17 मॉरिशियन लग्न –
17 मॉरिशियन लग्न –
लग्न एक संस्मरणीय सोहळा -
तुम्हाला सोनेरी सूर्यप्रकाशात न्हाऊन निघणाऱया निळ्याशार समुद्राच्या पांढऱया मऊ मऊ वाळूवर, गडद निळ्या आकाशाच्या छत्री खाली लग्नाच्या आणाभाका घ्यायच्या आहेत? का निळ्या-निळ्या समुद्राच्या पाण्याखाली जिथे रंगीबेरंगी माशांचे थवे वर्हाडी म्हणून तुमच्या अवती भोवती सुळकन् सळसळत आहेत अशा निळ्या पाताळात तुमच्या जलपरीचा हात जीवनभरासाठी हाती घ्यायचा आहे? का समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन वारं शीडात भरून दूरवर समुद्राचा फेर फटका मारत सागा नृत्याच्या तालावर थिरकत वाईन आणि बार्बेक्यूचा आस्वाद घेत कॅटॅमरॉन मधे आपल्या जीवनसाथीबरोबर आपल्या सहजीवनाची सुरवात करायची आहे? का एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सुंदर पवित्र देवळात देवाच्या साक्षीनी ‘कर हा करी धरिला शुभांगी’ म्हणत आपल्या लग्नाची आठवण मोरपिसासारखी आयुष्याच्या पुस्तकात सदोदित जपून ठेवायची आहे? मॉरिशस मधे लग्न करण्यासाठी असे सुंदर सुंदर पर्याय तेथल्या टुरिझम खात्याने आपल्या समोर ठेवले आहेत.
Civil Status
Office–
प्रवीणच्या कामानिमित्त त्याला एकदोनदा Civil Status office मधे जायला लागले. तिथे त्याला आलेले अनुभव फारच हृद्य वाटले.
इथे 1876 पासून लोकांच्या जन्म मृत्यू,लग्नाच्या नोंदींची रजिस्टर्स ठेवली आहेत. नवीन कायद्याप्रमाणे 1905 पासूनच्या रेकॉर्डचे संगणीकरण करायचे आहे. जानेवारी 2005 ला त्यांचे 1920 पासूनचे रेकॉर्ड संगणीकृत झाले होते.
मुल जन्माला आले की त्याला जन्म दाखल्या बरोबर पोस्टमास्टरला मुलाच्या नावानी 200 रुपयांचे सेव्हींग बँक अकाउंट उघडण्याचा आदेश दिला जातो. त्याच वेळी ऑफिस मधे एक जोडपं मुलाच्या जन्माचा दाखला घ्यायला आलं होतं. बापाचं नाव दौलत आणि आईच नाव झाँसी रानी. प्रत्येक हॉस्पिटलच्या बाहेर civil status office असते. तिथेच जन्म मृत्यूची नोंद होते. मॉरिशसमधे 47 ठिकाणी अशी कार्यालये आहेत. लग्नाच्या नोंदींसाठी मात्र काही मोठी ऑफिसेस आहेत
Marriage celebration officer असतो. Port Loie च्या ऑफिसमधील officer अतीशय उत्साही आणि हसतमुख होता. त्याचा हॉल टापटीप आणि छानच ठेवला होता. हॉलमधे छान पुष्परचना करून ठेवली होती. नोंदणी करायला आलेल्या एका नवदाम्पत्याला त्यानी सोफ्यावर बसायला सांगितलं हासतमुखानी त्यानी सांगितलं “Relax! Do not take tension. Since marriage takes place only once in life time his efforts
were to make it happy and memorable.” लग्न लावतांना मुलीचा जन्म दाखला पाहिला जातो.18 वर्ष हे जरी कायद्यानी मुलीच्या लग्नाचं वय असलं तरी आईवडिलांची सम्मती असेल तर 16 व्या वर्षीही लग्न करता येतं. Section 201, 202 आणि 205 Civil Marriage
Act प्रमाणे कायद्याच्या provisions ह्या तरतुदी अधिकारी समजावून सांगत होता. ``You must remain faithful to your wife. You must share her
distress. You must educate your children with responsibility. You must remain
sincerely faithful to your wife in all her activities.’’ sincerely ह्या शब्दावर तो परत परत भर देत होता.
हिंदू मॉरिशन लोकांचं विधिवत् लग्न हा एक हृद्य अनुभव होता. अशा अनेक भारतीय मॉरिशन लोकांच्या लग्नांची आमंत्रण आली की काहीतरी नवीन पहायला मिळणार असल्याने प्रवीण आणि मी आनंदाने लगेचच होकार देत असू. मॉरिशस मधे लग्न कुठल्याही धर्माचं अथवा जाती-पंथाचं असो ते फक्त शनिवार आणि रविवार ह्या दोन दिवसातच होणार असा अलिखित नियमच आहे. इथल्या समजुतदारपणानी ह्या नियमाला हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात अद्याप आव्हान नाही आणि कोणी देणारही नाही. मुहुर्तांच्या चौकटीत बसत नाही म्हणून आत्तापर्यंत कोणाची लग्न बिघडलीही नाहीत. त्यामुळे लग्नासाठी काम सोडून रजा घेणे, शाळा ऑफिसच्या बुट्ट्या, सुट्ट्या, रजा , ती नाकारणं ह्या गोष्टीच उद्भवत नाहीत. सगळं कसं सुरळीत पार पडतं.
भारतीय वंशाच्या वधूच्या साड्यांची खरेदी मात्र शक्य असेल तर भारतातच केली जाते. इथल्याही काही दुकानात भारतीय साड्या मिळतात. पण त्या फारच महागही
असतात आणि त्यात विविधताही कमी असते. मराठी मुलींना लग्नात काष्टी म्हणजे काष्ट्याची साडी/ नऊवारी नेसायची इतकी हौस असते की ही नऊवारी साडी पुण्यामुंबईला कोणी जाणार असेल तर खास मागवली जाते. विशाल बापूच्या नात्यातल्या एका लग्नाच्या जेवणाचं निमंत्रण होतं. त्यावेळी मीही काही कामासाठी भारतात जाऊन येणार होते. त्यामुळे मला मुलीसाठी काष्ट्याची साडी आणायचं काम होतं. लग्न मुलीकडचं असो अथवा मुलाकडचं, दोघेही आपापल्या नातेवाईकांना आपापल्या घरी शनिवारी संध्याकाळी जेवायला बोलावतात. आम्ही गेलो तेंव्हा घराच्या अंगणातच मांडव घालून टेबलं खुर्च्या मांडल्या होत्या. घराचं अंगण लहान असेल तर रस्त्यावर मांडव टाकला जातो. अशावेळेला रस्त्याच्या दोन्ही बाजूंना No entry चे फलक आधीपासून लावले जात. नेहमी सुंदर सजवलेल्या घरात जमिनीवर आज सगळीकडे मोठेमोठे पुठ्ठे अंथरून ठेवले होते. घर खराब होऊ नये म्हणून! त्याचं कारण ही दिसत होतं. सर्व स्वयंपाक घरातच बनवला जात होता. घरातल्या सर्व स्त्रिया, नातेवाईक आणि ओळखीच्यांच्या स्त्रियाही अंग मोडून स्वयापाकघरात काम करत होत्या. आलेल्याचे आगत्याने स्वागत होत होते. बालपणीचे अनुभवलेल्या वातावरणाचे धागे परत इथे कुठेतरी जुळत आहेत असं वाटत होतं. पंगत हा प्रकार नव्हता. लोकं जसे येतील तसे जेऊन जात होते. हजारोंनी लोक असाही प्रकार नव्हता. सर्व कार्यक्रम कुटुंब आणि अति जवळचे इतपतच मर्यादित होता. आम्ही जेवायला बसलो तर घरातील पुरुष माणसांपासून सर्वजण वाढायचं काम आग्रहाने करत होते. एखाद्या कोकणातल्या लग्नाला गेल्यासारखं वाटत होतं. केळीच्या पानावर लोणचं, कोशिंबिरी ,फळभाज्या, पालेभाज्या असं सगळ पान सजलं. काळाच्या ओघात पानातल्या डावीकडच्या उजवीकडच्या पदार्थांनी जरी त्यांच्या जागा सोडल्या असल्या तरी उजवं डाव न करता प्रत्येकाला आग्रह होत होता. कच्च्या पपईचं सफरचंद घालून केलेलं लोणचं होतं. श्रावणघेवडा म्हणजे बीन्सची भाजी आवडून गेली. शुशु ह्या पेरु सारख्या दिसणाऱया आणि थोडीफार दुधीच्या चवीशी साधर्म्य साधणारी भाजी बनवितांना मात्र एकदम चवदार बनविली होती. सोबत त्याच्या पाल्याचीही भाजी होती. ही भाजी घेतल्याशिवाय लोकं मंडईतून बाहेर पडत नाहीत हे मी पाहिलं होतं. आज त्याची भाजी खातांना आम्हालाही त्या चवीचा मोह पडला. पण हे सगळं कशाशी खायचं ह्याचा विचार करत असतांनाच विशाल म्हणाला, ``भाकर घ्या नं!'' टेबलावर एका पसरट कुंड्यात गव्हाच्या रोट्या ठेवलेल्या होत्या. ( त्या पोळ्याही नव्हत्या. ) त्यालाच सगळे भाकर संबोधत होते. मराठी भाकर मॉरिशसमधून हद्दपार झाली असली तरी `काप गेले आणि भोकं राहिली' या न्यायाने नुसत्या नावाने अस्तित्त्व टिकवून होती. तिथल्या कोणालाच भाकर ही ज्वारी किंवा बाजरीची असते हे माहित नव्हतं. एवढच कशाला त्यांनी ज्वारी बाजरी कधी पाहिलीही नव्हती आणि नावंही ऐकली नव्हती. ज्या कणकेच्या रोट्या बनवल्या जात तो गहू मॉरिशसमधे पिकत नव्हता. तो ऑस्ट्रेलियाहून बंदरावर आला की तेथेच पोर्ट लुईला मोठ्या मोठ्या गिरण्या होत्या त्यात तो दळला जाई आणि लोकांपर्यंत फक्त कणिक नव्हे मैदारूपातच पोचे. ह्या मैद्याचे ब्रेड किंवा रोट्या बनविल्या जात. त्यामुळे मॉरिशसच्या आमच्या मित्रांनी गहू, गव्हाच्या ओंब्या, गव्हाची हिरवीगार आणि गहू पिकला की सोनेरी झालेली शेतं कधि पाहिलीच नव्हती. असो. मॉरिशन लग्नाचं जेवण अप्रतिम होत. लग्नाचं जेवण पूर्ण शाकाहारी असतं. विशाल सांगत होता. लग्न झाल्यावर मात्र आमच्याकडे व्हेज किंवा नॉनव्हेज गोंधळ असतो. गोंधळ म्हणजे आपल्याकडे लग्नानंतर जो खंडोबाचा गोंधळ घालतात तोच. दुसर्या दिवशी लग्नाला यायचा आग्रह करत विशाल त्याची आई आणि नातेवाईकांनी आम्हाला निरोप दिला आणि छान बांधलेल्या दोन पुड्या. ``काय आहे ह्यात?'' ``स्वीट'' विशाल म्हणाला. जेवण इतकं सुग्रास होतं की जेवणात गोडाची कमी जाणवलीच नव्हती. ``कानोला आहे.'' ओल्या खोबर्याचे दोन मुरड कानोले घेऊन आम्ही घरी आलो. येथे जेवतांना गोड खायची पद्धत नाही. गोड पदार्थ जातांना बरोबर दिला जातो.
दुसर्या दिवशी आम्ही लग्नाला गेलो. स्त्रिया साडी ते फ्रॉक अशा ब्रॉड स्पेक्ट्रम मधे आल्या होत्या. कित्येकींचे शॉर्ट बॉब असले तरी अनेक जणींनी केसात गुलाब माळले होते. तेही कानावर येतील असे. फुलं कानावर माळण्याची ती पद्धत पाहून माझ्या डोळ्यासमोर महिषासुरमर्दिनी स्तोत्रातील देवीची सुंदर मूर्ती प्रकट होत होती. नेहमी रणांगणावर निवास करणारी ही शक्ति-देवताही जरा निवांत वेळ मिळाला की रणांगणाच्याच कडेला उगवलेलं एखादं फूल त्याच्या कोवळ्या तांबुस पानासहित खुडून कानावर खोचते.
सुमन सुगंधित किंचित तांबुस पर्णविभूषित कर्णभुषा
तुजसि दिसेचि मनोहर सुंदर मोहक रूप खुले सुषमा
तुझि कुरळी कुरळी मन मोहवि श्यामल सुंदर केशभुषा
जय जय हे महिषासुरमर्दिनि नित्य यशस्विनि तूच उमा ।।12.2
कदाचित पूर्वी भारतीय स्त्रियाही असच कानावर फूल खोचत असतील. स्तोत्रात वर्णन केलेली देवी इथे अचानक मला गवसल्याचा आनंद झाला. असं पूर्वीचं सूत सापडलं की ते मला स्वर्गापर्यंत नेत असे.
लग्नाचे सर्व विधी यथासांग झाले. जेवणाचा घोळ मात्र कुठेच नव्हता. लग्न लागल्यानंतर सुबकपणे बांधलेलं एक बदामाचं चॉकलेट(पेढ्याएवढं) सर्वांना वाटण्यात आलं. बत्ताशाला किंवा पेढ्याला शोधलेला पर्याय छान होता. बहुतेक लग्नांच्या हॉलबाहेर दालपुरी आणि आईस्क्रीमची गाडी उभी केलेली होती. ज्याला भूक लागेल त्याला तिथे दालपुरी विकत घेता यावी व फार लांब जायला लागू नये ह्यासाठी ही सोय होती.
प्रवीणच्या ऑफिसमधील एका मुलीच्या लग्नाला गेलो होतो. ती तामिळ मॉरिशियन होती. प्रत्येक तेलगु अथवा तामिळ देवळाला इथे कल्याणमंडपम् (लग्नासाठी सभागृह) असतोच. तिथेच हे लग्न होतं. लग्नाचे विधी पूर्ण झाल्यावर नवरा-नवरीला भेटायला गेलो. एका छोट्या लवचिक काडीच्या दोन्ही टोकाला मुंडावळ्यांसारखे फुलांचे गजरे बांधले होते. भेटायला येणार्या प्रत्येकाने ती मुंडावळी नवरा नवरीच्या डोक्यावर ठेवायची प्रथा आपल्याकडच्या मुंडावळ्यांशी जुळत होती. कधी कधी पंढरीच्या पांडुरंगाच्या मुकुटावरून दोन्ही बाजूंना लोबणार्या गजर्याशी ही पद्धत मिळतीजुळती वाटे. येथेही जेवणाचा घोळ नाही. एक चॉकलेट घेऊन सर्वजण आनंदानी आपापल्या घरी जात होते. किंवा क्वचितच बाहेर दालपुरी खात होते.
---------------------------------------------------------
( पुढचे प्रकरण वाचण्यासाठी खालील प्रकरणाच्या नावावर क्लिक करा. )
खाली दिलेल्या प्रकरणाच्या नंबरवर क्लिक केल्यास ते प्रकरण उघडेल
Comments
Post a Comment