16 ग्लोबल मराठी-

 

16 ग्लोबल मराठी-

विशाल आणि एशवंती -

भाषा ही लोकांना सांधणारी फार मोठी ताकद आहे. मनांना एकसंध चिकटवणारा डिंक आहे. एकवेळ फेव्हिकॉलचा जोड विजोड दिसेल पण एका भाषेमुळे जवळ आलेली मनं तंतोतंत सांधली जातात. मराठीने मॉरिशसमधेही आम्हाला विशाल आणि एशवंतीसारखे मित्र मिळवून दिले. त्यामुळे आमचा मॉरिशस मुक्काम सुंदर आठवणींचा खजिना-महाल तयार झाला.

विशाल आम्हाला  कुठे भेटला आठवत नाही. पण मॉरिशसच्या सर्व मुक्कामात तो आमच्या सोबत राहिला. अनेक नवीन नवीन प्रेक्षणीय जागा दाखवत राहिला. मॉरिशसचं अंतरंग उलगडून दाखवायला त्याने मदत केली. तेथील भारतीय मराठी परिवारात त्याच्यामुळेच आमचा शिरकाव झाला. मॉरिशसमधे प्रत्येक हॉटेलमधे पेप्सी पोचविणे हे छोटसं वाटणारं काम तो अत्यंत मनोभावे करत असतांनाच अचानक त्याला कामावरून काढून टाकलं गेलं. त्याचवेळी आम्ही भारतात परतलो. भारतात आल्यावर  फोन मधील मॉरिशसचं फोन कार्ड काढून भारतीय सिमकार्ड घालायच्या घाईत मॉरिशसची सिमकार्डस् चुकून दुकानातच राहून गेली  आणि त्यांच्या आणि आमच्या मधला एकमेव फोन हा तंतुच हरवून गेला. कधीतरी मॉरिशियन लोकं मुंबईला भेटले तर त्यांना मी विशालबद्दल सांगे. पण परत कोणीच त्याच्याबद्दल कळवलं नाही. यथा काष्ठं काष्ठं - - - समुद्रात पडलेली दोन लाकडं एकमेकांना भेटावी अशी ही भेट अर्ध्यातच सुटून गेली.

 एशवंती - टाइट जिन्स, तोकडा टॉप, ओठाच्या धनुकलीवर गडद चमकता रंग --- एशवंती मला भेटायला आली होती. ``बोंझु - - Nice to meet you यशवंती. Welcome!'' मी स्वागत केलं. ``No - --No --No! I am ऽऽ ऽऽ वं ऽऽ ती not  यशवंती.'' शक्य तेवढं स्पष्ट करत ती बोलली.  तिला हसून घरात  घेत, मी तिला सोफ्यापर्यंत घेऊन आले. बसायला सांगितलं. चहा, पाणी स्वागतानंतर हळुच तिला विचारलं , तुझ्या नावाचा अर्थ काय ? नावाला काही अर्थ असू शकतो हे तिला माहीतच नव्हतं. जॅक,जिल, टॉम अ‍ॅनी, बनी सोबत वाढलेल्या मुलीला, मराठी मुलीचं नाव इथे एशवंती असू शकतं. एवढच मान्य होतं. गप्पा मारता मारता तिला सांगितलं ``भारतीय संस्कृतीत प्रत्येक नावाला अर्थ असतो. तुला तुझ्या नावाचा अर्थ सांगू का?'' तिला आश्चर्याचा धक्का बसला. ``सांगा ना सांगा! मला कधी माहीतच नव्हता माझ्या नावाचा अर्थ.'' ``खूप सुंदर आहे तुझ्या नावाचा अर्थ -- - नित्य यशस्विनी! Always successfull!''. स्वतः यशस्वी होणारी आणि दुसर्यांना यश मिळवून देणारी. ती हरखून गेली. मधे गेलेला 200 वर्षांचा काळ आणि 6000 कि. मि. चं अंतर यामुळे अर्थ इथल्या मातीत मिसळून गेला होता एवढच! तिला तानाजी आणि यशवंतीची ही गोष्ट सांगितली. यशवंती घोरपडीची गोष्ट ऐकून ती आश्चर्यचकित झाली. तिला शिवाजी महाराज माहीत होते. किंबहुना इथल्या मराठी लोकांचं ते दैवतच आहे. आपण जे काय आज आहोत ते शिवाजीमुळेच आहोत. आपलं मराठीपण हे सर्वस्वी शिवाजीमुळेच आहे हे त्यांच्या पूर्वजांनी त्याच्या मनावर खोल बिंबवलं होत. एशवंती मुंबईला येऊन गेली होती. तुला भारतातलं काय लक्षात राहिल? मी तिला विचारल. `` मी दादर स्टेशनला उतरले. वरच्या ब्रिजवर आले आणि बघतच राहिले. लोकांचा महासागर उसळला होता. मी कितीतरी वेळ आश्चर्याने बघतच बसले. इतकी माणसं मी कधीच पाहिली नव्हती.

मराठी ललनांसोबत-

एशवंती एक आमंत्रण घेऊन आली होती. मॉरिशच्या मराठी ललनांसोबत भेटण्याचं. काही कार्यक्रम दोघांनी एकत्रितपणे करायचं. मी लगेचच होकार देऊन टाकला. स्त्रीवर्ग एकत्र आल्यावर बर्याच वेळेला पहिली सुरवात अन्नपूर्णेच्या आठवणीनीच होते. त्याप्रमाणे माझी मैत्रीण श्वेता कर्णिक आणि मी दोन मराठी पदार्थ करून दाखवणार होतो आणि त्या त्यांचे दोन मराठी पदार्थ करून दाखवणार होत्या. मला पिठलं भाकरी करून दाखवायची हौस असली तरी भाकरीचं पीठ दुर्मिळ प्रकारात मोडत होतं. शेवटी बटाटेवडा आणि शिरा  करुन दाखवायचं ठरलं. मला भाषणही करायचं होतं. सोप्या इंग्रजीत. कारण इंग्रजी ही जरी इथली सरकारमान्य भाषा असली तरी इथला पिंड फ्रेंच आणि क्रेयॉलवरच पोसला आहे. सर्व हॉल खचाखच भरला होता. माझ्या समोर बसलेल्या मराठी बहिणींशी ओळख करुन घ्यायला श्वेता आणि मी जेवढ्या उत्सुक होतो तेवढ्याच त्याही आमच्याशी बोलायला उत्सुक होत्या.

तेथे प्रथम आहारतज्ञ अशा त्यांच्या Health Minister चं भाषण झालं. त्या वारंवार सर्वांना जंक फूड खाऊ नका म्हणून सल्ला देत होत्या. बाहेरचे गातोपिमा (मिरचीची भजी) खाऊ नका. ते वारंवार त्याच त्याच तेलात तळलेले असतात. अशा तेलात तळलेल्या पदार्थांनी शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल वाढून अनेक दुष्परिणाम होतात हे सांगून त्या स्त्रियांचं प्रबोधन करत होत्या. स्त्रियांचे असे मेळावे भरवून त्यांच्यावरच सर्व लक्ष एकाग्र करण्याची ही पद्धत मला खूपच भावली. त्यांना आम्ही बनवलेले पदार्थ खूप आवडले. आम्हाला मराठी मंडळींकडून ही आमंत्रण आलं. त्याना भेटायची संधी आम्हाला दवडायची नव्हती. हा कार्यक्रम मॉरिशसच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात होणार होता. मंदिराच्या ओवर्यांवर संपूर्ण लग्नाचा स्वयंपाक करायची छान सोय होती. आम्हाला गॅस, भांडी कसलीच अडचण नव्हती. भारतात करंजी कशी करतात, त्यासाठी ओल्या नारळाचे सारण कसे शिजवून घेतात हे प्रात्यक्षिक श्वेता आणि मी त्यांना करून दाखवलं. रवा + मैदा + मोहन घालून वरची पारी बनवून दाखविली. आमची खुसखुशीत करंजी त्यांना खूप आवडली. त्यांनी करून दाखवलेली करंजी आमच्यासाठी पूर्ण वेगळीच होती. खोवलेल्या नारळात साखर घालून त्यांची सारण करायची रीत सोपी होती. वरचं आवरण मात्र उकडलेल्या रताळ्याच्या किसात मैदा घालून तयार करायचं किवा नुसत्या मैद्याचं. विठूमाऊलीच्या देवळात मॉरिशसच्या मराठी बहिणींना भेटल्याचा आनंद पंढरीच्या वारीला गेल्यावर जनाबाई आणि बहिणाबाई भेटल्यासारखा परमोच्च वाटला. त्यांनी भेट म्हणून दिलेल्या घड्याळावरही रंगीबेरंगी मासे सुळकन पोहत जात.

 मराठी मंडळी फेडरेशन -

5 सप्टेंबर 2005 ला मराठी मंडळी फेडरेशनच्या वतीने पुण्यात Infosis मधे शिकण्यासाठी म्हणून पाठविलेल्या 11 जणांचा सत्कार होता. आम्हालाही निमंत्रण होतं. कार्यक्रम महात्मा गांधी Institute  (MGI) मधे होता. ही C.B.S.C. चा अभ्यासक्रम  असलेली सुंदर शाळा भारताच्या सहकार्यानेच बांधून दिली आहे. विशालने सांगितल्याप्रमाणे मोटार रोडने रोझ हिल डावीकडे सोडून रिजवी (redute) चा रस्ता धरून मोका' ला वळलो. डावीकडे M.G.I.पाटी दिसत होती             

 शिलाबाय बापू मंत्री प्रमुख पाहुण्या होत्या. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच शिलाबाय बापू आणि कृष्णा बाबाजी हजर होते. येथे कुठलाही कार्यक्रम असला तरी सर्व आमंत्रित अगदी प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविलेले मंत्री, प्राईम मिनिस्टर सुद्धा बरोबर पाच मिनिटे आधी त्यांच्या खुर्चीत बसलेले आढळतील. कार्यक्रमाची सुरवात गायत्री मंत्राने तर शेवट शांतीपाठाने झाला. कोणीही त्याला आक्षेप घेतला नाही.

             सत्कार करण्यासाठी मुलांची नावं माईकवर घ्यायला सुरवात झाली. नवीन पिढीची धुरा वाहणार्या  टाइट जिन्स, शॉर्ट टॉप्स, सुबक कापलेल्या केसांमधून मधुनच रंगवलेल्या केसांच्या लाल, पिवळ्या, जांभळ्या उठावदार बटा, अशा मुली, मुलं उठून येत होती. त्यांची नाव मात्र त्यांच्या पेहेरावाला कुठे जुळत नव्हती. त्या मॉड मुलींची नावं एसूबाय, शांताबाय, ईटाबाय तर मुलांची बाबाजी, तानाजी ऐकतांना कानांना तरी पटत नव्हती. मराठी स्त्रीच्या नावापुढे बाई किंवा बाय लावायची शिवाजीकालीन प्रथा आज अचानक भेटल्याने आम्ही चक्रावून गेलो होतो. जिजाबाई, येसूबाई, अहिल्याबाई नंतर खंडित झालेला भूतकाळ आज अचानक ह्या मुलांच्या रूपाने आमच्यापुढे उभा राहिला होता.

मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा -

                  अशाच एका शाळेत मराठी मंडळीचे मुख्य नारु यांनी मनाचे श्लोक पाठांतराची स्पर्धा होती त्याला प्रवीणला आणि मला परीक्षक म्हणून बोलावलं होतं. साधारण पाचवी ते आठवी नववी पर्यंतची मुलमुली होती. तीन चार वर्गांमधे स्पर्धा सुरू होती. प्रत्येक वर्गात तीस चाळीस तरी मुलं होती.  आम्हाला ज्या गटाचे परीक्षक म्हणून बोलावलं होतं त्यात  तीस पस्तीस तरी मुल मुली स्पर्धेसाठी श्लोक पाठ करून आली होती. सर्वजण बिनचूक छान म्हणत होती. मराठीवर चढलेली फ्रेंच झिलाईही गोड वाटत होती. भारतापासून इतक्या दूर राहूनही मराठी संस्कार सांभाळणारी पिढी पाहून आश्चर्य वाटत होत. पहिल्या नंबरासाठी आम्ही निवडलेल्या धिटुकल्याचं नाव बालकवी होतं. त्याच्या आजोबा किंवा काकांना बालकवींच्या कविता खूप आवडत म्हणून त्याचं नाव बालकवी ठेवलं गेलं. तेथील मराठी तरुण तरुणींनी बसवलेली मराठी नाटकं आणि त्यांच्या रंगित तालमी पहायला विशाल घेऊन गेला. फ्रेंचची कल्हई लावलेल्या मराठीत नाटक ऐकायला मजा येत होती. त्यांचा उत्साह, मराठी वेषभूषा , फ्रेंचमधे लिहिलेले मराठी संवाद पाहून मजा वाटली.

                    आपल्याकडचं आंब्याचं रोप मॉरिशसला लावलं तर थोड्याच दिवसात तेथल्या हवामानाशी जुळवून घेऊन ते जसं नोव्हेंबर डिसेंबरमधेच फळेल तसे आपलेच मराठी बांधव ह्या फ्रेंच  हवामानात मराठी मनाचे श्लोक, नाटकं, सुगमसंगीत ह्या मराठी संस्कृतीनी संपन्न होत होते. मॉरिशियन संस्कृतीची हवा सांभाळत.

 शिवाजी डे

इथे 1 मे हा दिवस इथल्या मराठी लोकांमधे शिवाजी डे म्हणूनसाजरा केला जातो. शिवाजी आणि विनायक दामोदर सावरकरांबद्दल येथील लोकांना अतिशय आदर आहे. एशवंती सांगत होती, `` आमचे जुने लोक आम्हाला नेहमी सांगत असतात की आपण जे काय आहोत ते फक्त शिवाजीमुळेच आहोत. शिवाजी राजांनीच हिंदू धर्म टिकवला. अकबर आणि औरंगजेबाचं तोंडभरून कौतुक करणारा इतिहास इथे सांगितला जात नाही. जो होता तसा इतिहास सांगायचं धारिष्ट इथल्या विजयालक्ष्मी टिळकांच्या मॉरिशसच्या इतिहासात सापडलं.

भारतातील तज्ज्ञ विद्वांनांची भाषणं ऐकायला मिळावित. त्यांच्याकडून आपल्या महान पूर्वजांची माहिती मिळावी अशी तेथील मराठी लोकांची मनापासून इच्छा असे. आपल्याला मराठी उत्तमोत्तम नाटके, पहायला मिळावीत, गायनाचे कार्यक्रम ऐकायला मिळावेत ही त्यांची इच्छा असे. त्यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र सरकारकडून काही कार्यक्रमही पाठवले जात. बर्याचवेळेला त्यात ` आपल्यांची वर्णी लावलेल्या' कार्यक्रमांचीच संख्या जास्त असे. भारतात येऊन अनेक चांगल्या गोष्टी अनुभवलेल्या ह्या लोकांचा अशा कार्यक्रमांमुळे विरस होई. आणि त्याची खंत ते आमच्याजवळ व्यक्तही करत. कित्येक वेळा तेथे भाषण देण्यासाठी आलेल्या वक्त्यांचा ओढा मॉरिशस पहाण्याकडेच जास्त असे. इथल्या लोकांना काय कळतय असं समजून तर कधी, इथे मला कोण भारतातून बघायला येतोय असं समजून त्यांनी केलेली जुजबी, थातुर-मातुर भाषणं ऐकून त्यांची कीव येई. सावरकरांबद्दल प्रचंड ओढ असलेल्या या माणसांना सावरकरांसंबंधी काही तरी सारवा सारव करणारं भाषण देणारे कॉलेजचे प्रोफेश्वर कम थोर वक्ते ऐकून आम्हीच खाली मान घालून परत आलो.

भारताचा स्वातंत्र्य दिन-

भारतमातेच्या पायातील दास्याच्या शृंखला तुटल्या तो स्वातंत्र्य दिन मला नेहमीच दिवाळी दसर्यापेक्षा मोठा सण वाटतो. पोलीसमधे तर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हेच सण असतात. क्रॉसबेल्ट आणि तलवार कमरेला लाऊन परेडला जाणार्या प्रवीण सोबत जाणं हा मला माझाही बहुमान वाटतो. वार्यावर फडफडणार्या तिरंग्याची शान पाहून स्वतंत्र भारतात जन्माला आल्याच्या अभिमानाने आणि समाधानाने  मान आपोआप ताठ होते. त्या दिवशी जमेल तेथे झेंडावंदनाला मी आवर्जून जातेच. सुट्टी म्हणून कुठल्यातरी पिकनिकला जाण्याची कल्पना मला मनाला रुचत नाही. स्वातंत्र्याची सत्तरी मुंबईत साजरी करतांना मागे वळून पाहतांना मला भारताचा पन्नासावा स्वातंत्र्य  दिन दिल्लीच्या लाल किल्यासमोर साजरा होतांना पाहता आला ह्याचं जेवढं समाधान आहे तेवढंच भारताचा साठावा स्वातंत्र्यदिन मॉरिशसमधे भारतीय दूतावासासमोर तिरंगा फडकवून  साजरा केल्याचा आनंद.

इंदिरा गांधी Cultural Centre - 

                     येथील मुलामुलींना भारतीय शास्त्रीय संगीताबद्दल प्रचंड ओढ होती. त्यासाठी सहजपणे शिक्षक उपलब्ध नव्हते. भारताने त्यांची गरज लक्षात घेऊन तेथे इंदिरा गांधी Cultural Centre  ची स्थापना केली होती. तेथे योगासने, भारतीय संगित  शिकवले जाई. तेथील वाचनालयही सुरेख होते. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम तेथे होत. भारतीय संगीताच्या महिफिली होत. भारतीय अनेक उत्तमोत्तम चित्रपट तेथे दाखविले जात. रोज योगासने शिकविली जात. ह्यात तेथील भारतीयांसोबत तेथील बाकी वर्णांचे लोक सुद्धा उत्साहाने भाग घेत. आम्ही असतांना तेथिल योगाच्या स्पर्धेत एक चिनी महिला प्रथम आली होती. ज्यांना रामायण वाचण्याची आवड असेल त्यांना रामायणाची प्रत फुकट दिली जात असे. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र भारत आणि मॉरिशसमधील संस्कृतीची देवाण-घेवाण करणारा, भारतीय संस्कृती भारताबाहेर जपणारा एक दोन्ही देशातील दुवाच होता.

मातृभाषेचा झटका -

           मातृभाषेचे संस्कार दूरदूरच्या माणसांनाही किती जवळ आणतात हे वारंवार अनुभवत होते. पण आपली भाषा इतरांना काय कळतीए ह्या फुशारकीत वावरतांना अचानक एका वेगळ्याच प्रसंगालाही सामोरं जायला लागलं. एकदम जमिनीवरच आले.

       मैत्रीणी आल्या होत्या भारतातून. ललिता, रेखा आणि मी window shopping करत फिरत होतो बाजारातून. गाडीचे स्पेअरपार्टस् आणि ॅक्सेसरीजच्या दुकानासमोरून जाताना एकदम चमकून मैत्रीण म्हणाली ``अगं आत्ता आमच्या गाडीला आम्ही हे अस्सेच दिवे बसवून घेतले आहेत. चल चल आपण विचारू इथे त्यांची किंमत काय आहे.'' आम्ही तिघीजणी दुकानात शिरलो. शोकेसमधे ठेवलेल्या दिव्यांची किंमत विचारली. समोरच्या बाईंकडून थंड प्रतिसाद. दोनचारवेळा इंग्रजीत विचारूनही बाई काही बोलता शांतपणे दुसरच काम करत आहेत पाहिल्यावर आम्ही बाहेर पडलो. ``अगं चल चल तिला बहुधा इंग्रजीही कळत नसावं. चल फार वेळ घालवायला नको.'' खिदळत, आरामशीर  मराठीत संवाद साधत दुकानाबाहेर पडलो. समोरच्याला आपली भाषा येणं हे कधी कधी किती सुखावह असतं.

त्याचवेळेला आमच्या दुप्पट गतीने आतल्या बाई धावत बाहेर आल्या. ``थांबा थांबा मला मराठी चांगलं कळतं.'' त्यांचा तो आवेश पाहिला आणि बरीच गडबड झाल्याच लक्षात आलं. महाभारताचं युद्ध  नको म्हणून मी लगेचच नरमाईचं धोरण स्वीकारून त्यांची माफी मागून टाकली. विषयांतर करत त्यांना त्यांच्या अस्खलित मराठीचं रहस्य विचारलं. पण माझं खरं पानीपत तर आता होणार होतं. ``मी भारतात मराठी शिकले आहे'' तिने मोठ्या अभिमानानने सांगितलं. ``वा वा! कुठे शिकला?'' –मी. ``पुण्यात!, फर्ग्युसनमधे'' ``अरे वा छान!'' मी पण फर्ग्युसनमधेच होते. तुम्ही किती साली होता?'' त्यांनी सांगीतलेलं वर्ष माझ्या नाही पण प्रवीणच्या फर्ग्युसनच्या वर्षांशी जुळत होतं. आता तरी गप्प बसावं. पण मी पुढे चालूच --  ``होका?'' माझ्यातली स्त्री जागी झाली असावी. ``कुठचा विषय होता तुमचा?'' ``पॉलिटिकल सायन्स!'' मी खडा टाकून बघावं म्हणून विचारलं- ``प्रवीण दीक्षित माहीत आहे?'' ``तो आणि मी एकाच वर्गातच होतो. आम्ही बरोबरच होतो!'' - ती ``मी त्याची बायको.''- मी ``काय? प्रवीण इथे आहे?'' बैल मुझे मार चा नमुना मी सादर केला. मी तिला आमचा पत्ता, फोन नंबर दिला. यायचं निमंत्रणही दिलं पण मनातून तह झालाच नव्हता. तिने बहुधा प्रवीणच्या बायकोवर काट मारली असावी आणि प्रवीणसोबत त्या रस्त्यावर येऊनही नंतर `ते' दुकान मलाही परत सापडलं नाही(?)

 

मैत्रिणी -

आत्तापर्यंत भारतातून आलेल्या भारतीयांची चागलीच एकजूट झाली होती. माझ्या भारतीय मैत्रिणींमधे जास्त करुन दाक्षिणात्यच जास्त होत्या. सगळ्यांना भारतीय ह्या एका धाग्याने घट्ट बांधून ठेवलं होतं. भारतात असतांना कदाचित आम्ही एकमेकींच्या परंपरांना, जेवणाला नावं ठेवली असती. तेथे मात्र माझ्या हातची आमटी भाजी पासून करंजी, श्रीखंडापर्यंत मेनू त्या आवडीने खात होत्या आणि मीही त्यांच्या भातप्रकारांचे उत्साहाने स्वागत करत होते. भारतात राहून जेवढा एकोपा साधला नसता तेवढी एकात्मतेची तीव्र निकड मॉरिशसमधे आमच्यात आली होती.  थेंब नळातून टपकण्यापूर्वी पाण्याच्या सगळ्या कणांना कसं आवरून सावरून घेतो, जास्तीत जास्त एकत्र रहायचा प्रयत्न साधत असतो-- खाली पडण्यासाठी !  नळाच्या कडेच्या आधारानी किती काळ लोंबत राहतो पण कुठल्याही कणाला सहजासहजी एकटं पडु देत नाही, तसचं भारताच्या वेगवेगळ्या कोपर्यातून आलेले आम्ही अनेकजण येथे एकमेकांना धरून रहात होतो. गुण्यागोविंदाने एकत्र येत होतो.

                   ह्या दाक्षिणात्य मैत्रीणी दर शुक्रवारी एकत्र जमून ललितासास्रनामाचा पाठ करत असत. दाक्षिणात्यांइतकी महाराष्ट्रात स्तोत्रपरंपरा रुजली नाही. सामुदायिक स्तोत्र पठण हेही तितकेसे होत नाही. चला त्या निमित्ताने ललितासहस्रनाम शिकून होईल म्हणत काही दिवसात  मीही शुक्रवारच्या कबिल्यात सामिल झाले. माझी एक मराठी मैत्रीण संजीवनी आणि मी बघता बघता त्यांच्या हेलांसकट ललितासहस्रनाम म्हणायला लागलो.

स्थानिक हिंदू तामिळ किंवा तेलगु मैत्रीणीही आमच्या दाक्षिणात्य मैत्रिणींमुळे आमच्या ओळखीच्या झाल्या.

दिव्यफळ सीताफळ

एकदा पूजेसाठी तेथील स्थानिक ललनेने आम्हाला सर्वांना बोलावले होते. मी जेवणार नाही म्हटल्यावर ती म्हणाली, ``मी तुम्हाला असं एक फळ देते की जे फारच दुर्मिळ आणि फारच रुचकर आहे. त्याची चव फारच मधुर असते.'' `एक ऋषी येऊन राजाला एक दिव्य फळ देऊन जातात ' अशा कुठल्या कुठल्या गोष्टींमधील दिव्य फळं आठवून माझंही कुतुहल वाढलं. आणि `फळाच्या आशेने' मीही हो म्हटलं. थोड्याच वेळात स्वयंपाकघरात जाऊन ते दिव्य फळ घेऊन आली तिच्या हातात काय आहे हे पहाण्याची माझी उत्सुकता शिगेला पोचली असतांना मला तिच्या हातात एक सीताफळ दृष्टीस पडलं.   

            ` हे होय' मी मनातल्या मनता म्हटलं; ह्या सीताफळानी मला दोनदा चकवलं तर. मला एकदम आमची दिल्लीची बदली आठवली. मी पहिल्यांदाच हिंदी प्रदेशात हिंदीशी मारामारी करत होते. एकदा भाजी आणायला गेले होते. माझ्या शेजारी उभ्या असलेल्या बाईंनी विचारलं, ``सीताफल कैसे दिया?'' भाजीवाल्याने ``दस रु किलो'' म्हटल्यावर मीही अत्यानंदाने ``मग मलाही एक किलो देच'' म्हणून सांगितलं. सगळ्या भाजीमधे सीताफळं काही दिसेनात. मागितलेला लाल भोपळा  मात्र भाजीत पाहून मी त्याला ``भय्या सीताफळ कहाँ हैं? ये भोपळा क्युं दिया'' असं विचारताच भोपला? भोपला क्या होता हैं? सीताफल यहीं तो हैं।'' असं म्हणत लाल भोपळ्याकडे अंगुलीनिर्देश केला. ``काटा है अभी वापस नहीं लूँगा'' म्हणूनही सांगितले. सीताफळा ऐवजी पदरी पडलेला भला मोठा लाल भोपळा. `करम की गति न्यारी संतो' म्हणत मला घरी आणायला लागला. तर आज एक अद्वितीय फळ म्हणून मला एकेकाळी पाहिजे असलेलं सीताफळ अलगद माझ्या हातात आलं होतं. भाषा आणि स्थानपरत्वे काय काय गडबड होऊ शकते त्याचा परत अनुभव आला. शक्यतो चेहर्यावरचे भाव बदलू नयेत अशा प्रयत्नात ``वा वा मलाही हे फळ फारच आवडतं'' असं म्हणायच्या आधीच माझ्या शेजारी बसलेल्या माझ्या भारतीय मैत्रीणीला दाबता आलेलं हसू फुस्सकन बाहेर पडलं. ``हे होय! आमच्या शेतावर ही सीताफळं येवढी येतात की आजोबा हारे भरभरून सीताफळं नातवांसाठी पाठवत असतात.'' तिचा चेहरा गोरामोरा व्हायच्या आतच मी तिला हे फळ मला फारच आवडतं हे पटवून देण्यात जरा यशस्वी झाले. सीताफळ खरचच गोड आणि छान होतं. आपल्या देशातील सगळ्या फळांचं पहिल्यांदाच मला अप्रूप वाटलं. भारत नररत्नांची भूमी आहे तशी फलरत्नांचीही भूमी आहे.

                 येता जाता काही दुकानांमधील भारतीय वंशाच्या स्त्रियांचाही परिचय होत गेला. जाता येता त्यांना ``बोंझू '' म्हणून पुढे जायचे हा पायंडा पडून गेला. कधी वेळ असेल तर त्यातील एक  दोघींशी बोलून  मग मी पुढे जाई. भारतातून कपडे घेऊन येऊन ते मॉरिशसला विकायचा एकीचा व्यवसाय होता. काही दिवसांनी तिने विचारलं, ``भारतीय स्त्रिया चाळीशी आली की म्हातार्या सारखं का वागायला लागतात?'' ``म्हणजे कसं ''? समजून मी विचारलं. ``म्हणजे त्या मेकअप करणं, छान छान कपडे घालणं, दागिने घालणं सोडून का देतात?''  ``अगदि साध्या राहतात  असंच नं?’’ मला जरा हसू आलं कदाचित तिच्या प्रश्नाचा रोख माझ्याकडे असावा. अगं त्यांचा पाक पक्का झालेला असतो. साखरेचा पाक पक्का झाला की पाण्यात त्याचा थेंब टाकून बघतात. पाक पक्का नसेल तर आजूबाजूचं पाणी त्याला विरघळवून टाकत.  पक्क्या पाकाच्या थेंबाला पाणीही विरघळवू शकत नाही. विरघळवणार्या पाण्यात तो अजून  दृढ होतो. घट्ट होतो. तिला फारसं पटणारं नव्हतं आणि कळणारही नव्हतं.

मॉरिशसची मुशाफिरी

 

                         मॉरिशसमधे बरीच वर्षे राहिलेल्या श्वेताची मैत्री झाली आणि अनेक दुकाने, बाजार तिच्यासोबत हिंडून आले. दोघींनाही खरेदीची खूप आवड नव्हती पण मॉरिशसची मुशाफिरी करायला काही हरकत नव्हती. पोर्ट लुईला किराणा मालाची घाऊक दुकाने आहेत. तेथील डाळी आणि बहुतेक माल आफ्रिकन असे. टपोर्या डाळी, मसाल्याचे पदार्थ आणि इतर माल आपल्याकडच्या मारवाड्याच्या किराणामालाच्या दुकानांसारखा पोत्यांमधे भरून ठेवलेला असे. स्वच्छता मात्र बघून घ्यावी अशी असे.  ह्या टुरिस्ट सिझनच्या सुमारास  तेथे मादागास्करहून लवंगा आणि काळी मिरी येत असे. त्याचा घमघमणारा उग्र सुगंध जराही लपून राहत नसे. भारतातून येणार्यांना ही अनोखी भेट घेऊन जायला फार आवडे. काळ्याशार लवंगा आणि काळेभोर मिरे त्यांच्यातल्या स्निग्धांशाने तुकतुकीत दिसत. ते कागदात बांधून ठेवले तर कागदही त्यांच्यामधल्या नैसर्गिक तेलाने तेलकट होत असे. हे मसाले घरी असेपर्यंत त्यांचा वास घरात दरवळत असे. अजुनही मादागास्करचा एक पदार्थ म्हणजे साल काढलेले, कच्चे, टपोरे शेंगदाणे. त्यांचा आकार आपल्या गुजराथी दाण्याच्या दुप्पट मोठा असे. मायक्रोवेव्हमधे त्याच्यावर मीठाचं पाणी शिंपडून केलेले खारे दाणे मस्त होत. कुठल्याही प्रसंगी ते माझ्या मदतीला येत. अचानक आलेल्या पाहुण्यांना चहा कॉफी बनवे बनवे पर्यंत मायक्रोवेव्हमधे गरमा-गरम खारे दाणे तयार होत. प्रत्येक वेळेला नवीन स्टार्टर काय करावं हा माझा प्रश्न संपून गेला. तेथे सुबाना बिस्किट कंपनीची बिस्किटांचं दुकान होतं. ही एकमेव मॉरिशियन बिस्किट कंपनी होती. मॉलमधे बिस्किट मिळायची पण ती फ्रांस, ऑस्ट्रेलिया इत्यादि परदेशातून आलेलली. साधारणपणे कुकीज सारखी गुबगुबीत आणि चोको चिप्सनी भरलेली. एखादेवेळेस ठिक वाटली तरी रोज त्यांचा अत्याचार नको वाटे. आपल्यासारखी पार्ले जी आणि मोनॅको ही भारतीयांना आवडणारी बिस्किटं दुर्मिळ असत. त्याची उणीव सुबाना भरून काढे.

              दक्षिण अफ्रिका आणि मादागास्करहून पडद्यांचं येणारं कापड फार सुंदर असे. त्यावर जिराफ, हरीण, आकाशात उडणारे पक्षी, झाडी अशी निसर्गचित्रे असत. ती अगदि खरी वाटतील इतकी सुंदर चितारलेली असत. ही कापडं स्वस्तही असतं. पोर्टलुईच्या दुकानातून तर असे पडदे शिवूनही मिळत. माझ्या भारतातून आलेल्या मैत्रिणीला मी ते कापडं दाखवलं तिलाही भलतच आवडलं. किती मिटर लागेल ह्याचा अंदाज मात्र येईना. भली मोठी दोन बोचकी घेऊन ती भारतात गेली. नंतर भेटली तेंव्हा माझं कुतुहल मला गप्प बसु देईना. ``कसे झाले गं पडदे?'' मी तिला विचारलं. ``अग फक्त तीस मिटर कापड कमी पडलं''. तिने हसत हसत सांगितलं. भारतातून अनेक कापड गिरण्यांनी  मॉरिशसला मुक्काम हलविल्यामुळे  पोर्ट लुईला अरविंद मिलची कापडं सुंदर मिळत. येथील मॉलमधे मिळणारी विविध रंगी साखर भारतातून येणार्या लोकांना किंवा भारतात गेल्यावर भेट द्यायला चांगली वस्तू असे. अनेकांनी आपल्या होणार्या सूनेची ओटी विविध रंगी साखरेने भरून घेतली.

   मसाल्याच्या पदार्थांची, उदबत्यांची, पडद्यांची, कपड्यांची, अनेक प्रकारच्या हँडिक्राफ्ट्सची, आफ्रिका खंडातील अनेक देशातील वस्तु मिळणारी अशी अनेक प्रकारची दुकानं मला परिचित झाली.

रत्ननगरी

                 कोडा वॉटर फ्रंट ही हिंदी सिनेमांच्या शूटिंगसाठीची लाडकी जागा. कोडा वॉटर फ्रंट च्या बाजारातून त्या दुकानांच्या गर्दितून दुपारभर नेत्रसुख घेत मैत्रिणींबरोबर कधीमधी हिंडायला मलाही आवडे. मॉरिशसमधे खरेदीची माझ्या मैत्रिणींना सर्व माहिती असे. त्यांच्याकडून काही जुजबी माहिती माझ्यापर्यंत येई. एका दुकानात  रंगवलेली , चित्र रेखलेली मोठी मोठी शहामृगाची सुंदर अंडी मी पहिल्यांदाच तेथे पाहिली.

              आफ्रिकेच्या आणि मादागास्करच्या जमिनीतून बाहेर आलेली डोळे दीपवणारी रत्ने पहायला मला आवडे. कुठचीही सुंदर गोष्ट रसिकपणे पहायला मला आवडते. ह्या सर्व गोष्टी घरी आणल्या की मात्र त्यातील नवलाई जाते. आपल्यालाच डोळ्यात तेल घालून त्यांची जपणुक करण्यासाठी त्यांचे सेवक व्हावे लागते. त्या त्यांच्या जागीच शोभतात. भल्या मोठ्या हस्तिदंताचा उभा छेद (L.S.) घेतल्या प्रमाणे भल्या मोठ्या पाचसहा फुट उंचीच्या गारगोटीच्या दगडाला (Quartz) काकडी चिरल्यासारखं उभं चिरून त्याचे दोन भाग दुकानाच्या  दरवाजातच कमानीसारखे शोभून दिसत. त्याच्यामधे गडद दाट जांभळ्या पासून फिक्क्या जांभळ्यापर्यंतच्या छटांमधील लखलखणारे जांभळे, नीळे,गुलाबीसर अ‍ॅमॅथिस्टचे स्फटिक डोळे दीपवून टाकीत. त्यांच्यावर सोडलेल्या प्रकाश झोतांमधे ते अजूनच चमकत. ` देवाची करणी आणि नारळात पाणी ; दगडांच्या पोटात रत्नांच्या खाणी. अशी पुढची ओळ माझ्या ओठी येई. इतके सुंदर अ‍ॅमॅथिस्ट पाहून माझ्या डोळ्यांचं पारण फिटे. अनेक दुकानांची शोभा वाढवणार्या या अ‍ॅमॅथिस्टच्या जोडीने तेथील हिरे, पाचू, माणिक, पुष्कराज यासारख्या रत्नांनीही दुकानं झळाळत असत. समुद्राला रत्नाकर तर पृथ्वीला रत्नगर्भाच म्हणणं योग्य होईल. प्रत्येकीचे दमलेले पायच शेवटी रत्नावली, रत्नमालांमधून मनाला बाहेर काढत असतं.

-----------------------------------------------------------------

 ( पुढचे प्रकरण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. ) 

17 मॉरिशियन लग्न 

खाली  दिलेल्या प्रकरणाच्या नंबरवर क्लिक केल्यास ते प्रकरण उघडेल

 0  1   3  4  5  6  7  8  9  10   11 

12  13  14  15  16  17  18  19  20  21.


Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

भौमासुर / नरकासुर वध –

रामायण Express- ची माहिती