8 बागबगीचांचा देश -
8 बागबगीचांचा देश - ( Country of Gardens)
कॅसेला बर्ड पार्क -
मुंबईच्या बागांमधे जातांना सर्वत्र एकमेव दृश्य मनाला त्रास देत असतं. अनेक काकमित्र आणि कुत्रमित्र यानी त्याच्या पिशव्या पिशव्या भरून आणलेला आणि बगीचात मनात येईल त्या ठिकाणी पसरलेला फाफडा, ब्रेडचा चुरा वा घरी उरलेला तत्सम अन्न प्रकार. ते खाण्यासाठी अधीर झालेल्या काकांचे थवे. पुण्यार्जनासाठी बागाबागाच्या दरवाजात, बाहेर, बागांमधे ठिकठिकाणी वर्तमानपत्राच्या चिटोर्यावर ओतला जाणारा दूध-भात. पार्ले जी खायला चटावलेल्या बेवारस तट्ट पोटांच्या कुत्र्यांच्या झुंडी. पसापसा मका वा `कबुतरांची ज्वारी' नावाचं रोगट धान्य भूतदया म्हणून रस्त्यावर कुठेही ओतल्यावर पिसांचा धुराळा उडवत गोळा होणारी मुर्दाड कबुतरं. मारी किंवा मका कुरतडुन रोगट झालेल्या खारी. ते कमी की काय म्हणून माणसांनी जे जे टाकणं शक्य असेल ते ते टाकून केलेली घाण.
ह्याच रम्य प्राणी आणि पक्षी जीवनाचा रोज जवळुन परिचय असल्याने मॉरिशची कॅसेला पार्क मला अद्भुतच वाटायला लागली. इतकं रमणीय उद्यान पाहून खर तर गहिवरुन येणच बाकी होत. तमाम पक्षीप्रेमी आणि प्राणीप्रेमी प्रेमातच पडतील अशी ही बाग! मॉरिशसच्या पश्चिम किनार्यावर फ्लिक आँ फ्लॅक ( Flic en Flac) आणि तमारँ Tamarin ह्यांच्यामध्ये पसरलेला 14 हेक्टरचा भूखंड ह्या सुंदर बागेने व्यापला आहे. अत्यंत काळजीपूर्वक ज्यांचं आरोग्य जपल आहे असे शेकडो प्रकारचे हजारो निरामय आनंदी, सुंदर पक्षी, अत्यंत निरोगी, चपळ, आनंदी, प्राणी. पक्षी, प्राण्यांना रहाण्यासाठी बनवलेले हवेशीर प्रशस्त निवारे, चहुकडे हिरवीगार हिरवळ, पाण्याचे झरे, हिरवीगार झाडी. बघावं तिथे स्वच्छता. आणि `फुले तोडू नका' अशा पाट्यांशिवाय फुललेल्या अनेक देशी विदेशी फुलांचे ताटवे. `आम्ही आमच्या देशाचा कोपरान् कोपरा सुंदर ठेवतो' असे प्रत्येक मॉरिशियन नागरिकाचे निःश्वास जणु मॉरिशसमधे कुठल्याही ठिकाणी गेल्यावर ऐकू येत असतात. स्वच्छतेचा सूर्य उगवला की सौंदर्याची अनेक किरणं त्याच्यासोबतच सर्वत्र फाकली जातात हेच खरं. बागेची शोभा वाढवणारी रेस्टॉरंट्स, पश्चिम किनार्याचं मनोरम सागरदर्शन घडवणार्या खास जागा, उत्तम बसायची सोय. शिवाय बागेची माहिती देणार्या सहली. सुंदर मॉरिशच्या सौंदर्यात भर घालणार्या या बागा. तिकिट काढून सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचवाजेपर्यंत मनसोक्त कितीही फिरा.
प्रवेश करताच फार ऊंच न उडणारे कोंबडा, बदकं, मोर, वर्गातले अनेक पक्षी त्यांच्या चिल्यापिल्यांसह आजुबाजूने तुमच्यासोबत चालत असतात.
तोकडा स्कर्ट घालून लांबसडक सुंदर पायांच्या मुलीने बॅले करावा तसं तिच्या लांब पायांशी स्पर्धा करणारं शहामृग त्याची मान लांब करून मधेच तुम्हाला त्याच्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी न्याहाळत जातं. त्याचा बॅलेला लाजवणारा पदन्यास बघता बघता सर्व विसरायला होतं.
लहान असतांना `नाचरे मोरा आंब्याच्या वनात' असं म्हणत आपणच आपले दोन हात पिसार्यासारखे पसरून शाळेच्या स्टेजवर नाचायला लागायचं. `नाचरे मोरा आंब्याच्या वनात' अशी कितीही आर्जव केली तरी कुठुन कधी मोर डोकावला नव्हता. आमचे लहान अशक्त पाय मात्र त्या गाण्यावर नाचून नाचून दमून जात असत. आपण आपल्याच मनमोराचा पिसारा फुलवुन आनंदी व्हायला लागायचं. इथे मात्र आपल्या कुटुंब कबिल्याला घेऊन जाणारा, पाचू आणि नीलमचा वर्ख गळ्यावर लावलेला एखादा कंठनील मोर त्याचा रेशमी पिसारा ऐटित पेलत जात असतांना तुमच्या पुढ्यात थांबून अख्खा पिसारा थरथरवत अचानक उलगडून दाखवतो. जपानी पंखा परत मिटवून टाकावा तसा परत पिसारा बंद करुन काही बाही टिपायलाही लागतो.
ह्या पक्षांबरोबर सलगी करायची संधीही पक्षीतज्ञांच्या सोबत तुम्हाला मिळते. हातावर येऊन बसणारा काककुवा, हातावरून चालत थेट तुमच्या खांद्यावर येऊन बसतो. तुमच्या हातुन खाउही खातो.
अत्यंत काळजीने आणि अतीव प्रेमाने वाढवलेले नऊ सिंह आणि चार चित्ते इतके माणसाळले आहेत की तुम्ही त्यांना अगदि जवळुन सुद्धा पाहू शकता. त्यांनी सांगितलेली सर्व काळजी घेऊन तुम्ही ह्या प्राण्यांसोबत हिंडू फिरू शकता. त्यांच्या अंगावरून हात फिरवू शकता आणि त्यांच्या बरोबर फोटोही घेऊ शकता. अर्थात ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुमचा खिसा भोक पडेपर्यंत रिकामाही करायची तयारी पाहिजे. झेब्रा, माकडं सर्वच प्राणी निरोगी धष्टपुष्ट, आनंदी पाहून आपलाही आनंद द्विगुणीतच होतो. झेब्रांचे कळप ही हिरवळीवर हिंडत असतात. मॉरिशसमधील भली मोठी कासवं हा सर्वांनाच नोंद घ्यायला लावणारा प्राणी सर्वसाधारणपणे सर्व बागांमधे उपस्थित असतो.
राजहंसांसाठी एक प्रशस्त आणि स्वच्छ पारदर्शक सरोवर आणि आजुबाजुला हिरवीगार हिरवळ. हिरवळीच्या भोवती उच उंच झाडं. ह्या सरोवरात असंख्य हंस, राजहंस आणि इतर पाणपक्षी विहार करत असतात. काही हंस, पाणपक्षी बाहेरच्या हिरवळीवर विश्राम करतांना दिसतात.
ज्यांना साहसाची आवड आहे त्यांच्यासाठी इथेही कड्यांवर दोराच्या सहाय्याने चढणे, चढणे, दोरीच्या पुलावरून दरीपार जाणे, अशी Rando Tour असते.
ला
व्हॅनील, (
LA VANILLE CROCODILE FARM)
मगरपट्टा -
ही अशीच सुंदर जागा. खरतर
पालीच्या मोठ्या बहिणींना आपणहून भेटायला जायची माझी काही फार इच्छा नव्हती. कारण
आम्हा सर्वांच्याच घरी भरपूर पाली होत्या. मॉरिशस बाकी कितीही सुंदर असलं तरी फुटपाथवर अचानक सैरावैरा
धावणारी आणि बाहेरून घरात उडून येणारी मोठी झुरळं, घरी
रात्रभर मोठ्या मोठ्याने चुकचुक करत घरभर एकमेकींच्या पाठीमागे भान हरपून पळणार्या मोठ्या मोठ्या पाली मी
पहिल्यांदा इथेच पाहिल्या. पाल चुकचुकली असा वाक्प्रचार भले भारतात असेल पण त्यांचा
रात्री झोपेतूनही जाग आणणारा, एवढा मोठा आवाज
मी पहिल्यांदाच इथे ऐकला.
पाली, मगरी, सुसरी ह्या कुरूप प्राण्यांबद्दल माझ्या मनात कुठलीच
आत्मीयता नाही. सुसरी मगरी बहिणी बहिणी. दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने मगरबाई त्यातल्या
त्यात सुंदर. तिचा लांबलचक तोंडावळा तर सुसरबाईंचा जरा बसका आणि रुंद. दात
तोंडातून बाहेर आलेले. `सुसरीबाई तुझी पाठ मऊ' म्हणतांना कोणी तिच्या पाठीवरून हात फिरवून
पाहिला असण्याची शक्यताही कमीच. इथे मात्र फुटभर छोट्याशा मगरीच्या पिलाला हातात घेऊन
तुम्ही फोटो काढू शकता. तिचं करवती दातांचं तोंड मात्र रबर लावून बंद केलेलं. इवलीशी
पोरटी चावली तर तुकडा पाडते म्हणे. आपल्या कुठल्या पूर्वजाला नक्राश्रुंची कल्पना सुचली कोण
जाणे पण इतकी मुस्कटदाबी करूनही खरोखरच तिच्या डोळ्यात अश्रु नव्हते. रडण्याची
त्यांची कुठलीतरी दुसरी रीत असावी.
नाव जरी क्रोकोडाईल पार्क असलं
तरी चिली आईस्क्रीमधे मिरची जेवढ्या प्रमाणात चांगली वाटेल तेवढ्याच प्रमाणात ह्या
crocodile park मधे मगरी आणि सुसरी आहेत. बाकी
बाग कृत्रिम रीत्या बनवूनही खरोखरच नैसर्गिक सुंदर असावी इतकी सुंदर आहे. त्यातले
झरे, जंगल, हिरवळ हिरवळीवर रांगणारी भली मोठी कासवं, कासवांचे
विविध प्रकार पाहता पाहता तुम्ही त्यांच्यात गुंतुन जाता. पाण्याच्या
एका टँकमधे ठेवलेली 10-12 छोटी पाण-कासवं टँकच्या एका कोपर्यात उतरंड रचावी तशी झोपली होती. एकच
कासवं जाग होतं. टँकमधे एक चक्कर मारून आलं की त्या सर्व झोपलेल्या
कासवांच्या उतरंडी समोर जाऊन आपले पुढचे चपटे हात त्या प्रत्येकाच्या तोंडासमोर
फटकफटक पाण्यावर आपटत एखादया लहान
मुलाप्रमाणे खोड्या काढत होतं. त्याचं दरवेळेला पाण्यात एक चक्कर मारण आणि उतरंडीसमोर
वरपासून खालपर्यंत आणि परत खालपासून वरपर्यंत प्रत्येकासमोर पाण्यावर पाय
आपटणं आणि खोड्या काढणं बराच वेळ चालू
होतं. हिरवळीवर
चालणार्या मोठ्या मोठ्या कासवांवर
लहानमुलं बसत होती. त्यांना पाठीवर घेऊन तीही लुटुलुटु चालली होती. मधेच
कोणी इकडचा तिकडचा तोडून आणलेला झाडपालाही आनंदाने खात होती. कुठलेच
प्राणी दुःखी कष्टी वाटत नव्हते.
पँम्प्लेमूस ( Pamplemousses) ची SSR Botanical Garden. -
इंद्राचं नंदनवन कसं असेल ह्याची मनात कल्पना करायची असेल तर मॅरिशसमधल्या बागां आणि बगिचे बघायला पाहिजेत. आम्ही आमच्या देशाचा कोपरान् कोपरा सुंदर बनवितो हे ब्रीदवाक्य घेऊन वावरणार्या समस्त मॉरिशियन लोकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. ते सतत त्यांची तुलना सिंगापूरशी करत. आम्हाला आमचा देश सिंगापूरहून छान बनवायचा आहे; ह्या ध्येयाने ते झपाटले होते.
अशीच सुंदर बाग म्हणजे पँम्प्लेमूस ( Pamplemousses) ची SSR Botanical Garden. काय सुंदर दरवाजा आहे मनाने कुठे तरी दाद दिली. ह्या बागेची सफर करायची असेल तर दरवाजातच उभ्या असलेल्या गाईडस् पैकी एखाद्याला घेऊन गेलं पाहिजे. ही बाग गाईड शिवाय कळतच नाही. पूर्ण अंधार झाला की शेजारची गोष्टही दिसत नाही तशी गाईडविना ही बागही कळत नाही.
``आत्ता ज्या दरवाजाने आपण आत आला त्या दरवाजानेच सुरवात करू या. पाहिल्या पाहिल्याच तुम्हाला तो नक्कीच आवडला असणार. हा विस्तीर्ण दरवाजा जेंव्हा पहिल्यांदा तयार झाला तेंव्हा लंडन येथील क्रिस्टल पॅलेस (crystal palace) येथे 1862 मधे भरलेल्या आंतर्राष्ट्रीय प्रदर्शनात त्याने बक्षिस मिळवलं होतं.'' जी गोष्ट चांगली वाटते, चित्ताकर्षक असते, ती तशी असण्यासाठी खूप कष्ट घेतलेले असतात. हा नेहमीचा अनुभव आहे. आज माझ्या भारतातून आलेल्या मैत्रीणींसोबत मी येथे आले होते. सार्या गर्दीला बरोबर घेऊन त्यांना सतत उत्साह येईल, त्यांच लक्ष थोडही विचलीत होणार नाही, एक मिनिटभरही कंटाळा येणार नाही, असं सतत बोलत राहणार्या गाईडबद्दल मला कायम एक कुतुहल वाटत राहिलं आहे. गाईड ज्ञानाचं दिव्य अंजन डोळ्यात घालून नवीन दृष्टी देणार्या गुरूचं काम करतो. गर्दित ओळखू न येणारा नट स्टेजवर प्रकाशझोतात उभा राहिला की लगेच डोळ्यात भरतो. त्याच्या भोवती त्याच्या भूमिकेचं वलय निर्माण होतं. तशी झाडांच्या भाऊगर्दीत सारखीच वाटणारी झाडं गाईडच्या माहितीच्या प्रकाश झोतात आली की उजळून निघत. गाईडचं सतत माहिती देणं हे ह्या प्रकाशझोताचं काम करतं. `` हा बघा इलेफंट इअर पाम '' जाता जाता पाण्यात उगवलेली भल्यामोठ्या पानाची केळीसारखी वाढलेली झाडं पाहतांना त्याची मोठी पानं खरोखरच हत्तीच्या कानांसारखी आहेत हे पटलं. जाता जाता पानांमधे लपलेलं त्याचं फिकं हिरवट पांढरट शोभेच्या आळूला येतं तसं फूल दाखवायला तो विसरला नाही. ``हा क्रोकोडाईल पाम! ह्याचं खोड मगरीच्या अंगासारखं दिसतं बघा.'' हो खरच की इतकावेळ त्याच्या खोडाकडे पाहिलच नव्हतं. ``हा बघा इलेफंट फीट पाम.'' त्याचं खोड पाहतांना खरोखरच हत्तीनी जमिनीवर पाय ठेवल्यासारखा दिसत होता. आपल्याला निरोगी डोळे आहेत म्हणून आपण सगळं पाहू शकतोच असं नाही. एबनी, महोगनी, लतानिया, पँडानस, आणि पूर्वी न पाहिलेलीही अनेक झाडं दाखवत दाखवत तो आम्हाला काही झुडपांकडे घेऊन गेला. झाडांबद्दल समोरच्याचं कुतुहल इतक्या थोड्या वेळात जागृत करून ते टिकवून ठेवणं ही मोठीच कला आहे. ``ह्या झाडाच्या पानाला हात लावून पहा आणि तुम्हीच सांगा ह्याचं नाव काय असेल.'' त्याची पानं आपल्या पारिजातकासारखी किंवा गायीच्या जीभे सारखी खरखरीत होती. ``ह्याला काय नाव देणार?'' सगळे विचार करत असतांना त्यानी नाव सांगितलं, mother in law's tongue. '' हा ऽ हा ऽ हा एकच हशा पिकला. काही नातेसंबंध जगभर एकसारखेच कडू किंवा गोड असतात . सासू येणार म्हणून घर साफसूफ करणारी माझी ब्राझीलची मैत्रीण मला आठवली. तिचा नवरा आई येणार म्हणून स्माइली सारखा मुखचंद्रमा घेऊन फिरत होता तर स्माईलीची वरच्या दिशेने वळलेली ओठांची रेघ खालच्या दिशेने वाकवून पुढचे पंधरा दिवस ती वागत होती. mother in law's tongue च्या शेजारच्याच झाडाच्या पानाला हात लावायला सांगताच सगळे पानं कुरवाळायला लागले. हे पान मात्र एकदम मखमल मऊ. ``father in law's tongue.'' उत्साहाने आम्ही फिरत होतो. समोर पाहिलं का? एक पामचं मेलेलं झाडं दिसतय? त्याच्या बोटाच्या दिशेकडे सगळ्यांचे डोळे. त्याला वरती बघा खूप मोठा फुलोरा येऊन गेलेला दिसतोय. ``हं ऽ ऽ हं!'' - आम्ही. ``तो तालिपॉट पाम बर का.
साठ वर्षांनी त्याला असा भला मोठ्ठा जवळ जवळ 20-25 फुटी फुलोरा येतो. एकाच दांड्याला खूप फुलं लागतात. फुलांची फळ व्हायला लागली की हे झाड मरतं. आयुष्यात एकदाच फुल येतात त्याला.'' मेलेल्या झाडालाही आपल्या कॉमेंट्रीने जिवंत करायची कला गाईडजवळ होती. हे बुढा ट्री. झाड पिंपळाचं दिसत होतं. पानं जरा छोटी होती. पानाची पुढे लांबलचक होत जाणारी रेघही आखुड होती. ``ह्या झाडाखाली गौतम बुद्धाला ज्ञान झालं ना म्हणून हे बुढा ( बुद्धाचं झाड) ट्री. आम्ही गयेला असलेल्या बुढा ट्रीची फांदी लावून हे झाड आलं आहे.'' झाडाची एक फांदी 30-40 फूट लांबच लांब वाढली होती. ही जाडजूड लांब फांदी मधे तुटली होती. पण तुटलेल्या भागावर लगेच सिमेंट लावून लिंपल्यासारखं दिसत होतं. ``ह्याला सिमेंट का लावलय?'' नाही नाही ते सिमेंट नाही हे झाड मधेच तुटल्याने त्याला काही रोगराई होऊ नये म्हणून त्याच्यावर खास औषधांचा लेप लावला आहे. झाडालाही केलेली मलमपट्टी पाहून आम्ही आमच्या देशाची प्रत्येक गोष्ट सुंदर बनवतो हे वेगळं सांगायला लागत नव्हतं. मधेच 25- 30 नारळाची झाडं. उभी नाहीत चक्क जमीनीवर झोपलेली. ``आमचा देश वादळांचा. एकदा आलेल्या वादळात ही सर्व झाडं साफ कोलमडली. त्यांना उभं केलं असतं तर त्यांची मुळं दुखावली असती. आम्ही त्यांची विशेष काळजी घेऊन त्यांना ह्याच आडव्या झोपलेल्या अवस्थेत जिवंत ठेवलं.'' आजही ती घेतलेल्या काळजीला प्रतिसाद देऊन तेवढीच आनंदी दिसत होती. पाचशेपेक्षा जास्त प्रकारची झाडं विविध देशातून आणून त्यांची उत्तम काळजी घेतली होती. दोनशे अडिचशे प्रकारचे पाम, अनेक प्रकारची कमळं, आणि अनेक झाडं. ``हा बाऊबाबचा वृक्ष!'' ( गोरखचिंच) प्रचंड खोडाचा पसारा आणि वरती त्यामानानी छोटासा फांद्या-पान पसारा. आम्ही एका ओळीत पाचसहा जणं उभे राहिलो तरी झाडाचं खोड स्टेजवरच्या पडद्यासारखी विस्तृत बॅकग्राऊंड तयार करत होतं. पाच सहा लोकांनी मिठी मारूनही त्याचा विस्तृत बुंधा कवेत येत नव्हता. ``हे कापराचं झाडं.'' त्याची पानं चुरून नाकाला लावून हुंगतांना कापराच्या वासाने सारेच सुखावले. ``जाळी लावून बंद केलेल्या भागामधे ही सगळी मसाल्याची झाडं बर का. खाली वाकून जमिनीवर पडलेलं एक वाळकं पान चुरून त्यानी सगळ्यांच्या नाकाला लावलं. बघा ओळखू येतो का वास? तमालपत्र? - -लवंग? - -मिरी? --- नीट लक्षात का येत नाही? ``हा `ऑल स्पाईस' चा वास आहे. All in one.'' ते सगळ्या झाडांच्या मधे झाडं दिसतय बघा. त्याला छोटी छोटी फळं लागलेली दिसतायत. - -'' झाडाच्या फांदीवरून प्रथमेची रेघेसारखी चंद्रकोर दिसल्यासारखे आम्हीही ``दिसलं दिसलं!!! फळ आलेलं झाड दिसलं'' म्हणत होतो. ते झाड जायफळाचं. 28 वर्षांनी जायफळं येतात त्याला. मग ते झाड मरतं का? एका पाश्चिमात्याचा प्रश्न . नाही नाही. अठ्ठावीस वर्षांनंतर त्याला दर वर्षी फळं येतात. ते ऊंच झाड सिनॅमोन, दालचीनीचं. त्याची साल म्हणजेच दालचिनी! Oh! I love cinamone bread ! आमच्या गटातील त्या गोर्या तरुणाची प्रतिक्रिया. आम्ही चालत चालत कमळाच्या तळ्यापाशी आलो होतो. भल्यामोठ्या पांढर्या शुभ्र , पिवळ्या, लाल कमळांनी तळी गच्च भरली होती. त्यांच्या फुलांच्या रंगाप्रमाणेच हिरव्या पानांमधेही तो रंग हलकेच उतरला होता जणु. वेगवेगळ्या आकाराच्या , रंगांच्या पानांनी तळं भरून गेलं होतं. फुलांनी फुललं होतं. पंजे एकाला एक जुळवून ठेऊन फुगवल्यासारख्या उमलण्यासाठी सज्ज झालेल्या कमळाच्या कळ्या टपोर्या दिसत होत्या. आता ह्या बागेचं एक विशेष मी तुम्हाला दाखवणार आहे. आम्ही चालत चालत एका तळ्यापाशी पोचलो. पाण्यावर तीन साडेतीन चार फुटी व्यासाची ताटासारखी गोल गोल पानं तरंगत होती. ही Giant Amazon water lily. बगळ्यांसारखे काही पाणपक्षी आरामात ह्या पानावरून त्या पानावर चालत होते. नवीन पानं देठाच्या मध्यापर्यंत दोन्ही बाजूनी गुंडाळून ठेवल्यासारखी दिसत होती. दोन्ही बाजूची गुंडाळी उघडलेली नवीन कोरी पानं चमकदार लालसर हृदयाकृती. छोट्या `पंट’ होड्यांसारखी तरंगत होती. ह्या छोट्या पानांचं तीन फूट व्यासाच्या पानात रूपांतर व्हायला महिना तरी लागतो. त्याच्या मोठ्या मोठ्या गोबर्या कळ्या पाण्याबाहेर मान काढून डोकावत होत्या. पांढरी शुभ्र कमळं नुकती आजच उमलली होती. उमलेली पांढरी कमळं दुसर्या दिवशी फिकट गुलाबी रंगाची होतात. झाडं बघतांना कंटाळा पळून गेला. कितीवेळ चालत होतो तेही जाणवलं नाही. ह्या इथे शिवसागर रामगुलाम यांची समाधी आहे. कुठल्याही देशाचे मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती आले तर ते येथे येऊन आदरांजली वाहतात. त्यांच्या हस्ते येथे वृक्षारोपण होते. आम्ही आपले पूर्व पंतप्रधान राजीव गांधी, नरसिंहराव, अटलबिहारी बाजपेयी यांनी लावलेली झाडं पहात होतो.
जेंव्हा डच लोकांचा अम्मल या बेटावर होता तेंव्हा त्यांचा गव्हर्नर `माहे द लँबुर्दोन' येथे रहायचा. त्याने येथे आवश्यक ताजी भाजी आणि मसाल्याची झाडं लावली. बेटावर आणलेल्या शेळ्यामेंढ्यांना चारा मिळावा म्हणून आजुबाजूची अजून जमीन ह्या घराला जोडण्यात आली. त्यांच्या चारापाण्याची सोय झाली. नंतर फ्रेंच horticulturist `पिअर पॉव्हर' इथे आल्यावर ह्या 60 एकर जागेचा विकास एका सुंदर बगिचात करण्यात आला. फ्रेंचांनी 1760 मधे देशोदेशातून आणलेले अनेक पाम, भारत आणि अनेक देशातून आणलेली उंच ,घनदाट वढणारी झाडे, मसाल्यांची झाडे ह्यांनी हा बगीचा सजला. आजही शंभर वर्षांहून जुनी अनेक झाडं येथे दिमाखात उभी आहेत.
ह्या बागेत जाळीने बंदस्त केलेल्या जागेत हरणं, कासवं ठेवलेली आहेत.
बागेचा निरोप घेणंही आनंददायक आहे. बाहेरच्या स्टॉल्सवर मिळणारे मॉरिशियन तिखट-मीठ, चिंचेचं पाणी घातलेले अननस मैत्रीणींच्या हातात दिल्यावर लहान मुलींसारख्या उत्साहाने खिदळत आम्ही घरी पोचलो.
---------------------------------------------------------
( पुढचे प्रकरण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. )
खाली दिलेल्या प्रकरणाच्या नंबरवर क्लिक केल्यास ते प्रकरण उघडेल
Comments
Post a Comment