11 देवळांचा देश -

 

 

11 देवळांचा देश -

                     देवळं हा मॉरिशसचा श्वास आहे. वरवर पाहिलं तर पूर्णपणे साखर आणि टुरिझमवर जगणारा हा देश. पण कान देऊन ऐकलं तर या देशाची स्पंदनं इथल्या देवळादेवळात ऐकू येतील.  एखाद्या मूर्तीवर वारंवार लावलेला शेंदराचा लेप काही काळाने इतका दाट आणि कवचासारखा बनून जातो की आतली मूर्ती कशी आहे, कशाची आहे, किंवा कुठल्या देवतेची आहे  हेही ओळखणे अवघड होऊन जाते.  हे जाड कवच एखाद्यावेळेस अचानक उकलून येते किंवा  भंग पावते आणि आतली मूळची सुबक मूर्ती पहायला मिळते.  त्याचप्रमाणे इथे राहणार्या लोकांच्या संस्कृतीवर दुसर्या संस्कृतीची इतकी पुटं चढली की नक्की आता ह्यांची ओळख काय मानायची असा प्रश्न पडावा. पण  मॉरिशसच्या अंतरंगात शिरायची संधी मिळाली आणि अचानक बाह्य संस्कृतींची कवचं गळून पडली. मॉरिशसच्या देवळात गेल्यावर आणि तेथील सणवार, प्रथा पाहिल्यावर ढगातून सूर्याची तिरीप येताच सर्व देखावा उन्हानी उजळून निघाल्यासारखं वाटायला लागलं. भारतातून आलेल्या या लोकांच बाह्यांग कितीही बदलल्यासारखं वाटलं तरी अंतरंग त्याच दृढ श्रद्धेने भरलेलं आणि भारलेलं दिसेल. प्रभात समयी न्हाऊन केस मोकळे सोडून हातातील पूजेचं तबक जाळिदार रुमालानी झाकून जाणार्या स्त्रिया, तरुणी पाहिल्या की मला राजा रवी वर्म्याच्या चित्रांची आठवण येई. दाट, लांब, काळेभोर केस ही मॉरिशच्या स्त्रियांना मिळालेली देणगी आहे. ह्या लांबसडक केसांच्या स्त्रिया बघतांना त्यांच्यामधेच आपल्या पुराणातील एखादि सीता, द्रौपदी मला भेटुन जायची. एकदा कार्तिकस्वामी म्हणजे मुरुगनच्या देवळाच्या पायर्या चढणारी युवती हातात पूजेचं तबक घेऊन जात होती. तिचा मोकळा सोडलेला टाचेपर्यंत रुळणारा केशसंभार पाहून मलाच तिच्याकडे मागे वळून वळून पहायचा मोह आवरत नव्हता.  मॉरिशसच्या मुक्कामात माझ्या मैत्रिणीने आणि मी एकदा फ्रेंच शिकायचं ठरवलं. शिकवणारीच्या शिकवण्याकडे पाहता तिच्या लांबसडक केसांवर भाळून आम्ही तिची निवड केली. तिच्या लांब दाट केसांचं रहस्य विचारल्यावर तिने `मी कपडे धुण्याच्या डिटर्जंटने केस धुते' सांगितल्यावर आम्ही कपाळाला हात लावून घेतला. परिणामी आमचे केसही वाढले नाहीत आणि फ्रेंचचं ज्ञानही.  मॉरिशसच्या रस्त्यावरून जातांनाही अशा गुडघ्याखालपर्यंत काळेभोर केस रुळणारया अनेक सुंदरी पहायला मिळत. पहाटे देवळात जाणार्या स्त्रिया पाहून मला माझ्या आईची आठवण येई. आज आपल्याकडे अदृश्य झालेलं हे दृश्य चाळीसएक वर्षांपूर्वी आपल्याकडे प्रत्येक गावागावतून शहरा शहरातून दिसे. ते रम्य चित्र मनाच्या पडदयांवरूनही कधी पुसट झालं लक्षातच आलं नाही.

               कधी एखाद्या निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत तर कधी हिरव्यागार डोंगराच्या पायथ्याशी, कधी एखाद्या चित्रमय तलावाकाठी तर कधी नदी-समुद्राच्या गभीर नितळ दुरंगी संगमावर, कधी नदीकाठी, कधी एखाद्या दरीच्या टोकावर तर कधी भर वस्तीच्या मध्यभागी असलेल्या मॉरिशसमधील देवळात प्रवेश करताच स्वच्छता आणि शिस्त या दोघी सुमुखी हलकेच तुमच्या दोन्ही हातात हात गुंफत तुम्हाला थेट देवापर्यंत पोचवतात. तत्त्वज्ञानाच्या पायर्या उतरत तुम्हाला हृदयस्थ परमेश्वरापर्यंत पोचविण्याची ताकद इथल्या शांत आणि पवित्र वातावरणात आहे.

              देवापर्यंत कसे पोचावे अशा जिग सॉ पझल सारख्या मधेच बंद झालेल्या वाटा नाहीत. गिर्हाईक गटविण्यासाठी हाकाट्या नाहीत. दलालीचं सावट नाही. प्रवेशाला तिकीट नाही. पोलिसांचा गराडा नाही. स्वयंसेवकांचा ओरडा नाही. देवळाभोवती फुला-पेढ्यांच्या पडव्यांचा गराडा नाही. निर्माल्याचा उकिरडा नाही. चपलांची चिंता नाही. विचारांचा गुंता नाही. रांगांची रेलचेल नाही. माणसांची रेटारेटी नाही, बडव्यांची दलाली नाही, देवाला हात लावायची झटापट नाही, देवावर फुला-हारांची फेकाफेकी नाही, नवसाचे लोंगर नाहीत, तेलाचे ओघळ नाहीत, सोन्याच्या उतरंडी नाहीत, धनाच्या हुंडी नाहीत, पाकिटमारांचे भय नाही सोनसाखळ्यांचा घात नाही, घणाघाती घंटांचा मेंदूवर आघात नाही आरत्या बडवण्याचा प्रघात नाही. सगळं कसं नुकत्याच उजाडत जाणार्या पहाटेसारखं मंद, धुंद प्रसन्न आणि सौम्य ! नास्तिकाचीही समाधि लागावी अशा जागा.

            देऊळ हिंदू (उत्तर हिंदुस्तानी) असो, तामिळ असो, तेलगू असो, मराठी असो. सगळ्या ठिकाणी  हे गुण मात्र सारखेच दिसून येतील. मॉरिशसमधील  हिंदी, तामिळ, तेलगू , मराठी यांची देवळं वेगवेगळी आहेत. कोणी दुसर्याच्या देवळात जायचं नाही असा कुठलाही लिखित नियम नसला तरी सर्वसाधारणपणे प्रत्येकजण आपापल्या देवळात जाण्याचा प्रघात जास्त दिसून येतो. तेथे त्या त्या समाजाच्या पिढ्यानु पिढ्या चालत आलेल्या रीती पाळल्या जातात. त्यांचे त्यांचे सणवार मोठ्या भक्तिभावाने सांभाळले जातात.

1 स्पिरिच्युअल पार्क -                    

निकोलिए (La Nicoliere) या तलावातून उगम पावलेली रिव्हियर दु रँपार्ट (Rivier Du Rempart) ही नदी मॉरिशसच्या N.E.ला Point du Laskar ला समुद्रात मिळते.  ह्या नदीच्या तीरी अतिशय रम्य परिसरात असलेलं , मनात कायमचं राहुन जाणारं देऊळ म्हणजे स्पिरिच्युअल पार्क. देवळाच्या नेहमीच्या संकल्पना बाजूला ठेऊन हिरव्या गार वनराईत बांधलेल हे देऊळ. बांधलेलं म्हणणं फारस बरोबर नाही. एका चौथर्यावर खांबांच्या आधारानी शाकारलेल्या उतरत्या छपराखाली काळ्याभोर दगडाची 7-8 फूट उं  पंचमुखी गणपतीची अतिशय प्रसन्न, सुबक उभी मूर्ती. कुठल्याही सोन्याचांदीच्या दागिन्यांनी  मढलेली नाही तरी मनात ठसणारी. लाल हिरवं करवत काठी पांढरंशुभ्र धोतर आणि डोक्यावर चंदनाचा टिळा. देवावर मोजकीच फुलं वाहिलेली. एका वेताच्या गोल उभ्या टोपलीत ठेवलेला दिवा मंद शांत जळत आहे.  शेजारीच एका भांड्यात पाणी आणि पाण्यात ठेवलेल्या हिरव्यागार दुर्वा. भाविकांनी तिथल्याच दुर्वा घेऊन देवाला वाहाव्यात. देवळाबाहेर कुठेही दुर्वा, फुलं, मोदक कशाच्याच टपरया , दुकानं काही नाही. सगळीकडे फक्त एकच गोष्ट मिळणार - -- स्वच्छता! छोट्या छोट्या घंटांचा एक नाजुक झेला झुंबरासारखा टांगुन ठेवलेला. हात लावला तर मंजूळ किणकिणाट, शेजारीच असलेल्या समुद्राची धीरगंभीर गाज, पक्षांची मधुर किलबिल, आणि झाडाच्या फांद्यापानातून आवाज करणारा वारा. देवळाभोवती सुंदर कारंजी थुई थुई नाचत आहेत. भोवतालच्या वनराईत हिंडतांना एक एक देव सहज भेटत होते. गर्द वनात तप करणारा दक्षिणामूर्ती शंकरही असाच लोभस!  आत्ता एखाद्या झाडामागून पार्वती नुकती खुडलेली बिल्वदले घेऊन येईल असं वाटावं इतकी ती मूर्ती आणि वातावरण एकमेकांना पूरक होतं. मनापासून हात जोडून एक बेलाचं पान वहावं अशी इच्छा होताच

 शंकरासमोर बेलाची पानही हजर होती. आवळ्यांनी लगडलेली झाडं, चायनीज वड, आणि  एका बाजूला झाडांमधूनही  दिसणारा नदी आणि समुद्राचा संगम! संगमाचे विलक्षण भिन्न रंग. एकमेकात सामावूनही स्वतःचं स्वत्त्व जपणारे. नदीचा हिरवट काळसर तर समुद्राचा टर्क्वाझ ब्ल्यू. समुद्राकडे तोंड केलेलं समुद्राभिमुख कार्तिकेयाचं मंदीर. सर्वच मूर्ती आखीव रेखीव, प्रमाणबद्ध, प्रसन्न आणि विलक्षण चित्तवेधक

भक्त आणि देवामधे कुठलीही भिंत ठेवणारं हे बिन भिंतींच देऊळ. एकाच छताखाली देव आणि भक्तांना सामावून घेणारं हे देऊळ. एका अमेरिकेत राहणार्या श्रीलंकन तामिळ गृहस्थाने ते बांधलेलं होतं. त्याचा फोटो देवळात लावलेला होता. देवळात एक रजिस्टर ठेवलं होतं. चार कॉलम केले होते. तुमच नाव , पत्ता, फोन, email त्यात लिहून ठेवलं की देवळाच्या सर्व कार्यक्रमांची पत्र तुमच्या पत्यावर येत.

 2 ला लुई (La Laura) येथील व्यंकटेश्वर बालाजी मंदीर -

 मंदिरांच वेड भारतात असतांना आम्हाला नव्हतं. किंबहुना मनःशांती लाभण्याऐवजी अनेक वेळा मनःस्ताप घेऊन परत यायला लागण्यामुळे नास्तिक नसूनही मंदिराकडे फार उत्साहाने आम्ही वळत नव्हतो. मॉरिशसला मिळालेले मित्र परिवार दाक्षिणात्य भारतीय असल्याने त्यांनी शोधून काढलेल्या देवालयांमधे आम्ही त्यांच्या सोबत जात राहिलो. आमचे तेलगु मित्र चेट्टींसोबत त्यांनी शोधून काढलेल्या मॉरिशसमधील तेलगु देवालयातही आम्ही मॉरिशस अजुन बघता यावे म्हणून जात राहिलो आणि काही अप्रतिम देवालयांच्या प्रेमात पडलो त्यातील एक म्हणजे ला लुईचं  बालाजी मंदीर. मोकाहून जातांना लागणार्या उंचच उंच हिरव्यागार पर्वतरांगा आणि त्याच्या पायथ्याशी असलेल्या बशीसारख्या तयार झालेल्या सपाटीवर असलेलं हे बालाजी मंदिर त्याच्या परिसरामुळे फारच आवडे. मोकाला रस्त्याने वळण घेतलं की उभा असलेला पीटर बॉथचा मजेशीर सुळका दिसायला लागे. एका भल्या मोठ्या सुळक्यावर तोलून धरलेल्या एका भल्यामोठ्या शिळेमुळे तो डोंगराचा सुळका एखादा माणुस उभा आहे की काय असे वाटे. आमच्या मॉरिशियन मित्रांनी त्याची एक अख्यायिका सांगितली होती. ह्या डोंगराच्या पलिकडे एक सरोवर आहे. अत्यंत रमणीय असलेल्या ह्या सरोवरात पहाटेच काही अप्सरा अंघोळ करायला  उतरत असत. त्या आरसपानी पर्यांना एक विकृत मनाचा माणूस चोरून पहात असे. हे त्या पर्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शाप देऊन त्याला दगड  बनवुन टाकलं. तोच हा पिटर बॉथचा सुळका. हा नयनरम्य परिसर कितीही वेळेला जाऊनही हवाहवासा वाटे. आणि पर्यायाने हे बालाजी मंदीरही. येथे वर्षभर चालणार्या अनेक उत्सवांना चेट्टींसोबत आम्हीही जात असू. वेंकटेश्वरा कल्याणउत्सवम् म्हणजे बालाजीच्या लग्नोत्सवाला गेल्यावरच लग्नाला `कल्याण' आणि लग्नमंडपाला `कल्याणमंडपम्' हे शब्द एकदम् पटुन गेले. लग्न आणि कल्याणचा हा अनोखा भावबंध आपल्या ज्या पूर्वजांनी शोधून काढला असेल त्यांना त्रिवार वंदन.  तेथे वाजणारा elctronic चौघडा ऐकणं हा तेथील अजुन एक आनंददायी गोष्ट असे.

3 श्री सुब्रह्मण्यम् तिरुकोविल / श्री मुरुगन मंदीर / कार्तिकेय मंदीर -

आमच्या घरामागेच असलेल्या Quatre-Bornes क्वात्र बोन च्या सुंदर को - दे- गार्ड ( Corps de Garde ) पर्वताच्या कुशीत हे सुंदर मंदीर आम्हाला कायम येता जाता दिसत राहे. आमची स्वाभाविक उत्सुकता एक दिवस आम्हाला तेथपर्यंत घेऊन गेली. को दे गार्डचा पहाड एखादा हत्ती पाय मुडपुन बसल्यासारखा दिसत असे. ह्या ह्तीच्या पायांवर हे सुंदर मंदीर स्थानापन्न झालं आहे. त्याच्या पाठीशी को दे गार्डचा खणखणीत सुळका उभा असे. डोंगराच्या मध्यावरच असलेलं हे मंदिर पहिल्यांदा आम्ही पाहिलं आणि त्याच्या प्रेमात पडलो. दररोज सकाळचा जॉगिंगचा कार्यक्रम रविवारी बदलून  सकाळीच मुरुगनची टेकडी हे आमचं ठिकाण ठरून गेलं. शंभरएक दगडी पायर्या चढता चढता, वाटेत दिसणार्या अनेक मूर्ती बघत बघत, वाढत जाणारी स्वच्छ हवा आणि फटफटणार्या पहाटेचं `सोनेरी सकाळ' मधे होत जाणारं रूपांतर अनुभवत आणि वर पोचता पोचता उठावदार रंगांमधील देवळाचं होणारं दर्शन फार छान वाटे. बूट काढून मंदिरात गेलं की  गाभार्याच्या निवांत स्थळी ठेवलेल्या समयांच्या उजेडात मूर्तीचा उजळलेला शांत चेहरा पाहूनच मन प्रसन्न होई. मंदिराभोवती असलेल्या प्रशस्त प्रदक्षिणा मार्गावरून जातांना संपूर्ण मॉरिशसच दर्शन होई. सोनेरी उन्हात चमकणारी घरं, शेतं, लांबवर दिसणारे डोंगर, त्याच्या माथ्यावर उतरलेले ढग, कधी जमिनीच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत ताणून धरलेलं  सप्तरंगी  इंद्रधनु , कधी आकाशात मधे मधेच लोंबकाळणारे ढग, तर अंगावर शिरशिरी आणणारं गार वारं, आमच्याही अंगात उत्साह निर्माण करून जात असे.

वेलामुरुगन ह्या वेठबिगार म्हणून 1884 साली आलेल्या भारतीयाने त्याच्या वेठबिगारीची मुदत संपल्यावर आपली सर्व पुंजी खर्च करून को दे गार्ड च्या मध्यावर असलेली ही सुंदर जागा विकत घेतली. तेथे सर्व पुंजी खर्च करून कार्तिकेयाचं देऊळ बनविलं. एका वादळात कोसळलेल्या दरडीमुळे देवळाचं नुकसान झालं. तेंव्हा 30 रुपयात अर्धा एकर जमिन विकत घेऊन बनविलेले हे मंदिर आता तीन एकर परिसरात उभे आहे. श्री लंकेहून खास कारागीर आणून त्यांच्याकरवी खास दाक्षिणात्य शिल्पकलेच्या शास्त्रानुसार 2001 मध्ये हे देऊळ उभारण्यात आले. स्कंद जयंतीच्या संध्याकाळी संपूर्ण मंदीर रोषणाईने उजळून निघत असे.

4 गणेश मंदीर -

                Seven cascade सेव्हन कास्काड या सात टप्प्यांमधे खोल दरीत कोसळणार्या धबधब्याच्या त्या नयनरम्य दरीकाठी मराठी मंडळींनी गणपतीचं देऊळ बांधलं आहे. एखाद्या सुट्टीच्या दिवशी ह्या गणपतीला भेटायला आम्ही आमच्या सर्व दाक्षिणात्य संघाला घेऊन जात असू. आणि तेही अत्यंत भाविकपणे आमच्या सोबत तेथे गणपति अर्थवशीर्ष म्हणत असतं.

Grand Baie (उच्चार ग्राँबे) ला असलेलं सूर्योदय मंदीर असो अल्बिनो बीच वरील देवी मंदीर असो Tamarin (उच्चार तामार्या म्हणजे चिंच) च्या seven cascade मराठी लोकांचं गणेश मंदीर असो किंवा इतर अनेक मंदीर असो. तेथील शांतता पावित्र्य मनालाही पूर्ण प्रसन्नता देऊन गेले.

5 गंगा तलाव

               श्रद्धा माणसाला जगण्याची उमेद देत असते. हिंदूच्या मनातील गंगेचं पवित्र स्थान कोणीही कधीही हिरावून घेऊ शकत नाही. जगाच्या पाठीवर हिंदू  कुठेही गेले तरी सुप्तपणे गंगा त्यांच्या मनात वहातच राहते. मॉरिशस बेटाच्या मध्यात डोंगरांच्या रांगांच्या एकात एक गुंफलेल्या पाकळ्यांमधे जणुकाही मधल्या परागाप्रमाणे मॉरिशसच्या हृदयस्थानी असलेल्या तलावाला ``गंगातलाव’’ नाव नसतं मिळालं तरच नवल. ह्या ग्रॉंम्बे (Grand Basin) भागातील ही सुंदर जागा तेथे व्यापारासाठी येणार्या पंडित संजीवनलाल ह्यांच्या मनात भरली. 1866 च्या सुमारास फ्रेंचांची परवानगी घेऊन त्यांनी तलावाकाठी शंकराचं देऊळ बांधलं. शंकराची भव्य पिंड खास भारतातून बनवून आणून त्यांनी येथे शिवाची प्राणप्रतिष्ठा केली.  ह्या भव्य शिवलिंगाचं दर्शन  घेतांना मन प्रसन्न होतं. त्या देवालयातील,  एका कुशीवर झोपलेल्या बाल शिवाचं गोंडस चित्र मला फार मोहवून गेलं.

 तलावाभोवती प्रदक्षिणा करता येईल असा सुंदर रस्ता आणि घाट बांधला आहे.  गंगातलावच्या आजुबाजूचं पवित्र वातावरण आज आमच्या मनाला जेवढं भुरळ घालत होतं तेवढच आपल्या पूर्वजांनाही आपल्या पवित्र भारतभूची आठवण करून देत असावं. कारण हा गंगातलाव पाहून हिंदुंच्या मनातील गंगाप्रेम उचंबळून येत असे. कोणाला स्वप्न पडलं की गंगोत्रीच्या जाह्नवी मधून निघालेला झरा ह्या गंगातलावात येऊन मिळत आहे. त्यांच्या ह्या स्वप्नाचा बोलबाला होऊन गंगामैया आपल्या भेटायला येथे अवतरली आहे अशी लोकांची श्रद्धा अजून दृढ झाली. लोकभावनेचा विचार करून नंतर तेथील पंतप्रधान रामगुलाम शिवसागर स्वतः भारतात आले.  थेट गंगोत्रीच्या गोमुखचे पवित्र गंगाजल घेऊन ते मॉरिशसमधे गेले. तेथे विधिवत् आणि मोठ्या समारंभपूर्वक हे गंगाजल गंगातलावात मिसळण्यात आले. गंगातलाव खरोखरच गंगानिधान झाला.

        डोंगराच्या कुशीत आणि चिनी पेरुंच्या दाट जंगलांनी वेढलेला हा तलाव म्हणजे एका सुप्त ज्वालामुखीच्या खोल मुखाचा बनलेला तलाव आहे. मॉरिशसमधे असे अजूनही दोन Crater lake आहेत. ज्वालामुखीच्या तोंडाजवळचा भाग सुंदर असतो असं म्हणतात. त्याप्रमाणे हा तलाव अत्यंत सुंदर आहे. मॉरिशसमधील प्रत्येक प्रेक्षणीय स्थळे सौंदर्याच्या चढत्या भांजणीत वर वर चढणार्या कितव्या स्थानावर ठेवावीत हा कायम प्रश्न पडावा इतकी सुंदर आहेत. ह्या गंगातलावच्या शेजारी असलेल्या एका उंच टेकडीवर चढून मारुतीरायाचे दर्शन घ्यावे लागते. तेथे ह्या वीरवरासोबत दिसणारा गंगा तलावाचा परिसर उंचावरून पक्षाप्रमाणे पहावा आणि डोळ्यात साठवून ठेवावा. गंगा तलावाच्या शेजारी विश्वहिंदूपरिषदेने बांधलेले  मंदिर आणि  त्याच्या सोबत असलेला 33 मिटर किंवा 108 फुटी शिवाचा भव्य पुतळा उभारण्याचे काम  आम्ही असतांना होत आले होते. 

 पोर्तुगीज आणि ब्रिटिशांच्या वेळी  धार्मिक सुट्या नाकरल्या जात असल्या तरी आज मात्र दर महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा असते. पुढे त्याचे वर्णन यईलच.

6`श्री क्षेत्र विठ्ठल'.

13 फेब्रुवारी 2006 ,भारतीय कॅलेंडरप्रमाणे आज वसंत पंचमी! पण इथे मात्र गणपतीचं वातावरण. सरींवर सरी बरसत होत्या. रुपेरी पाठीच्या पानांचा आघाडा नसला तरी दूर्वा भरपूर! दूर्वा आणि जास्वंदीची रेलचेल होती निसर्गात. मैत्रीणीने सांगीतलं, कॅसकॅव्हीलला मराठी वस्ती आहे. पांडुरंगाचं देऊळही आहे. खूप दिवस तेथे जायचं मनात होतं. शेवटी आज गाडी काढलीच. फ्लिक-आँ-फ्लॅकच्या रस्त्याला लागलो. रस्त्याच्या दोन्हीबाजूला उसाचे मळे डोलत होते. शेतामधल्या स्प्रिंक्लर्स मधून नर्तकीसारखं गोल गोल उडणारं पाणी बघत गाडीतून जाता जाता एकदम सप्पकन पाण्याचा सपकारा गाडीच्या काचेवर बसला आणि पुढचे दोन मिनिटं गाडी मांजरासारखं वायपर्सनी आपलं तोंड साफ करत बसली. ``थांब थांब थांब!'' मी ओरडले. रस्त्याच्या डाव्या कडेला पाटी होती – `श्री क्षेत्र विठ्ठल'. डावीकडे वळलो. गाडी वळणं वळणं घेत जणू शेतातूनच चालली होती. उसाच्या मळ्यातले स्प्रिंक्लर्स वारंवार गाडीवर पाण्याचा शिडकावा करत होते. मुख्य रस्ता सोडून आत आल्याने वस्त्या वस्त्यांना जोडणारा रस्ता शांत होता. मधेच अफ्रिकन लोकांची वस्ती लागली. मुलं रस्त्यावर खेळत पळत होती. बायका कडेवर पोट्ट्यांना सांभाळत गप्पा मारत होत्या. नाक्यावर तरुणांचा घोळका गप्पा मारत उभा होता. गाडीची काच खाली करत मी देवळाची विचारणा केली. त्यांनी हातानीच रस्त्याचं वळणं दाखवत गाडीला रस्ता दाखवला. अरुंद असलेला रस्ता देऊळ जवळ येताच चांगला रुंद आणि प्रशस्त झाला होता. पार्किंगला चांगली जागा होती. सगळीकडे प्रसन्न शांतता होती. देवळाच्या कंपाऊंडची कडी काढून आत गेलो. ओंजळीत मावणार नाहीत अशी टप्पोरी जास्वंदीची फुलं झाडावर हेलकावत होती. रंगसंगती पहात रहावी अशी. एकाच फुलामधे किती रंगांची दाटी झाली होती. पण एकही रंग विसंगत वाटत नव्हता. देवळावर देवळाच्या स्थापनेची पाटी होती. `मराठी प्रेमवर्धन मंडळी' 1902. `मराठी प्रेमवर्धन मंडळी' यांनी ते देऊळ उभारलं होतं.विठ्ठल रुक्मिणीच्या सुबक सुंदर मूर्ति शेजारीच पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीची तसबीर होती. ज्ञानेश्वर माऊलींनी विठ्ठलाची प्राणप्रतिष्ठा प्रत्येक मराठी हृदयात केल्याची ती निशाणी होती. आपल्या नाम्यानी किंवा जनीनी मारलेली हाक ऐकताच धावून येणारा, चंद्रभागेच्या तीरी भक्तांची वाट बघत उभा राहणारा विठू इथेही तेवढ्याच अचलपणे Black River च्या काठी भक्तांना भेटायला आतुर होऊन उभा होता. आवारात मंदिराशेजारीच एक हॉल होता. Vito Hall  - - विठो हॉल! मातृभूमीचा, मातृभाषेचा धागा किती चिवट असतो ना ! काळाचे, दोन देशांमधील कित्येक किलोमिटरचे अंतर, इतकच नव्हे तर देशाटनामुळे बदललेल्या नागरिकत्वाचे अंतर त्यांना तोडू शकत नव्हते. मातृभाषेच्या शिक्षणाची मेख इथेच आहे. मातृभाषेच्या शिक्षणातून आपल्या मातीचा परिसर मनात झिरपत राहतो.  आणि मग त्यात रुजलेले आपले संस्कार हृदयातून बाहेर फुलत येतात.

             परत यायला निघालो. उजव्या हातालाच मोठ्ठं फुटबॉल ग्राऊंड होतं. मुलं खेळत होती. टू व्हिलरवर बसून एक तरूण आणि एक पन्नाशीचा माणूस खेळ बघण्यात रंगले होते. गाडी थांबवली. चेहरेपट्टी, नाके डोळे मराठी मुशीतले वाटत होते. when the temple opens? प्रवीणच्या प्रश्नाला ``उघडंच आहे'' असं मराठीतून उत्तर आलं. पुढची चार-पाच मिनिटं कळणारया कळणार्या मराठीतून गप्पा मारल्या. शिवरात्रीला रात्री सात वाजता कीर्तन आहे.  अरेव्वा! तुमचं नाव काय? तुकाराम! खरोखरचा तुकाराम भेटल्याचा आनंद झाला. तुझं नावं काय? प्रवीणने त्या मुलाला विचारलं. ``राजीव गांधीमधलं राजीव.'' मुलानी हसत उत्तर दिलं. जवळचे नातेवाईक भेटावेत असा आनंद दुतर्फा झाला. आपका नाम-? मुलानी विचारणा केली. प्रवीण! भाबीजीका नाम? माझ्याकडे बघत प्रश्न आला. अरुंधती! प्रवीणने त्याचं कुतुहल पूर्ण केलं. समोरून गाडी येत होती. हालणं भाग होतं.

हात हालवत निरोप घेत निघालो. - - श्री क्षेत्र विठ्ठल - - कॅसकॅव्हील - - - तुकाराम - -मॉरिशस - - विठो हॉल - -विठ्ठलाच्या मूर्तीसोबत पंढरपूरच्या विठोबाचा फोटो - - - इथे ब्लॅक-रिव्हरच्या काठीही विठोबा - - कटेवरी हात विटेवरी उभा असाच - - तुकाराम पण येऊन पोचला इथे - - मनाशी अजून सांगडच घातली जात नव्हती. स्वप्नातही शक्य नव्हती पण प्रत्यक्ष पुढे उभी राहिली होती अशी घटना! सत्य  खरोखरचं स्वप्नापेक्षाही अद्भुत असतं.

--------------------------------------------------------------

 ( पुढचे प्रकरण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. ) 

12 रंगांचा देश -    

खाली  दिलेल्या प्रकरणाच्या नंबरवर क्लिक केल्यास ते प्रकरण उघडेल

 0  1   3  4  5  6  7  8  9  10   11 

12  13  14  15  16  17  18  19  20  21.

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

भौमासुर / नरकासुर वध –

रामायण Express- ची माहिती