7 वादळांचा देश –
7 वादळांचा देश –
वादळ हेनी (Hennie)
आम्ही 6 डिसेंबर 2004 ला डिसेंबरमधे ह्या बेटबेटुल्यांच्या देशात पोचलो. बेटांसोबत येणारा विशाल समुद्र हा देशाच्या प्रत्येक घडामोडीवर ठसा उमटवून असतो. समुद्र आनंदी तर बेटांचा सारा समूह आनंदी. समुद्र रागावला की सारं बेट घराघरात गुपचुप बंद होऊन जातं. मॉरिशसची थोडी थोडी ओळख होत होती. अजुनही बरीच ओळख व्हायची होती. डिसेंबर ते मार्च हा मॉरिशसचा जसा Tourist season तसा cyclone season सुद्धा. आम्ही आल्यापासून अधुन मधुन स्थानिक लोकांच्या बोलण्यात वादळाचा उल्लेख यायचा. बाजारात नेहमीच्या एका दुकानात गेले होते. काउंटर वर बसलेली गोड म्हातारी म्हणाली, " It's too hot! Now we need a cyclone." " कधी येईल तुमचं cyclone?" मीही सहज विचारलं. "असं सांगून थोडच येणार आहे? मागे दोन वर्षांपूर्वी New year Eve लाच आलं होतं. अर्थात वर्षभर सतत वादळंच वादळं येत नाहीत. इथला उन्हाळा
म्हणजे डिसेंबर ते मार्च हा वादळांचा काळ'' कोणी सांगे, "February is the month of cyclones. आम्ही भारतातून येणार्या पाहुण्यांना भारतातच थोपवून ठेवलं मार्चमधे या म्हणून कळवून दिलं. पाहुणे आले आणि मार्च 21 ला सोमवारी Meteorological
Service च्या Director Mr. Sok Appadu
(शोक अपादु) नी आम्हाला नको असलेल्या ह्या बिनबुलाये मेहमानच्या आगमनासाठी मॉरिशस बेटाला सज्ज राहण्याचे आदेश दिले. वादळ मॉरिशसवर येऊन थडकणार हे नक्की झाल्यावर ह्या उपद्व्यापी बाळाचं नाव हेनी (Hennie) ठेवण्यात आलं. वादळापूर्वीची suspense शांतता सुरू झाली. रेडिओ, टि.व्ही. वर वादळाची सतत माहिती चालू होती. मॉरिशसच्या उत्तरपूर्वेकडून येणारं हे वादळ हातात वार्याचा असूड आणि पावसाची गोफण घेऊनच हजर झालं. पाहुण्यांना मॉरिशस दाखवायचं होतं. आमच्या हातात थोडेच दिवस होते. एकदा का वादळात सापडलो तर कायमचच राहून जाणार होतं. आमच्या नेहमीच्या टॅक्सी ड्रायव्हरला -- कुमारला फोन केला. यायला जरा नाराज होता. पण पाहुण्यांना 8 दिवसात परत जायचं आहे म्हटल्यावर येतो म्हणाला. ``पाहुणे भारतीय आहेत का दुसर्या देशाचे? '' फोनवरूनच त्याने पहिला प्रश्न टाकला. माझाही स्वाभिमान पटकन दुखावला गेला. तरी सावध पवित्रा घेत मी त्याला कारण विचारलं. तो म्हणाला, ``नाही नाही तसं काही नाही. cyclone grade 2 साठीसुद्धा माझ्या Taxi चा अणि passengers चा insurance आहे. पण पाहुणे दुसर्या देशातील असले तर त्यांना साहसी ट्रेक, पाण्यातील साहसी खेळ यांची आवड असते. ते भारतीय असतील तर त्यांना बीचवर जाऊन बसायला किंवा खरेदी करायला आवडतं. त्याप्रमाणे मी दिवसाचा आराखडा आखला असता.'' क्षणभर काय बोलावं ह्या विचारने मी अवाक् झाले. त्याचं खरं होतं. आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांना दिवसभराचा डबा दिला की ते आनंदाने एखाद्या बीचवर जाऊन आराम करत. लहानपणापासून आपल्याला ह्या साहसी खेळांची कधी तोंडओळखच झाली नाही. पारतंत्र्याचं जोखड आयुष्यभर मानेवर वाहणार्या आम्हा भारतीयांना आणि आमच्या वाडवडिलांना आत्तापर्यंत ही संधी उपलब्धच झाली नव्हती. त्यांची सारी आयुष्य कुटुंबाच्या पोटासाठीच संपून गेली. आता मात्र आमची नवीन पिढी नक्कीच ह्या सर्व खेळांचं कौशल्य आत्मसात करेल असं वाटलं आणि नंतर आलेल्या भारतीय तरुणांनी माझ्या मनातले विचार कृतीतही उतरवून दाखवले.
कुमारसोबत आम्ही निघालो. नेहमी
निळाशार चमकदार दिसणारं आकाश आज अंगाला राखाडी फासून आलं होतं. रोजच्या अंग भाजून काढणार्या `आदित्य जगतापांनी' सकाळपासूनच बुट्टी मारली होती. वळणं वळणं घेत कुमारची 2ZM
01 taxi मॉरिशच्या रस्त्यांवरून धावायला लागली. 01 चा अर्थ होता 2001 सालची गाडी आहे. गाडीचा नंबर पाहिला की गाडी किती नवी किंवा जुनी आहे हे सहजच कळत असे. सर्वच गाड्यांची तब्बेत मात्र निरोगी असे. आजच्या हवामानानुसार जरा वेगळ्याप्रकारचा दौरा आखणं भाग होतं. फिनिक्सची ग्लास फॅक्टरी, शिप मॉडेल फॅक्टरी, शॅमॅरिलची सप्तरंगी वाळू, तिथून जवळच असलेला शॅमेरिलचा धबधबा, माहेबुर्गचं म्युझियम आणि माहेबुर्ग वॉटर फ्रंट असा दिवसभराचा कार्यक्रम आखून आम्ही निघालो होतो. खाली उतरलेले ढग,रिमझिम पाऊस, सभोवार हिरवळ आणि त्यातून जाणारा आमचा रथ! चित्रपटातील स्वर्गासारखंच दृष्य होतं.
फिनिक्सची ग्लास फॅक्टरी -
पहिलीत तळेगावच्या पैसाफंडच्या काचेच्या कारखान्यात गेलेली ट्रिप आठवत थोडसं नाखुशीनी गाडीतून उतरलो. ग्लास फॅक्टरीपर्यंत जायला सिमेंटची पायवाट बनवली होती. कुठे जायचं आहे हे विचारायाची जरूर नव्हती. सिमेंटच्या पायवाटेवर मार्गदर्शक म्हणून पावलांच्या उमटवलेल्या ठशांवर काचेचा रस ओतल्याने पावलांचे ठसे चमकत होते. त्याचाच मागोवा घेत आम्ही आत गेलो. छोट्याशा जागेचीही सुबक मांडणी करून लोकांना कसं आकर्षून घ्यावं हे इथेच शिकावं. काचेच्या उकळत्या रसामुळे कुठे धग लागणं नाही, कचरा नाही, काचेच्या तुटक्या फुटक्या गोष्टींचा कचरा नाही. काचेच्या म्युझियममधे गेल्यासारखं! आत कामगार काचेच्या वस्तू बनवत होते. काचेची बंद मूठ, उघडलेला पंजा, पेपरवेटमधेच मॉरिशसचा पोस्टाचा स्टँप, जणु काही हत्तीने पाय देऊन चप्पट केल्यासारख्या फिनिक्सच्या दारूच्या (रिकाम्या) बाटल्या, दिवे, अशा सर्व काचेच्या
वस्तू मॉरिशसची आठवण म्हणून न्यायला ठेवल्या होत्या. आपल्याकडे कुंभार मातीचे गोल दिेवे बनवितात. त्यात खालच्याबाजूने तेल घालायचं. ते परत सुलटे करून ठेवले तरी त्यातून तेल गळत नाही. त्यांचा मॅजिक लँप बघतांना मला त्याचीच आठवण झाली. आपल्याकडचं मातीचं तत्रज्ञान इथे काचेत उतरवलं होतं. ``काच कारखान्यात काय पहायच आहे? पाच मिनिटात येतो.’’ असं कुमारला सांगून गेलो होतो. तब्बल पाऊण तासानी ``चला चला वादळ येईल’’ म्हणत बाहेर आलो तेंव्हा आमच्या हातात बरचं सामान गोळा झालं होतं. हसत हसत कुमारनी डिकी उघडून सर्व सामान नीट ठेऊन दिलं.
Ship model factory
Ship model factory मधेही Ship models बघता बघता इतके रंगून गेलो आणि फोटो घेता घेता तास कधी संपला हेही कळलच नाही. खरोखरच्या पण प्राचीन जहाजांच्या बनविलेल्या प्रतिकृती इतक्या सुंदर आहेत की त्यावरून नजर हटत नव्हती. ते बघतांना पाय खिळून राहिले होते. दरवेळेस बाहेर आलो की दरवाजाच्या समोरच गाडी घेऊन कुमार तयारीत रहात असे. गाडी जवळ लावता आली नाही तर हातात छत्री घेऊन तो दरवाजापाशी वाट पहात उभा असे तेही आम्ही न सांगता.
ढगांमधील गंगा तलाव-
वाकवा रिझरर्वॉयरच्या दिशेने गाडी धावत होती. येथून मॉरिशसला पाणीपुरवठा होई. रस्त्याच्या दुतर्फा पुरुष पुरुष उंचीची
सोनटक्क्याची झाडं शुभ्र पांढर्या आणि पिवळसर सोनेरी फुलांनी लगडलेली होती. ओलीचिंब झालेली झाडं वार्यावर हेलकावत होती. इतरवेळी त्यांचा घमघमणारा सुवास पाण्यासोबत वाहून गेला होता. गंगा तलाव हे इथल्या सर्व भारतीय पर्यटकांचं आवडतं ठिकाण. डोंगराच्या कुशीत तयार झालेलं सरोवर आणि त्या सरोवराकाठी बांधलेल शिवाचं मंदिर. गंगातलावाला लागून असलेली टेकडी चढून जाणार्यांसाठी मारुतीराया भेटण्यासाठी प्रेमाने उभा असे. आम्ही गंगा तलावला पोचलो तेंव्हा नेहमी अबोल असलेला वारा चांगला जोरजोरात घुमत होता. भांडणार्या मांजरांचे खर्जापासून तार सप्तकापर्यंत सारे आवाज आम्हाला काढून दाखवत होता. गंगा तलावाच्या पाण्याची पातळी वाढल्याने मंदिरापर्यंत उतरून जायच्या पायर्यांवरही पाणी आलं होतं. मंदिरापर्यंत जाणं अशक्य होतं. निसर्गाचं रौद्र रूप तरीही मोह घालणारं होतं. सगळीकडे ढग खाली उतरले होते. ढगांच्या ओलसर साम्राज्यात बुडून गेलेला एखादा डोंगर मधेच आपलं डोकं वर काढे तर कधी ढगांच्या झिरझिरित ओढणीतून झाडं डोकावून बघत. निळ्याशार पाण्यावर लोळणारे ढग जरा लोळत लोळत दूर झाले की गंगा तलावाचं निळंशार पाणी चमकू लागे तर कधी ढगाला सूर्यकिरणाने भोक पाडून सूर्य हळुच झाडांना हात लावून जाई. इतरवेळेस न सापडणारं निसर्गाचं हे दर्शन मनाला तिथेच बांधून ठेवत होतं. गंगा तलाव डावीकडे सोडून आम्ही पुढे आलो होतो. पावसातच कुमारने रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली. आलोच म्हणून धावत गेला. थोड्याच वेळात ओंजळभर चायनीज पेरु तोडून घेऊन आला. दुतर्फा चायनीज ग्वाव्हाचं जंगल होतं . चिनी पेरुंच्या झाडांवर अजूनही मोठ्या बोरांएवढे लाल लाल पेरू उठून दिसत होते. आपल्याकडच्या करवंदांसारखा हा मॉरिशन रानमेवा.
वादळवार्यात ढगातून सफर -
सरळ शॅमोनीला न जाता गाडी अॅलेक्झान्ड्रा फॉलवरून खाली ब्लॅक रिव्हर गॉर्ज (black river gorgue ) कडे धावायला लागली. वादळातील निसर्गसौदर्य काही वेगळच होतं. black river gorgue point ला गाडी थांबली. तेथील हिरव्यागार पर्वतरांगा, त्याच्यावरून खाली उड्या मारणारे प्रपात आणि सर्वापलिकडे दिसणारा निळा समुद्र ह्या नेहमीच्या दृश्यात ढगांनी हजेरी लावली होती. ढगांमुळे चित्र पुसट व्हायच्या ऐवजी अजून गडदच झालं होतं. एकामागे एक उभ्या असलेल्या पर्वतरांगा मागे मागे बघत जावं तशा जास्त जास्त निळ्याशार आणि गडद बनत होत्या. त्यांच्या three dimensional layers मधून दृष्टी बाहेर निघत नव्हती. आज पावसामुळे धबधबेही चांगलेच फुगले होते. सोसाट्याच्या वार्याने आमच्या छत्र्या उलट्या होत होत्या. आम्हाला `आता निघा'चे इशारे देत होत्या. नेहमी गोंडस वाटणार्या मॉरिशसच्या निसर्गाचं रागावलेलं रूपही अविस्मरणीय होतं. हे वादळ एवढं भयावह नव्हतं. कुमारचा कान गाडीतल्या रेडिओकडे होताच. दुपारी चार वाजेपर्यंत वादळाची ग्रेड 2 सुरू होईल असं वाटत होतं.तो पर्यंत आम्ही शॅमॅरिलला पोहचलो. शॅमॅरिल म्हणजे सप्तरंगी वाळूचा प्रदेश. जेवढा जास्त सूर्यप्रकाश तेवढे इथल्या वाळूचे वेगवेगळे रंग अजून अजून उठावदार दिसतात. अगदिच न पहाण्यापेक्षा पाहून तर येऊ म्हणून आत गेलो - -आणि ढगांमधून सूर्याने दर्शन द्यायला सुरवात केली. वाळूचे सातही रंग उजळून निघाले. वादळामुळे आज जिथे जावे तेथे आमच्याशिवाय हौशी कोणी नव्हते. आमच्यासाठीच निसर्ग मांडून ठेवला होता. अजूनही वादळाचं रूप गोंडस होतं. आम्ही जवळच्या शॅमेरिल वॉटरफॉलवर मोर्चा वळवला. पायर्या चढून जायला वहिनीने नकार दिला. भाऊ आणि मी पायर्या चढलो. खोल दरी, दाट झाडी आणि समोर एकाशेजारी एक तीन धबधबे खाली खोल दरीत कोसळत होते. तेवढ्यात दाट ढगांच्या सांदि-सापटीतून सूर्याचे किरण ढगांना भेदून दरीत उतरले. क्षणार्धात दरीत खाली प्रपातावर सप्तरंगी इंद्रधनुष्य चमकायला लागलं. न राहवून वहिनीला वरती आणण्यासाठी खाली धावले. तीही आली. देव देवळातच भेटतो असं नाही.
माहेबुर्गचं वस्तू-संग्रहालय - पावसाच्या रिमझिमित आमची गाडी महेबुर्गच्या म्युझियमजवळ आली. म्युझियमच्या आवारात घनदाट झाडी. फार पूर्वी लावलेली झाडं असावीत. सगळी पद्धतशीर ओळींमधे उभी होती. म्युझियमच्या मागच्या बाजूस एक लोकोमोटिव्ह इंजिन ठेवलं आहे. 1860 मधे मॉरिशसमधे रेल्वे ट्रॅक घालून जवळ जवळ 250 किमी.चं रेल्वेचं जाळ पसरून दळणवळण सोप्प झालं. दुसर्या महायुद्धापर्यंत ही रेल्वे मॉरिशसमधे टिकून होती. पण त्यानंतर वेगाने तयार झालेले रस्ते आणि वाढलेल्या गाड्यांच्या संख्येमुळे मॉरिशन रेल्वे तोट्यात जायला लागली आणि ती बंद झाली. त्याचच एक (locomotive) इंजिन बघण्यापुरतं ह्या वस्तुसंग्रहालयात टिकून आहे. आाता मॉरिशसमधे मेट्रोही आाली आाहे.
म्युझियममधे अफ्रिकेचे 1570 मधे छापलेले नकाशे, डचांच्या काळापासूनचे हातानी काढलेले नकाशे, चित्र हे तीन - चार शतकापूर्वीचे असले तरी त्यातील बारकावे लक्ष वेधून घेतात. 1598 ते 1602 मधे 13 डच तांडेल 46 जहाजं घेऊन आले. त्याची चित्रं तेथे सापडतात.
काही जहाजं बुडाली त्याचा शोध घेऊन त्यातील सामान आजही ह्या संग्रहालयात ठेवलेलं आहे. लोकांनी बरोबर आणलेले मसाले, धान्य, त्यांच् सामान अशा अनेक गोष्टी त्यात आहेत. त्याचबरोबर एका गोष्टीनी आमच सर्वांचच लक्ष वेधून घेतल. पितळी तांबे आणि त्यात साठवलेली नाणी. भारतातून जे वेठबिगार येथे आणले गेले, त्यांच्या मनातील आपण परत एक ना एक दिवस आपण आपल्या मातृभूमीला परत जाऊ, आपल्या मुलाबाळांना परत भेटू, आपल्या वाटेकडे क्षीण डोळे लावून बसलेल्या आपल्या म्हातार्या आई-बापांच्या पायावर डोक टेकवून त्यांचे पाय अश्रूंनी चिंब भिजवू ही इच्छा त्यांच्या तांब्यांबरोबर जमिनीत गाडलेली तशीच राहून गेली. असं वाटलं त्यांनी पै पै साठवलेले तांबे पुरून त्यावर उभारलेली चूल जणू त्यांच्या कुटुंबाच्या पुनर्भेटीवर ठेवलेले निखारे होते.
Chelonia Mydas नावाने ओळखली जाणारी अति प्रचंड आकाराची कासवं 1598 मधे डच लोकांनी खाऊन टाकली आणि त्यांच्या पाठी कपाटं, दरवाजे, टेबलं किंवा इतर शोभेच्या वस्तू बनवायला वापरल्या. त्या कासवांची माहिती, चित्र, त्यांच्या पाठीवरील भली मोठी कवचं तेथे पहायला मिळतात.
जवळ जवळ शंभर वर्षांपूर्वी एप्रिलमधे आलेल्या वादळाने घातलेल्या तांडवाची चित्र चितारली होती. त्यावेळी असंख्य लोक वादळात मरण पावले होते. तेंव्हा सॅटेलाईट इमेजेस हे तंत्रज्ञान विकसीत झालं नव्हतं. वादळाच्या पहिल्या तडाख्यात हेलपाटून गेलेल्या मॅरिशसने जरा निःश्वास सोडला. वादळात झालेल्या नुकसानीचा अंदाज घ्यायला आणि परत एकदा पडल्या झडल्या संसारांना सावरायला लोक बाहेर पडले. पण ती शांतता वादळानंतरची होती तशी वादळापूर्वीचीही होती. म्हणजे वादळाचा भला मोठा Eye शांतपणे मॉरिशसवरून सरकत होता. वादळाच्या त्या डोळ्याला माणसाच्या विजिगीषु वृत्तीची, कुठल्याही संकटांवर मात करण्याच्या
मनोधैर्याची जणु परीक्षाच घ्यायची होती. त्यांची दुःख पचवायची ताकद आजमावायची होती. मृत्यूची शांतता घेऊन येणारा वादळाचा डोळा परत एकदा अश्रुंचा महापूर देऊन गेला.
तेंव्हापासून वादळ आलं की मॉरिशसमधे Cyclone Drill शिस्तबद्धपणे पाळली जाते. फ्रेंच सॅटेलाईटच्या सहाय्याने मॉरिशसच्या जवळ आसपास वादळ येत असेल तर त्याची नोंद घेतली जाते. ते मॉरिशसवरच येत आहे हे नक्की झालं की त्याला नाव दिले जाते. ही झाली वादळाची पहिली ग्रेड. किंवा class 1. वादळाच्या आधी 36 ते 48 तास आधी हा इशारा नागरिकांना दिला जातो. दुसर्या ग्रेडमधे वादळाचा मॉरिशच्या दिशेने प्रवास सुरू होतो. किमान 120 किमी. वेगाने वारे वाहू लागतात. वादळ जमिनीला स्पर्श करण्यापूर्वी 12 तास आधी ही सूचना नागरिकांना दिली जाते. वादळ प्रत्यक्ष येण्याआधी सहातास अधी दिलेली सूचना म्हणजे ग्रेड 3. वादळाचं थैमान सुरूच राहील ही 4थी ग्रेड किंवा class 4. वादळ पूर्ण शमलं की त्यानंतर सर्व उद्योग सुरळीतपणे सुरू करण्याची म्हणजे Cyclone Termination ची सूचना नागरिकांना देण्यात येते. एकदा का वादळाची ग्रेड 3 जाहीर झाली की सर्वांनी आपापल्या घरात दारे खिडक्या बंद करून रेडिओ ऐकत बसायचं हा नियम सर्वजण पाळतात. `लाटा पहायला चला समुद्रावर' अशी नियम मोडणारी वृत्ती नाही. म्हणूनच Cyclone grade 2 पर्यंतचा Insurance
टॅक्सींना मिळतो. बाकीच्यांना नाही. ग्रेड 3 cyclone ला सर्व सरकारी आणि बाकीच्या कचेर्या बंद होतात. लोक घरी पोचतात. ज्यांची घरं वादळाला तोंड द्याला सक्षम नाहीत त्यांची शेजारील शाळंमधे सोय केली जाते.
अजूनही बाहेर वादळाने जोर धरला नव्हता. त्यामुळे माहेबुर्ग वॉटरफ्रंटला जायचं ठरवलं. वादळाने आमच्या उत्साहाला लगाम घालावा लागला. नेहमी शांत असलेल्या समुद्राच्या अंगी भलतच चैतन्य संचारलं होतं. नेहमीच्या तरंगहीन समुद्राला जाग आली होती. सरसर लाटा अंगावर धावून येत होत्या. नेहमी आपले मागचे पाय समुद्रात बुडवून बसणारा लायन माऊंटन गडद निळा झाला होता. शेजारीच पोरं फुटबॉल खेळत होती. वार्याचा रेटाही वाढला होता. तरी समुद्राचे विविध रंग बघत स्तब्ध उभे राहिलो.
------------------------------------------------
( पुढील प्रकरण वाचण्यासाठी खालील प्रकरणाच्या नावावर क्लिक करा. )
खाली दिलेल्या प्रकरणाच्या नंबरवर क्लिक केल्यास ते प्रकरण उघडेल
Comments
Post a Comment