15 अनेक संस्कृतींना सामावून घेणारा अनेक सणांचा देश -
15
अनेक संस्कृतींना सामावून घेणारा अनेक सणांचा देश -
महाशिवरात्र -
महाशिवरात्र जवळ आली आणि रस्तोरस्ती शिवाच्या चित्रांचे फलक दिसू लागले. क्वात्रबोर्नच्या महानगरपालिकेवर शिवभक्तांच्या स्वागताचे मजकूर झळकू लागले. विविध नगरपालिका आणि रस्त्यांमधे असेच फलक दिसत होते. बरेच लोकं पायी जातांनाही दिसू लागले. इथे महाशिवरात्र फार मोठ्या प्रमाणावर साजरी होते. बेटाच्या उत्तर टोकाला राहणारे लोकही पायी गंगातलावला जायला निघतात. ह्या चालत जाणार्या लोकांच्या सेवेसाठी गंगातलावला जाण्याच्या रस्त्यांवर जागोजागी लोकं टेबलं टाकून विविध फळ घेऊन वाट बघत असतात. लांबून चालत येणारे थकलेले भागलेले चेहरे पाहून त्यांना पाणी, सरबत, फळं देतात. बहुतेक लोक हे संध्याकाळी निघून रात्री अथवा पहाटे पहाटे गंगातलावला पोचत. देवदर्शन घेऊन कलशांमधे गंगातलावाचे पाणी घेऊन परत आपल्या मुक्कामी परतत. जेंव्हा हा गंगातलाव आणि त्या काठी शिवमंदिर बनविलं गेलं तेंव्हा काही हिंदू भारतात आले. गंगेचं पवित्र पाणी आपल्याबरोबर घेऊन गेले. ते पाणी गंगातलावात अर्पण केलं. तेंव्हापासून ह्या तलावाला गंगा-तलाव असं नाव मिळालं. लोकांच्या भावना लक्षात घेऊन मॉरिशसचे पंतप्रधानही भारतात येऊन गंगोत्रीच्या गोमुखाचे पाणी घेऊन आले आणि ते ह्या तलावात मिसळण्यात आलं. येथील हिंदू या तलावाला गंगेइतकंच पवित्र मानतात. अशाप्रकारे शिवरात्रीला कलशातील पवित्र जल आपल्या घराच्या जवळ असलेल्या शंकराला अर्पण केलं जाई.
आम्ही आमच्या भारतीय परिवाराला विचारून पाहिलं. आणि चंद्रा आणि श्रीनिवासन् आमच्या सोबत पायी यायला तयार झाले. आमच्या क्वात्रबोर्नच्या घरापासून 20 कि.मी.वर गंगा तलाव असेल तर श्रीनिवासन याच्या घरापासून 24 कि.मी. तेवढं अंतर चालायला काही हरकत नव्हती. इथले स्थानिक लोक पार बेटाच्या उत्तर टोकावरून निघत असतील म्हणून रात्री अपरात्री जात असले तरी आपण सकाळी नाश्ता करून निघू आणि दुपारी दोन-तीन वाजे पर्यंत पोचू आणि दिवसा उजेडी बसने परत येऊ असं ठरवून आम्ही निघालो. तासभर चालल्यानंतर लक्षात आलं ; शिवरात्रीला आपल्याकडे जरी थंडी थोडीशी टिकून असली तरी इथे मात्र चांगलाच उन्हाळा असतो. शिवाय पृथ्वीवरच्या ओझोनच्या थराला अफ्रिकेजवळ भोक पडलं आहे असं आत्ता पर्यंत जे नुसतच ऐकत होतो ते मॉरिशसला अनुभवत होतो. मॉरिशसला आल्यावर प्रखर सूर्यप्रकाशाने डोळे लाल होत आणि चुरचुरत म्हणून सर्वप्रथम आम्हाला U.V. ला तोंड देतील असे गॉगल्स घ्यायला लागले होते. टाल्कम पावडरवर मेकअपची भिस्त असल्याने सनस्क्रीन इत्यादि इत्यादिची फारशी ओळख करून घेतली नव्हती. त्याचा दुष्परिणाम जाणवत होता. भरतासाठी वांगं भाजावं तशी उन्हाने पाठ होरपळून निघत होती. ॐ नमः शिवाय म्हणत जाण्याशिवाय काही जास्त करता येण्यासारखं नव्हतं. वाटेत लोकं आदरभावाने पाणी, सरबत, फळं देऊ करत होते. जाईपर्यंत सूर्याने अक्षरशः आम्हाला पिऊन टाकलं. `नमो उग्राय वीराय' म्हणून ह्या आकाशवीरासमोर आम्ही तर संपूर्ण शरणागतच होतो. पण त्याला काही दया आली नाही. लोकं एवढ्या रात्री का प्रवास करतात हे मात्र चांगलच कळलं. `हाती घ्याल ते तडीस न्या’ सारखी सुवचनं घरी परतूही देत नव्हती. गंगा तलावाजवळ विश्व हिंदू परिषदेनेही एक सुबक देऊळ बांधले होते. त्या देवळाबाहेर ती मजली उंच शंकराची मूर्ती उभी करण्याचे काम तेंव्हा बरेचसे पुरे होत आले होते. गंगा तलाव जवळ आल्याची खूण म्हणून लांबूनच तीन मजली उंच शंकराची प्रतिमा दिसायला लागली आणि जीवात जीव आल्या सारखं वाटायला लागलं. गाडीनी जातांना गाडीनी दोन वळण घेतली का तीन घेतली याची कधी मनात मोजणी होत नाही. पायांची गाडी आली की अर्ध्या अर्ध्या पावलाचा हिशोब मनाला जड करत होता. गाडीतल्या AC चं सुख इतरवेळा जाणवत नसलं तरी आता त्याची महती जाणवत होती. अजुन पाच मिनिट, अजुन पाच मिनिटं असा मनाला धीर देत देवळात पोचलो. आत्तापर्यंतच अवसान संपत आलं होत. येतांना मात्र सरकारी बस रथात बसून घर गाठलं मॉरिशसच्या प्रचंड उन्हाने नंतर कितीतरी दिवस पाठीची लक्तरं लोंबत होती. कोणी पाठीवर हात जरी ठेवला तरी पाठ नको गं नको!! म्हणत विव्हळत होती.
कावडीपर्व –
हा तामिळ सण सर्व तामिळ देवळांमधे सर्व मंत्रातंत्रासह साजरा होत असे. अशावेळेला अंगात वेगवेगळ्या ठिकाणी सळया खुपसून घेणे, पाठीला हुक लावून रथ ओढणे, निखार्यांवरून चालणे हे आजही टिकून असल्याचे पाहून आश्चर्यही वाटलं.
ख्रिसमस, चिनी नववर्ष, गुढीपाडवा हे सगळे सण उत्साहा उत्साहात साजरे होत. चिनी नववर्षा निमित्त होणारी चिनी नृत्य अप्रतिम असतं. कार्यक्रमासोबत चिनी नववर्ष भविष्याचे कागद घरी घेऊन येतांना आपणही गुढीपाडव्याला पंचाग पूजा करतो नवीन वर्षाचं फळ वाचतो तसं वाटलं. एकंदर जगभर ह्या ना त्या प्रकारे भविष्य हा लोकांचा जगण्याचा आधार किंवा उमेद आहे.
गणपती -
मॉरिससमधे 2005 साली 50,000 मराठी मंडळी होती. जवळ जवळ चाळीस मराठी मंडळं आणि फेडरेशन्स आहेत. गुढीपाडवा, 1 मे ला `शिवाजी-डे' तर भाद्रपद चतुर्थीला गणपती उत्सव हे सण फार मोठ्याप्रमाणावर साजरे केले जातात. दर महिन्याच्या संकष्टीचा उपवास मराठी मंडळी मनोभावे करतात. संकष्टीला संकष्टीच म्हणण्याचा प्रघात आजही आहे. मोदकांच्या नैवेद्याऐवजी कानोल्यांचा नैवेद्य दाखवला जातो. खोवलेल्या खोबर्यात साखर घालून केलेल्या सारणाचे मुरड कानोले छान खमंग तळलेले असतात. मुरडही सुबक सुंदर असते. ह्या कानोल्यांचा नैवेद्य दाखवून चंद्रोदयाला उपवास सोडतात. प्रत्येक चतुर्थी वेगवेगळ्या मंडळांकडे साजरी केली जाते. चंद्रोदयापर्यंत मृदंग, चिपळ्यांवर भजनं गायली जातात.
भाद्रपद गणेशोत्सवाला सार्वजनिक पेक्षा घरगुती स्वरूप असले तरी घरोघरी फार मोठ्याप्रमाणावर उत्सव साजरा होतो. इथे बिजु कॅप ( Beau du cap ) ला शाडूची माती मिळते. त्याच शाडूच्या मातीचे हातानी गणपती तयार केले जातात. त्याला प्लॅस्टर ऑफ पॅरिसची साचेबंद सुबकता नसली तरी घरगुती आपलेपण होतं. ऑविएता (Henrita) ( spelling आणि उच्चाराचा संबंध नाही म्हणजे किती नाही ह्याचं हे उत्तम उदाहरण) आणि येथे असलेल्या मराठा मंदीर ह्या संस्थेने भली मोठी सुबक मूर्ती मुंबईहून मागवली होती. घराघरात साजरा होणारा गणेशोत्सव जवळून बघण्याची संधी विशाल बापू ह्या आमच्या मॉरिशन मित्रामुळे मिळाली. माझी मैत्रिण एशवंतीनीही आग्रहाच्या निमंत्रणाचं पत्र पाठवलं होतं.
7 सप्टेंबर 2005 ला आम्ही मॉरिशसच्या वाकवामधे गणेशोत्सव साजरा करत असू असं कोणी आदल्यावर्षी सांगितलं असतं तरी आमचा विश्वास बसला नसता. बदलीच्या नोकरीची हीच गम्मत आहे. घरच्या गणपतीची पूजा करून आम्ही वाकवाला जायला निघालो. वाटेत ठिकठिकाणी पताका, मॉरिशसचे ध्वज फडकत होते. सोबत Glory to Lord Ganesha, Family welcomes you to Lord Ganesha चे गणपतीचे चित्र असलेले, मोठे मोठे फलक, फडफडत होते. वाकवाच्या रस्त्यावर जातांना मुंबई रोड 3, मुंबई रोड 4 अशा पाट्या आहेत. बहुतेक मराठी लोकांचीच वस्ती असलेल्या या भागाला इतर लोक मात्र कँप बंबैय्या म्हणूनच ओळखतात. विशालच्या मामांकडे गेलो. बाहेरच स्वागताचे फलक झळकत होते. संपूर्ण घरालाच सजावट केली होती. हॉलमधे चारी बाजूला केळीचे खांब लावून केलेल्या मखरात गणपतीची तीन फुटी तरी मूर्ती विराजमान होती. देवापुढे रंगवलेल्या तांदुळांची सुंदर रांगोळी घातली होती. पांढरया चाफ्याच्या फुलांचा भरगच्च हार, दूर्वा, पत्री, फुलं, नारळ, पान, सुपारी, दक्षिणा, निरांजन, धूप, दीप, नैवेद्य यथासांग षोडषोपचार पूजा पाहून मन प्रसन्न झालं. हात आपोआप जोडले गेले. गणपतीच्या हातावर प्रसादाचा कानोला विराजमान होता. पूजा पहाटे साडेचार वाजताच सम्पन्न झाली होती. कोकणात असल्यासारखं वाटत होतं. भाषा, आणि संस्कृतीचे धागे किती अतूट असतात नाही? आपल्या उगमापासून हजारो मैलावर शेकडो वर्षानंतरही आपलं स्वत्त्व जपण्यामागे काय प्रेरणा असवी? इंग्रज, फ्रेंच ह्यांच्या संस्कृतीचा नांगर फिरूनही मराठीचे तजेलदार लसलसणारे कोंब मनाला सुखावून गेले. तेवढ्यात घरातून विशालच्या आई आणि मामीनी येऊन आता महाप्रसाद घेऊन जायच हं म्हणून प्रेमळ आग्रह केला. आम्हाला अजून एका ठिकाणी गणपती पूजेचं आमंत्रण होतं. हा गणपती सार्वजनिक होता. एका वस्तीत राहणार्या सर्व कुटुंबांनी एकत्र येऊन विशालचेच नातेवाईक `शिवाजी ' यांच्या गॅरेजमधे हा गणपती बसविला होता. गणपतीच्या चारी बाजूला चार केळीचे खांब लावून केलेलं मखर इकोफ्रेंडली आहे हे सांगायची गरज नव्हती. चार छोट्या प्लस्टिकच्या पिशव्यांमधे पाच पाच कानोले घालून ते चारही केळीच्या खांबांना बांधले होते. गुरुजी आले आणि पूजेला सुरवात झाली. आपल्याकडील गुरुजी आणि ह्या गुरूजींमधे दिसण्यात तर काहीच फरक दिसत नव्हता. थोड्याचवेळात अस्खलित संस्कृतमधे त्यांनी पूजा सांगायला सुरवात केली. ``गुरूजी भारताततून आणले आहेत का?'' मी विशालला विचारलं. ``नाही नाही. गणू कदम इथलेच गुरुजी आहेत. भारतातल्या आमच्या कुडाळकर महारांजांकडून सर्व शिकून आले आहेत.'' गणू कदम संस्कृत बरोबर मराठी आणि क्रियॉलमधेही पूजा विधी समजाऊन सांगत होते. मंत्र पूजा, पुष्प पूजा, पत्र पूजा -- --हवन अशी सविस्तर पूजा होत असतांना जमलेली सर्व मराठी मंडळी पूजेतील श्लोक मनोभावे म्हणत होते. सर्वांचे पाठांतर आणि उच्चार ऐकल्यावर मलाच आपल्याला या मधील अनेक श्लोक माहीत नसल्याची खंत वाटली. गणपती अथर्वशीर्ष लहानांपासून थोरांपर्यंत तोंडपाठ होतं. पूजा संपल्यावर मंत्रपुष्पांजली म्हणायच्या आधी गणू कदम यांनी मराठीत सांगितलं, ``ह्या वर्षी आपण जरी गॅरेजमधे गणपती बसविला असला तरी पुढच्या वर्षी आपण खास बांधत असलेल्या हॉलमधेच गणपती बसविला जाईल. आपण पूजा जरी घराघरात करत असलो तरी मंत्रपुष्पांजली आपण विश्वकल्याणासाठी म्हणत आहोत. त्याचा अनुवाद त्यांनी मराठी आणि क्रेयॉलमधेही सांगितला. भारतापेक्षा आपलं मराठीपण भारताबाहेरच किती अतोनात जपलं जात आहे हे पाहूनही आशेचा अंकुर दृढ होत होता. शांतीपाठ सुरू झाला. सारे मनोभावे गणू कदमांबरोबरीने म्हणत होते - - ॐ शान्तिः - -वनस्पतयः शान्तिः - -- ! मन्त्रोच्चाराने सारं वतावरण भारून गेलं होतं.
``महाप्रसाद is
compulsary'' पूजा संपल्या संपल्या विशालने सांगितलं. स्वतः शिवाजी आणि इतरांनीही जेऊन जायचा आग्रह केला. घराच्या अंगणातच मांडव घातला होता. अंगणात टेबलं खुर्च्या मांडल्या होत्या. टेबलावर केळीची पानं आडवी मांडली होती. सर्व बायका स्वयंपाक करण्यात गुंतल्या होत्या. कोणी कच्च्या केळांचं साल काढून चकत्या करत होत्या. कोणी इतर भाजी चिरत होत्या.कोणी बाकीची कामं करत होत्या. भारतात सुद्धा अप्रूप वाटावं अशा केळीच्या पानांकडे कौतुकाने बघत असतांनाच विशाल म्हणाला, ``ही सर्व केळीची पानं आदल्या दिवशी आम्हाला इथल्या जंगलातून तोडून आणायला लागतात. मॉरिशच्या जंगलामधे केळीची, आणि रावण केळींची खूप झाडं वाढतात. मॉरिशसमधे इतका पाऊस आणि पावसापेक्षा जोरदार असलेल्या वार्यामधे न फाटलेली केळीची पानं मिळवणं कसं शक्य होत असेल? बायका पुरूष सर्वजण जेवण वाढायचं कामं करत होते. आपल्या दुधी च्या चवीची पण कलमी पेरूसारख्या दिसणार्या शुशु (chow chow) भाजी, त्याच्या वेलीसारख्या पानांची भाजी अजून पाच सात वेगवेगळ्या भाज्या, beans, लिंबू आणि मिरचीचा ठेचा, सफरचंद आणि कच्च्या पपईचं लोणचं, पोळ्या, असं अस्सल मराठमोळी स्वादाचं जेवणं आम्ही जेवत होतो. वरण, भात, भाजी हे सर्व शब्द इथलेही मराठी लोकं जसेच्या तसे वापरत होते. परत एकदा जाणवलं, पोळीचा उल्लेख भाकर असा होता.
गणपती विसर्जन -
मॉरिशसमधे गणेश चतुर्थीच्या दुसर्या दिवशी गणेश विसर्जनाची सरकारी सुट्टी (National Holiday) असते. बहुतेक मराठी मंडळी दिड दिवसाचाच गणपती ठेवतात. काहींकडे पाच दिवसांचा तर मराठा मंदीरचा दहा दिवसांचा गणपती असतो. इथल्या गणेश-विसर्जनाची आम्हालाही उत्सुकता होती. इथल्या बडोदा बँकेचे मॅनेजर श्री रोकडे आणि त्यांच्या पत्नी संजीवनी यांच्या बरोबर आम्ही वाकवाला पोचलो. शिवमंदिरापाशी विशाल आमची वाटच बघत होता. त्याच्याबरोबर कालच्या शिवाजींच्या घरी पोचलो. गणपतीला कालच्या मखरातून एका चौरंगावर स्थानापन्न केलं होतं. मराठी अनेक तरूण धोतर आणि झब्बा घालून सजले होते. काहींनी धोतरावर टी-शर्टस् घातले होते. टी-शर्टवर गणपतीचं चित्र आणि त्याखाली Glory to Lord Ganesha असं लिहिलेलं होतं. विसर्जनाच्या मिरवणुकीची सर्व तयारी झाली आणि विशालने गणपतीचा चौरंग डोक्यावर उचलला. ढोलकीच्या तालावर सारे गात होते. - - ``झाला झाला हो आनंद झाला माझा गणपती नाचत आला.`` सर्वजण तालासुरात गात होते `` बोला बोला लंबोदरा बोला माझा गणपती नाचत आला'' कोणी चिपळ्याही अतिशय सुंदर वाजवत होते. ह्याला इथे झाकरी म्हटलं जातं. कदाचित झाँकीचा तो अपभ्रंश असावा किंवा काही मराठी शब्द आपल्याकडून सुटुन गेले असावेत. आपलं स्वत्त्व टिकवण्याची पराकाष्ठा दिसत होती. नऊवारी, नथी, पैंजण,अंबाडा, अंबाड्यावर गजरा अशा तरुण मुली सजल्या होत्याच पण त्या जोडीला इवल्या इवल्या चिमुरड्याही नऊवारीत ठुमकत होत्या. नऊवारीला इथे काष्टी म्हणतात. बहुतेक सर्वांकडे ही मराठी गाणी फ्रेंचमधे लिहिली होती. त्यांच्या मराठीवर चढलेल्या फ्रेंच मुलाम्यामुळे ती मूळ मराठी आहेत हे कळायला आम्हालाही बराच वेळ लागला. त्यांच्या एका गाण्यात वारंवार ताल हा शब्द येत होता. ते गाणं म्हणता म्हणता एक तरुण माझ्या जवळ आला . Aunty what is the meaning of `Tal’?'' त्याने न राहवून विचारले. ``रिदम'' त्याला तो म्हणत असलेल्या मराठी गाण्याचा अर्थही समजाऊन सांगितल्यावर भलताच खूष झाला. नवीन पिढीला मराठी दुर्मिळ होत चाललं आहे. तोडकं मोडकं मराठी बोलणारी ही पिढी मराठी गाणी म्हणत थेट कोकणातल्या बाल्यांप्रमाणे नाचत होती. चेहरे पाहून genetic मराठी नातं स्पष्ट जाणवत होतं. आपल्याच कोकणी बांधवांना मॉरिशसमधे भेटणं हा आमच्यासाठी एक अपूर्व सोहळा होता. मिरवणुकीनी आता बाळसेदार आकार घेतला होता. रस्ता अरुंद असला तरी रस्त्याच्या अर्ध्या भागतूनच मिरवणूक चालू होती. मोजके पोलिस हजर होते. ते जाणारा आणि येणारा ट्रॅफिक आलटून पालटून सोडत होते. रस्ता अरुंद असूनही कुठेही ट्रॅफिक जॅम झाला नाही. गाण्यांचा, ढोलकी, झांजा चिपळ्यांचा आवाज जवळ आला की पुढच्या गल्लीतला गणपती आणि सोबतची मराठी मंडळी मिरवणुकीत सामिल होत होती. प्रत्येक गणपती हा माणसांच्या डोक्यावरच विराजमान होता. त्यामुळे त्याच्या अकारमानाला आणि उंचीलाही आपसुक मर्यादा होतीच. कुठेही डिजे बिभत्स नाच हा प्रकार नव्हता. कुठेही रस्ता अडवून कोणी उभे नव्हते. नवीन येणार्या गणपतीचं कपूर्र आरतीने स्वागत होत होतं. नव्याने सामिल होणार्या गणपतीसोबतची मंडळीही मिरवणुकीतल्या गणपतींच तसच ओवाळून स्वागत करत होती. गाणी गात, नाचत, बार्ने नावाच्या छोट्याशा नदीच्या काठी मिरवणूक पोचली. नदीच्या दुतर्फा उसाच्या मळ्यातून विसर्जन बघण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती. त्यात चिनी, फ्रेंच, मराठी याव्यतिरिक्त भारतीय वंशाचे तामिळ, तेलगू आणि इतरही लोकं होते. नदीकाठी देवाच्या उत्तरपूजेसाठी छोटे छोटे ओटे बांधले होते. त्यावर मूर्ती ठेवल्या गेल्या. आरत्या, गाणी, मंत्रपुष्पांजली, कर्पूर आरती झाली आणि अचानक 10-12 तरुणांनी कपडयांसहीत एकाच वेळेस नदीच्या पात्रात धडाधड उड्या मारल्या. सर्व गणपती नदीच्या काठावर आणण्यात आले. प्रत्येक गणपतीसाठी एक एक माणूस आधीच नदीच्या पात्रात होता. प्रत्येकाकडे गणपती सुपूर्त करण्यात आला. सर्वांनी हातात गणपती घेऊन नदीपात्रात अर्धगोल तयार केला; आणि मूर्ती आपल्या चेहर्यासमोर अशी धरली की तीरावरच्या लोकांना माणूस दिसू नये फक्त गणेशमूर्तीच दिसावी. गणपती बाप्पा मोर्या म्हणत सर्वांनी एकाच लयीत तीन डुबक्या घेतल्या. तिसर्या डुबकी नंतर क्षणभराची शांतता पसरली; आणि गणेश विसर्जन करून सर्व डोकी एकदम बाहेर आली. एक शिस्तबद्ध संस्मरणीय गणेश विसर्जन पहायला मिळालं.
मॉरिशसला मराठी मंडळी वस्त्या वस्त्यांनी अनेक ठिकाणी राहतात. मॉरिशसच्या दक्षिण-पश्चिम किनारपट्टीवर बेजु कॅपला ही बरीच मराठी मंडळी राहतात. तेथेही गणपती उत्सव फार मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. तेथेही मोठे मोठे गणपती बसविले जातात. त्यांची विसर्जन मिरवणूकही शिस्तबद्ध असते. समुद्राच्या ठरवून दिलेल्या भागात विसर्जनास परवानगी असते. समुद्रात आधीपासून अंगरक्षक होड्या, life jacket सह अंगरक्षक उपस्थित होते. फार पूर्वीपासून गणपती उत्सव कोकणात किती सुंदरपणे केला जात असावा ह्याची ती पावती होती. कुठच्याही कर्णकर्कश्य वाद्यांची अनुपस्थिती उल्लेखनीय होती. रस्ते बंद नाही रस्त्याच्या एका बाजूने मिरवणूक जात असली तरी कुठल्याही वाहनांची कोंडी होणार नाही ह्याची पूर्ण खबरदारी घेतली जात होती. चिपळ्या, टाळ, इतर अनेक वाद्य सुरेल वाजवली जात होती. त्यावर सर्वजण गात होते. इथेही तेच बाले- नृत्य सुंदर वाटलं. 12 वाजता सुरू झालेली ही विसर्जनावी मिरवणूक बरोबर वेळेत 4 वाजता संपन्न झाली तेही पोलीसांनी कुठलाही हस्तक्षेप न करता. 150- 200 वर्ष कित्येक पिढ्यांनी केलेली ही संस्कृतीची जपणूक आश्चर्यकारक होती.
त्याचा अनुभव आम्हाला वेळोवेळी येत होता. विशाल, एशवंती ह्यांच्यामुळे आमची अजून मॉरिशसच्या लोकांची ओळख होत होती. त्यांच्या कार्यक्रमाची आमंत्रणही येत होती.
------------------------------------------------------
( पुढील प्रकरण वाचण्यासाठी खालील प्रकरणाच्या नावावर क्लिक करा. )
खाली दिलेल्या प्रकरणाच्या नंबरवर क्लिक केल्यास ते प्रकरण उघडेल
Comments
Post a Comment