5 मॉरिशस मोठं शहर का छोटा देश -

 

5 मॉरिशस मोठं शहर  का छोटा देश - 

        मॉरिशसला स्वातंत्र्य -   

           ``मॉरिशसला ब्रिटनचा अविभाज्य घटक म्हणून रहायचं आहे का स्वतंत्र देश म्हणून अस्तित्त्व पाहिजे?’’ ह्यासाठी मॉरिशसच्या जनतेचे सार्वमत घेण्यात आले तेंव्हा मॉरिशसच्या जनतेने बहुमताने स्वांतंत्र्याची  तीव्र इच्छा व्यक्त केली. मॉरिशसच्या शेजारी एकेकाळी फ्रेंच कॉलनी असलेल्या रियुनियन ह्या बेटावरच्या लोकांनी मात्र फ्रांस सोबतच राहण्याचे ठरवले. ब्रिटिशांना मॉरिशसला स्वातंत्र्य देण्याशिवाय पर्याय नव्हता. पण मॉरिशसला स्वातंत्र्य देण्यापूर्वी ब्रिटनने चलाखीने एक राजकीय नासका डाव खेळला. त्यांच्या Devide and Rule ह्या धूर्त धोरणानुसार बेटबेटुल्यांच्या ह्या देशातील छागोस (दिएगो गार्शिया) बेटबेटुल्यांचा समुह मॉरिशसला न विचारताच मॉरिशसपासून तोडून तो परस्पर अमेरिकेला विकून हलवयाच्या घरावर तुळशीपत्र ठेवले. 12 मार्च 1968 ला मॉरिशस स्वतंत्र देश झाला.

          दर वर्षी 12 मार्चला कोडा वॉटर फ्रंट वर मॉरिशसच्या स्वातंत्र्यदिनाचा समारंभ अत्यंत आनंदाने साजरा होतो. भारताने प्रशिक्षित केलेल्या पोलीसांचे रुबाबदार संचलन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. प्रवीण तेथे असतांना मॉरिशस सरकारचे विशेष निमंत्रण असल्याने हा कार्यक्रम पाहता आला. त्यावर्षी ह्या कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजे, भारताचे राष्ट्रपती अब्दुल कलाम हे मुख्य पाहुणे होते.  

मॉरिशस मधील शहरे आणि खेडी -

  मॉरिशसला एक देश म्हणून पाहिलं की देशाला लागणारी राज्य घटना, रचना, विविध खाती ही आवश्यक होती.  गुगल-मॅपवरचा हलणारा छोटासा पंजा  बाहेरच्या दिशेने सरकवत नेला की देशाच्या नकाशाचा आकार वाढवत नेतो अणि आतल्या दिशेने ओढत आणला तर छोटा छोटा करत त्यांना पिटुकलंही बनवतो. तसं एका मोठ्या देशाला छोटं छोटं करत पिटुकलं मॉरिशस राष्ट्र तयार झालं आहे असं वाटे. येथील राजधानी, शहर, गाव, ह्या संकल्पना मनाला कुठेच पटत नव्हती. मुंबई पुणे मिळून झालेला देश त्यामुळे सर्वच गोष्टी खेळण्यातल्या सारख्या लुटुपुटीच्या वाटत होत्या.  भारताच्या आणि अमेरिकेतील भव्यतेच्या परिमाणापुढे इथे सर्वच विचार इटुकले पिटुकले होते. पुणे, नागपूरच्या एखाद्या छोट्या पेठांपेक्षाही इथली शहरं छोटी  आहेत. आणि गावालगतच्या 40- 50 घरांच्या छोट्या वस्त्यांसारखी छोटी खेडेगावं. पोर्ट लुई हे राजधानीचं शहर आणि क्वात्र बोर्न, रोझ हिल इत्यादि  थोडिशी शहर सोडलं तर बाकी सर्व गावं किंवा खेडीच असली तरी स्वच्छ, सुंदर, निर्मळ असतं. रस्तेही खाचखळगे रहित असतं.

             गर्दीच्या रस्त्यांवर पोलिसांचा वावर जाणवण्यासारखा असे. बाजारातून एक पुरुष आणि एक महिला पोलिस नेव्ही ब्लू पँट आणि फिका नीळा शर्ट  अशा गणवेशात कायम जोडी जोडीने अंतरा अंतरावर पायी गस्त घालत असत. हे सर्व पोलीस  सहा फुटाच्यावर उंच, सपाट पोटाचे असत. त्यांना एखादा पत्ता विचारला तर हसतमुखाने मदत करत. स्वच्छता आणि नियम लोकं कटाक्षाने पाळत. रहदारीचे नियम पाळणे हे काम सर्वच नागरीक कर्तव्य समजून आपणहून करत. त्यासाठी पोलिसांना त्यांचा वेळ आणि मनुष्यबळ वाया घालवायला लागत नाही. शांतता असलेल्या पोलीस स्टेशनमधील पोलीस पोलिसस्टेशनच्याच असलेल्या मैदानात आनंदाने व्हॉलिबॉल खेळतांना दिसत. 

            प्रवीणने IPS  मधे प्रवेश केला तेंव्हापासून पोलिंसाबद्दल पूर्वापार चालत आलेल्या कथा आणि दंतकथांनी आमच्या घरात प्रवेश केला. एकदा एक DIG जिल्हा मुख्यायलाला भेट देण्यासाठी आले असतांना वाटेतच असलेल्या पोलिस ग्राऊंडवर त्यांना त्यांचे S.P.  व्हॉलिबॉल खेळतांना दिसले. S.P. स्वतः व्हॉलिबॉल खेळत आहेत म्हणजे जिल्ह्यात कुठे काही गडबड दिसत नाही. सर्व जिल्ह्याचा कारभार सुरळीत आणि शांतपणे चालू आहे. मला भेट द्यायची काही जरूर नाही असं म्हणून DIG. शांतपणे पुढे निघून गेले.  मॉरिशसमधे व्हॉलिबॉल खेळणार्या त्या पोलिसांना पाहून ही गोष्ट आठवे. भारतातही एके काळी अशीच असलेली शांतता कुठल्या वादळाने उडवून नेली कळे.

मॉरिशसची सुरक्षा -

                  मॅरिशस ह्या छोटुकल्या बेटाला कोणी उपद्रवी शेजारी नाही. त्यामुळे मॉरिशसचे स्वतःचे सैन्य नाही. पर्यायाने सैन्यावर वारेमाप खर्चही करायला लागत नाही. त्यांच्या सुरक्षेसाठी तेथील पोलिसांना प्रशिक्षण देणे , महत्त्वाच्या व्यक्तींचे  संरक्षण करण्यासाठी पोलीसांना प्रशिक्षण देणे, सागरी सुरक्षेसाठी भारताच्या कोस्टगार्ड तर्फे हेलिकॉप्टर्स, जहाजे, अधिकारी देणे या गोष्टी भारत निष्ठापूर्वक पार पाडत आहे.

                  आपला देश टुरीझमवर अवलंबून आहे. हे तेथील वरपासून तळागाळातल्या लोकांना चांगलच माहित होतं आणि म्हणूनच स्वच्छता, नम्र वागणूक, परदेशी प्रवाशांची सुरक्षा यासाठी सारेच दक्ष असत.

मॉरिशसची राजधानी -

           मॉरिशसची राजधानी पोर्ट लुई आपल्या दादरएवढी असेल.  पोर्ट लुईला तेथील फुटपाथवरून चालतांना एका दरवाजासमोर कायम एक रुबाबदार गणवेश घातलेला तडफदार पोलिस गार्ड उभा दिसे. वरती चक्क Prime minister of Mauritius अशी पाटी पाहिल्यावरही परत परत वाचली. इतर सामान्य कचेर्यांसारखं पंतप्रधानांचं कार्यालयही सहज फुटपाथवरून जाता जाता रस्त्याच्या कडेला दिसावं याचं अप्रूप वाटलं. येथील  त्यावेळचे प्रेसिडेंट अनिरुद्ध जगन्नाथ त्यांच्याच घरी राहणे पसंत करत. जेंव्हा कधी दुसर्या देशाचे पाहुणे येणार असतील किंवा कोणी खास पाहुण्यांसाठी जेवण, किंवा काही समारंभ ठेवला असेल तेंव्हा तवढ्या वेळेपुरते ते राष्ट्रपतिभवनात  येत. अनेक वेळा प्राईम मिनिस्टर किंवा प्रेसिडेंट गाडीतून जातांना दिसायचे. त्यांच्या गाडीच्या पुढे-पाठी पायलट गाड्यांचा ताफा सोडाच फक्त पुढे- दोन मोटरसायकल-स्वार असतं. मोटरसायकलला कडेला असलेल्या दांडीवर लाल दिव्यांमुळे कोणी VIP जात आहे एवढं कळे. त्यांच्या गाडीला लाल दिवा नसे. दर मंगळवारी येथील parliament session  (संसदेचे अधिवेशन ) असे. आम्ही असतांना आता तर 9 डिसेंबर ते 11 मार्च पर्यंत तीन महिने पार्लमेंटला सुट्टी होती. गलिव्हरच्या गोष्टी किंवा सिंदबादच्या सफरी ह्या नुसत्या लहान मुलांच्या गोष्टी नसून त्या विविध देशोदेशी फिरलेल्या लोंकांच्या अनुभवांचं रोचकपणे केलेलं एक छान संकलन असावं असं मला वाटतं. त्यांचा अभ्यास केला तर काळाच्या पडद्याआड गेलेले अनेक प्रसंग, अनेक भूभाग, त्यांच्या अनेक आठवणी परत जिवंत होतील असं मला राहून राहून वाटतं.

मॉरिशसच्या पंतप्रधानांचं साधंसुधं ऑफिस जाता जाता रस्त्यावरच पहायला मिळालं.  प्रेसिडेंट राहतात ते The State House खूप सुंदर आहे हे ऐकून होतो आणि अचानक तेही पहायला मिळालं

 राष्ट्रपति भवन The State House 

                          मॉरिशसला असतांना 2005 ला श्री अनिरुद्ध जगन्नाथ हे तेथील प्रसिडेंट होते. त्यांनी एका चहापानाच्या कार्यक्रमानिमित्त  निमंत्रण दिल्याने त्यांच्या राष्ट्रपती भवनाला भेट देता आली. अत्यंत साधेपणाने राष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नी सर्वांना भेटत होत्या. मॉरिशसमधील काही प्रख्यात लोकांच्याही त्यानिमित्ताने गाठीभेटी होत होत्या. तेथील एका बाईंची साडी मला त्यांच्याकडे घेऊन गेली. त्या म्हणाल्या, ही साडी दोनशे वर्ष जुनी आहे. बनारसी रेशमी साडीला खर्या सोन्याच्या जरीचे काठ,पदर  झळकत होते. साडीचा उंचीपणा नजरेत भरत होता तशी  त्या साडीची 'पुरातन`( antique piece ) म्हणून किंमतही जाणवत होती. आपल्या भारतात दोनशे वर्षांपूर्वी तयार होणार्या साड्यांची प्रत आणि पोत  पाहून माझे डोळे दिपून गेले होते. अशी साडी बनविणारे कलाकार किती प्रगत असतील  याचा मी अंदाज बांधत होते. रेशमाची उच्च प्रत हा एक मुद्दा होता. त्या सोबतीने सोन्याचे, चांदीचे काम, त्याची तार काढायचं काम, म्हणजे पर्यायाने धातूशास्त्रातील प्रगती, नक्षीकाम आणि कलाकुसर चित्रित करून तसे बनवणार्याची कमाल आणि ही अशा प्रकारची रंगसंगती दोनशे वर्ष टिकण्यासाठी रंग तयार करण्याची कला. अशा प्रगत देशाला इंग्रजांनी ओरबाडून ओरबाडून कंगाल केलं. परत एकदा बाईंशी संवाद साधतांना कळलं की, त्यांचे मूळ गाव बिहारमधे होते. त्या सांगत होत्या की त्यांचे पूर्वज येथे व्यापारासाठी आले होते. आणि येथेच स्थायिक झाले. आजही मॉरिशसमधे असे काही सधन भारतीय वंशाचे परिवार आहेत. ते त्यांच्या सुना बिहारमधल्या त्यांच्या त्यांच्या काही जिल्ह्यातूनच घेऊन येत. आजही ही परंपरा  चालू आहे.

             ह्या गर्दित कोण कोण लोकं भेटून तुम्हाला आश्चर्यचकित करतील हे सांगता येत नाही. सर्वांना भेटता भेटता आमची ओळख indian ocean rim countries’ association for regional cooperation च्या श्रीलंकेच्या मुख्य अधिकार्याशी झाली. आम्ही भारतीय असल्याच कळल्यावर त्यांना आनंद झाला.  त्यांच्या तोंडून भारताची स्तुती ऐकतांना मनातून सुखावायला होत होतं. आमच्याविषयी वाटणारा आदर त्यांच्या वागण्या- बोलण्यातून डोकावत होता. ते म्हणाले, `` भारत तर महान व्यक्तिंची, विद्वानांची खाण आहे. आम्हाला आमच्या देशात कुठल्याही कामात काही अडचण आली आणि त्याचं निराकरण आम्हाला अशक्य वाटलं की आम्ही भारतात येतो. त्या विषयातला निष्णात आम्हाला मिळतोच. त्याला घेऊन आम्ही आमच्या देशात आलो की तो आमचे प्रश्न चुटकीसरशी सोडवून देतो. महा अवघड वाटणारी कुठलीही समस्या भारतीयांनी सोडविली नाही असं अजून एकदाही झालं नाही.''

  `` तुमचा भारतीयांवर एवढा विश्वास आहे हे पाहून आम्हाला खूप आनंद वाटला. खरतर आज काही कठिण परिस्थिती असली की सगळे पाश्चिमात्यांकडे नजर लावून असतात. त्यांना सोडून तुम्ही भारतीयांची निवड कशी केली? एक कुतुहल म्हणुन विचारतो'' प्रवीण म्हणाला. `` आम्हीही पहिल्यांदा  पाश्चिमात्यांना  विचारून पहायचो. पण त्यांना आमची समस्या इतक्या सहजपणे कळायची नाही. शिवाय त्यांची बिदागी खणखणित असे. भारत आणि आमची नैसर्गिक आणि सांस्कृतिक एकच पार्श्वभूमी आहे. त्यामुळे भारतीयांच्या आणि आमच्या अडचणीही मिळत्या जुळत्या असतात. त्यामुळे भारतीय आमच्या अडचणींची सहजपणे उकल करतात तेही अत्यंत कमी मोबदल्यात. आम्ही ऐकतच राहिलो. मॉरिशसचा मुक्काम भरून पावल्यासारखं वाटलं. कान तृप्त झाले. ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास ते अचानक समोर गवसल्यासारखं वाटलं.  आपल्याकडे हे सांगूनही खरं वाटणार नाही. भारतीयांचा उत्साह, आत्मविश्वास वाढविणारा हा प्रसंग तुम्हाला सांगतांना मला आनंद वाटत आहे.

ह्या चहापान समारभात हे राजभवन पहायला फार वेळ मिळाला नाही तरी नंतर एकदा तेथे आत सर्वत्र फिरून ते पहाता आलं.

  रिझवी, मोका (Réduit, Moka,) च्या एका हिरव्यागार पाचूच्या घळीत डोंगराचा एक आडवा कडा सरळ दरीतच घुसला आहे. आपल्या टकमक टोकासारखा. ह्याच कड्यावर 240 एकरमधे The State House  हा फ्रेंचांनी बांधलेला किल्ला दिमाखात उभा दिसतो. एकेकाळी फ्रेंचांनी शत्रूपासून संरक्षण म्हणून बांधलेला हा किल्ला नंतर Governer House म्हणून वापरला जात असे तर आता राष्ट्रपती भवन (State House ) म्हणून वापरला जातो. ह्या प्रचंड परिसरात अनेक प्रकारची झाडं अत्यंत कौशल्याने लावलेली आहेत. मॉरिशसची काही दुर्मिळ झाड, जगातील विविध भागातून आणलेली सुंदर सुंदर झाडं, ह्यांच्या जोडीने असलेला औषधी वनस्पतींचा स्वतंत्र विभाग आणि सर्वत्र पसरलेली हिरवीगार हिरवळ पायांना थकल्याची जाणीवही होऊ देत नाही.

               ह्या सुंदर कड्यावरून दरीच्या अंतरंगात डोकावतांना `कनकधारा' स्तोत्रातील लक्ष्मीच्या नजरेची आठवण मला येत असे. निद्रिस्त शेषशायी भगवंताचं सौंदर्य सतत बघतच रहावं असं सुंदर आहे. त्यांच्या त्या सौंदर्याकडे लक्ष्मी एकटक बघत असतांना  तिच्या त्या निळसर काळ्या नजरेच्या सतत प्रवाहाने जणु विष्णुच्या गळ्यामधे असलेली पांढरी शुभ्र मोत्याची माळही तिच्या प्रेमळ दृष्टीत भिजून नीलार्द्र झाली.

दृष्टि तुझी मधुकरासम नीलवर्णी

झाली स्थिराचि मधुसूदन वक्षभागी

दृष्टिप्रभा भिजवि मौक्तिकमाळ वक्षी

नीलार्द्र नील कमलासम नील झाली॥

दृष्टी-सुधा-सुमन-माळचि पद्मजा गे

साफल्य देउनि कृतार्थ  करी सदा  गे।।5

             इथेही त्या गर्द हिरवाईत खोल खोल बुडलेली आपली दृष्टी अशीच शांत, पारदर्शी  होते. मनातील सर्व विचार शांतपणे कुठेतरी तळाला बसून जातात. सर्वत्र स्वच्छता ही तर मॉरिशसची खरीखुरी लक्ष्मीच म्हटली पाहिजे. मॉरिशसला प्रत्येक ठिकाणी गेल्यावर एखाद्या भारून टाकणार्या मंत्रासारखे विशालचे शब्द माझ्या मनात घुमत राहत, ``आम्ही अमच्या देशाचा कोपरा न् कोपरा सुंदर बनवितो.’’

मॉरिशसच्या निवडणुका -

                   3 जुलै 2005 च्या मॉरिशसच्या निवडणुकांचे आम्ही साक्षीदार होतो. आपल्या देशात निवडणुकांची धामधूम, निवडणूक चिन्ह, विराट सभा, भाषणांची खैरात, एकदुसर्यावर आरोप-प्रत्यारोप, शाब्दिक चिमटे, ह्या सगाळ्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर मी  इकडच्या निवडणुका पहायला उत्सुक होते. तेंव्हा पॉल बेरोंजे हे फ्रेंच वंशाचे पंतप्रधान होते तर नवीन रामगुलाम आखाड्यात होते. पॉल बेरोंजे हे तेंव्हा अहिंदू पंतप्रधान होते. मॉरिशसमधे हिंदूंची संख्या जास्त आहे.

                 निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तशा रस्तो रस्ती पताका  लोंबायला लागल्या. आपल्याकडच्या पताका त्रिकोणी किंवा छोट्या चौकोनी असतात; इथल्या मात्र लांब लांब आयताकृती. ठिकठिकाणी भिंतींवर  मजकूर, उमेदवारांचे फोटो झळकायला लागले. क्वात्रबोर्नच्या महानगरपालिकेसमोर श्री. नवीन रामगुलामांच भाषण झालं. श्री पॉल बेरोंजेंचंही भाषण झालं. मला कळलं काहीच नाही पण थोडावेळ उभी राहून आले. सगळा माहोल अनुभवायला बरं वाटत होतं. आपल्यासारख्या विराट सभांपुढे इथल्या मोठ्या सभा सुद्धा चिमुकल्या वाटत होत्या. पहायला मजा येत होती. भाजी मार्केटमधे बेरोंजे आणि नवीन रामगुलाम ही नावं कानावर पडत होती, म्हणून सहजच मी ``काय कोण निवडून येणार ?'' कुतुहलाने विचारलं. ``नवीन रामगुलामच !'' उत्तर आलं. ``काल एका बेकरीतला माणूस श्री पॉल बेरोंजे यांनी केलेल्या कामाचं कौतुक करत होता.’’ हे त्यांना सांगताच उसळून तो म्हणाला छे छे हिंदू माणूसच आमचा पंतप्रधान झाला पाहिजे. सरळ सरळ असा धर्माचा उल्लेख तो सुद्धा आजूबाजूला बघता -  - मलाच आश्चर्याचा धक्का देऊन गेला. मी लोकांच्या मनाचा अंदाज घेत असतांना त्याचं असं तावातावाने बोलणं ऐकल्यावर आपण दुसर्या देशातील आहोत ह्याचं भान ठेवणही आवश्यक असल्याचं जाणवलं. पण निवडणुकीत किंवा निवडणुकीनंतर भांडणं, मारामार्या, खून, जाळपोळ, आंदोलन असं काहीही झालं नाही. ह्याचंही उत्तर आमच्या मित्राकडून ऐकायला मिळालं.

          मॉरिशसला स्वातंत्र्य मिळाल्यावर 1968 ला हिंदू मुसलमान मोठी दंगल उसळली होती. त्या सगळ्या दंगलीचा अभ्यास केल्यावर तेंव्हाचे मॉरिशसचे पंतप्रधान श्री. शिवसागर रामगुलाम (श्री. नवीन रामगुलाम यांचे वडिल) ह्यांनी मॉरिशसमधे सर्व धर्माच्या लोकांना शालेय शिक्षण मोफत आणि सक्तीचं करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यानंतर मॉरिशसमधे परत कधीही दंगे झाले नाहीत. आमच्या मॉरिशियन मित्राकडून नवी माहिती मिळाली होती. ह्याचा परिणाम म्हणून अनेक मुस्लिम स्त्रिया उच्च शिक्षित होत्या. लंडन, पॅरिस सारख्या ठिकाणी कायद्याचे उच्च शिक्षण घेऊन आल्या होत्या. त्यामुळे तेथे फॅमिली प्लॅनिंगसाठी वेगळे कायदे किंवा योजना राबवाव्या लागल्या नाहीत. प्रवीणचा ड्रायव्हर जादूची मुलगीही बॅरिस्टरचा कोर्स करायला लंडनला गेल्याचे जादू अभिमानाने सांगत असे. प्रत्येकाला मिळणार्या शिक्षणामुळे सर्वांचीच प्रगती झाली. 19 व्या शतकात येथे आलेले हे भारतीय आपलं मूळ शोधत जेंव्हा भारतात येतात तेंव्हा आपल्या अशिक्षित अडाणी राहून गेलेल्या बांधवांना पाहून अश्चर्यचकित होतात. शिक्षणामुळे त्यांच्यात झालेली सुधारणा पाहिल्यावर कोणालाही शिक्षणाचे महत्त्व थक्क करणारे वाटेल.

       70 पैकी 42 जागा मिळवून नवीन रामगुलाम निवडून आले. येथे मॉरिशसमधल्या प्रत्येक अल्पसंख्यांकांना जसे चायनीज, अफ्रिकन, तामिळ, तेलगु , मराठी  यांना निश्चित प्रतिनिधित्व दिले जाते. निवडणूक झाली आणि अचानक काही दिवसात सगळ्या भिंती पूर्ववत झाल्या पताका, फलक सर्व निघाले. ही काय जादू आहे? मी विशालला विचारलं. इथे निवडणुकीनंतर तीन दिवसाचा अवधी प्रत्येक पार्टिला दिला जातो. तेवढ्या अवधीत प्रत्येकाने आपापल्या जाहिराती, पताका , आणि आपल्या नेत्यांचे फोटो काढून घेणं अपेक्षित असतं. भिंतीही रंगवून पुन्हा पूर्वीसारख्या चकाचक होतात.

       मॉरिशस मधील सुनियोजित शहरे आणि गावे -    

                 मॉरिशसमधेही लोकवस्ती वाढू लागली की जंगलाची काही जमिन अथवा शेतीची काही जमिन  रहाण्यासाठी म्हणून तयार केली जाते. ही जमिन स्वच्छ करून प्लॉट्स पाडले जातात. घरांचं बांधकाम सुरू होण्यापूर्वीच सर्व ड्रेनेजेस्, पाण्याच्या लाईन्स, इलेक्ट्रिसिटीच्या जोडण्या पूर्ण होतात. रस्तेही बनविले जातात. रस्त्याच्या कडेला फुटपाथस्, आणि सुंदर झाडं लावली जातात. हे सर्व झाले की मग घरांची बांधकामं केली जातात.  काही रस्त्यांवर दुतर्फा अमलतास तर काहींवर दुतर्फा गुलमोहोर, तर काहींवर जकरंडा.  फुलं आली की रस्त्याच्या दुतर्फा एकाच प्रकारच्या फुलांनी सजलेला रस्ता सुंदर दिसे. गरीब लोकांना घर बांधायला सरकारी मदत मिळे. अनधिकृत बांधकाम कोठेही होणार नाही ह्याची उत्तम खबरदारी घेतलेली असे. त्यामुळे कोठेही झोपडपट्टी नव्हती. घरांना नावं नसली तरी इथल्या छोट्या छोट्या लेन्स्ना दिलेली फुलांची नावं मात्र फारच आवडून गेली

सर्व सोयींनी युक्त गावे आणि वस्त्या -

               ह्या छोट्याशा देशात सर्व कसं व्यवस्थित पूर्वनियोजित असे. प्रत्येक  छोट्याशा तुरळक वस्तीच्या गावातही शाळा, प्रत्येक गावात सर्व सोयींनी सुसज्ज असे सरकारी हॉस्पिटल, आयुर्वेदिक चिकित्सालय, प्रत्येक गावात फुटबॉल ग्राउंड, वॉकिंग ट्रॅक, सर्व ठिकाणी स्वच्छ टॉयलेटस् ( ही टॉयलेटस् साफ करायला बाहेर सफाई कामगार उपस्थित नसूनही ) माणसांना माणूस म्हणून जगायला लागणार्या सर्व गोष्टी. आमचा मॉरिशयन मित्र विशाल बापू कायम म्हणे, ``आम्ही आमचा देश सुंदर बनवतो. आमच्या देशाचा कोपरा अन् कोपरा सुंदर असावा ह्याची आम्ही काळजी घेतो.'' अगदि खरच होतं ते. देश छोटा असूनही प्रत्येकाला मी मॉरिशियन आहे ह्याचा सार्थ अभिमान होता. प्रत्येकजण रस्ता, टॉयलेट, सार्वजनिक बागा स्वच्छ ठेवण्याची काळजी घेत होता. रोज घराजवळच्या जॉगिग ट्रॅकवर आम्ही जॉगिंगसाठी जात होतो. येथील गावं छोटी असल्याने दुसर्या गावात पोचायला गाडीने 15-20 मिनिटे पुरत. आजूबाजूच्या गावांमधील खेळाची मैदाने शोधता शोधता आम्हाला आमच्या काही भारतीय मित्रांमुळे वाकवा येथील जिमखान्याचा शोध लागला

वाकवाचा पोलीस जिमखाना-

     हे आमच्यासाठी देऊळ होतं. रोज जरी तिथे जायला जमलं नाही तरी ज्यावेळेला जमेल तेंव्हा तिथे जॉजिंग ट्रॅकवर मनमुक्त जॉगिंग करणे हे देवळाला प्रदक्षिणा घातल्यापेक्षाही उत्साहवर्धक असे. हिरवीगार मऊ मऊ हिरवळीची सात फुटबॉल कोर्टस् उलगडून टाकलेली. प्रत्येक पटांगणावर फुटबॉलचा सामना रंगलेला असे. त्यांच्या कडेनी मस्त जॉगिंग ट्रॅक! कडेनी झाडं. ह्या ट्रॅकवर फिरता फिरताच व्यायाम करता येतील अशी सोपी पण सुंदर व्यायामाची लाकडी साधनं ट्रॅकच्या अजुन बाहेरच्या कडेवर बसवलेली होती. मधेच जमिनीपासून तीन साडतीन फुट उंचीवर आडव्या रुंद लाकडी ओंडक्यावर पाठ टेकवून पाठीवर झोपून लोंबकाळत पाठ मोकळी करून घ्यावी, जाता जाता वर टांगलेल्या लोखंडी कड्यांना लोंबकाळून घ्यावं, मुद्दाम रचना केलेल्या नागमोडी अरुंद पण लांबलचक ओणक्यांवरून तोल सांभाळत चालत किंवा पळत जावं. वेगवेगळ्या अडथळ्यांच्या शर्यती पार करत जावं किंवा सरळ एकसंथपणे पळत रहावं. मॉरिशसचे अनेक मॅरॅथॅान रनर्स येथे पळतांना दिसत. ऑलिंम्पिकमधे पदक विजेता रनरही येथे येत असे. पळता पळता  मधेच दमला तर एखादि फुटबॉलची मॅच बघत बसावं. प्यायचं पाणी, टॉयलेट स्वच्छ आणि सुसज्ज! कितीही गर्दी असली तरी पार्किंगला जागा मिळण्याची खात्री! भेळपुरी, पाणीपुरी, कोणाचाही गराडा नाही. आला आहात तर फक्त खेळायचा, व्यायामाचा आनंद घ्या! 

मॉरिशसची स्मृतीचिह्ने -

तेथे येणार्या लोकांना मॉरिशसची आठवण म्हणून घेऊन जाण्यासाठी अनेक मेमेंटोज् बनविले जात. मॉरिशसच्या नकाशाच्या आकाराच्या कीचेन्स, मॉरिशस लिहिलेले किंवा तेथील जागांची नावे लिहीलेले T shirts, मॉरिशसचे मॅप्स किंवा  मॉरिशसची सुंदर निसर्गचित्रे असलेले टेबलमॅटस्, दगडाचे, लाकडाचे डोडो पक्षी (जे खरतर तेथे आज अस्तित्त्वातही नाहीत.) आजपर्यंत बाहेरच्या विविध देशांची नावं आपल्या T-shirt च्या छातीवर मिरवत जाणारे भारतीय मी आपल्याच देशात पाहिले आहेत. भारत ही ज्ञानप्रभेने उजळून निघालेली बिल्वदलासारखी तीन अक्षरं किंवा INDIA ही पंचामृताची पंचाक्षरं आपल्या छातीवर घेऊन फिरणारा एकही माणूस पाहिला नाही. भारत नको असेल तर आपापल्या प्रांतांची महाराष्ट्र, गुजरात, बिहार,तामिळनाडू, ओरिसा, जम्मू-काश्मीर अशी नाव छातीवर नाहीतरी कोणाच्या पाठीवर सुद्धा पाहिली नाहीत. त्याक्षणी मला असं वाटायला लागलं, आपल्या देशातील अगणित सुंदर निसर्गचित्रांचे, कवितांच्या चपखल ओळींचे, मेमेंटो, किचेन्स, T-shirts, टेबलमॅट्स असावे. आपल्याकडच्या फुलांच्या डिझाईनच्या साड्या असाव्यात. जेवता जेवता टेबलमॅटवरच्या भारताच्या नकाशावरची गावं पहात आमच्या बाळांनी जेवावं. वाघ, सिंह, मोर, कमळ ह्या बरोबर आपल्याकडच्या चिंच, आंबा पेरू ह्या झाडांची, फळांची चित्रही त्यांच्या टिफीनच्या डब्यांवर, दप्तरांवर, पडद्यांवर, माऊसपॅडवर, बेडशीटस् आणि बेडकव्हरवर असावीत. चिमणी तिच्या पिलाला घास भरवत आहे असं टेबलमॅटवर रेखाटलेलं एक सुंदरस चित्र माझ्या मनात मला खुणावत होतं. आंब्यांनी  लगडलेल्या झाडाचं प्रिंट असलेला किंवा `आमचा उखाणा ठिया ठिया पिकल्या फळाला बाहेरून बीया' असं काजूचं केशरी फळ आणि त्याच्या खाली लोंबणारा काजू असा T-shirt कोकण भेटीला गेलेल्या प्रवाशांना मिळावा असं वाटत होतं. खांद्यावर मोठा फणस घेऊन येणार्या  प्रवाशांच्या अंगावर फणसाचं चित्र असलेलं एखादं उपरणं असायला काय हरकत आहे? चित्र-विचित्र लेगिंग्जवर मोगरा, पारिजात, बकुळ ह्यांची चित्र का असु नयेत? भारताच्या प्रचंड वैभवाची ओळख मुलांना, भारतीयांना करून देण्यासाठी हे किती छोटे छोटे, साधे, सोपे आणि तरीही भारतीयत्व मनामनात पाझरत ठेवणारे उपाय आहेत. जे सतत दिसतं तेच मनावर ठसतं. मनाच्या वेगाने एक नवीन व्हर्चुअल भारतीय बाजारपेठच मी उघडली. सब कुछ देसी वाली.

रस्ते - 

           मॉरिशसमधील रस्त्यांची आखणी ही विचारात घ्यावी अशी गोष्ट आहे. फ्रेंचांनी रस्ते बनवले असल्याने सर्व रस्ते एकमेकांना समांतर, एकमेकांना काटकोनात  मिळणारे असतात. चौक किंवा जेथे अनेक रस्ते एकत्र मिळत असतील तेथे कुठल्याही सिग्नलशिवाय फक्त एका सर्कलद्वारे रहदारी कशी सुरळीत चालू ठेवता येते हे पाहूनही छान वाटायचे. आपल्या उजव्या बाजूच्या रस्त्याने येणार्या वाहनाला सर्वप्रथम जाऊ द्यायचे एवढा एक छोटासा नियम पाळला की सर्व  रहदारी कशी सुरळीत चालू राही.

        येथे right of way फार कडक रितीने पाळला जातो. मुख्य रस्त्यावरून जाणार्या वाहनांना सर्वप्रथम जाण्याचा अधिकार आहे. मुख्य रस्त्याला एखादा छोटा रस्ता मिळण्यापूर्वी 100 मी. S T O P  अशी मोठी अक्षरे रंगवलेली असत. ( ती पावसाळ्यात वाहून जात नाहीत.) गल्लीचा रस्ता  मुख्य रस्त्याला मिळण्याआधी रस्त्यावर एक पांढर्या रंगाचा पट्टा ओढलेला असे. त्याचा अर्थ डेड स्टॉप.  गाडी तेथेच थांबवायची. हे शाळेपासूनच मुलांना शिकवले जाई आणि त्याची अम्मलबजावणी दक्षतेने होई. चौकाचौकात पिवळ्या रंगाची चौकट असलेले चौकोन आखलेले असत. त्याचा अर्थ `नो व्हेईकल झोन' तेथे कोणीही गाडी थांबवायची नाही. त्यामुळे चौकात सिग्नल असला नसला तरी ट्रॅफिक जॅमचा गोंधळ नसे.

ह्या पिवळ्या चौकटीच्या चौकोनाचा उपयोग इमारतीत सुद्धा केलेला दिसे. इमारतीत असलेल्या कचराकुंडीकडे जाणार्या लोकांना अडथळा होईल अशी गाडी कोणी लावू नये म्हणून तेथेही हा पिवळ्या चौकटींचा चौकोन आखलेला असे. आणि इमारतीत पार्कींगला जागा नाही या सबबीखाली तेथे कोणी गाडी लावत नसे.

 मुख्य रस्त्यावरील गाडीने आपले दिव्यांचे डोळे उघडमिट केले ह्याचा अर्थ ` गप! मागे सरक ' असा नसून `तू आधी जा' असा असे. पहिल्या पहिल्यांदा आम्ही त्याची ही दटावणी आहे असं समजून थांबून राहिलो तर तोही हाताने `तू आधी जा' चा इशारा करत थांबून राही. आम्हीही आमच्या गाडीचे डोळे मिचकावून Thanks  चा इशारा करत पुढे जात असू.

                  मॉरिशचा main motor way आणि काही मुख्य रस्ते सोडले तर बाकीचे रस्ते गल्लीबोळांसारखेच आहेत. हा मुख्य दक्षिणोत्तर जोडणारा मोटर-वे चीनने बांधून दिला होता. सर्व नियमांच अत्यंत काटेकोरपणे पालन केलं गेल्याने, नाकपुडीसारख्या बोळातून सुद्धा वाहनं सहज वेगाने जात असतात. पोर्ट लुई सारख्या राजधानीच्या ठिकाणी वाहनांची गर्दि लक्षात घेऊन दोन-तीन कि.मी. अगोदरच मोठा वाहनतळ बनविला आहे. तेथून पोर्ट लुईला जायला बस सर्व्हिस उत्तम आहे. ह्या उत्कृष्ट बस सेवेवर विसंबून आपल्या महागड्या गाड्या घरी  ठेऊन लोकं आनांदाने बसचा पर्याय स्विकारत. साध्या बसचा प्रवासही सुखकर असे.

    एकदा आम्ही फार रहदारी नसलेल्या रस्त्याने जात होतो. डावीकडे वळायला सिग्नलवर  गाडी थांबवली होती. बराच वेळ झाला पण सिग्नल काही मिळेना. आमचा मॉरिशियन मित्र विशाल बापू आमच्याबरोबरच गाडीत होता. त्याने रस्त्यावर ओढलेल्या पांढर्या पट्ट्याला गाडीच्या चाकांचा स्पर्श होईल अशी गाडी उभी करायला सांगितली. आणि अचानक सिग्नल हिरवा झाला. येथे सेन्सॉर्स बसवले आहेत. पांढर्या पट्ट्याला गाडीच्या चाकांचा स्पर्श होत नाही तो पर्यंत  सिग्नल बदलत नाही. पोलिसांशिवाय लोकं सिग्नल उत्तम पाळत होते

वाहन चालक परवाना विभागातील भ्रष्टाचार  पूर्णपणे बंद करण्यात सरकार यशस्वी झालं होतं. प्रत्येक चालकास परवाना देण्यापूर्वी त्याची कठोर परीक्षा घेतली जाई. त्यामुळेच होणार्या अपघाताच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली होती.

            बहुतेक सर्व रस्ते उत्तम ठेवले आहेत. डांबरी, गुळगुळीत, कुठे खाचखळगे नाहीत, खड्डे तर नाहीच नाहीत. इथे भुरभुर, रिमझिम, रिपरिप, धोऽधो, झोडपून काढणारा मुसळधार  असे पावसाचे सर्व प्रकार वर्षभर झेलूनही हे रस्ते कायम ठणठणीत आणि तंदुरुस्त ठेवायची कला इथल्या म्युन्सिपाल्टीला कशी काय जमली असावी कोण जाणे. एकदा दुपारी आमच्या घरासमोर रस्ता खणायला सुरवात केली.( दोन वर्षात एकदाच घडलेला प्रसंग) आणि हाताततली सर्व कामं सोडून आश्चर्यानी मी बाल्कनीत बघतच उभी राहिले. अत्यंत अद्ययावत उपकरणांनी सर्व कामं एक-दोन तासात करून रस्ता पूर्ववत गुळगुळीत करून सर्व जण गेले सुद्धा. रस्त्याच्या कडेला दगडमातीचा कुठला ढिगाराही ठेवता.

रेडिओ आणि टि.व्ही.-

             एकदा सकाळी गाडीने जात असता अचानक गाडीतल्या रेडिओवर `विडा घ्या हो नारायणा - - ' ह्या शब्दांनी आम्हाला चकित करून टाकलं. भारतात असतांना इतका सुंदर `गोविंद' विडा  ऐकला नव्हता. नंतर अशा अनेक जुन्या जुन्या माहित नसलेल्या भारतीय रचनांनी आम्हाला मोहित केलं. रेडिओवर पंतप्रधान आज कोणाच्या घरी गेले आणि कोणाचा सत्कार केला हे  सांगत. ह्या सर्व सत्कारमूर्तींचा त्यादिवशी शंभरावा वाढदिवस असे. येथे शंभरी गाठणारे खूप जण असतात. येथील हवा, पाण्याचे ते वरदान असावे. त्याचप्रमाणे कोणी गेलं की त्यांची नावंही रेडिओ वर सांगितली जात. त्यांची नावं ऐकून लोक त्यांच्या घरी त्यांना भेटायला जात किंवा त्याच्या क्रिया कर्मास जात.

                मॉरिशसमधे असलेलं भाषा वैविध्य लक्षात घेऊन मॉरिशस रडिओ आणि TV वर सर्व भाषांना ठराविक वेळ दिला जाई. सर्व भाषांचे उत्तमोत्तम कार्यक्रम त्यावर असत. भारतातील हिंदी, भोजपुरी, तामिळ, तेलगू, मराठी तसेच चिनी, फ्रेंच क्रेऑल अशा सर्व भाषांमधील कार्यक्रम असत. मॉरिशसच्या टिव्हीवर मी जेवढे तेलगुतामिळ, भोजपुरी, चिनी, मराठी आणि हिंदी जुने सिनेमे पाहिले तेवढे मी भारतातही पाहिले नाही. रोज कुठल्या ना कुठल्या भाषेचा सिनेमा असे.  इतर भाषातील सिनेमे आणि मालिका आम्ही मनोभावे बघत असू. त्यांच्याखाली सबटायटल्स असल्याने सर्वजण त्याचा आनंद घेऊ शकत. आम्ही तेलगु, तामिळ मालिका जशा आनंदाने पहायचो तशी दिलीप प्रभावळकरांची `तात्या टिपरे' ही मराठी  मालिका मॉरिशसच्या लोकांनाही तेंव्हा वेड लावून गेली. त्यातील चौकोनी सुंदर कुटुंब हे सगळ्यांच्याच मनातील आदर्श कुटुंब होतं. तात्या टिपरे हे आजोबा घराघरातील लाडके आजोबा झाले होते. तुमच्याकडे T.V.  असो वा नसो प्रत्येकाच्या घरी T.V.असणारच हे गृहीत धरून प्रत्येकाला दरमहा  शासनाला 100 रु कर द्यावा लागे. तो वीजबीलातून वळता करून घेतला जाई.

      मॉरिशसमधे रेडिओ आणि T.V. कडे वळायचं अजून एक कारण होतं ते म्हणजे, - भारतातून येतांना कमीत कमी वजनाच्या हिशोबाने मी दोनच पुस्तकं घेऊन आले होते. एक संस्कृत स्तोत्रांचं आणि दुसरं म्हणजे पंचतंत्रची मूळ संस्कृत हिंदी अर्थासह आवृत्ती. गणपती, नवरात्र इत्यादि सणांना आपल्याला एखादं स्तोत्र वाचता यावं म्हणून स्तोत्रांचं पुस्तक आणलं होत तर बरीच वर्षे घरात असूनही वाचलच नाही म्हणून पंचतंत्र. तेथील पुस्तकं आणि वृत्तपत्र आहेतच जोडीला असा साधा विचार पूर्णच चकवून गेला. फ्रेंचने माझी विकेट घेतली. संस्कृत वाचण्यापुरतं येत होतं. रोज एक  नवीन स्तोत्र वाचायच आणि रोज पंचतंत्राची एक गोष्ट तरी वाचायचीच असं ठरवलं. काही दिवसात ही दोन पुस्तकं म्हणजे माझी एकदम जीवाभावाचीच होऊन गेली. कित्येक स्तोत्रे त्यांच्या वृत्तांमुळे आणि यमक अनुप्रासांमुळे मला इतकी आवडायला लागली की काही स्तोत्रं स्वयंपाक आणि इस्त्री अशी सरावाची काम करतांना गुणगुणता गुणगुणता पाठही होऊन गेली. तर पंचतंत्रातील अद्भुत नीती आणि तत्वज्ञानाने भारून जायला झालं. आपण हे पुस्तक लहान मुलांसाठी आहे असं समजून केवढं दुर्लक्ष केलं याचं वाईट वाटलं. आणि ह्या दोन्ही पुस्तकांना मराठीत आणायचच हा संकल्प मनात रुजला. नंतर काही प्रमाणात मी ते काम हातीही घेतलं.

----------------------------------------------------------------

 ( पुढचे प्रकरण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. ) 

देखण्या समुद्र किनार्यांचा देश -

खाली  दिलेल्या प्रकरणाच्या नंबरवर क्लिक केल्यास ते प्रकरण उघडेल

 0  1   3  4  5  6  7  8  9  10   11 

12  13  14  15  16  17  18  19  20  21.

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -