटसं मंदिर! संध्याकाळी या मंदिरात नित्यनेमानी लाल तर क्वचित काही ठिकाणी पिवळे दिवे प्रकाशत असतात. भारतातून सातासमुद्रापलिकडे आल्यावर इथल्या अनोळखी प्रदेशात महावीर हनुमानच आपलं रक्षण करेल ही पूर्वी भारतातून आलेल्या लोकांच्या मनात असलेली नितांत श्रध्दा आजही तेवढीच प्रखर आहे. प्रत्येक हिंदू घरात मारुतीला आवडणारं पानाफुलांनी डवरलेलं रुईचं झाड आणि मंजिर्यांनी भरगच्च बहरलेली कृष्ण तुळस दारी असणारच! देवाला रोज विडाही हवा. त्यासाठी नागवेली ही प्रत्येक घरात हवीच. लोक मात्र विड्याच्या पानांचा उपयोग फक्त देवाला आणि पूजेसाठीच करतात. घराघरात नागवेल असूनही पान खाऊन रस्तोरस्ती लाल सडे टाकतांना कोणीही दिसला नाही. मारुतीच्या देवळावर लाल किंवा केशरी रंगाचे दोन झेंडे फडकत असत. एकावर ॐ लिहिलेल असतं तर दुसर्यावर उड्डाण करणार्या मारुतीचं चित्र असत. ‘गर्वसे कहो हम हिंदु हैं’। हे वेगळ सांगायला लागत नाही. हनुमान जयंतीच्या दिवशी हे झेंडे बदलले जात. इथली हनुमान जयंती मात्र आपल्या पंचांगाशी न जुळणारी असते. मारुती येथे महावीर या नावानी लोकांच्या जीभेवर आहे. दिल्लीला असतांना रामलीला बघतांना स्टेजवर मारुतीचा प्रवेश होताच मी शेजारच्या छोट्या मुलाला म्हटलं, ``देखो देखो मारुती आ गया!’’ त्यावर त्यानी ``कहाँ है मारुती? रामायणमें मारुती कैसे आ सकती हैं?’’ म्हणून मला क्लिन बोल्ड केलं शेवटी त्याच्या आजीच्या मध्यस्थीमुळे मला कळले की हिंदी लोकांमधे मारुती हा हनुमान नावानीच प्रचलित आहे. मारुती म्हटल की त्याचा अर्थ फक्त मारुती गाडी एवढाच होतो. ``हनुमानका दुसरा नाम मारुती भी है।‘’ असं आजीनी नातवाला सांगितल्यावर आमच्या दोघांच्या डोक्यात प्रकाश पडला. आणि कम्युनिकेशन गॅप मुळे झालेल्या गमतिचं आम्हाला दोघांनाही हासू आलं पुलंच्या अपूर्वाईत इंडोनेशियात मरुत् ची मुलगी म्हणून मुलीच नाव मारुती ठेवतात ही पण गम्मतच आहे. `देव एक नाम अनेक' हेच खरं.
देवाच्या रोजच्या पुजेबाबात हे हिंदू अतिशय काटेकोर असतात. भारतीय दूतावासातील उपउच्चायुक्त श्री. राजीव शहारे यांनी बंगला भाड्यानी घेतला तेंव्हा घरमालकांनी सर्वप्रथम त्यांना विचारलं की तुम्ही रोज ह्या मारुतीची पूजा करणार ना? रोजच्या कामामधे त्यांना पूजा करणं जमणार नाही हे कळल्यावर मालकानी गुरुजींना बोलावून विधिवत् मंत्र म्हणून महावीर मारुतीची मूर्ती काढून घेतली आणि मंदिर बंद केलं. हिंदू राज्य नसूनही हिंदुत्व जपायला मॉरिशस मधे कायद्याचा अथवा घटनेचा आसूड सूड म्हणून उगारत नाहीत. सरकारी गाडी, कचेरी, दवाखाने अशा ठिकाणीही देव पाठीराखा असतो. येताजाता एका बंगल्याच्या ओसरीवरच्या कोनाडयात एक सुबक गणेश मूर्ती दिसे. संध्याकाळी त्याच्याभोवती इलेक्ट्रिकच्या दिव्यांची माळ चमचमत असे मूर्तीच नातं पेणच्या मातीशी आहे हे गणपतीचे रेखीव अवयव आणि डोळेच सांगत. गेटबाहेर सुबक रांगोळी पांढर्या ऑइलपेंटने चितारलेली दिसे. मालकीणीला कुतुहलानी प्रश्न विचारणं मात्र `मेरे बस की बात’ नव्हती. एक तर इथे पाश्चिमात्य संस्कृती प्रमाणे लोक एकमेकांना फोन करून मगच घरी जातात त्यामुळे
दारावर घंटी नावाचा प्रकार नसतो. नवीन माणसांच्या स्वागताला भलीदांडगी कुत्री ठेवली असल्याने आतल्या माणसाशी ओळख करून घेण्यापेक्षा `यः पलायते स जीवति।' हेच खरं. कोण्या एका सकाळी प्रवीण आणि मी फिरायला गेलो असता तिळा तिळा दार उघड म्हटल्यावर अलिबाबाच्या गुहेच दार उघडावं तस समोरचं प्रचंड दार हळुहळु सरकायला लागलं. बघता बघता चायनीज रेड रंगाची मर्सीडीज त्यातून दिमाखात बाहेर पडली थोडावेळ थांबली. मघाशी दरवाजा जसा हळु हळु उघडत गेला तसा हळुहळु आपोआप बंद झाला. गाडी भुर्रकन् निघुनही गेली.
---------------------------------------------------------------
( पुढचे प्रकरण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. )
4 मॉरिशसची तोंड ओळख -
Comments
Post a Comment