13 बुलांजेरी आणि पॅटिसेरीचा देश

 

  

 13 बुलांजेरी आणि पॅटिसेरीचा देश

(Boulangerie and Pattisseri)

बॅगेट्स (Pain Baguette )

                  मॉरिशसमधे आम्ही सकाळ संध्याकाळ एक लांबची जॉगिंग रपेट मारून येत असू. प्रवीण ऑफिसला गेला की घराच्या आजूबाजूच्या परीसरात मी पायी फिरून येई. त्यावेळी मॉरिशसच्या रोजच्या कारभाराशी निगडीत अशा दोन शब्दांचाही परिचय झाला. ते म्हणजे बुलांजेरी आणि पॅटिसेरी. हे दोन्ही फ्रेंच शब्द.  बुलांजेरी आणि पॅटिसेरी म्हणजे मॉरिशसच्या रोजच्या व्यवहाराचा कणा. बुलांजेरी म्हणजे वेगवेगळे पाव ब्रेड बनविण्यात  आणि विकण्यात माहीर असणार्या बेकर्या. पॅटिसेरी म्हणजे केक पेस्ट्री बनवून विकणारी बेकरी. बुलांजेरी एकदिवस जरी बंद असेल तर मॉरिशस एका दिवसात कोलमडून पडेल. लोकांना जास्तीत जास्त जरूर असेल तेंव्हा संपावर जायचं ही मनोवृत्ती येथे नाही. (किंबहुना गांधीजींनी परदेशी इंग्रजी राजवटी विरुद्ध उगारलेलं असहकाराचं शस्त्र बूमरँगसारख आता आपण आपल्यावरच चालवून आपल्याच मालमत्तेचं नुकसान करून घेतांना पाहून आपल्याला जे भारतीयांचं नुकसान करणं  जमलं नाही ते भारतीय लोक स्वतःहूनच करून घेतांना पाहून इतर देशीयांना मनसोक्त आनंद होत असेल.) लोकांना लागणारी ही दैनंदिन सेवा नित्यनियमाने  चोख चालू असते. येथील लोकांवर फ्रेंचांचा मोठा प्रभाव टिकून आहे. पोळी भाकरी, रोटी हे प्रकार काळाच्या रेट्यात बरेच मागे पडले आहेत. आमचा मॉरिशियन मित्र विशाल दरवेळी `मी भाकर खाऊन आलो' असं सांगत असे. प्रत्यक्षात तो ब्रेडच खाऊन येत असे. इतका ब्रेड लोकांच्या अंगवळणी पडला आहे. रोज पहाटेच पब्लिक हातात पिशवी घेऊन कुठे चाललं आहे हे विचारायला नको. पहाट झाली की, `पाऊले चालती बुलांजेरीची वाट' हे रोजचं पहाटेचं दृश्य असे. परत संध्याकाळीही ऑफिसमधून येता येता प्रत्येकाची बुलांजेरीला भेट नक्की असे. अशा छोट्या मोठ्या बुलांजेरी गल्ली बोळात आपल छोटं मोठं दुकान थाटुन बसलेल्या असत. ह्या बुलांजेरीमधे मोठ्या मोठ्या वेताच्या टोपल्या ठेवलेल्या असत. भट्टीतून निघालेले ताजे ताजे गरमागरम पाव त्यात सतत ओतले जात. आपल्याला पाहिजे ते आणि पाहिजे तेवढे ब्रेड उचलून शेजारीच ठेवलेल्या कागदी पिशवीत घालून घ्यायचे. स्लाईस्ड ब्रेडपेक्षा कोपराएवढे लांब बॅगेट्स (Pain Baguette ) आणि कडक बन पाव ह्यांना सकाळी मोठा उठाव असे. बहुतेकांचा सकाळचा नाश्ता ह्या कडक बनपावाचा असे. ह्या कडक बनपावातील आतला मऊ भाग काढून टाकून त्यात चिकन, मटण किंवा कुठलीही भाजी भरली की नाश्ता तयार. दुपारच्या जेवणालाही  बॅगेटचे दोन भाग करून आतला मऊ भाग काढून त्यात असेल ते कालवण, सॅलड  भरलं की जेवण तयार.

केळीवाला -

ह्या बुलांजेरी आणि पॅटेसरिचा पत्ता नवीन माणसाला हुडकुन काढायला नको. ज्याप्रमाणे रामासमोर हनुमान, विष्णुसमोर गरूड, शिवासमोर नंदी असतोच त्याप्रमाणे पहाटे ज्या दुकानासमोर केळीवाला बसला असेल ते दुकान म्हणजे बुलांजेरीच असणार हे वेगळं सांगायला नको. सकाळी नाश्त्यासोबत केळं हे इथल्या ब्रेकफास्टचं खास विशेष. अमेरिकेत an apple a day  ने डे सुरु होत असला तरी येथे banana a day  ने  दिवसाची सुरवात होते.

मुरड कानोला -

इथल्या पॅटिसेरीमधे केक पेस्ट्रीज चे खूप प्रकार नसले तरी एक पदार्थ माझं लक्ष वेधून घेई. तो म्हणजे मुरड कानोला. घराच्या जवळ असलेल्या स्पा (SPAR) नावाच्या मॉलमधे तर हे मुरड कानोले नेहमी असत.  त्याच्याबद्दल विचारल्यावर कळलं की  उकडलेल्या रताळ्याच्या गरात मैदा घालून ह्या करंज्यांच आवरण बनवलं जातं. आतमधे खोबरं आणि साखरेचं सारणं. सुबक मुरड मात्र खास भारतीय वळणाची. दुपारी एकच्या सुमारास ह्या मॉलमधे गेलं तर अचानक बॅगेटचा खमंग वास दरवळु लागे. भट्टीतून भले मोठे स्टँड ढकलत बाहेर आणले जात. एकएका स्टँडवर सहज पाचएकशे गरम बॅगेटस् असत. स्टँड गरम आहे. जपून असं तो सांगत असतांनाच स्टँडवरचे बॅगेट लोकं भराभर उचलून घेत. वर तीळ लावलेले खरपूस भाजलेले बॅगेटस् घेऊन जायचा मोह आम्हालाही आवरता येत नसे. त्याच्या स्लाईसेस करून लोणी लावून भाजून खायला एकदम मस्तच लागत. त्याच्याबरोबर पावभाजीची भाजी केली की संध्याकाळ साजरी होई.

                           मॉरिशसमधे नऊ ही जशी कार्येलये उघडण्याची वेळ आहे तशी चार ही कार्यालये बंद होण्याची वेळ. चार वाजता शिपाई हातात कुलुप घेऊन उभा असे. शुक्रवारी चार वाजता बंद झालेले ऑफिस सोमवारी सकाळी आठ वाजताच उघडे. साडेतीन चार वाजताच दुकानांच्या पापण्या मिटु लागत. रस्ते ओस पडु लागत. सहा वाजताही टिकून असलेली एखादि बेकरी किंवा एखादाच उघडा असलेला मॉलही सात वाजता रजा घेई. सात वाजता रस्त्यांवर शुकशुकाट असे. सात नंतर सागा डान्ससारखे थोडेबहुत कार्यक्रम हॉटेल्स किंवा काही संस्थांपुरतेच मर्यादित असत.   बहुतेक लोक सकाळी ऑफिसला जाता जाता किंवा ऑफिस सुटल्या सुटल्या तेथल्याच कोपर्या कोपर्यांवर असलेल्या टपर्यांमधील बॅगेटचे बनविलेले सँडविच खाऊन ऑफिसला किंवा घरी जात. ‍ऑफिसच्या मधल्या सुट्टीत किंवा ऑफिस सुटल्यावर लोक पोर्ट लुईच्या मंडईतून भाजी घेत. पोर्ट लुईचं भाजी मार्केट हे आपल्या पुण्याच्या फुले मंडई किंवा मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटप्रमाणे छान बांधलेले  आहे. त्यात भाजीवाल्यांसाठी उंच कट्टे बांधलेले आहेत. ह्या मंडईत भाजी , फळांसोबत भारतातून आलेली सर्व वृत्तपत्रे, मासिकेही मिळत.

------------------------------------------------------------------------------------------------

 ( पुढचे प्रकरण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. ) 

14 चिली आणि लीचीच्या  देशात –

खाली  दिलेल्या प्रकरणाच्या नंबरवर क्लिक केल्यास ते प्रकरण उघडेल

 0  1   3  4  5  6  7  8  9  10   11 

12  13  14  15  16  17  18  19  20  21.

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

भौमासुर / नरकासुर वध –

रामायण Express- ची माहिती