2 Hotel Gold Crest
2 Hotel Gold Crest
हॉटेल गोल्डक्रेस्ट
सें जाँ (Saint Jean) रस्त्यावर भर बाजारात उभं असलेलं हॉटेल! जादूची गाडी पोर्च मधे थांबली. इथेच आमची तात्पुरती रहायची सोय केली होती. बहुतेक सारे भारतीय, समुद्रकाठच्या एकाकी हॉटेल्स पेक्षा येथे राहणेच पसंत करतात. मलाही कल्पना काही वाईट वाटली नाही. समुद्राच्या किनार्यावर मासळीसारखं एकाकी वाळत पडण्यापेक्षा बाजारात विंडो शॉपिंगला बरेच तास मिळणार होते. प्रवीण ऑफिसला गेल्यावर काय करायचं प्रश्न नव्हता. प्रवीणना ऑफिसला जायचं होतं. “चल चल लौकर आटोप! नाश्ता करून घेऊ” घाई करत होते. पटकन एक अघोळ मारून कपडे बदलून डायनिंग हॉलमधे गेले. अमेरिकेच्या अनुभवानी जे व्हेजिटेरिअन म्हणून पुढे येईल ते पोटात घालायच्या तयारीनीशी गेले होते. पण इथे चक्क आनंददायक प्रकार होता. सालं काढलेल्या संत्र्या मोसंब्याच्या गोल गोल चकत्या, कलिंगड, खरबूज, सफरचंदाच्या फोडी, वेगवेगळ्या फळांच्या रसांनी भरून ठेवलेले काचेचे जार, स्टॉबेरी योगर्ट, वेगवेगळे ब्रेड, पराठे, छोले, पिवळ्या रंगाच्या बीन्सची राजमाप्रमाणे
स्वादिष्ट उसळ, अंडी दूध, कॉर्न फ्लेक्स, सँडविचेस- - -! विमानातल्या तथाकथित `व्हेजिटेरियन’ नंतर हा प्रकार फारच सुखदायक वाटला. आजूबाजूच्या टेबलांवरही भारतीय चेहरे बसलेले दिसत होते. पलिकडच्या टेबलांवरून डोळे आम्हालाच न्याहाळत होते. नजरेची भाषा प्रत्येकालाच उमजली. आणि थोड्याच वेळात सारेच एकमेकांपाशी आले. ``मी कवात्रा'', ``मी श्रीनिवासन्'' ``मी हिरेमठ'',``मी लक्ष्मी नारायण़'', ``मी दीक्षित'' भारतीयांची एक गोलमेज परिषदच भरली. ``ही माझी पत्नी अनुराधा श्रीनिवासन्!'' ``मी अरुंधती''. पहिल्याच दिवशी एक मैत्रीणही मिळाली. मी खूश झाले. ह्या सार्या भारतीयांची मॉरिशस सरकारने त्यांच्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या विभागात सल्लागार म्हणुन निवड केली होती. सव्वाआठच्या ठोक्याला नवरे कामाला गेल्यावर आम्ही दोघी भटकायला मोकळ्याच होतो. तयार व्हायला दोघी आपापल्या खोल्यांमधे गेलो.
करुणा -
``नमस्ते मादाम, मैं करूणा हूँ । आप कैसी हैं? आपकी यात्रा कैसी हुई? मुझे भारतीय लोग बहुत पसंद हैं।'' छगन कमळ बघ. विमल गगन बघ. असं पहिलीचं छापिल पुस्तक वाचल्यासारखी करुणा बोलत होती. करुणा बेड्स लावत होती. ``अरे वा तुझं नाव तर छान आहे. हिंदी पण छान बोलतेस.'' ``हाँ मादाम मैं हिंडू हूँ। (हिंदू मधील द चा झुकाव ड कडेच जास्त होता.) तो हिंडि आनी चाहिऐ नं?'' आपण हिंदू आहोत हे ती किती अभिमानानी सांगत होती! आपण हिंदू आहोत म्हणून आपल्याला हिंदी यायला पाहिजे हा तिचा अट्टाहास मला अवाक् करुन गेला. आम्ही इंग्रजीची टोपी डोक्यवर चढावी म्हणून किती तडफडतो. `साऊथ मुंबई'च्या दुकानांमधे तर काउंटरवरच्या मराठी, हिंदी पोरी `I don't know Maraaathi. Speak in English.' म्हणत माझ्या मराठी बाण्याचा रोज त्रिफळा उडवत होत्या. माझ्या घरी काम करणार्या बाई आणि बाईंची मुलं सुद्धा इंग्रजी येवो किंवा न येवो पण मम्मी पप्पा, थ्यँकू च्या वेडाने झपाटली होती. शाळेत जाणारं प्रत्येक पोर इंग्रजीच्या पावन कुंडात बुचकळून काढलच पाहिजे आणि आयुष्यभर आत मधे पाक न शिरलेल्या चिरोट्यासारखं फक्त सॉरी थँक्यूत निथळत राहिलं पाहिजे ह्या वेडाने भारतात सरकारचे सर्व अधिकारी इरेला पडलेले असतांना इथे भारताच्याही बाहेरची ही मुलगी ``मादाम मैं हिंडू हूँ। तो हिंडि आनी चाहिऐ नं?'' असं तळमळीने सांगत होती. एवढ्या सरळ स्वच्छपणे `मैं हिंडू हूँ ।' हे एक छोटसं वाक्य उच्चारायला आमच्या देशात आम्हाला किती वेळेला आजूबाजूला पहायला लागतं! ``मैं यहाँ के स्कूलमें हिंडी पढाती थी।'' माझी विचारमालिका मधेच तोडत करुणा बोलत होती. भारतीय हिंदीची दिंडी मॉरिशसच्या शाळांपर्यंत पोचवणं नक्कीच सोपं काम नाही ह्याची पहिल्याच दिवशी मला तितकिशी जाणीव झाली नव्हती त्यामुळे तिची ही अशी ` हिंडीकी दिंडी' हॉटेलातच बरी असं वाटून मी तिला विचारलं, ``स्कूलमें पढाना क्यों छोड दिया?'' मला वाटलं तिची `ही अशी' हिंदी शाळेत चालणंही कठीणच आहे त्यामुळे असेल. पण उत्तर वेगळच आलं; ``स्कूलसे यहाँ ज्यादा पैसे मिलते हैं न!'' एकंदर भारतीय आणि मॉरिशन शिक्षकांच्या माथी सारखाच वनवास आहे.
``आपके पटी - -`` ( हं ! बहुधा तिला पती म्हणायच असावं )--काय पऽऽती? दुसर्या क्षणी मी दचकलेच. माझे डोळे विस्फारले गेले. दुसर्या देशात - - ते सुद्धा पती वगैरे म्हणजे फारच झालं. - - ``बहुत सज्जन हैं।'' आता मात्र मला भोवळ आल्यासारखं वाटायला लागलं. आपण इंडियन एअरलाईन्स ऐवजी पुष्पक विमानातून थेट द्वापार युगात तर पोचलो नाही ना? ``आप यहाँ नही थी तो, उन्होने कभी मुझसे गलत व्यवहार नहीं किया''। व्यवहार हा शब्द माझ्या मनातल्या मनात अधोरेखीत झाला. नवर्याच्या बाबतीतला इतका प्रशंसनीय उल्लेख ऐकून, कालच ती `नवरा माझा गुणाचा' सिनेमा तर नाही पाहून आली असं वाटायला लागल. पण एकंदर माझी कळी खुलली खरं! ``का ग ! इथे कोणी तुम्हाला त्रास देतात का?'' ``हाँ मॅडम ये गोरे आते हैं ; वो अकेले है तो, एक रातके लिए कितना पैसा लोगी पूछते हैं। कभी तकलीफ भी देते हैं। दारूका नशा हैं तो बहोत बचना पडता हैं।'' माझं लक्ष तिच्या बेड्स लावण्याकडे होतं बेडस् किती कौशल्यपूर्ण रीतीने लावता येतात ते पहायला छान वाटत होतं.
खोलीला बाल्कनी होती. करुणाची खोली आवरून होईपर्यंत बाल्कनीतून मॉरिशस निरखत उभी राहिले. सगळा भूभाग सपाट. नजरेत भरेल इतका हिरवागार. क्षितिजाला टेकलेलं निळशार आकाश. बर्याच वर्षात असं जमिनीला येऊन मिळालेलं क्षितीज पाहिलं नव्हतं. पर्वतरांगा नव्हत्या पण अधून मधून सह्याद्रिच्या सुळक्यांचे काही भाऊ इकडे येऊन राहिले आहेत असं वाटतं होतं. त्याच निधड्या छातीचे ! ड्युक नोजचे चार पाच भाऊही लांब नाकं सावरत, पोलादी छाती पुढे काढून उभे होते. ढगांनी गर्दी केली होती त्यांच्या डोक्यावर. अधूनमधून उतरत्या कौलाची थोडीशी घरं सोडली तर बहुतेक घरं बंगलेवजा पण धाब्याची. घराघराच्या अंगणातून लिची, आंबा नारळ,पांढरा चाफा जास्वंद डोकावत होती. लिचीची झाडं लिचींनी लगडली होती. ``इतक्या स्वच्छ मॉरिशस मधे झाडांवरती मात्र भरपूर प्लॅस्टिकच्या पिशव्या वार्यानी उडून अडकून का बर बसल्या आहेत?'' ``नहीं! वो लगाया है। रातको फ्रुट बॅट्स आकर सब लिची खा जाते हैं ना! ये हवासे उडते है तो उनमेसे आवाज आती हैं! तो वे डरकर उनके पास नही जाते हैं।'' करुणानी मला पडलेलं कोडं सोडवलं होत. आंब्यांवर आंबे लोंबकाळत होते. त्यांचा आकार आणि रंग मात्र किती वेगळा! लाल मरून रंगाच्या लांबुळक्या कैर्या हिरव्या गार पानांतून उठून दिसत होत्या.
Bank of Baroda
दुसर्या दिवशीच बँकेत joint account काढायचं असल्याने प्रवीणबरोबर मलाही पोर्टलुईला जायचं होतं. ही मॉरिशसची राजधानी. मॉरिशसमधे बँक ऑफ बडोदाची शाखा आहे हे पाहून खूप आनंद झाला. LIC ची भव्य इमारतही सुखावून गेली. बँकेमधील मुलीच्या केबिनमधे छानसं बाळकृष्णाचं चित्र आणि सोबत साईबाबा! भारताबद्दल प्रेम आपुलकी असणारे, हिंदू परंपरा काटेकोर पाळणारे आपले कोणी लागेबांधे भारताबाहेर आहेत हे भारत सोडेपर्यंत माहित नव्हतं. नंतर लक्षात आलं की आपल्या ह्या श्रद्धास्थानांना हॉस्पिटल्समधेही मानाचं स्थान आहे.
Van Market (ला फा)
7 डिसेंबर, पहाटेचे पाच वाजले होते पण केवढं उजाडलं होतं! रात्रभर पाऊस पडत होता आणि अजूनही पडतच होता. खिडकीतून बाहेर नजर टाकली. हॉटेलशेजारी भल्यामोठ्या पटांगणासारखी लांबलचक बरीच मोकळी जागा दिसत होती. ह्या लांबलचक जागेत टेबलांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. दहा पंधरा ओळींमधे टेबलंच टेबलं मांडून ठेवली होती. वर ताडपत्रीची तात्पुरती छपरं केली होती. सकाळी 8 वाजता पाहिलं तर सारा परिसर गजबजून गेला होता.मार्केटच्याबाहेर व्हॅन्सची गर्दी होती. व्हॅन मालक आपापला माल भरलेल्या मोठ्या पिशव्या म्हणा, मोठाल्या वेताच्या टोपल्या, वेताचे हारे भरभरून भाजी फळं उतरवत होता. सर्वजण आपला विकायचा माल व्हॅन्स मधे घेऊन येतात म्हणून याला व्हॅन मार्केट म्हटलं जातं. ही व्हॅन मार्केट म्हणजे मुंबैचा रानडे रोड, पुण्याची तुळशीबाग, नागपूरची सीताबर्डी किंवा दिल्लीचा चांदणी चौक म्हणा! जीवाचं मॉरिशस करायला पुढचे तब्बल दहा दिवस माझ्या हातात होते. एकदा घर मिळालं की हॉटेलमधे आरामशीर ऑर्डर देऊन खायचे दिवस संपुष्टात येणार होते. आज इथला भाजी डे दिसत होता. माझ्यातील सुगृहिणी जागी झाली होती. काय काय भाज्या मिळतात, फळं मिळतात किंवा कसे पहाण्यासाठी चक्कर मारायला बाहेर पडले. सुरवातीलाच मोसंबी,संत्री, केळी,कलिंगड, खरबूज,सफरचंद अशा अनेक फळांची रेलचेल होती. पलिकडून तळणीचे वास येत होते. आपल्याकडील वडापावच्या गाड्यांसदृश वातावरण होतं काकाची टपरी टाईप 5-6 दुकानदार मोठ्या मोठ्या कढयांमधे ‘गातोपिमा’(Gateaux Piment) तळत होते. गातोपिमा हा भारतीय भज्यांचा फ्रेंच अवतार होता. फ्रेंच मधे गातोचा अर्थ आहे केक आणि पिमा म्हणजे मिरची. थोडक्यात मिरचीचं भजं इथे स्वतःला गातोपिमा म्हणवून घेतं. अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत असलेली ही भजी वाटाण्याच्या डाळीच्या पिठाची किंवा वाटाण्याची डाळ भिजत घालून वाटून त्यात मेथीच्या पानांप्रमाणे दिसणार्या एका खास प्रकारची बारीक चिरलेली सॅलडची पान घालून केलेली असतात. मिरची मात्र गंगा,यमुना,सरस्वती च्या त्रिवेणी संगमातील सरस्वती इतकीच गुप्त असते.
आपल्याकडच्या मंडईत गेल्यासारखं वाटत होतं भाजीवाले आपल्या कडील माल खपविण्यासाठी, गिर्हाईकांना आकृष्ट करण्यासाठी,जोरजोरात आरोळया देत होते. `जिस रुपी- - जिस रुपी ' वेन सॅक ,- - -बोंऽझू मादाम! - -मेर्सी - -पाता गा सी '' !!! अशा न कळणार्या शब्दांनी वातावरण भरून गेलं होतं. वेताच्या टोपल्यांमधे टप्पोर्या लाल मरून रंगाच्या लिचिंचे घोस विकायला बसले होते. मॉरिशन दोन रुपयाला एक लिची. भारतीय रुपयांमधे एका लिचीला साडेतीन रुपये. भाजी किलो या परिमाणात न मिळता पौंडात मिळत होती. 35 रुपये (मॉरिशयन) पौंड टोमॅटो, 25 रु पौंड भेंडी, धडकी भरतील असे भाव होते.(2004 सालची गोष्ट आहे.) मी प्रत्येक भाव भारतीय चलनात किती ह्याचा हिशोब करत होते. कुठल्याही नवीन देशाची सवय होईपर्यंत जेटलॅगच्या जोडीने चलनस्थित्यंतरचाही माझ्या मेंदूला काही दिवस सामना करायला लागतो. काही दिवस चलनबदलाचे हिशोब भारतातल्या वीस रु किलो टोमॅटोच्या पार्श्वभूमीवर दोनशे रुपये किलो टोमॅटोंपासून मला दूर ठेवत होते. मग थोड्या दिवसात मेंदू, मन आणि हात सर्वच सरावलं. भारतात परत आल्यावर मात्र दानशूरासाखी पहिले काही दिवस मी कुठलीच घासाघीस न करता अत्यानंदाने खरेदी करून उरलेले दोन रुपये परत न घेता भाजीवाल्याच्याच हातावर ठेऊन आले. महिन्याभराने (पतिदेवांच्या भारतीय चलनातील पगाराचा अंदाज आला आणि ) परत माझी घासाघीस सुरू झाली.
बाजारात थोडं आत प्रवेश केल्यावर तर कोकणात आल्यासारखं वाटायला लागलं. केळींच्या फण्या ,सोनकेळ्यांचे घड टांगून ठेवलेले, मोठाल्या टोपल्यांमधे आंबे विराजमान झाले होते. भल्यामोठ्या काटेरी फणसांनीही हाजेरी लावली होती. आंबा, फणसाचे वास लपत नव्हते. भाजीचे फणस, भले दांडगे लाल भोपळे, पांढरे भोपळे, भेंडी, फ्लॉवर, कोबी, आळूची पानं, नारळ, मिरच्या, कढिलिंब, कोथींबीर, लिंबू बरच काही आपल्यासारखं मिळत होत. प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधे किंवा प्लॅस्टिकच्या छोट्या ट्रेमधे प्लॅस्टिक रॅपरने बंद केलेले खोबर्याचे तुकडे +ओव्याची पान+मिरची+कोथिंबीर अशी चटणीची तयारी दिसत होती. ह्यांच्या जोडीला काही नवीन प्रकारही दिसत होते. मला त्यांची ओळख करून घ्यायला लागणार होती. पडवळाला पाटुल तर वांग्याला लेशु म्हणून संबोधलं जात होतं. पोमदामूर (टोमॅटो), पोमदेतेर ( बटाटे ), शुफेरल (फ्लॉवर) , पिमाँ (मिरची) मी मनाशी पाठ करत होते. शाळेतील पाठांतराची सवय अशीही उपयोगी पडते तर. मॉरिशसच्या पुढच्या दोन वर्षांच्या मुक्कामात मला ही सवय चांगलीच उपयोगी पडली. भले मोठ्ठे कलमी पेरू पाहून मी खूष झाले पण ती शुशु (Chow Chow ) नावाची भाजी आहे कळलं शुशुच्या जोडीला भोपळ्याच्या वेलासारखी दिसणारी पालेभाजी म्हणजे शुशुचे वेल असल्याचं कळलं.
ह्या भाजीच्या नावामुळे माझी एक भारतीय मैत्रीण त्याला हातही लावत नसे. शुशु (Chowchow) ह्या उच्चाराचा आणि त्याच्या स्पेलिंगचा मात्र दुरान्वयानेही संबंध नसल्यासारखा वाटले. भाजी घ्यायला आलेल्या प्रत्येक मॉरिशन माणसाच्या हातातील वेताच्या बास्केटमधून शुशुचे स्प्रिंगांसारखे तण (टेंड्रिल्स) बाहेर डोकावत होते. ह्या भाजीशिवाय इथल्या लोकांचं पान हलत नाही. आणि भाजीही सुरेख होते. येणार्या मॉरिशियन मंडळींच्या हातातील बॅग्ज पाहून मला माझ्या लहानपणीची आठवण झाली.
40-50 वर्षांपूर्वी वेगवेगळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या चपट्या वायरचे गुंडे बाजारात विकत मिळत. बायका ठराविक प्रकारे त्या गुंफत आणि बास्केटस् बनवत. घरटी एकतरी तशी बास्केट असेच. कोथींबीरीच्या जोडीला बारीक पानांचा ओवाही छोट्या गड्ड्या बाधून बसला होता. हा प्रकार आपल्यापेक्षा नवीन होता. भाजीत भाजी मेथीची दिसत नव्हती पण मेथीसारख्या पानाचं सॅलड घेतल्या शिवाय कोणीही पुढे जात नव्हतं. बाहेर तळल्या जाणार्या गातोपिमामधे हीच भाजी होती तर! सॉसच्या बाटल्यांमधे कोल्हापुरी लवंगी मिरचीच्या बहिणी व्हिनेगार मधे घालून ठेवलेल्या होत्या. या खास रॉड्रिग्जच्या! विमानातून येतांना इंडियन ओशनमधे पहिल्यांदा टि.व्ही. वरच्या नकाशात त्या ठिपक्याचा थोडासा परिचय झाला होता. पालेभाजीला भाजी म्हणून संबोधलं जात होतं. भाजीसाठी भाजून दळलेले मसालेही प्लॅस्टिकच्या बंद पिशव्यांमधे मिळत होते. त्यांचा खमंग वास बाहेर दरवळत होता. भाजीवाल्यांच्या आरोळ्यांमधून काही सुपरिचित शब्द ऐकू येत होते. कोथिमिली. भाजी इत्यादी. भाजी विकणारे चेहरे आणि अंगकाठ्या कोकण, बिहार, तामिळनाडूशी नातं सांगणार्या दिसत होत्या. इंग्रजीत मी काहीतरी प्रश्न विचारला त्याला एका मिठ्ठास जिभेच्या हासर्या चेहर्याकडून ``इंडियासे आये हैं
क्या?'' असा प्रतिप्रश्न आला. त्याचे पूर्वज गुजराथी होते असं त्याने सांगितलं. जेनेटिक्समधे डोळे, रंग, नाक, कान इत्यादि ठरविणारे क्रोमोसोमवरील छोटे ठिपके म्हणजे जीन्स चा उल्लेख असतो. पण हासर्या मिठ्ठास स्वभावाचे जीन्स गुजरात पासून दोनशे वर्ष आपली नाळ तोडल्यावरही तेवढेच प्रभावी राहू शकतात हे पाहून मजा वाटली. त्याला ``केम छो'' असं विचारलं असतं तर कदाचित ``मजामा '' असं उत्तरही By default हेरिडिटीमुळे त्याच्या तोंडून येईल असं वाटलं. मासे, सुकट, बोंबिल विकणार्या एका ठेंगण्या ठुसक्या तुडतुडीत म्हातारीकडे बघून वाटलं अल्लाऊद्दीनच्या जीननी अलिबागच्या बाजारातून उचलून तर हिला इथे आणून नाही बसवलं? आता मात्र राहवलं नाही. “काय आजी कसं काय?” म्हणून अंदाज घेतला तर काय ! आजीबाई शिवाजी कालीन मराठीत बोलायला लागल्या. आजीबाईंच नाव इटाबाई होतं.
आपल्या मराठी वरून काळाच्या कितीतरी लाटा जाऊन मराठी शब्दांची अनेक पानं, फांद्या गळून नव्या रंगाची पालवीही आली. कित्येक शब्द दुसर्या भाषांच्या आक्रमणाखाली पुसून गेले. काही नवीन उगवले. मूळ झाडावर उगवणार्या पिंपळ, उंबरासारखे. भारतात एखाद्या ठिकाणचे स्थानिक, मूळ वृक्ष कुठले हे जर शोधायचं असेल तर गायराने आणि देवरायांचा शोध घेतला जातो. गायरान म्हणजे पूर्वीच्या राजा किंवा संस्थानिकांनी गायी चरायला ठेवलेलं राखीव रान. तर देवराई म्हणजे देवळासाठी राखीव ठेवलेली जमिन. देवाच्या पूजेसाठी येथे अनेक वर्षांपूर्वीपासून लावलेल्या फुलझाडांची, फळझाडांची तेथे चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाई. दक्षिण भारतात देवळासाठी राखीव ठेलेल्या अनेक देवराया आढळतात. आजही पुण्यात बेलबाग, तुळशीबाग ह्या ठिकाणी मुचकुंदादि खूप जुनी झाडं पहायला मिळतात. कुठल्याही जुन्या देवळात गेले की मी त्याच्या परिसरातील जुनी झाडं शोधायला लागते. कित्येक वेळा कित्येक माहित नसलेली झाडं पहायला मिळतात. ती आपली स्थानिक झाडं होती. आज आपल्या पूर्वीच्या भाषेचा किंवा संस्कृतीचा मागोवा घ्यायचा असेल तर मला वाटलं भारताबाहेर खूप वर्ष राहिलेल्या लोकांकडूनच आपल्याला बरीच गहाळ झालेली माहिती उपलब्ध होऊ शकेल. कदाचित भाषा आणि संस्कृतीच्या देवरायाच्या रूपात आजही ही माणसं उपलब्ध आहेत. काही वर्षात तेथील स्थानिक संस्कृतीच्या रेट्यात त्याही नामशेष होतील. काळचक्र मागे फिरवल्याच्या सायन्स फिक्शनच्या गोष्टी ऐकल्या वाचल्या होत्या आज प्रत्यक्ष पहात होते. दोन जुळी मुलं जन्मतःच `बिछडून’ अनेक वर्षांनी समोरसमोर यावीत असं हिंदी सिनेमाचं कथानकच अनुभवल्यासारखं वाटत होत. जेनेटिक्सच्या ``डेटा कलेक्शन’’साठी आणि अभ्यासासाठी एकदम योग्य जागा वाटली. इथे सर्वांच्या जिभेवर लिलया नाचणारी म्हणजे `नरी नृत्यते' अशी भाषा मात्र क्रेयॉल किंवा क्रियॉल! अफ्रिकन, भोजपुरी, हिंदी,तामिळ, चिनी, ह्या सर्व भाषांच्या मिसळीवर फ्रेंच उच्चार आणि व्याकरणाची फोडणी घातली की क्रेयॉल ची रेसिपी तयार होते.
पहिलाच दिवस असल्याने पैशांचा हिशोबाचा गोंधळ होत होता. आधीच ओंजळभर भारतीय रुपये देऊन मुठभर मॉरिशन रुपये हाती आले होते. जिस रुपी, सँक रुपी, वेनसँक असे उच्चार कळून त्या रंगाच्या नोटा शोधणं कठीण जात होतं. पण समोरचा माणूस खरोखरची मदत करत होता. आपल्याकडील नोटांवर जसे गांधीजी असतात तसे त्यांच्या प्रत्येक नोटेवर त्यांच्या राष्ट्रपित्याचं, शिवसागर रामगुलामांचं सदोदित दर्शन होत राही. नोट पाहीली की आमचीं मस्तके आदरानी झुकतांत ती उगीच नव्हेत. मॉरिशसची करन्सी रुपयाच आहे; मात्र पैसे नाही सेंट आहेत. हिंडतां हिंडता बाजाराच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पोचले पण सगळीकडे कस छान स्वच्छ! कुठे भाजीचे नको असलेले अथवा खराब भाग लोळत नव्हते.
क्वात्रबोर्नच्या व्हॅन मार्केटमधे बुधवार, शनिवार हे भाजीचे दिवस सोडले तर कपडे, पिशव्या, खेळणी, चाळण्या, डबे, बाटल्या, टेबलक्लॉथ, पडदे, चपला, पावडरी, कुंकु, अगरबत्या, धूप, निरांजनं, समया, भारतातून आणलेल्या देवाच्या मूर्ती असं एकमेकांशी कसलही नात नसलेलं बरच काहीही मिळू शकत होतं. मॉरिशसच्या प्रत्येक गावा गावात अशी व्हॅन मार्केट्स असतात. प्रत्येक ठिकणी भाजीचे दोन दिवस ठरलेले असतात.
भाजीच्या मार्केट शेजारीच फुलांचं छोटसं मार्केट होतं. मार्केट छोटं असलं तरी फुलं फारच सुंदर होती. ही सुंदर आणि आगळी वेगळी फुलं बघत मी उभी राहिले. तेंव्हा भारतात दुर्मिळ असलेल्या लालचुटुक अँथुरीयम फुलांनी माझं लक्ष वेधून घेतलं. वर्गात बाईंनी सोप्पा प्रश्न विचारल्यावर `` बाई मी!! बाई मी!! '' ( आत्ता बाईंच्या ऐवजी teacher किंवा Miss म्हणत असतील) म्हणत जशा असंख्य इवल्या इवल्या तर्जन्या वर होतील तशा `माझा पहिला नंबर' म्हणत जणु काही लालचुटुक नागवेलीच्या पानावर आपली कोवळी कोवळी बोटं नाचवित असंख्य फुलं डोकावून बघत होती. Bird of paradise चे रंग बघत रहावेत असे होते.
बाहेर आले तर एका टपरीवजा खोपटापुढे क्यू लावून लोकं उभे दिसले. लोकं सूट-बूट, टाय मधे. पण क्यूतून बाहेर पडणारा प्रत्येकजण कागदामधे पोळीच्या गुंडाळी सारखा पदार्थ खातांना दिसत होता. इथे ऑफिस मधे प्रत्येकानी सूट,बूट टाय मधेच आलं पाहिजे असा फ्रेचांनी घातलेला पायंडा लोकं घाम पुसत पुसत पाळत होते. त्या खोपटावर ‘देवाज् धोलपुरी’ असं लिहीलं होतं. अजून अशा गोष्टींचा परिचय झाला नव्हता. त्यामुळे भुकेसाठी गोल्डक्रेस्ट गाठले.
ख्रिसमस आणि नवीन वर्ष –
आम्ही मॉरिशसमधे पाय ठेवला तो वसंत, ग्रीष्माच्या साक्षीनेच. दक्षिण गोलार्धात नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा उन्हाळ्याचा काळ. नवीन वर्षाचं स्वागत करायला गुलमोहोर लाल चुटुक छत्र्या उघडून तयार होते. अमलतास पुष्कराजांची झुंबरं टांगून उभे होते. लाल जांभळ्या कैर्या, आंबे, लिचींचे घोस झाडांवर डुलत होते. भर डिसेंबर-जानेवारीत बकुळ घमघमत होते. बोलण्यातून जसं माणसाचं मन कळतं तशी इतर वेळेला ओळखू न येणारी झाडं त्याच्या फुलांमुळे सहज ओळखू येतात. आम्ही हॉटेलवर येऊन 5-6 दिवस झाले असतील नसतील सर्व हॉटेलमधे एक वेगळीच धूम चालू झाली. हॉटेलचा प्रत्येक काना कोपरा स्वच्छ होऊन सजावट सुरू झाली होती. कोनिफरेर्ल्स जातीच्या झाडांचे विविध आकाराचे छोटे मोठे लाकडी कोन्स सिल्व्हर आणि गोल्डन रंगांच्या स्प्रेने रंगवून ठिकठिकाणी टिकावू पुष्परचना करत होते.
काही स्पेशल आहे का? ``मादाम आठवड्यावर ख्रिसमस येऊन ठेपला आहे. नाताळच्या सुट्टया सुरू झाल्या की आमच्याकडे टुरिस्टची भाऊगर्दि उसळेल.'' ह्या छोट्याशा देशाचं भवितव्य `अतिथी देवो भव' वरच अवलंबून असल्याच दिसत होतं. सार्या बेटावरच पाहुण्यांच्या स्वागताची तयारी जोर धरत होती. आपल्या देशातल्या वातावरणापेक्षा हे वातावरण फारच वेगळ्या प्रकारचं वाटलं. आपण आपल्या देशात बाहेरच्या देशातून येणार्यांची इतकी दखल घेतल्याचं मला कुठे दिसलं नाही. आपण आपल्या कामात खूप मग्न आहोत का आपण आपल्यातच मश्गूल लोकं आहोत? ज्या बाहेरच्यांना आमच्या इथे यायचं असेल त्यांनी या बघा आणि जा. त्यांनी खूष व्हावे म्हणून आपण जराही झटत नाही. कदाचित सर्व ठिकाणी भारतीयांचीच झुंबड एवढी असते की परदेशी व्यक्तींसाठी थोड अजून लक्ष द्यावं असं आमच्या डोक्यातच आलं नसेल. त्याच बरोबर माओचं वाक्यही आठवत होतं. ' If you open the window
you will get fresh air and some flies and mosquitoes.' देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणार्या या पाहुण्यांसोबत येणारं अदृश्य पण समाज-जीवनावर खोल परिणाम करणारं वातावरण कदाचित ह्या माशा आणि डासांसारखं उगीचच मला तेथील वास्तव्याच्या काळात त्रास देत राहिलं.
हॉटेल गोल्ड क्रेस्टच्या समोरच क्वात्रबोर्न शहराची म्युन्सिपाल्टी होती. तेथेही पताका, लाईटिंगची गडबड चालू होती. थोड्याच दिवसात तेथील electronic digital board वर मेरी ख्रिसमस आणि Happy New Year चे संदेश झळकायला लागले. जो सण असेल त्यानिमित्त म्युन्सिपाल्टीतर्फे लोकांना शुभेच्छा दिल्या जात. ही कल्पना मला मॉरिशसच्या संपूर्ण वास्तव्यात फार सुखदायक वाटत राहिली.
नाताळ आणि नवीन वर्षाच्या आगमनाला बेट सिद्ध होत असतांनाच शेजारच्या मादागास्कर आणि इतर छोट्या छोट्या आफ्रिकी देशातले अनेक कलाकार-लोक परदेशी पाहुण्यांना आवडतील अशा लाकडापासून आणि दगडापासून बनविलेल्या अनेक वस्तू घेऊन मॉरिशसमधे दाखल होत असत. फुटपाथवरच त्यांच्या वस्तू मांडून विकत. लाकडी जिराफ, हरीण, अफ्रिकन पुरुष व स्त्रियांचे दगडात कोरलेले चेहेरे, दगडाचे बनविलेले हिप्पो, सिंह, चित्ते, हत्ती, डोडो अशा अनेक गोष्टी असत. आफ्रिकेतील निसर्ग, लाकडातून आणि दगडातून तंतोतंत सजीव झालेला दिसे. दगडात, लाकडात कोरलेले चेहरे मोठे बोलके असत. प्राणी तर विलक्षण कमनीय असत. तेथे थांबून त्यांची कलाकृती पाहिल्याशिवाय मला पुढे जाववत नसे. कधी आमच्याकडे येणार्या पाहुण्यांसाठी त्यातील चार-दोन कलाकृती मी घेऊन ठेवत असे. बांबू पासून बनवलेलं विंड-चाईम मला फार आवडे. त्यातून निघणारे नादमधुर सूर पाणी, लाटा, अशा नैसर्गिक आवाजांशी साधर्म्य साधत असे. क्वात्र बोर्नच्या फुटपाथवरही दोनचार ठिकाणी ह्या अफ्रिकन स्त्रिया बसलेल्या असत. त्यातल्या दोघीजणींचे चेहरे जरा परिचित झाले होते. त्यांच्याकडच्या वस्तू न्याहाळत मी जिराफाची किंमत विचारली. किंमत 50 रुपये ही ठरलेलीच असे पण तरीही संवादाला सुरवात करायला काहीतरी बोलणं आवश्यक होतं. मी त्या कलाकृती बघत असतांना त्यांची नजर माझ्या खांद्याला अडकवलेल्या पिशवीकडे सारखी जात होती. मी भारतातून येताना ह्या उठावदार रंगाच्या कच्छी भरतकाम केलेल्या दोन तीन गुजराथी पिशव्या भाजी, किराणासाठी घेऊन आले होते. येथे मला पिशवी मोलाची होती. शिवाय माझे पैसे, घराची किल्ली, कार्ड, फोन सर्वच त्यात होतं. नवीन देशात मीही पिशवी जरा आवरून सावरून उभी राहीले. पिशवी पाहून त्यांचं एकमेकीत काहीतरी बोलणं चालू होतं. परत परत त्या पिशवीकडे बघत होत्या. पिशवी सावरत परत एकदा मी तिला किंमत विचारताच त्यातील एक म्हणाली ``तुझ्या खांद्यावरची पिशवी देशील?'' क्षणभर मी गडबडले. माझे
पैसे, कार्ड, घराची
किल्ली सर्वच त्यात होतं. (हो आत्तापर्यंत आम्ही आमच्या घरात रहायला
गेलो होतो.) माझ्याकडे
दुसरी पिशवी नव्हती. `पिशवी तुला दिली तर मी काय वापरू' हा माझा मोह गेला नाही. आत्ता असं वाटतं मी लगेच देऊन टाकायला पाहिजे होती. तशी नाही तरी दुसरी एखादि पिशवी मला बाजारात कुठे ना कुठे नक्कीच मिळाली असती. आपल्याकडे सर्व सुबत्ता असतांनाही दोनशे- पाचशे रुपयाची एक पिशवी आपल्या हातून सुटली नाही ही बोच मनाला कायमची लागून राहिली. माझं अति सामान्यपण एका लहानशा प्रसंगातून मला कळून आलं होतं.
मॉरिशसच्या रस्त्यांवरून हिंडताना मोजकेच भिकारी दिसत. त्यातही चिनी किंवा गोरे भिकारी नसत. असलेच तर जास्त करून अफ्रिकी वंशाचेच असत. तेही महारोगी, अपंग असे नसत. येणारे जाणारे अफ्रिकन वंशाचे लोक जाता जाता त्यांना हस्तांदोलन करून, त्यांच्याशी हसत खेळत गप्पा मारून मग पुढे जात. साठ वर्षांच्या पुढे प्रत्येकालाच निवृत्ती वेतन मिळे. कदाचित त्यामुळे ह्या व्यवसायाला फारसं प्राधान्य मिळालं नसावं. कोड असलेली माणसंही कधि दिसली नाहीत आणि अपंग प्रजाही पाहिल्याचे फारसे आठवत नाही.
-----------------------------------------------------------------------
( खालील प्रकरणाच्या नावावर क्लिक केल्यास पुढचे प्रकरण उघडेल. )
खाली दिलेल्या प्रकरणाच्या नंबरवर क्लिक केल्यास ते प्रकरण उघडेल
अतिशय सुंदर. प्रवासवर्णन सुद्धा किती छान आणि मनोरंजक पद्धतीने लिहावं याचं छान उदाहरण आहे हे. त्यात एका सुगरण गृहिणीच्या चाणाक्ष नजरेने टिपलेले भाजी मार्केट चे वर्णन छान च. मॉरिशस बद्दल नवीन माहिती कळतेय. माझा येतेय वाचताना.
ReplyDeleteप्रवासच इतक प्रवाही भाषेत लिहिलेल पुस्तक वाचताना पुनःप्रत्ययचा निखळ आनंद मिळाला.
ReplyDelete