10 ट्रेकिंग आणि विविध साहसी खेळ

 

10 ट्रेकिंग आणि विविध साहसी खेळ

              मॉरिशसला लाभलेला असीम समुद्राचा सुखद संग, समुद्राची शांत वृत्ती, उथळ प्रेमळ समुद्रापासून गहिर्या गहन समुद्पर्यंत व्याप्ती, सर्व प्रकारच्या प्रदूषणापासून मुक्त अत्यंत निर्मळ पाणी आणि मॉरिशसवर असलेलं धनिक युरोपियनांचं वर्चस्व हयामुळे तेथे समुद्रात खेळले जाणारे surfing, sailing, snorkeling water skiing, windsurfing त्यासोबत Deep sea fishing, Scuba diving सारखे साहसी खेळ असो वा नौकानयन सारखी आरामदायी  कॅटॅमरॉन मधील दिवसभराची एखाद्या बेटावरची सहल असो सर्वच खेळांना भरपूर मागणी असते. आम्हीही आमच्या सर्व पाहुण्यांना पॅरा-सेलिंग करायला प्रोत्साहन देत असू. आणि आधी नको नको म्हणणारे सारे प्रत्यक्ष अनुभवानंतर मात्र अत्यंत आनंदून जात. आलेल्या पाहुण्यांचे वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो काढून, छानपैकी एडिट करून ते जाण्यापूर्वी प्रवीण त्यांना सी.डी. बनवून देत असे. ही कायम स्मरणात राहील अशी छोटी भेट सर्वांनाच आवडत असे.

या शिवाय ले पुस, दोमेनदुलाग्राव सारखे डोंगर कडे चढणे, ब्लॅक रिव्हर च्या जंगलातून ट्रेक, किंवा सायकलनी भ्रमंती असे अनेक आनंददायी पर्याय येणार्यांसाठी उपलब्ध असत.

डोंगर दर्यांमधुन भटकंती -  

रविवार सकाळ  

             मॉरशसला शनिवार रविवार हे पूर्ण सुट्टीचे दिवस असत. शुक्रवारी संध्याकाळी फीसला लागलेले टाळे सोमवारी सकाळी आठालाच उघडत असे. `शनिवार रविवार ओव्हरटाईम' असले विचारसुद्धा मॉरिशिअन फिसच्या भोवती घोटाळत नसत. शनिवार भाजी, किराणासाठी आणि आवरावरीसाठी ठेवला तरी रविवार पूर्ण सुट्टी असे. इंग्रजी  पेपर ही फक्त शनिवारची चैन होती. भाजीसोबत येता येता तोही आणायला लागे. आठवड्यातून एकदाच इंग्रजी पेपर येत असल्याने तो पुरवून पुरवून वाचायला लागे.

15 ऑक्टो. 2005 शनिवारच्या वर्तमानपत्रात  नेचर वॉकची मोठी जाहिरात पाहिली. बस 8 वाजता रोझहिल प्लाझाला येणार होती. उद्या बघू आपलं आवरून झालं तर म्हणून  आम्ही दुसर्या दिवसावर सर्व सोपवलं. तरीही स्थानिक लोकांबरोबर जाण्यात जरा वेगळी गम्मत होती. आम्ही  भारतीय, भारतीय ग्रुपने कुठे कुठे जात असलो तरी स्थानिक लोकांबरोबर मिसळण्याच्या संधी अभावानेच येत.

दोमेन दु ला ग्राव -

 दुसर्यादिवशी सकाळीही कालचा पेपर खुणावत होता.  `नेचर वॉक ' ही मॉरिशस मधली रम्य कल्पना होती. ब्रेकफास्ट बनवून, बरोबर घेऊन, आम्ही सकाळी सव्वासातलाच रोझ हिलचा मार्ग धरला. एक धोपटी प्रवीणच्या गळ्यात तर दुसरी माझ्या! प्रत्येकाने आपापले जेवण बरोबर आणायचे होते. रोझहिलच्याच सुपर मार्केटला गाडी पार्क करून आम्ही प्लाझाच्या दिशेने वन् टू वन टू करत चालायला सुरवात केली.

Plaza -

रोझहिल-म्युन्सिपाल्टीपाशी 4-5 म्हातार्या चिनी बायका पिशव्या, सामान घेऊन उभ्या होत्या. इंग्रजीत त्यांना नेचर वॉकसाठी थांबला आहात  का असं विचारलं. ``वीऽऽऽऽवीऽऽ'' (होय होय) त्यांनी फ्रेंच / क्रेऑल बोलायला सुरवात केली. ``आँग्ले ऽऽऽ आँग्ले. '' मी क्रेऑलपुढे शरणागती पत्करली. बस तेथेच येणार होती. दर महिन्याला लोकांच्या मनोरंजनासाठी महानगरपालिका वा नगरपालिका काही ना काही कार्यक्रम ठेवते. ज्यांना काही कारणाने कुठे जाणं शक्य नाही त्यांच्यासाठी ही चांगली सोय होती. बस वेळेवर आली . सगळ्यांनी आपल्या पैसे भरल्याच्या पावत्या दाखवून बसमधे चढायला सुरवात केली. ``आम्ही पैसे भरले नाही. पण आम्हालाही यायला आवडेल. आत्ता आम्ही पैसे भरतो''.प्रवीण म्हणाला. ह्या सर्वांबरोबर जायची संधी आम्हाला सोडायची नव्हती. `` बस फुल्ल आहे उभं राहून येणार का? मग थोडासा विचार करून तो म्हणाला, `` If we want to find a way we can find a way. '' `` तुमच्याकडे ट्रान्सपोर्ट आहे का?'' ``होऽऽ!'' आम्ही. ``Then follow us.'' ``आमची गाडी सुपरमार्केटला पार्क केली आहे.'' `` ठीक आहे तेथपर्यंत माझ्या गाडीने चला.'' त्याच्या कारने सुपरमार्केटपर्यंत आलो. आम्हालाही बरं वाटलं. लोकल माहोल अनुभवता येणार नसला तरी आम्ही जाऊ शकत होतो. आमची निस्सान सनी पुढच्या Hollywood Star (घरांना नाव नाहीत निदान बसला तरी नाव होतं. बसचं नाव पाहून आनंद झाला. माझ्या मनात तिचा मर्लिन मन्रोसारखा चेहरा तयार झाला. ) च्या मागे धावायला लागली. थोड्याच वेळात आम्ही टूर ऑर्गनायझर च्या गाडी मागे जाणार होतो. कारण मधेच बस. 2-4 ठिकाणी लोकांना गोळा करत पोचणार होती.गाडीने मोटारवे पकडला आणि एअरपोर्टच्या दिशेने एक-एक सर्कल्स मागे टाकायला सुरवात केली. 16 Miles च्या वळणावर डावीकडे वळतांना पहिल्यांदाच लक्षात आलं की दोमेन - दु- ला - ग्राव कडे असा ठळक बाण दाखवलेली पाटी मौजूद होती.ज्या गावाला जायचं नाही त्याचं नावं कशाला विचारा  - - - वाचता येणारी पाटी म्हणून मी दरवेळी दुर्लक्ष केलं होतं. ---- आज त्याचा उच्चारही कळला- -- - दोमेन - दु- ला - ग्राव! दोमेन - दु- ला - ग्रावकडे दर्शविणारे बाणं जागोजागी दिसत होते. मॉरिशसमध्ये रस्त्यांचं डिझायनिंग इतकं छान आहे की एखादि पाटी दिसली नाही म्हणून रस्ता चुकला ही वेळ कधीच येत नाही. दुतर्फा संपणार्या उसाच्या शेतांमधून वळणं घेत रस्ता पुढे चालला होता. टार रोड संपून मेटलरोड सुरू झाला. पुढे लाकडी पट्ट्या टाकून बनविलेला एक पूल होता. त्याच्यावरून गाडी पलिकडे जाऊ शकेल का असं वाटत असतांनाच पुढची गाडी बिचकता त्याच्यावरून गेलेली पाहून आम्हीही गेलो. एका प्रशस्त रेस्टहाऊस पाशी थांबलो. काळं झिपरं कुत्र आणि एक सोनेरी मांजर उड्या मारतच स्वागताला  आले. एक S.U.V. पार्क केलेली दिसत होती. एक गोरा माणूस बोंझू बोंझू म्हणत स्वागताला आला. ही सर्व त्याची प्रायव्हेट प्रॉपर्टि होती. जराशा चढावर हे रेस्टहाऊस होतं. समोर विस्तीर्ण नैसर्गिक हिरवळ. खाली वळणं घेत जाणारी एक छानशी नदी. नदीच्या पल्याड हिरवीगार पर्वतरांग! नदीकडे तोंड करून जागोजागी लाकडी बाक ठेवले होते. बस यायला अजून अवकाश होता. नदीकडे आणि समोरच्या रमणीय पर्वतराजीकडे  बघत आम्ही बाकावर बसलो. कुठेही गेलं तरी ती जागा कशी सर्वांगसुंदर , मन प्रसन्न करणारी असते. अस्वच्छतेचं थोडंही सावट कुठे पडलेलं नसतं. शांत, प्रसन्न चित्ताने आम्ही आमचा ब्रेकफास्ट काढून यज्ञकर्माला सुरवात केली. तोपर्यंत Star of Hollywood ही पोचली. कळणार्या किलबिलाटात सगळ्यांनीच आपले डबे सोडायला सुरवात केली. झिपरू आणि सोनू सगळ्यांच्याच पायाशी घोटाळत होते. थोड्याच वेळात पांगलेल्या सर्वांना आमच्याऑर्गनायझरने एकत्र करून  पुढचा प्लॅन सांगायला सुरवात केली. एकमेकांकडे पाहून हसण्यापलिकडे आमचा कुठलाच भाषा-संपर्क नव्हता. सगळे जे करतील ते आपणही करायचे  एवढेच माहित होते. नदित छोटे छोटे लाकडी तराफे दिसत होते. वल्हवत नदीच्या पलिकडच्या काठाला पोचायचा एक आनंदोत्सव सुरू झाला. माझा ग्रुप वल्हवण्याची शिकस्त करत होता. पण आमचं अ‍ॅलिस सारखं चाललं होतं.  Wonder land मधे पोचलेली अ‍ॅलिस /Alice जीव तोडून पुढे पळत होती. पळता पळता तिच्या लक्षात आलं की जेथे होती तिथेच आहे. आमच्या ग्रुपचं ही काही असंच झालं . प्रत्येकजणं जीव तोडून वल्ह मारत होता. परिणामी आम्ही तिथल्या तिथेच गोल गोल फिरत होतो. नेचरवॉकसाठी सगळेजण निघाले. झुळझुळ वाहणार्या नदिच्या किनार्या किनार्याने, सुंदरशा जंगलातून जाता जाता आत्तापर्यंत समोर दिसणारी पर्वतराजी आम्ही चढायला सुरवात केली. दुरून रम्य, साजिर्या दिसणार्या डोंगरांवर चढाई सुरू झाली. इथे प्रत्येक डोंगरावर एकाच प्रकारची माती असते. -चिक्कणमाती. मागे ले- पुस म्हणजे (The big Thumb)  हा डोंगर चढलो होतो त्याच्या आठवणी ताज्या असतांनाच ही नवी डोंगरचढाई! `अक्कण माती चिक्कण माती अश्शी माती सुरेख बाई बूटं ते रोवावे' म्हणत चालायला सुरवात केली. आमच्या भारतीय बांधवांनी आज एका निसर्गरम्य ठिकाणी छान सहल आयोजित केली होती. तिथे जायचं सोडून कुठल्या चिखलात फसलो म्हणून मी माझ्याच उत्साहीपणाला दूषणं देऊ लागले. `वर' जाण्याशिवाय पर्याय नव्हता. पाऊलवाटेच्या दोन्ही बाजूस उंच गवत, पायाखाली चिखल आणि निसरडे गोटे ह्या शिवाय कुठेच लक्ष जात नव्हतं. मला `वर ' जायची भिती नव्हती. पण वरून कोसळणार्या गंगेला झेलायला शंकरबुवा सज्ज होते. माझ्यासाठी कोणी नव्हतं ही खंत होती. इथे सारखाच पाउस होत असल्याने पायाखालची माती ओलीच होती दरवेळी पाय उचलला की बुटाला चिकटून किलो किलो ढेकळं वर येत. जड पावलांनी जाता जाता भोंडल्याचं गाण गुणगुणत होते. `हातपाय  खणखणित गोंडे . एकेक गोंडा वीसा वीसाचा --' इथल्या डोंगरांवर उगवणारं गवत मात्र बांबूच्या छोट्या जातीचं आणि चांगलं पक्क असतं. त्याचा घट्ट आधार घेत घेत पाउल उचलणं सोप्प जात. आजूबाजूला हास्य-विनोद , चिवचिवाट आणि हास्याची कारंजी उडत होती. आमचीही मराठी मुक्तपणे चालू झाली. आमच्या दोघांशिवाय आमची भाषा कोणाला कळत नाही हे परम सुखाचं वाटत होतं. हळु हळु सगळ्याच चेहर्यांवरचा उत्साह, आनंद आणि हास्याचे फवारे कमी व्हायला लागले. बरोबरच्या गर्दिची घनताही कमी कमी व्हायला लागली. काळेसावळे, नीटस भारतीय वंशाचे मॉरिशन, थोडेसे चेहरे टिकून होते. छडीदार अंगकाठीच्या चिनी लोकांचा उत्साह मात्र टिकून होता. आम्हालाही उत्साह आला. एव्हाना आमच्या बूटांनीही सरड्याप्रमाणे आपला रंग बदलला होता लाल ब्राऊन मातीने ( टेरे - रूज)  ते पूर्णपणे माखले होते.. ही चिकट माती नंतर धुवायला सुद्धा बराच त्रास देणार होती. पहिल्या प्प्यावर स्क्वाड थांबलं. एका उंच मचाणावरून खालचं विहंगम दृष्य पहायची सोय होती. मचाणावर चढल्यावर खालची हिरवीगार जमिन पाहून सुखवायला झालं. आकाशात उडणार्या ढगांच्या सावल्यांची सालपट खाली हिरवळीवर  विखुरली होती. खाली ओल्या चिक्कण मातीशिवाय बसायला काहीच नव्हतं. तरी थोडेसे हिरवळीचे तुकडे, दगड पाहून सर्वांनी बसून घेतलं. वर चढणार्यांच्या संख्येत खूपच घट झाली होती.लोकांच्या पिशव्यांमधून बन्स, बॅगेटस् बाहेर आले. भाजणारं कडक उन, गार वारं आणि वर लोंबणारे काळे कुळे ढग हे इथलं वैशिष्ठ्यच आहे. जरा उकाडा वाढला की कधी घननीळ बरसेल हे सांगता येत नाही. चिक्कण मातीची दहशत घेऊन  `बरखारानी आम्ही घरी पोचलो की मग जमके बरसो' म्हणत असतांनाच कोणीतरी पुढे चलण्याचा एल्गार दिला. भाषेच्या ज्ञाना शिवाय पुढे जायच आहे हे कळलं. मागे फिरावं असं वाटत होतं पण प्रवीणने पुढचा रस्ता धरला आणि सति सावित्रीसारखं त्याच्यामागे जाण्यावाचून मला पर्याय नव्हता. एक चढ चढून गेल्याच्या आनंदात असतांनाच पुढचा उतार समोर ठाकत होता. अरुंद पायवाटेवरून मुंगळ्यांच्या रांगेसारखी माणसं चढता उतरतांना दिसत होती. म्हणजे आम्हालाही ती संपूर्ण डोंगररांग पादाक्रांत करायची होती तर.  आपल्याला त्या डोंगर रांगेच्या दुसर्या बाजूने उतरायचे आहे. कोणीतरी सांगितले. आता तेथून मागे फिरायची माझी हिम्मतच नव्हती शेलारमामाने माझ्या परतीच्या रस्त्याचे दोरच कापून टाकले. उतार खडतर असले तरी बाजूच्या बांबूग्रासला पक्की जाळी लावली होती. तिला धरून धरून चढ आणि उतार सोपे केले होते. डोंगर कितीही कठीण असले तरी माझ्या सारख्या डोंगर चढण्यात कच्या असलेल्यांचीही चांगलीच काळजी घेतली होती. चिखलाने बूट जड होत होते. पण मधून मधून खाली दिसणार्या हिरव्यागार दृश्याने `हाऽऽऽ !' म्हणत चालायचे कष्ट विसरले जात होते. चार- पाच डोंगर चढून उतरून परत चढल्यावर समोर काळाशार उतरता खडक दिसत होता.  निसरडा आणि भितीदायक वाटला तरी जाणं भागच होतं. तिथे पोचल्यावर त्या उतारावर सगळ्यांनी बसकण मांडली. खडक फारच अरुंद होता. त्याच्या दुसर्या बाजूला नजर टाकली तर नव्वद अशात कापल्यासारखा  खोलच खोलं. इथून कुठून उतरायचं ? जेम तेम रांगल्यासारखं त्या खडकावर  फिरत होतो.  कोणीतरी सांगितलं जसे आलो तसेच परत जायच आहे. - - -म्हणजे परत ते पाच डोंगर पार करून?  - --तिथल्या खोल दरीकडे लक्ष गेलं आणि मागे जायचा रस्ता एकदम सोप्पा वाटायला लागला.

          खाली आलो तेंव्हा चढलेल्या बाकी लोकांपेक्षा मी कशी ग्रेट आहे  अशा विजयी चेहर्याने मी वावरायला सुरवात केली.  डोंगर चढलेले लोकं डोंगर किती अवघड आहे असं विचारत असतांना  ``हां! अवघड आहे पण आम्ही जाऊन आलो असं मी विजयी मुद्रेने सांगत होते. .तीन साडेतीन तासाच्या चालीने शरीराचीही पूर्ण शुद्धी झाली होती. शरीराचं आणि मनाचं गणितच व्यस्त असावं. शरीराचे जेवढे लाड करावे तेवढं मन दुःखी होत जातं. आणि शरीराकडून जेवढं काम करवून घ्यावं तेवढं मन शांत, आनंदी होतं. आज पाय दुखत होते.  नस अन् नस फुणफुणत होती.  शरीर जाम दमलं होतं. मन मात्र कस शांत शांत होतं. असाध्य ते साध्य केल्याचा आनंद वाटत होता. घरी जाऊन मस्त अंघोळ करून झोपलो ते तीन का चार तासांनीच जाग आली. इतकी गाढ झोप गेल्या कित्येक दिवसात लागली नसेल. आमचे भारतीय मित्र फोन कर करून थकले. आम्हाला कुठच्याच फोनचा त्रास होण्यापलिकडे एका शांत समाधित आम्ही होतो. इतकच काय मशिदीची बांग, कुत्र्यांचा भुभुःक्कार कश्शाकश्शाचा आमच्या झोपेवर तिळभरसुद्धा परिणाम झाला नव्हता.   जाग आली. घड्याळात किती वाजले पाहतांना ``अरे बापरे संध्याकाळचे सात!'' म्हणत उठून बसतांना आमचे चेहरे आनंदाने फुलून गेले होते. व्वाव! WHAT A TREK!

-----------------------------------------------

 ( पुढचे प्रकरण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. ) 

11 देवळांचा देश -

खाली  दिलेल्या प्रकरणाच्या नंबरवर क्लिक केल्यास ते प्रकरण उघडेल

 0  1   3  4  5  6  7  8  9  10   11 

12  13  14  15  16  17  18  19  20  21.

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -