9 सुंदर बेटांच्या देशात –

 

9 सुंदर बेटांच्या देशात

         मॉरिशसचा नकाशा उघडला तर ह्या मुख्य बेटाच्या कडेकडेने अनेक छोटी छोटी बेटं आणि बेटुल्या समुद्रात पोहतांना दिसतात. हे बेटांचे थेंब ठिपक्यांमुळे मॉरिशच सौंदर्य उणावता उलट ते मॉरिशसच्या सौंदर्यात भरच घालतांना दिसत. आणि त्यासोबत कालिदासाच्या शाकुंतल मधल्या एका सुंदर  श्लोकपंक्तीची आठवण ही जागी करतात. –

सरसिजमनुविद्धं शैवलेनापि रम्यं

मलिनमपि हिमांशोः लक्ष्म लक्ष्मीम् तनोति।

 

जरि कमल वनासी वेढि शेवाळ सारे

परि कधि उणावे श्रेष्ठ ऐश्वर्य त्याचे॥

जरि दिसत असे तो डाग चंद्रावरीही

परि खुलवि तयाचे पूर्ण सौंदर्य तोची

         `मलिनमपि हिमांशोः लक्ष्म लक्ष्मीम् तनोति।' मलीन झालेल्या हिमांशु म्हणजे चंद्रावर असलेला `लक्ष्म' म्हणजे डाग त्याच्या लक्ष्मीत म्हणजे वैभवात भरच घालतो. प्रत्येक बेटाचं स्वतःचं असं वेगळ नाविन्य आहे. त्यांनी मॉरिशसच्या मुख्य बेटाभोवती सुंदर रांगोळी रेखलीए. अर्थात ह्या प्रत्येक बेटावर पोचायचं म्हणजे तुमचे गरम खिसे नरम हे होतातच.

Ile aux Aigrettes ( लो अ‍ॅग्रेथ) –

मोटरवेवर  एअरपोर्टच्या दिशेनी एका मागून एक सर्कल्स मागे टाकत(Mahebourg)  माहेबू (माहेबुर्ग प्रत्यक्ष मात्र माहेबू असंच इथले लोक म्हणातात. तसच ऐकू येतं.) कडे दाखविणार्या बाणाकडे प्रवीणनी गाडी वळवली. प्रवीण, मी आणि बरोबर विशाल बापू हा आमचा मॉरिशन दोस्तही होताच.  आम्हाला क्रेयॉल येत नसल्याने वारंवार आमच्या खिशाला बसणारी चाट विशालमुळे कमी व्हायची. शिवाय सर्व रस्ते शॉर्टकटस् त्याला चांगले परिचयाचे असल्याने वेळ , पेट्रोल आणि पैसे वाचायचे. माहेबू च्या रस्त्याने 15-20 मिनिटांनी गाडी उजवीकडे ब्लूबेच्या पाटीकडे वळली सरळ जाणारा रस्ता आडव्या रस्त्याला मिळाला उजवीकडे ब्लू बे तर डावीकडे Hotel Preskil ची पाटी होती. आम्हाला Preskil ला जायचं होतं. मोरपंखी निळा हिरवा समुद्र चमकत होता. त्यावर  हिरव्यागार बेटाची चकती तरंगत होती. हेच ते ` लो अ‍ॅग्रेथ!' इथला समुद्र कितीही वेळा पाहिला तरी अजून अजून पहावा असा ! पंचमहाभूतांना आजारपण कुठलं आणि म्हातारपण कुठलं?  क्षीण होत जाणं त्यांना कुठे माहित? इथल्या समुद्राच्या तारुण्याचा बहर कधी ओसरत नाही. समोरच झाडाखाली लो अ‍ॅग्रेथला जाणार्या फेअरी सर्व्हिसची पाटी होती. मी इथे अनेक वेळेला अनेक मैत्रिणींबरोबर आले होते. ती पाटी पण पाहिली असेल पण पहाणं, वाचणं आणि कळणं ह्यात माझी कुठे संगती साधली जात नसे. पाहिलं तर वाचता येत नसे. वाचलं तर आपले उच्चार आणि तेथील स्थानिक उच्चार ह्यात थोडंही साम्य नसे.

सकाळी 11, 11.15 आणि दुपारी 1.15 अशी रोज ही फेअरी चाले. रविवारी बंद. स्थानिक लोकांना 175 मॉरिशन रुपये,  मॉरिशस मधे काम करणार्या परदेशी लोकांसाठी 300 मॉरिशन रुपये तर परदेशी प्रवासी लोकांसाठी 600 मॉरिशन रुपये. आमचे पासपोर्ट, प्रवीणचं civil service ministry चं I card आम्ही सुसज्ज आलो होतो. ही गाईडेड टूर होती.

बोटीत आमच्याबरोबर  चारजणांचं चिनी कुटुंब होतं. दोन व्हॉलेंटिअर्स आणि आणि एक गाईड मुलगी. असे 10-11 जणं बोटीत बसलो. समुद्र किनार्यावरून अवघ्या 10-12 मिनिटावर बेट. किनार्यापासून दूर जावं तसा किनाराही सुंदर दिसायला लागला. समुद्राचं नीळेपण जास्त गहिरं व्हायला लागलं. किनार्यावर असतांना लो अ‍ॅग्रेथकडे डोळे लावून बसलेलो आम्ही आता त्याच्याकडे पाठ करून  किनार्याचे, लायन माऊंटनचे,  किनार्याच्या पार्श्वभूमीवर चमकणार्या रंगीबेरंगी यॉटस्, कॅटॅमेरॉन यांचे फोटो काढता काढता बेटावर पोचलोही!  छिन्नी हातोड्यानी छिनून काढल्याप्रमाणे समुद्राच्या लाटांनी बेटाच्या किनार्याला कापून अशी काही कपार केली आहे की वाटावं बेट आधाराशिवायच समुद्रात तरंगत आहे.

बोट जेटीला लागली. जेटीवर उतरताच गाईडनी स्वागत केलं. इतका वेळ शांत बसलेल्या गाईड मुलीनी आता बोलायला सुरवात केली. संपूर्ण प्रवाळाच्या बनलेल्या या बेटावर 2-4 ते 10-15 cm. इतकाच काय तो मातीचा थर आहे. त्यामुळे झाडांची वाढ खुरटीच राहून गेली आहे. कमी उंचीच्या ह्या जंगलात मध्यभागी मातीचा थर थोडासा ज्यास्त म्हणजे 10-15cm. असल्यानी तिथे मात्र एबनीचं जंगल अजून तग धरून आहे.

जादुई चष्म्यासारखी किंवा अंधारात अचानक लागलेल्या दिव्यासारखी ती गाईड मुलगी मला वाटायला लागली. इतक्यावेळ दिसलेल्या गोष्टी आता दिसायला लागल्या.

       मॉरिशसच्या दक्षिणपूर्वेला असलेलं 26 हेक्टरचं  हे प्रवाळाचं बनलेलं बेट 1965 मधे  Nature Reserve म्हणून घोषित करण्यात आलं. पूर्वी किनार्यालगत असलेल्या शिसवी (एबनी) च्या जंगलातील काही अजूनही तग धरून असलेल्या झाडांचं एक छोटसं खुरटं जंगल इथे बेटाच्या मध्यावर आहे. पूर्वी मॉरिशसमधे नैसर्गिकपणे इथल्या सखल प्रदेशात उथळ पाण्यात आढळणार्या डोडो या पक्षांचं ते नैसर्गिक घर होतं. आज  हे पक्षी अस्तित्वात नाहीत. Mauritian Wild Life Foundation (M.W.F)नी आक्रमण केलेल्या बाकीच्या प्राणी आणि वनस्पतींचं उच्चाटन करून  इथल्या स्थानिक वनस्पतींची nursury तयार केली आहे. इथल्या काही वनस्पती जगभरात अजून कुठेही सापडत नाहीत. गुलाबी कबुतर (pink pigeons) इथे नव्यानी सोडण्यात आली आहेत. उंदरापासून हे बेट मुक्त केलं आहे.

आपल्याकडे स्थानिक वनस्पती कुठल्या हे ठरविण्यासाठी जशी गायरानं आणि देवराया ह्या प्रमाण मानल्या जातात; तशा मॉरिशसच्या मूळ वनस्पती कुठल्या ह्याचा अभ्यास करण्यासाठी जी बेटं लोकसंपर्कापासून दूर राहिली त्या बेटांचा अभ्यास केला जातो. बेटांवरील वनस्पती, प्राणी आणि पक्षी यांचा अभ्यास केला जातो. ही बेटं छोटी असली तरी इथल्या वनस्पती पूर्णपणे वेगळ्या आहेत. इथे सापडणारी  Rat Wood Tree किंवा  Candal Wood Tree  ही झाडं फारचं दुर्मिळ आहेत. Rat Wood च्या एकाच झाडावर तीन वेगवेळ्याप्रकारची पानं येतात. वनस्पती खाणार्य़ा प्राण्यांपासून संरक्षण मिळावं म्हणून जवळ जवळ तीन चार फुटांपर्यंत या झाडाची पानं लांब लाल लाल रेघा असलेली; थोडक्यात प्राण्यांना भीती वाटेल आणि ते खाणार नाहीत अशी होती. शेंड्याची पानं मात्र हिरवी आणि गोल होती. मधली पानं वेगळ्याच प्रकारची होती. पूर्वी इथे जिराफाप्रमाणे लांब मान असलेलली कासवं रहायची. त्याची मान तीन चार फूट ऊंच असे. ह्या कासवांपासून संरक्षण मिळविण्यात ह्या वनस्पती यशस्वी होत. पूर्वी इथे उंदीर नव्हते तरीही ह्या झाडांचं नाव Rat Wood का? कारणही गमतीशीर होतं. Rat Wood चं फूल पुस्तकात press करून ठेवलं तर 3-4 दिवसात त्याला मेलेल्या उंदराचा वास यायला लागतो. प्रत्यक्षात मात्र बेटावरील भरपूर प्राणवायुने आम्हाला जास्तच ताजंतवानं वाटत होतं. बेटावरील गुलाबी कबुतरांचे, समुद्राचे, विविध झाडांचे, एकेकाळी तेथे असलेल्या लांब मानेच्या कासवाच्या प्रतिकृतीसोबत आमचे फोटो घेता घेता कधी जायची वेळ झाली हे कळलच नाही.

Ile aux Cerfs  आईल सेफ - इलोसेफ-

                 जशी काशीविश्वेराची यात्रा अन्नपूर्णेचं दर्शन घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही त्याप्रमाणे मॉरिशसमधे इलोसेफला गेल्याशिवाय मॉरिशस पाहून झालं असं म्हणता येणार नाही. मॉरिशसच्या भोवतालची बेटं म्हणजे मॉरिशसच्या गळ्यातले रत्नहारच आहेत. त्या रत्नावलीतील इलोसेफ म्हणजे कंठ्यातील मध्यभागी सोनेरी वाळूत जडवलेला नीलमच म्हणायला लागेल.  मॉरिशसच्या पूर्व किनार्यावरील हे बेट नेहमीच्या मोरपंखी पाण्याने, सोनेरी वाळुने, निळ्याशार आकाशाने, हिरव्यागार झाडीने आणि सुंदर प्रवाळाने वेढले असले तरी त्यात अजुन एक गुप्त खजिना दडला आहे जो त्या बेटावर जाईपर्यंत सापडत नाही. तो म्हणजे waterfall of Grand Rivière Sud Est.  G.R.S.E. waterfall. ह्या बेटावर नावेतून पोचल्यावर परत नावेतून पुढे गेले की ग्रँड रिव्हिअर साउथ इस्ट ही नदी समुद्राला मिळते तेथपर्यंत जाता येत. हा संगम ही तेवढाच विलोभनीय. नदी येथे धबधब्याच्या रुपात समुद्रात कोसळते. तोच हा G.R.S.E. waterfall. हा धबधबा स्पिरिच्युअल पार्कच्या गणेश मंदिरातून दुसर्या बाजूने म्हणजे वरच्या बाजूने उंचावरून खाली बघता येतो. तेथून दिसणारा नदी-समुद्र संगम फार सुंदर दिसतो.  ह्या सर्व बेटांवर सागरीपाण्यातील साहसी खेळ मनसोक्त उपलब्ध असत.

आईल - - बेनिशिए (Ile aux Bénitiers )

                       मॉरिशसच्या पश्चिम किनार्यावर असलेलं सर्वात सुंदर बेट म्हणजे इलोबेनिशिए आईल बेनिशिए. फ्रेंचमधे शेजारील शब्दांचे संधी होत असल्याने आईल - - बेनिशिए एवढा लाबलचक उच्चार करता इलो बेनिशिए असं म्हटलं जातं. मॉरिशसच्या पश्चिम किना र्यावरून दक्षिणेकडे जात असतांना `ला गोलेत' (La Gaulette) या गावापर्यंत पोचलं तरी इथे इतकं सुंदर बेट असेल असं वाटत नव्हतं.

                बेनिशिए म्हणजे शिंपी, कालव, असं समुद्रातील अन्न. इथे कालव किंवा शिंपले खूप मिळतात हे तेथे गेल्या गेल्याच जाणवलं. वाळूत खूप शिंपले पडले होते. नावेनी बेटाकडे जातंना अर्ध्या अंतरावर आलो तर पुढे निळा समुद्र पाठी हिरवीगार सुरुची रांग डावीकडे लेमोर्नचा निळा खणखणीत पहाड, उजव्या क्षितीजावरही मागे मागे गडद निळ्या होत जाणार्या डोंगर रांगा. काही वेळाने दूरवर समुद्रात काहीतरी खडकासारखं दिसत होत. हळु हळु नाव त्याच्या जवळ यायला लागली आणि त्या खडकांवरून कोणाची नजर हलेना. त्याचे फोटो काढण्यासाठी सर्वांची धांदल उडाली.

                मी लहान असतांना आई व्रताच्या दिवशी आम्हा मुलांना  कहाण्या वाचून दाखवायची आणि आम्ही मजा म्हणून ऐकायचो. कित्येकवेळा तिची थट्टाही करायचो. जिवतीच्या कहाणीत तर मनातल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी काशीला गेलेला राजपुत्र पितरांना अर्घ्य देतांना ते घेण्यासाठी नदीतून दोन हात बाहेर येतात हे ऐकून आम्ही आईला पार भंडावून सोडत असू. इलो बेनिशिएला गेल्यावर मात्र तसच काहीसं वाटलं.

           ह्या नितळ निळ्या समुद्रात लेमोर्न ह्या डोंगरांची पार्श्वभूमी साधत   एखाद्या जलदेवतेने  समुद्रातून मनगटापर्यंत दोन हातांची जोडलेली तिची अंजुली बाहेर काढून जणु एखादा पुष्पगुच्छ सप्रेम अर्पण केला आहे असं वाटत होतं. कदाचित जाचाला कंटाळलेल्या अनेक गुलामांनी ह्या मृत्यूच्या पर्वतावरून उड्या मारून आपला जीवन प्रवास संपवला त्यांना भूमातेने वाहिलेली ही पुष्पांजली असावी.

 

तेथपर्यंत जाता येईल का? नावाड्याला सर्व जण विचारत होते. भरती असेल तर तुम्हाला त्या खडकावर चढताही येईल. पाणीही चढत होतं. मघाशी दगडी ओंजळीचे मनगटापर्यंत दिसणारे हात दिसता नुसती ओंजळच दिसत होती. खडकाचा खालचा दांडा पाण्यात बुडाला होता. नावाड्याने नाव त्या खडकाला लावताच त्या सुंदर खडकावर  चढून आम्ही फोटो काढून घेतले. त्याच्या शेजारीच एक दुसरा खडक होता. एखादा प्राणी त्याचे चारी पाय वर करून जसा पाण्यात लोळत पडावा तसा तो पाण्यात लोळत होता. काढू किती काढू किती फोटो संपेना इतके फोटो काढले. त्या अफलातून खडकांना वळसा घालून आम्ही इलोबेनिशिएच्या बेटावर आलो.

बगळ्यांसारखे पक्षी किनार्याच्या उथळ पाण्यात वाळूतून त्यांच्या पायांचे ठसे उमटवत चालले होते. लाटांमुळे तयार झालेली नक्षीही इतकी सुंदर होती की त्याचेही फोटो कॅमेराबंद केले.

तिथेच किनार्यावर मराठी कोळी गृहस्थ राहत होते. त्यांच्या आग्रहास्तव त्यांचे आदरातिथ्य स्वीकारले व आम्ही जड पावलांनी, पुन्हा यायचे ह्या निश्चयाने परत आलो.

--------------------------------------------------

 ( पुढचे प्रकरण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. ) 

10 ट्रेकिंग आणि विविध साहसी खेळ

खाली  दिलेल्या प्रकरणाच्या नंबरवर क्लिक केल्यास ते प्रकरण उघडेल

 0  1   3  4  5  6  7  8  9  10   11 

12  13  14  15  16  17  18  19  20  21.

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -