6 देखण्या समुद्र किनार्‍यांचा देश -

6 देखण्या समुद्र किनार्यांचा देश -

                  सूर्याभोवती पसरलेल्या प्रकाशाच्या लाल, केशरी  प्रभावळीप्रमाणे ह्या हिरव्या पाचूच्या बेटाभोवती समुद्राची चमकदार  निळी, हिरवी, मोरपंखी प्रभावळ पसरली आहे. प्रत्येक समुद्र किनारा स्वतःमधे सौदर्याची वेगळीच खासियत घेऊन उभा आहे. आपल्या मायभूमीचा, भारताचा, अंगावर रोरावत येणार्या लाटांचा राकट मर्दानी समुद्र काही काही ठिकाणी शांत वाटला तरी घनगंभीर गाज असलेल्या लाटांचा दरारा मनातून जात नाही. भरती ओहटीच्या वेळा सांभाळतच समुद्रस्नान हा पवित्रविधी उरकावा लागतो. आत्ता ओहटी आहे म्हणून जरा आत शिरावं तर लांब दिसणार्या पाण्याच्या हळुहळु जवळ येणार्या लाटा कधी तुमच्या गळ्यापर्यंत पोचतील आणि पायाला आधार देणारी वाळू कधी पायाखालून निसटून जाईल हे सांगता येणार नाही. रतिमदनाच्या ह्या देशात समुद्रालाही बदलवून टाकलं आहे. बेटाच्या सभोवार असलेल्या प्रवाळाच्या भिंतींमुळे भरती ओहोटी , त्यांच्या वेळा आणि वेळांचं गणित सांभळत बसायला लागत नाही. दिवसाच्या कुठल्याही वेळेला पाणी असणारच आणि प्रवाळाच्या भिंती लाटांना आडवणारच. मोरचुदासारखा किंवा cobalt blue निळाशार, अथांग समुद्र पारदर्शक इतका की थेट त्याच्या अंतरंगात डोकावून बघू शकता. पहिल्यांदा ह्या स्वर्गीय बेटाचं आणि त्याच्यासभोवार पसरलेल्या समुद्राचं दर्शन झालं तेंव्हा  श्री आद्य शंकराचार्यांनी केलेल्या पार्वतीच्या वर्णनाच्या ओळी झरझर माझ्या मनात उतरत गेल्या

सुगंधी गाभ्याचा सुविकसित तो चंदन तरु

उगाळोनी केले परिमलयुता गंध  रुचिरु

सुगंधी कस्तूरी, तयि मिसळले केशर किती

अशी शोभे माते तनुवर तुझ्या गंधित उटी॥19.1

 

अगे माते जाशी तनुवर अशी लावुन उटी

सुगंधी पायाने करित धरणी पावन अती

मिळे पाण्यामध्ये परिमल-उटी स्नानसमयी

तयाच्या आमोदे सकल जल होई पुनितची॥19.2

 

स्वहस्ते ब्रह्मा तो हळुच उचले धूळ पदिची

तुझ्या स्पर्शाने जी अति पुनित झालीच सहजी

तुझ्या स्नानाचे ते पुनित जलही घेउन करी

सहाय्याने त्यांच्या अभिनव उभारे  सुरपुरी  19.3

( - आनंदलहरी )

 

पार्वतीच्या पायाला लागलेल्या धुळीने आणि तिच्या स्नानसमयी तिच्या अंगावरच्या पाण्यात विघळलेल्या उटीचं सुगंधी जल घेऊन खरच विधात्याने स्वर्ग बनवला असला तर तो हाच तर नसेल असं वाटल्याशिवाय राहिलं नाही. मॉरिशसचा प्रत्येक किनारा स्वतःचं वेगळच वैशिष्ठ्य घेऊन स्वागताला उभा आहे. कितीही सांगितलं तरी कमीच पडेल. त्यातील मोजक्या काहींबद्दल फक्त सांगते.

bay du cap  बे जु कॅप -

                          मॉरिशसमधे प्रवेश करता करताच मी क्वात्रबोर्नच्या बस स्टॉपवरून बसरूटचं एक पुस्तक घेऊन आले होतेघरी गेल्या गेल्या मी बस-मार्ग पहायला सुरवात केली. मॉरिशसच्या दक्षिण टोकाला म्हणजे bay du cap  बे जु कॅपला जाणारा बसचा मार्ग समुद्राच्या बर्यापैकी काठाकाठाने जात होता. आपण बसच्या उजव्या बाजूच्या खिडकीत बसलो तर आपल्याला नयनरम्य समुद्र बघत बघत जाता येईल असं मनाशी नक्की केल. दुसर्या दिवशी 5 नं बसमधे बसून शेवटच्या स्टॉपचं तिकिट काढलं. नेत्रांचं पारणं फेडणारा सुंदर प्रवास झाला. मोरपंखीच्या विविध छटा, समुद्राकाठच्या सुरूच्या झाडांमधून गाळून येतांना अजुनच मोहक होत होत्या. वार्याने चेहर्यावर येणारया बटांमधुन माधुरी किंवा मधुबालाच्या सौंदर्यासारख्या. सुरूंमुळे समुद्र का समुद्रामुळे सुरूची बनं सुंदर दिसत होती, सांगता येणार नाही. पण त्या सौंदर्यलहरी माझ्या मनातही उचंबळत होत्या. अधुन मधुन येणार्या गावातील मुलं शाळेत जाण्यासाठी बसमधे चढत होती. त्यांच्या किलबिलाटनी बस जिवंत झाली होती. गावं शाळा मागे पडत होत्या. मधेच महिलांचे घोळके चढत होते आणि काही विशिष्ट थांब्यांना उतरत होते. परत येतांना त्याच सर्व महिला हातात नवीन बनवलेल्या बॅगा, कागदाची फुल असं काहीना काही घेउन येतांना बस मधे परत भेटल्या. सर्वांशी बोलतांना कळलं की दुपारी महिलावर्ग, बास्केटस बनविणे, फुलं बनविणे अशा वर्गांना जात असतो. मधेच डाव्याबाजूला उंचच उंच डोंगराचे हिरवेगार सुळके तर उजव्या बाजूला मोरपंखी समुद्र! डोंगराला खेटून जाता जाता समुद्राच्या मागे राहून गेलेल्या पाण्यावर(लगुन्स) छानसे पूल. ही जागा मला फारच आवडून गेली. रस्त्याच्या कडेने mangrove ची झाडं उथळ समुद्रात उभी होती. mangrove ची ही जातही सुंदर होती. फोटोग्राफरचा त्रिकोणी स्टँड उभा करावा तसा मुळांनी झाडाला पाण्याच्यावर उभं रहायला स्टँड बनवला होता. झाडं त्या मुळांच्या स्टँडवर उभी होती. रावणाच्या सभेत आपल्याच शेपटीच्या गोल गोल विळख्यांनी उंच आसन तयार करून बसलेल्या मारुतीसारखी झाडंही हुशार वाटली       

                             इथला समुद्र आणि ही उंच पर्वतराजी पहायला मधे एखादी उंचावर जागा असायला पाहिजे होती असं मनात यायला आणि एका बाजूला डोंगर तर दुसर्या बाजूला एक छोटीशी  टेकडी तयारच होती. नंतर कित्तीतरी वेळेला ह्या टेकडीवर चढून तीन बाजुंनी समुद्र आणि एका बाजूला हा उंच डोंगर बघतांना निसर्गाच्या कलाकुसरीच गुणगान करायला शब्दच अपुरे पडत गेले. संध्याकाळी अंधार पडायला लागला की मॉरिशसच्या जवळ असलेल्या री-युनियन बेटावरचे दिवे येथून चमकतांना दिसत. हा समुद्र किनारा शांत होता. येथे पर्यटकांची विशेष वर्दळ नसेबसचा हा शेवटचा थांबा मला मोरपंखी समुद्राजवळ सोडून देत असे जिथे मी आणि समुद्र यांच्यामधे अजुन तिसरा कोणी नसे. सूर्याला बघण्याच्या घाईत जमिनीतून उगवणार्या बीजाला डोक्यावर चिकटलेल्या मोठ्या ढेकळाचं ओझं वाटत नाही त्याप्रमाणे हा विशाल मोरपिशी समुद्र डोक्यावरची सर्व चिंतांची ओझी आणि कामाचा व्याप क्षणात विसरायला लावायचा. तासभर समुद्र किनार्यावर बसून आमच्या दोघात शब्देविण संवाद होई. त्याच्या मोरपंखी रंगात मी पूर्णपणे विरघळून जात असे. आमच्याकडे  आलेल्या पाहुण्यांना आल्या दिवशीच मी ह्या पाच नंबरच्या बसमधून फिरवून आणत असे.

      

           गाडीतून जाता जाता अचानक रस्त्याच्या कडेला  हॉटेल्स, कॅसिनो, दुकानं स्विमिंगसूट्सची दुकानं दिसायला लागली म्हणजे समजावं समुद्रकिनारा जवळच असला पाहिजे. !  समुद्र किनारा जवळ यायला लागला की हवाही `बदली बदलीसी' वाटायला लागे. सगळं वातावरण धुंद बनत जाई. रति-मदनाच्या या देशात समुद्रालाच मदन-स्पर्श झालेला मग माणसांचं काय विचारता? रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथवरून  `घे रे कान्हा चोळी लुगडी' पब्लिक दिसायला लागायचं.

 फ्लिक- आँ - फ्लॅक ( Flic en Flac )

                  हा सर्वांचा आवडता बीच. किनार्यावरील सुरूच्या बनात 2-3 हजार गाड्या सहज पार्क होऊ शकतील आणि समुद्राच्या अंगाखांद्यांवर कितीही जीव बागडू शकतील असा लांबच लांब विस्तीर्ण समुद्रकिनारा. कधी काळी आपल्या अफाट पराक्रमाने रावणाने नवग्रहांना पकडून आपल्या सिंहासनाखाली पालथं घालून ठेवलं होतं म्हणे. इथे मदनाच्या नुसत्या झुळकेनेच अनेक आंग्ल रंभा उर्वशींना वाळुत पालथं घालून ठेवलेलं.

स्थानिक लोकांना समुद्रकिनारा ही एकमेव बिनखर्चिक करमणूक असल्याने शनिवार- रविवार समुद्रकिनार्यांवर जणु जत्राच असे. गाड्यांचं पार्किंग म्हणजे गाड्यांचं जणु भव्य प्रदर्शन भरल्यासाखंच वाटे. इथल्या वृद्धांनाही सरकारी खर्चाने महिन्यातुन एकदा समुद्रकिनार्यावर आणलं जात. आपापले टेंट, खाण्याचे डबे (हे काम सोप्प असतं. बॅगेटमधे चिकन किंवा एखादि भाजी भरली की जेवण तयार!) किंवा बार्बेक्यूचं सामान, खुर्च्या, टेबलं, चटया सगळ्यासकट माणसं वाळूवर मुक्कामाला येतात. No hurry. No worry. No curry. फक्त enjoy! अशाच मूडमधे सारे असत.

मॉरिशसचा माड -

                        मॉरिशसला क्वात्रबोन ते फ्लिकाँ फ्लॅक प्रवास एक सुखद अनुभव असे. आज विशाल बापू आमचा मॉरिशयन मराठी मित्रही आमच्या बरोबर होता. मॉरिशसची त्याला खडान् खडा माहिती होती. मराठी असला तरी त्याला मराठीचा नमस्ते पलिकडे गंध नव्हता. नेहमीप्रमाणे  प्रवीण गाडी चालवित होता. गाडी स्टिव्हन्सन अव्हेन्यू (Stevenson avenue ) वरून सें जॉ (St. Jean) रस्त्याला लागली. कपडे, स्टेशनरी, गिप्ट आयटेम्स, ग्रोसरीनी मार्केट्स खच्चून भरली होती. भारतातून आलेले गॉड फादर म्हणजे  चक्क आपले देवबाप्पा मारुती , गणपती , शंकरराव, दुकानांच्या   शेल्फवर आरामात बसले होतेपुजेचं साहित्य, अगरबत्त्या,  धुप कांड्यांनी दुकान भरलं होतं शेजारीच भारतातून आलेले चमको पंजाबी  सलवार खमीसनी  दुकान सजलं होतं. आमचे भारतीय मित्र याला सुटकेस मार्केट म्हणत.अनेक  मॉरिशस निवासी भारतातून सुटकेसेस भरभरून लॉट का माल घेउन येतात. भरपूर किमतीला मॉरिशसला विकतात. माल संपला की परत भारत फेरीची वेळ होतेच. थोड्या थोड्या अंतरावर बुलांजेरी आणि पॅटिसेरीमधे वेताच्या मोठ्या मोठ्या टोपल्यांमधे हाताएवढे लांब बॅगेट पाव डोकावत होते. सें जॉ (St. Jean) रस्ता संपला. दुकानांची  गर्दी कमी होऊन घरं आणि मधून मंदीरं डोकवायला लागली. उजवीकडे को-दे- गार्ड चा काळ्या फत्तराचा खणखणीत  मजबूत डोंगर एक दोन छोट्या टेकड्यांना घेऊन उभा होता. पाल्मा आलं आणि हळु हळु घरा मंदिरांची दुकानांची गर्दी कमी व्हायला लागली. लिचीच्या बागा आमराया, चिंचाची बनं आणि ऊसाचे फड रस्त्याच्या दुतर्फा धावायला लागले. लिचीच्या बागा आमराया मागे पडल्या आणि  दुतर्फा नजर जाईल तिथे ऊसच ऊस आणि समोर अथांग निळा समुद्र दिसायला लागला. हिरण्यगर्भानी आपला सोन्याचा कुंभ सागरावर उधळून दिला होता. डोळे दिपत हेते. गाडीचे सन स्क्रीनचे फ्लॅप्स खाली करून डोळ्यांची अंधेरी घालवत मी तो माड शोधू लागले.

थोड्या उंचीवर असलेल्या  क्वात्रबोन वरून समुद्र किनाऱयाला येतांना असलेल्या अलगद उतारावरुन निस्सान सनी झोकात वळणं वळणं घेत धावायला लागली की प्रवीणच्या ड्रायव्हींग सीटच्या शेजारी बसलेल्या माझे डोळे  ‘तेझाड शोधायला लागायचे. कॅसकॅव्हील हे मराठी वस्तीचं गाव येऊन गेलं की तें झाड दिसायला लागायचं. सार्या हिरव्यागार ऊसात एकांड्या शिलेदारासारखं. ते एक नारळाचं झाड होत. नारळाची अनेक झाड मी पाहीली होती. अलिबागच्या आमच्या बंगल्यातच दिडशे-दोनशे झाडं चौर्या वारत उभी असायची. एक अनोखं नारळाचं झाड सिंधुदुर्गच्या किल्यात मी पाहिलं होतंया  नारळाच्या झाडाला फांदी फुटल्यामुळे इंग्रजी वाय ह्या अक्षराप्रमाणे हे झाड दिसे. काही वर्षांपूर्वी ह्या  झाडावर  वीज पडली. झाड जळालं. अनेक वर्ष ह्या जळक्या झाडाचा सांगाडा तिथे उभा होता. मॉरिशस च्या पँपलेमूस बागेमधे वादळानी पार जमिनीवर झोपवलेली   नारळाची  झाडं आहेत. वादळात साफ कोलमडून जमिनीवर कोसळलेली ही झाडं आजही त्यांच्या जगण्याच्या जिद्दीमुळे ताजी टवटवीत आहेत. त्यांची जगायची जिद्द कायम दाद देण्यासारखी आहे. मग ह्याच नारळाच्या झाडात असं का विशेष होत की ज्या साठी माझे डोळे त्याला शोधत रहावेत? मॉरिशस हे सागरी वादळांच्या क्षेत्रात असलेले बेट आहे. दर वर्षीचा उन्हाळा इथे दोन चार तरी लहान मोठ्या वादळांना घेऊन येतो. साधारण नारळाच्या झाडांपेक्षा ते  झाड बरच उंच होतं. इतक्या सोसाट्याच्या वार्यात सरळसोट वाढलेल्या झाडाच मला नेहमी कौतुक वाटे. एवढं वाढायला त्याला किमान वीस वर्षतरी लागली असणार. वीस पावसाळे पाहिलेल्या या झाडाने किमान वीस ते तीस तरी वादळं सोसली असणार. वादळाला ताठ मानेनी टक्कर देणाऱया त्या माडानं वादळपुढे वाकणारही नाही आणि मोडणार ही नाही हे कस काय साधलं असणार? त्याला पाहून मला आदि शंकराचार्यांच्या शिवानंदलहरीतील

धैर्यासी तव काय वर्णु शिव हे! थारा भया ना जरा

राहे आत्मस्थितीत तू सहजची नाही सुखा पार या

ऐसे धैर्यचि, निर्विकार स्थिति ही लाभे कुणाला कशी

आहे देवगणांसही पतन रे होतीच ते नष्ट ही।।34.1

होती हे भयग्रस्त त्रस्त ऋषिही जाता लया धैर्यची

जाई विश्वप्रपंच पूर्ण विलया उत्पात होई जगी

सारे नष्टचि होतसे बघुनिही तू एकटा निर्भयी

आनंदातचि मग्न तू दिसतसे आनंदसान्द्रा सुधी।।34.2

असा शंकर आठवे.

                      एवढ्यात विशालनी प्रवीणला गाडीचा वेग कमी करायला सांगितला. तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे. तेवढ्यात  मी शोधत असलेल्या  त्या माडाकडे अंगुली निर्देश करीत फ्रेंच झिलाईच्या इंग्रजीत त्यानी विचारल तो माड पाहिला का? तो नेहमीच्या माडांपेक्षा उंच आणि सरळ नाही का वाटत? आज आपण तोच माड पाहू. मलाही तो माड पहायचाच होता. प्रवीणलाही कुतुहल होतच. कॅसकॅव्हीलचा सिग्नल गेला की आपल्याला डावीकडे वळायचय. आमच्या वाटाड्या विशालने दाखवलेल्या रस्त्याने ऊसाच्या मळ्यांमधल्या रस्त्याने गाडी धावू लागली. आता तो माड समोरच दिसत होता. अंतर कमी व्हायला लागल तसतसा तो प्रमाणापेक्षा जास्तच ऊंच आणि मजबूत वाटू लागला. माड जवळ आला. प्रवीणने गाडी थांबविली. गाडीतून बाहेर पडून आम्ही माडाच्या दिशेने चालत होतो. आत्तापर्यंतचं कुतुहल आश्चर्यात बदलत होत. दोन्ही हात खिशात घालून विशाल हासत होता. ``काय कस आहे नारळाचं झाड?’’ तो एक टॉवर होता. माना वर कर करून आम्ही त्याच्या पानांकडे बघत होतो. विशाल हात उंचावून बोटानी त्या पानांमधे काहीतरी दाखवत होता. ते पाहिलत काय आहे ते? पानांमधे काहीतरी चौकोनी वस्तू उन्हात चमकत होती. हो काय आहे ते? रडार! शिवाय रेडिओ, मोबाईल, टि.व्ही. चे सिग्नल ह्याच्यावरूनच पाठविले जातात. मॉरिशस मधे आम्ही सर्व गोष्टी सुंदर बनवितो. इथे कुठलीही गोष्ट तुमच्या नजरेला खुपणार नाहीत. माडच्या खोडाचा परीघही चांगलाच मोठा होता. नारळाच्या झाडाच्या बुंध्याच्या चांगला दुप्पट- चौपट! त्याला एक दरवाजाही दिसत होता. बंद होता त्याला कुलुप  होतं. कुठल्याही दुरुस्तीसाठी शेंड्यावर पोचायला  माडाच्या पोटातून टॉवरला वर जायला  जिना होता. असे  सुंदर माड़ मॉरिशसमधे बर्याच ठिकाणी पहायला मिळाले. प्रत्येकवेळी ते सुंदर माड पाहिले की विशाल च्या वाक्याची मला आठवण यायची----मॉरिशस मधे आम्ही सर्व गोष्टी सुंदर बनवितोतो सुंदर माड माझ्या मनात कायमचाच चित्रित झाला.


 कॅप मालरो Cap Malheureux, कॉईन दु मायर ( Coin Di Mire ) -

मॉरिशसच्या पश्चिम किनार्यावरील जवळ जवळ उत्तर टोकाला असलेलं हे बेट,- कॉईन दु मायर. निसर्ग-सौंदर्याची लयलूट केलेल्या मॉरिशच्या सौंदर्य-मुकुटातला मोरपिशी तुरा किंवा मोरपिसच. पाचू आणि नीलम या रत्नांचा रंग आणि प्रभा घेऊनच हा समुद्रकिनारा चितारला असावा. आमच्याकडे आलेल्या कुठल्याही आणि कितव्याही पाहुण्याला तेथे नेल्यानंतर एकच प्रतिक्रिया असे. पहिले काही मिनिटे तरी कोणाची नजर समुद्रावरून हटतच नसे. तो/ती स्तंभित होऊन इतका सुंदर समुद्र बघतच रहायचे. काही मिनिटानी भानावर आल्यावर `` काय हा सुंदर समुद्र !'' ह्या अर्थी कुठल्यातरी उद्गारवाचकाचेच शब्द मुखातुन बाहेर पडत. आणि नंतर फोटोंची धांदल. किनार्यावरील सुरुच्या झिपर्यांमधुन घेतलेला समुद्राचा आणि समुद्रातील कॉईन दु मायर या बेटाचा  फोटो म्हणजे आपल्याकडच्या `चौदहवीका चाँदच्या' पुढचं निसर्गाचं सौंदर्याचं परिमाण.

                   इथलं निसर्गचित्रण करतांना मला नेहमी वाटे, जसा देवात ठेवलेला गंगेच्या पाण्याचा गडू, गंगेच्या विशाल पात्राची अनुभूती देऊ शकत नाही त्याप्रमाणे निसर्गाचे काढलेले फोटो निसर्गाच्या विशाल पसार्याची कल्पना पूर्णपणे मांडू शकत नाहीत. आकाशातल्या सर्व तार्यांना एखाद्या कागदावर चित्रित करायचं म्हटलं तर आकाशाचाच कागद करायला लागेल. आणि पृथ्वीवरच्या सर्व निसर्गाला एखाद्या जागेत बंदिस्त करायचं झालं तर पृथ्वीचीच कक्षा वापरायला लागेल. प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेला, कानांनी ऐकलेला आणि स्पर्शाने अनुभवलेला निसर्ग हळुहळु झिरपत हृदयापर्यत पोचतो, तेंव्हाच त्याचं विशाल रूप हृदयात कायमचं चित्रित होऊन राहतं. एक कायम स्वरूपी प्रतिमा गुगल ड्राईव्ह किंवा क्लाउड मधे कायमची साठवली जावी तसा. गाई जशा स्वस्थ चित्ताने बसल्या की पोटातलं परत ओठावर आणून रवंथ करत राहतात तसा हा कायम स्वरुपी चित्रित झालेला निसर्ग मनावर केलेल्या एका क्लिक मधे कितीही वेळा अनुभवता येतो. एखादा समर्थ कवी किंवा लेखक एखाद्या ठिकाणच्या निसर्गाचं चित्रण समर्थपणे मांडू शकेलही पण ज्याचा त्याचा निसर्ग ज्याने त्यानेच अनुभवावा.

इथला मोरपिशी समुद्र, हिरवीगार झाडी या निळ्या हिरव्या  रंगाच्या कोंदणात लाल चुटुक मानव निर्मित चर्च आणि त्यावरच्या लाल चुटुक घंटा हे जणु एकमेकांसाठीच बनल्यासारखे वाटे.

             काचेचा तळ असलेल्या नावेतून समुद्राच्या अंतरंगात डोकावून पहायची संधी इथल्या नावाड्यांच्या उत्साहामुळे आमच्यापर्यंत चालून आली. वहिनी आणि भावाला घेऊन समुद्रातील कोरल पहायला गेलो होतो. ह्या द्रवमय देवतेने आपल्या अंतरंगात कितीजणांना आश्रय दिला होता ते पहातांना आश्चर्य वाटत होतं. हल्ली शहरा शहरात माणसांनी बांधलेल्या विस्तीर्ण टाऊनशिप्सना मागे टाकतील अशा प्रवाळांच्या वस्त्या  पाण्याखाली फोफावल्या होत्याविविध आकाराचे, विविध रंगांचे प्रवाळ पाण्याखाली लपले होते. काचेचा तळ असलेल्या नावेमुळे ही प्रवाळांची दुनिया `खुल जा सिमसिम' म्हटल्यावर संपत्तीने ओसंडून जाणार्या अजब गुहेसारखी आमच्यासमोर उघडली होती. हजारो हजारो वर्षांची साठवलेली ही संपत्ती होती. कोरलच्या वस्त्या बनतांना त्यात त्या इवल्या जीवांची एक कमालीची शिस्त होती, सौंदर्यदृष्टी होती त्यांच्या architecture ची

 कमाल होती. स्थापत्यशास्त्राची वहावा करावी तेवढी थोडी होती. प्रत्येक पुढच्या पिढीने त्यांच्या साम्राज्यात अजून अजून मोलाची भर घातली होती. माणूस सर्वात हुशार प्राणी आहे असं म्हणवून घेणार्यांची कीव वाटली. मासे झुंडीने प्रवाळाच्या त्या चिरेबंदी वाड्यांच्या भूलभुलैयातून सुळकन जात होते. कित्ती प्रकारचे मासे, किती रंगांचे मासे!, किती वेगवेगळ्या आकाराचे मासे. उडत्या तबकडीसारखा दिसणारा रे फिश पंख हलवत उडावं तसा पाण्यातून उडत चालला होता. त्याची लांबच लांब  काडीसारखी शेपटी त्याच्यामागोमाग पाण्यातून वहात चालली होती. माशांचे रंग आणि त्यांच्यावर देवाने केलेलं रंगीत टॅटू आजही कोणाला आपल्या अंगावर करायला जमणार नाही.

स्नॉर्केलिंगसाठी पाण्यात उतरतांना नावाड्याने हातात ब्रेडचा चुरा दिला होता. सवईने मासेही तो खायला गोळा झाले. माझ्याभोवती जमलेली ती रंगांची दुनिया वेड लावून गेली. ओठांचा चंबू करून सतत   करत डोळे मिटता माझ्या भोवती जमलेल्या माशांची ती `ओ'रॅकलची' भाषा एकच सांगत होती, मुठीतला खाऊ लवकर काढ.

                       नावाडी बरोबर येतांना गळ आणि अमिष घेऊन आला होता. त्याच्याबरोबर येणार्यांना गळाला लागलेले ताजे ताजे मासे  भेट म्हणून तो देत असे. पहिल्यांदा कुतुहलाने आम्हीही मासा कसा गळाला लागतो बघत होतो. मासा गळाला लागल्यानंतर गळ्यात गळ अडकलेल्या माशाची तडफड बघवेना. नावाड्याने गळ ओढून काढल्यावर त्याचा घसा फाटून तोंडातून येणारं रक्त, त्याचा प्राणांतिक तडफडाट वहिनीला सहनच होईना. श्री आद्य शंकराचार्य हे केरळचे असल्याने त्यांनीही हे दृश्य कधीतरी पाहिलं असाव असं वाटायला लागलं. तडफडणार्या माशाशी केलेली माणसाची तुलना आणि त्याचं लक्ष्मी-नरसिंहाच्या स्तोत्रातलं वर्णन समोर प्रत्यक्ष बघत होतो.

जाळ्यात मी गवसलो भवसागरीच्या नाही तिथून सुटका करु काय देवा

संसाररूप गळ हा मम कंठ छेदी। घायाळ मी तडफडे बहु वेदनांनी।।4.1

प्राणांतिका कळ उठे मम मस्तकी ही। फाटून जाय मुख हे मम प्राण कंठी

धावून या झडकरी बहु त्रस्त हा मी। लक्ष्मीनृसिंह धरि रे मम हात हाती ।।4.2

भारताचे लाडके राष्ट्रपति डॉ. A.P.J. अब्दुल कलाम मॉरिशस भेटीसाठी आले असता थोड्यावेळासाठी ह्याच समुद्र किनार्यावरील कोळी बांधवांना भेटले. कुठल्या देशाचा राष्ट्रप्रमुख दुसर्या देशातील सामान्य नागरिकांना इतक्या आत्मीयतेने भेटण्याची ती बहुधा पहिलीच वेळ होती डॉ. कलामांच्या अत्यंत साधेपणाने आणि अत्युच्च विचारांनी तेंव्हा साराच मॉरिशस देश भारावून गेला होता. वर्तमानपत्र असो किंवा लोकांच्या तोंडी असो एकच विषय होता. राष्ट्रपति डॉ. A.P.J. अब्दुल कलाम! ``माझे आजोबा नावाडी होते आणि माझा मोठा भाऊही नावाडी आहे '' हे त्यांनी सहजपणे तेथील कोळी बांधवांना सांगितल. नावेतून जाता जाता ते आपल्या भावपूर्ण शब्दात म्हणाले, ``समुद्राचं हेच पाणी मॉरिशसच्या आणि भारताच्याही किनार्यांना जोडतं.''

आपल्या देशाचं तारु प्रगतीपथावर नेणार्या ह्या महा-नावाड्याने, ``माझ्या मॉरिशसच्या बांधवांना समुद्रात कोठे जास्त मासे आहेत ही माहिती त्यांना लवकरच भारताच्या सॅटॅलाईट मार्फत उपलब्ध होईल आणि त्यांना कमी श्रमात जास्त मासे मिळतील.'' असं त्यांचं जीवन जास्तीत जास्त सुखमय करण्याचं आश्वासन दिलं.

 

Pointe aux piment पाँत पिमा अर्थात पाँतोपिमा -

मॉरिशसच्या पश्चिम किनार्यावर उत्तरेकडे असलेलं हे पिटुकलं गाव आणि तेथील सुंदर समुद्र किनार्याच्या जोडीने तेथे असलेलं टुमदार छोटसं मत्स्यालय हे मला कितीही वेळेला पहायला आवडायचं. निसर्गाने निर्माण केलेल्या ह्या जीवसृष्टीची कमाल वाटावी असे हे रंगिबेरंगी जीव. एखाद्या जागेचा उत्तम रित्या वापर कसा करावा हे येथेच शिकावं. परत परत ते शब्द माझ्या कानात घुमत, ``आम्ही आमच्या देशाचा कोपरान् कोपरा सुंदर बनवितो.'' एकदा का तुम्ही चांगलं काम हाती घेतलं की देव सुद्धा धावून धावून मदत करतो. असं मला नेहमी वाटतं. इतके सुंदर आणि वैविध्यपूर्ण मासे इतक्या निरोगी स्वच्छ परिसरात ठेवलेले पाहून मन प्रसन्न होई. एखादा माशाचा टँक मोकळा आहे असं समजून पुढे जायला निघावं तर अचानक त्याच्या तळाशी ठेवलेले दगड श्वासोच्छ्वास केल्यासारखे का हलत आहेत म्हणून पहावं तर तो दगडासारखा खडबडीत मासा असे. समुद्राच्या तळाशी बराच काळ बसून राहिल्याने दगडावर जशी कोरलची घरे साचावीत किंवा समुद्र-शेवाळ वाढावे तसे त्यांच्याही अंगावर चिकटलेले दिसे. खूप वर्ष तपश्चर्येला एकाच जागी बसलेल्या वाल्मीकी ऋषींच्या, किंवा च्यवनऋषींच्या अंगावर मुंग्यानी वारुळ बांधलं ते खरच असावं. रंगांची सारी दुनिया ह्या माशांच्या अंगावर अवतरली होती. कदाचित सर्वात  सुंदर मासे बनविण्याची देवांची स्पर्धा घेतली गेली असावी आणि त्यातील पहिल्या 10%ना इथे ठेवलं असावं. आमच्या पाहुण्यांना आवड असेल तर मी तर हे हटके असलेलं मत्स्यालय मी नेहमीच दाखवायला घेऊन जायचे

  ग्री ग्री (Gris Gris) आणि सुफले (Souffle)

मॉरिशस ह्या बेटाचं दक्षिण टोक म्हणजे ग्रीग्री. Gris ह्या  फ्रेंच शब्दाचा अर्थ ग्रे , राखाडीइतर जागी लाटा विरहीत असलेला समुद्र इथे मात्र गर्जना करत असतो. सूऽऽसू वारा. पावसाचा मारा. गडद्द निळा सागर. पांढर्या फेसाच्या उसळणार्या निळ्या लाटा समुद्रातल्या काळ्या फत्तरांना चहूबाजूंनी घेरून त्यांच्यावर आदळत हर्षोन्मादाचे तुषार उडवत काळ्या फत्तरांचीही हृदये विर्दीण करत. फेसाळत सरसर किनार्यावर येऊन फुटणार्या लाटा असंख्य तुषारांचे मोती उधळत. फेसाची  लवलव हालणारी रेघ किनार्यावर सोडून मागे सरत. समुद्रकिनारा म्हणावा असा समुद्रकिनारा इथे नाही. समुद्रसपाटीपेक्षा 20-25 फूट ऊंच खडकाळ सपाटीवरून निळं आकाश आणि निळा समुद्र पहात राहणं हीच इथली मजाइथल्या सुसाट वार्यापुढे शरणागती पत्करून गवतानीही जमिनीलगत खुरटेपणानी रहायच मान्य केलय. संपूर्ण मॉरिशस भोवती असलेली coral reef  प्रवाळाची भिंत मॉरिशसच्या दक्षिण भागात नाही. त्यामुळे लेमोर्न, सुफले, ग्रीग्री ह्या दक्षिण टोकांवर समुद्र रौद्ररूपात गर्जत असतो. Souffle हाही फ्रेंच शब्द! breath / blast हा त्याचा अर्थ. घोंगावणारा  वारा जेथे आहे ते सुफले. उंच खडकावर उभं राहून  गडद निळ्या   समुद्राच्या लाटंची चाललेली दंगामस्ती नुसती बघत रहायची. भल्या मोठ्या खडकांना फोडून दगडांच्या कमानी तयार करणारा हा शिल्पकार अनोखाच!   इतर ठिकाणी तरंग रहित निळाईवर  तरंगत असलेल्या होड्यांचं नेहमी दिसणारं दृश्य मात्र इथे दिसत नाही. आईचे रागावलेले डोळे पाहून मुलानी मागच्या मागे काढता पाय घ्यावा तसे समुद्राचे खवळलेले रूप पाहून होडयांनी ही इथून काढता पाय घेतला आहे.

हे फक्त वानगीदाखल काही समुद्र किनारे .

------------------------------------------------------------------------------------

 ( पुढचे प्रकरण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. ) 

7 वादळांचा देश 

खाली  दिलेल्या प्रकरणाच्या नंबरवर क्लिक केल्यास ते प्रकरण उघडेल

 0  1   3  4  5  6  7  8  9  10   11 

12  13  14  15  16  17  18  19  20  21.

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

भौमासुर / नरकासुर वध –

रामायण Express- ची माहिती