21 परतीचे वेध -

 

 21 परतीचे वेध-

नेहमी प्रमाणे नवीन ठिकाणी गेल्यावर आम्ही आप्त-स्वकीयांना बोलवत राहिलो, ते येत गेले. मॉरिशसला आप्त-स्वकीयांना बोलावण्याचा माझ्या मनात बराच काळ राहून गेलेला वेगळाच हेतू होता. आम्ही दिल्लीला असतांना आमच्या आजूबाजूला राहणार्या अनेक जणांचे नातेवाईक बाहेरच्या देशात असत. ते त्यांच्याकडे जाऊन त्याच्या सुरस गोष्टी सांगत. त्याकाळी मराठी लोकांचे नातेवाईक अभावानेच बाहेरच्या देशात असत. आणि ते असले तरी त्यांना भेटायला जाण्याचा खर्चही कोणाला परवडणारा नसे. मला माझे मराठी आप्त-स्वकीय ``आपल्या कोणाकडेतरी’’ जाऊ शकले हा फार मोठा आनंद त्यातून मिळत होता. ह्या साध्याभोळ्या लोकांना मॉरिशसचं तिकिट कुठे आणि कसं काढावं हाही प्रश्न पडे. कणादच्या ऑफिसमधेच ही सोय होती. ह्यावेळेला मी शहाणी झाले होते आणि कणादही. येणार्या पाहुण्यांच्या बॅचेस बनवून दर पंधरा दिवसानी त्यांना मॉरिशसला पाठवायचं काम तो करत होता. एक बॅचनंतर घर आवरायला आणि पुढच्या बॅचसाठी सामान भरून ठेवायला मला 8 दिवस मोकळे सोडून परत पुढची बॅच पाठवत होता. शेवटी तेथील मुलाने त्याला विचारल, ``तुम्ही मॉरिशचा टुरिझम ऑर्गनाइझ करता का? आमचे जास्तीत जास्त पाहुणे मॉरिशसला यावेत ही आमची इच्छा पूर्ण झाली. आणि आपल्याला बोलावणारे आपले कोणी परदेशात नाही ही मनातील रुखरुख धुवून गेली.

 

`En Vendre ' आँ वॉन्द्र '

             दहा दिशांसोबत गुंफल्या जाणार्या बदलीच्या रेशीम गोफाला धरून आम्ही सर्कशीतील झुल्यांवर काम करणार्यां Trapeze Artist सारखे नवीन नवीन गावांवर स्वार होत होतो. बदलीची टाळी वाजली की पहिल्या गावाचा झोपाळा सोडून दुसर्या गावाच्या झोपाळ्यावर उडी मारत होतो. मॉरिशसची दोन वर्ष संपली. भारतातून बदलीचा खलिता आला आणि आम्ही मॉरिशचा झोपाळा सोडायला सज्ज झालो.

             आम्ही गाडी विकायची असं ठरवलं. पेपर मधे जाहिराती देऊनही गिर्हाईक काय ते फिरकेना. आमच्या मित्रमंडळींच्याही गाड्या विकल्या जाऊ लागल्या. तेवढ्यात आमच्या मॉरिशियन मित्राने आम्हाला सल्ला दिला. गाडीच्या मागे पुढे     `En Vendre ' आँ वाँन्द्र ' म्हणजे `गाडी विकणे आहे' असे लिहून त्यावर तुमचा फोन नंबर लिहून गाडी बाजारपेठेतून लोकांच्या जाण्या येण्याच्या वेळेला फिरवून आणा.  आम्हीही उत्साहाने आमच्या फोन नंबरची माळ गाडीच्या हातात देऊन तिला स्वयंवरासाठी सज्ज केलं. गाडी धुवून पॉलिश करून वेगवेगळ्या मॉल, बाजार गर्दिचे रस्ते येथून फिरवून आणत असतांनाच फोन घणघणू लागले आणि लगेचच `देवानंद' हा सुनियोजित वर  तिला लाभला. देवानंदने एकदाच बॉनेट उघडून पाहिलं  ठिकठिकाणी इंजिनवर बोट फिरवून त्याने गाडीची परीक्षा केली. आणि लगेचच गाडी पसंतीचा होकारही दिला. राहवून मी त्याला विचारलं, ``बॉनेट उघडून तुम्ही काय पाहिलं?'' तो म्हणाला  ``26 डिसेंबर 2004 ला  जपानमधे भूकंप आणि त्यानंतर प्रचंड मोठी त्सुनामी आली होती. त्यावेळेला तेथील नवीन बनविलेल्या असंख्य गाड्या पाण्याखाली गेल्या. त्यांच्यामधे चिखल भरला गेला. ह्या सर्व गाड्या नंतर धुवून साफ करून आफ्रिका, मॉरिशस अशा देशांमधे पाठविण्यात आल्या. त्यांच्या इंजिनमधे काही ना काही तक्रारी येत आहेत. त्या गाड्यांच्या इंजिनावर कुठे ना कुठे कोपर्यात त्या चिखलाचे अंश का होईना सापडतात. पण ही गाडी संपूर्णपणे साऊथ अफ्रिकेत ॅसेंबल झालेली आहे. मला पसंत आहे.'' देवानंद एका प्राणांतिक अपघातातून केवळ गाडीला असलेल्या एअरबॅग्जमुळेच वाचला होता. त्यामुळे गाडीला एअरबॅग्ज पाहिजेतच ह्या गोष्टीवर ठाम होता. ``तुम्हाला पाहिजे त्या करन्सीत पैसे देईन'' त्याने सांगितलं. त्याचा फुलांचा व्यवसाय अगदि भरभराटीला आलेला होता.फुलं युरोपात जायची त्यामुळे त्याच्याकडे युरो, डॉलर अशी कुठलीही करन्सी उपलब्ध होती. गाडी नवी कोरीच होती. आम्हीही तिच्या सर्व accessories सह तिचं सालंकृत कन्यादान केलं. गाडी एका भारतीय वंशाच्या भल्या माणसाच्या तेही `देवानंदच्या' हाती सोपविल्याचा आनंद झाला. अखेर आमची वहिदा रहेमान तिचा गाईड देवानंदबरोबर निघून गेली.

--------------------------------------------

निरोपसमारंभ -

                    प्रवीण त्याच्याबरोबर काम करणार्य़ा अधिकार्यांनी मॉरिशस सरकारने दिलेली जबाबदारी तडफेने एक वर्षाच्या आत पूर्ण केली. सर्व विभागाच्या सर्व स्तरातील अधिकार्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या प्रशिक्षणाच्या गरजा नक्की केल्या. त्यानंतर पुढच्या वर्षात एकट्या प्रवीणने अनेक विभागातील अनेक अधिकार्यांचे सॉफ्ट स्किल संवंर्धनाचे तसेच महिला कल्याण विभागातील अधिकार्यांसाठी महिलांचे सक्षमीकरण; पोलीस अधिकार्यांसाठी मानवी हक्कांचे संरक्षण व संवर्धन; सरकारी अधिकारयांसाठी कार्यालयीन प्रोसीजर्स असे अनेक प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे राबविले. दोन वर्षांनंतर तेथून निघतांना Ministry of Civil cervices चे प्रमुख श्री जग्रु ह्यांनी त्यानिमत्त निवडक अधिकार्यांना बोलावून निरोप समारंभ आयोजित केला. मुद्दाम सांगितले की इथून  जाणार्या कोणत्याही अधिकार्याला असा निरोप समारंभ आम्ही ठेवत नाही पण खास तुमच्यासाठी तो करत आहोत. आम्हाला तुम्ही केलेल्या कामाबद्दल अतिशय आनंद आणि अभिमान आहे.

                एक छानसं बोटीचं मॉडेल त्यांनी भेट म्हणून आम्हाला दिलं. मलाही निरोपसमारंभाचं खास आमंत्रण दिलं होत.  ``मॅडम मॉरिशस आवडल का? आमच्याकडे तुम्हाला आवडली नाही अशी काही गोष्ट आहे का?''  मॅडम मॉरिशस आवडल का? इथपर्यंत प्रश्न ठीक होता. पण पुढच्या अर्ध्या प्रश्नानी माझं विश्वच ढवळून गेलं. माझ्या डोळ्यांसमोर पोर्ट लुईचा राणी व्हिक्टोरियाचा पूर्णाकृती पुतळा डोळ्यासमोर उभा राहिला. त्याच्याखाली लिहिलेली ती एक छोटीशी पण कट्यारीसारखी हृदयात जखम करणारी ओळ दिसायला लागली. `EMPRESS  OF INDIA'  दगड धोंड्यांचा रस्ता तुडवतही माणूस एकवेळ शिखर पादाक्रांत करु शकेल; पण बुटातच असलेला एखादा छोटासा कण सलून सलून पायाला जखम तयार करतो. दोन पावलही चालू देत नाही. मॉरिशसच्या दोन वर्षांच्या काळात त्या एका ओळीने मला जखमी केल होतं. इथे रोज इतके भारतीय येतात पण त्यांना ह्या ओळीने जखम सोडाच खरचटल्यासारखंही वाटू नये ह्याची अजूनच सल होती. ती ओळ माझी भळभळणारी जखम झाली होती. त्यावर मीठ चोळल्यासारखा प्रश्न अचानक पुढ्यात आला होता. सूर्यालाही ग्रहण लागतं, पण काही काळासाठी. सावली दूर झाली की तोही तळपायला लागतोच की. भारतावरची गुलामगिरीची छाया कधीच दूर झाली आहे मग ह्या ओळीची तरी अभद्र छाया कशासाठी? भारताबाहेर भारताबद्दलची ही अपमानजनक गोष्ट मला स्वस्थ बसू देत नव्हती मी स्वतंत्र भारतात जन्मले आहे. मला तो माझा अपमान वाटत होता. ती ओळ पुसून टाकायला माझं मन अधीर होतं. आजही आहे.

        माझ्या नजरेसमोरून म्यझियममधले पै पै गोळा करून भरलेले तांबे हलत नव्हते. आपल्याला कधी ना कधीतरी आपल्या मातृभूमीला परत जायला मिळेल, म्हणून सार्या आयुष्यभर काटकसरीने वागून पै पै वाचवून सारे चांदीचे रुपये लोट्यांमधे भरून ठेवून, ते चोराचिलटांच्या हाती पडू नये म्हणून चुलीखालच्या जमिनीत पुरणारी आणि त्यांना प्राणपणे जपणारी अनेक आयुष्य, भरल्या तांब्याला कोणाचा तरी पाय लागावा आणि तांब्या लवंडून जावा तशी मातृभूमीची आस हृदयात ठेऊन सांडून गेली होती. मातृभूमीचं अखेरचं दर्शनही त्यांच्या डोळ्यांना लाभलं नव्हतं.

           गाडीतून जातांना हिरव्यागार उसाच्या फडांच्या बांधावर, शेताच्या कोपर्या कोपर्यावर दिसणारी दगड-धोंड्यांची रास- - - तीच ती धोडयांची रास मला गोफणीतून दगड मारावे तशी घायाळ करत होती. ती माझ्या पूर्वजांच्या कष्टांची रास होती. भारतातून येणार्या प्रवाशांना सुंदर मॉरिशस मधील ही रास अज्ञातच होती का?

          बाहेरच्या देशात काही गोष्टी diplomatically फार कुशलतेने बोलायला लागतात. त्या फार टोकदारपणे बोचेल अशा रीतीने बोलू नयेत. त्यामुळे दोन देशांचे संबंध बिघडू शकतात . . सर्व गोष्टी आठवायला लागल्या. माझा मराठी बाणा आणि जिभेला असलेली तलवारीची धार नको ते करून जायची ह्या कल्पनेनी जिभेवरचे शब्द मी मागे रेटत राहिले. मला एकदम असहाय्य वाटू लागलं. वाटलं रडू येईल.

             प्रवीणने परिस्थितीची जाणीव करून देत मला बोलायचा इशारा केला. ``छान आहे तुमचा देश पण मला आता माझ्या देशात जायची ओढ लागली आहे.'' कसंबसं मी मला सावरलं. आता मला इथलं काहीच देखणं वाटत नव्हतं. मॉरिशस आणि भारताच्या किनार्याला जोडणार्या  समुद्राला  पैलतीरी माझा भारत कसा आहे? असं मन विचारत होत. सोन्याची लंका सोडून रामालही परत मातृभूमीची ओढ कशी लागली असेल हे जाणवत होतं. केवढ्याही मोठ्या ऐश्वर्यापुढे आईची झोपडीच मला प्रिय आहे म्हणणारे विनायक दामोदर सावरकर आठवत होते.

              विमानानी भारतमातेच्या भूमीला स्पर्श केला आणि मन गलबलून आलं. वाटलं हात पसरून धावत सुटावं. आपल्या भूमीवर डोकं टेकवावं. हात मातीत भरून कपाळावर भस्माच्या पट्ट्यासारखे ओढावेत. डोळे वारंवार भरून येत होते. संजय माझा दीर, माझी बहीण सुरेखा, तिचे पति नरेनभाई सारेच आले होते न्यायला.  आम्हाला पाहताच त्यांच्या चेहर्यांवर आपली माणसं आल्याचा आनंद पसरला. एवढ्या गर्दितून हात उंचावून उंचावून आम्ही त्यांना हात हलवत होतो. एवढा आनंद मला पूर्वी कधीच झाला नव्हता.

--------------------------------------------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

खाली  दिलेल्या प्रकरणाच्या नंबरवर क्लिक केल्यास ते प्रकरण उघडेल

 0  1   3  4  5  6  7  8  9  10   11 

12  13  14  15  16  17  18  19  20  21.

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

भौमासुर / नरकासुर वध –

रामायण Express- ची माहिती